भागवतधर्मी वारकरी संप्रदायातील एक विलक्षण मधुर, उत्कट असा भावोत्सव म्हणजे ‘काला’! वारकरी कीर्तनसप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने करावयाची हा तर एक प्राचीन दंडक. श्रीपांडुरंगाचा पूर्वावतार गणल्या जाणाऱ्या बाळकृष्णाच्या बाळलीलांचे भावोत्कट शब्दचित्र रेखाटणारे बाळक्रीडेचे आणि काल्याचे अभंग म्हणजे, निवृत्तिनाथांपासून ते थेट निळोबारायांपर्यंतच्या संतविभूतींचे एक अम्लान असे अक्षरलेणेच जणू. गोकुळातील घराघरांत शिरकाव करून दही-दूध-लोणी मटकावणाऱ्या नंदकिशोराचा आणि त्याच्या सवंगड्यांचा अशाच एका मोहिमेदरम्यानचा लाघवी संवाद शब्दबद्ध केलेला आहे तुकोबांनी एका गोड अभंगात. ज्या घरावर डल्ला मारायचा आहे ते ठिकाण जवळ आलेले असून आता सगळ्यांनी एकसलग माझ्यामागे यायचे, असे गोपाळांना बजावणाऱ्या नंदनंदनाने दिलेला एक अतिशय महत्त्वाचा इशारा- ‘‘हळूहळू चाला। कोणी कोणाशीं न बोला।’’ अशा शब्दांत तुकोबारायांनी अक्षरांकित करून ठेवलेला आहे. मुदलात, ‘काला’ हे आहे एक रूपक. दही आणि लाही जसे एकजीव होतात, तसे देव आणि भक्ताचे प्रगाढ सामरस्य प्रगट करते काल्याचे रूपक. काल्याच्या अभंगांतील विविध रूपकांद्वारे सूचक उद्बोधन घडवत असतात संत. साधनेच्या मार्गावर वाटचाल हळूहळू व जपूनच करावी लागते, हाच संदेश तुकोबा तुम्हाआम्हाला देत आहेत- कृष्णाने त्याच्या सवंगड्यांना दिलेल्या इशाऱ्याद्वारे! आपल्या दीड-दोन दशकांच्या साधकावस्थेदरम्यान नामसाधनेचा जो परमोत्कर्ष तुकोबांनी साधला, त्या प्रवासाचे टप्पे महाराजांनी कमालीच्या सूक्ष्मपणे अभंगांत ठायी ठायी नोंदवून ठेवलेले आहेत. कोणाही नामप्रेमीला मार्गदर्शक ठरावेत असाच तो मार्गक्रम होय. अगदी पहिल्या टप्प्यात मनाला निग्रहाने नामचिंतनामध्ये गुंतवावे लागते. ‘‘घेईं घेईं माझे वाचे। गोड नाम विठोबाचें।’’ अशा शब्दांत तुकोबाराय नामसाधनेचा अगदी आरंभीचा तो टप्पा प्रांजळपणे विशद करतात. मुखाने नामस्मरण चालू असताना मनाने मात्र दशदिशांना उंडारू नये यासाठी- ‘‘मना तेथें धांव घेईं। राहे विठोबाचें पायीं।’’ असे त्याला निक्षून सांगत, शरीर आणि मन यांचे साहचर्य नामचिंतनादरम्यान अभंग राहावे यासाठी जपाव्या लागणाऱ्या दक्षतेचा रोकडा वस्तुपाठ तुकोबाराय आपल्या पुढ्यात समूर्त करतात. रसनेबरोबरच मनानेही एकदा का नामरसाची गोडी चाखली, की साकारतो या मार्गक्रमणादरम्यानचा दुसरा टप्पा. अंतरंगात या अवस्थेदरम्यान नामघोष सतत गतिमान बनतो, हा स्वानुभव मग- ‘‘सदा नामघोष करूं हरिकथा। तेणें सदा चित्ता समाधान।’’ अशा शब्दांत प्रगट करतात तुकोबा. सततच्या निदिध्यासाद्वारे नामचिंतनाचे जणू वळणच लागते साधकाच्या जिव्हेला. ‘‘पडिलें वळण इंद्रियां सकळां। भाव तो निराळा नाहीं दुजा।’’ अशी या पर्वातील देहमनाची अवस्था तुकोबाराय वर्णन करतात. नामसाधनेच्या प्रगतीमधील एक निर्णायक स्थित्यंतर घडून येत प्रवासातील तिसरा टप्पा अवतरतो या बिंदूवर. नामाच्या अवीट माधुर्याला चटावलेली साधकाची रसना, या तिसऱ्या पर्वादरम्यान, त्याच्याही कह््यात राहत नाही. ‘‘माझी मज झाली अनावर वाचा। छंद या नामाचा घेतलासे।’’ अशा प्रत्ययकारी शैलीत नामसाधनेचा परमोत्कर्ष अभिव्यक्त करतात तुकोबाराय. नामसाधनेच्या मार्गक्रमाचे हे टप्पे स्पष्ट करून होतकरू साधकांना डोकवून पाहण्यासाठी लख्ख आरसाच पुढे धरला आहे तुकोबांनी जणू! – अभय टिळक

agtilak@gmail.com