अभय टिळक agtilak@gmail.com

एकादशी ही तिथी आहे का स्थिती, असा अथवा हा प्रश्न पडण्याचे मुळात कारण काय असाही मुद्दा उपस्थित करील कोणीही एखादे वेळी. ते स्वाभाविकही ठरेल. दर १५ दिवसांनी येणाऱ्या एकादशीस उपवास करतात अनंत साधक.

‘उपवास’ या संज्ञेचा तरी नेमका अर्थ काय? आहारातील जिनसांमध्ये फरक केल्यामुळेच केवळ उपवास घडतो का? उपवासाच्या दिवशी फराळ करणे हे तरी संतांना मंजूर आहे अथवा नाही? सगळे  प्रश्नच!  ‘काय तुझा जीव जातो एका  दिसें । फराळाच्या मिसें ।  धणीं घेसीं’  असा रोखठोक सवाल करण्यामागे काही तरी हेतू खचितच असला पाहिजे तुकोबांचा. अकारण शब्द वेचणाऱ्यांतले नाहीत तुकाबोराय. एकादशी ही तिथी नसून ते आहे एक व्रत, असे प्रतिपादन आहे महाराजांचे. ‘पंधरा दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार’ या, तुकोबा तुम्हा आम्हाला विचारत असलेल्या प्रश्नात दडलेली आहे एक खंत. महिन्यातील दोन दिवससुद्धा एक व्रत आपल्याला पाळता येऊ नये, याचा विशाद वाटतो तुकोबारायांना. त्यासाठी कारण आहे तसेच सज्जड. तुकोबारायांना वाटणाऱ्या या विस्मयाचे मूळ दडलेले आहे त्यांचे पूर्वसुरी असणाऱ्या पैठणवासी नाथरायांच्या एका वचनात. ‘एकादशी एकादशी । जया छंद अहर्निशीं,’ हे पहिले चरण असणारा एक अभंगच आहे नाथांचा. एकादशीचे व्रत मनोभावे जपण्याचा छंद ज्या उपासकाच्या जिवाला अहोरात्र जडलेला असतो, त्याला विश्रांतीसाठी वैकुंठ हे हक्काचे स्थान होय, असा निर्वाळाच आहे नाथांचा! असीम मुक्ततारूपी वैकुंठाची प्राप्ती आणि अहर्निश जडलेला एकादशीचा छंद यांचे नाते काय,अशी जिज्ञासा कोणाच्याही मनात जागावी आता या टप्प्यावर. ‘सकलां इंद्रियां मन एक प्रधान। जे ही करी ध्यान विठोबाचें’ अशा शब्दांत करतात तुकोबाराय तृप्ती त्या जिज्ञासेची. पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेद्रिये यांच्या जोडीने अकरावे असे मनही ज्या दिवशी परतत्त्वाच्या ध्यानात निमग्न होईल त्या दिवशी एकादशीचे व्रत यथासांग घडले असे खचितच समजावे, असा आहे सांगावा तुकोबांचा.

व्रताची शिस्त जपण्याच्या बाबतीत मन हे कमालीचे अवखळ इंद्रिय. मन:पूर्वक परातत्त्वचिंतन घडणे हे झाले एकादशीच्या व्रताचे सार. अशी एकादशी अहर्निशी घडावी, ही असोशी पैठणवासी नाथरायांच्या मनीमानसी. हे घडणे तर महाकठीणच! निदान महिन्यातून दोनदा तरी कायेने आणि मनाने एकमय बनून परतत्त्व ध्यानात स्थिर व्हावे, अशी किमान अपेक्षा तुकोबारायांची तुमच्या आमच्याकडून. दशेंद्रियांवर ज्याची अनिर्बंध सत्ता चालते ते मनही ध्यानमग्न होऊन निर्द्वद्व बनले, की त्रलोक्यात अणुमात्रही ‘कुंठा’च नाही त्याला कोठे. अशा जितेंद्रिय साधकांचा वास वैकुंठातच चिरकाल असावा, हे मग स्वाभाविकच नव्हे का? पाण्याचा थेंब समुद्रात विरावा त्या न्यायाने, मन एकदा का उन्मन झाले ध्यानाच्या माध्यमातून, की जाणिवेचें विसर्जन ठरलेलेच. ‘मी’च्या जाणिवेचा समूळ विलय घडवून आणलेल्यांचे वसतिस्थान म्हणजेच भू-वैकुंठ पंढरी! ‘मी पणाचा कोस ठाव। पाहतां गाव पंढरी’ अशी साक्षच आहे या संदर्भात नाथरायांची. वारी करायची पंढरीची ती त्यासाठीच. ‘अभिमान नुरें। कोड अवघेंचि पुरें’  ही होय फलश्रुती वारीची. तर ‘तुका म्हणे डोळां। विठो बैसला सांवळा’  ही ठरते अंतर्खूण महाएकादशीचे व्रत यथासांग परिपूर्ण झाल्याची!