– अभय टिळक

कल्पना करा की, एक विलक्षण तेज:पुंज हिरा आहे. ज्याच्या तेजाला सीमाच नाही असा हिरा. चांदीच्या तबकात तो ठेवला तर त्यातून प्रसवणाऱ्या प्रकाशाने आसमंत उजळून निघेल अशी त्याची प्रभा. आता, एखादा महाभाग, समजा असे म्हणायला लागला की, ‘‘अहो, काय करावे! या हिऱ्यामधून प्रसवणाऱ्या प्रकाशाचे पांघरूण पडल्यामुळे हिराच दिसेनासा होतो. कसे काय त्याचे लावण्य आता अनुभवायचे बुवा? हिऱ्याचे सौंदर्य झाकून टाकणारे ते प्रकाशाचे आवरण कोणी तरी जरा दूर करा हो..,’’ तर काय बोलणार त्यावर! ‘खुळा’ या एकाच शब्दाने अशा चमत्कारिक मनुष्याचे वर्णन करता येईल. माया आणि शक्ती या दोन पदार्थात असणाऱ्या मूलभूत फरकाचे आकलन नीट झालेले असेल तरच अशा खुळेपणापासून बचाव संभवतो. अद्वयदर्शनानुसार शक्तीयुक्त शिव आणि जग यांचे नाते हिरा आणि त्यामधून प्रसवणारा प्रकाश यांच्या परस्परनात्यासारखेच आहे. ज्ञान व विमर्श यांनी विभूषित असलेले परमशिव हे तत्त्व सत्यस्वरूप असल्यामुळे त्याचेच प्रसरण असलेले दृश्य जगही तितकेच सत्य शाबीत होते. मायेचे आवरण ब्रह्मावर पडण्यासारखे इथे घडत नाही. त्यामुळे अद्वैतदर्शनाची परिभाषा अद्वयाच्या प्रांतात वापरता येत नाही. किंबहुना, ती अप्रस्तुतच ठरते. शक्तीच्या बुंथीखाली शिव लोपून गेला आहे, असे म्हणावे तर, विश्वरूपाने मग कोण नटलेला आहे, असा प्रश्न ज्ञानदेव- ‘‘जालेंनि जगें मी झांकें। तरि जगत्वें कोण फांके। किळेवरी माणिकें। लोपिजे काई।।’’ अशा शब्दांत विचारतात. कमालीचे वैविध्य जगात आपण अनुभवतो, त्याचाही खुलासा ज्ञानदेव याच तर्काच्या माध्यमातून करतात. आपल्या हाताची पाच बोटे एकसारखी नाहीत. देह एकच असला तरी प्रत्येक अवयवाचे कार्य, आकार, क्षमता वेगवेगळ्या आहेत. हाच न्याय शिवाचे प्रसरण घडून साकारलेल्या या भौतिक जगातील विविधतेला, चित्रवैचित्र्याला लागू होतो. ‘‘हां गा एकेचि देहीं। काय अनारिसे अवयव नाहीं। तेवीं विचित्र विश्व पाहीं। एकचि हें।।’’ असे ज्ञानदेवांचे या वैविध्याविषयीचे स्पष्टीकरण. बीजातून अंकुरलेल्या वृक्षाच्या फांद्या आणि डहाळ्या अनंत आकाराच्या असतात. काही जाड, तर काही बारीक. काही अगदी बुंध्यालाच फुटलेल्या, तर काही थेट शेंडय़ाला. परंतु हा सगळा पसारा म्हणजे वस्तुत: बीजाचेच प्रसरण होय ना. ‘‘पैं उंचा नीचा डाहाळिया। विषमा वेगळालिया। येकाचि जेवीं जालिया। बीजाचिया।।’’ असे ज्ञानदेव म्हणतात ते पटण्यासारखेच नाही का? पेरणीच्या हंगामात शेतकरी पाभर धरतो आणि शेतात पेरा करतो. यथावकाश पीक अंकुरते. सुगीच्या काळात भरदार कणसे शिवारात डोलू लागतात. पेरलेले एक बी कणसामधून अनेक पटींनी पुन्हा प्रगट होते. विश्वोत्तीर्ण शिव आणि त्याचे शक्तिरूप विश्वात्मक प्रगटन यांचा नातेसंबंध आहे नेमका असाच. जगाकडून मिळणाऱ्या वागणुकीला उबगून कोपीमध्ये स्वत:ला कोंडून घेणाऱ्या ज्ञानदेवांची समजूत, ‘‘एकापासूनि अनेक जाले..’’ अशा शब्दांत मुक्ताबाई घालतात, त्यातील गमकही हेच. हे रहस्य उलगडले व एका अननुभूत आनंदाची अंतर्बाह्य़ प्रचीती आली, असा रोकडा स्वानुभव ज्ञानदेव एका अभंगात- ‘‘आनंदु रे आजि आनंदु रे। सबाह्य़ अभ्यंतरी अवघा परमानंदु रे।’’ असा प्रगट करतात. याच दृष्टीने जगाच्या स्वरूपाचा विचार करत त्याच परमानंदाला तुम्हीही प्राप्त व्हा, असे आवाहन- ‘‘एक दोन तीन चार पाच सहा। इतुके विचारूनी मग परमानंदी रहा।।’ अशा शब्दांत आपल्यालाही करतात.

agtilak@gmail.com