अभय टिळक agtilak@gmail.com

भगवान सूर्यनारायण, माऊली जनाबाई आणि आमचे तुकोबाराय हे तिघेही एकाच कुळातील! विस्मय वाटण्यासारखे अणुमात्रही काही नाही या विधानात. या तीन विभूतींना जोडणारे सूत्र एकच आणि त्यांमुळे त्यांचे कूळही समानच. अकर्म हे समान सूत्र गुंफते या तिघांना एकत्र व कर्मसंन्यासी हे ठरते त्यांचे समान कूळ. तिघेही निष्कलंक कर्मयोगी आणि कर्मसंन्यासीही. अखंड अविरत कार्यरत राहण्याने तिघेही शोभतात कर्मयोगी, तर अहोरात्र कामे करत राहूनही कर्तेपणाचा कलंक कणभरही चिकटत नसल्याने तिघेही होत कर्मसंन्यासी. ‘संन्यास म्हणजे अशी ही परमधन्य अकर्मदशा’ असे या अलौकिक स्थितीचे वर्णन करतात विनोबाजी त्यांच्या ‘गीता-प्रवचनां’त. एक विकर्माची व्याख्या वगळली, तर कर्म आणि अकर्म या दोहोंच्या बाबतीत विनोबाजी आणि पैठणनिवासी नाथराय या उभयतांत प्रगाढ एकवाक्यता नांदताना प्रतीत होते. ‘‘ज्यासी शुद्ध आकळे अकर्म। तो तत्काळ होय निष्कर्म। अकर्माचें कळ्ल्या वर्म। मुक्ततां परम पायां लागे।’’ अशी अकर्मदशेची निर्मळ व्याख्या करतात नाथराय. शरीराच्या माध्यमातून साकारणाऱ्या बाह्य़कर्माना नामचिंतनाच्या आंतरिक विकर्माचे अस्तर जोडले गेले, की मनाचे मनपण निवते आणि मनासह क्रमाक्रमाने ‘स्व’ची जाणीव ठायीच्या ठायी मुरून जाते. एकदा का अकर्मदशा हस्तगत झाली, की सतत कर्मरत राहूनही कर्माचा बोजा वाटत नाही, कर्म केल्याचा अहंकार नाहीसा झाल्याने क्लेशांची जाणीव नाहीशी होते आणि कर्माचीही जाणीव उरत नाही, असे या जीवनरीतीचे विनोबाकृत विश्लेषण. तर.. जनाबाईंचे अवघे जीवन म्हणजे मूर्तिमंत दर्शनच जणू अकर्मदशेचे. भात सडण्यासाठी एकदा सरसावल्या जनाबाई. उखळामध्ये साळ घेऊन झाले कांडण सुरू. कांडून-कांडून फोड आले जनाईंच्या तळहाताला. पण गंमत बघा, अकर्तात्मभाव अस्तित्वात एकजीव झालेल्या जनाबाई- ‘‘साळी सडायास काढी। पुढें जाउनी उखळ झाडी। हाता आला असे फोड। जनी म्हणे मुसळ सोड।’’ अशा दिव्य शब्दांत करतात वर्णन त्या साऱ्या रामरगाडय़ाचे. साळ सडून मी भात कांडले, कांडताना हाताला फोड आले हा भावच नाही जनाईंच्या ठायी. प्रत्येक कामात सखा विठ्ठलच हातभार लावतो आहे, नव्हे, तोच तर सर्व कामे करतो आहे, हीच जनाईंची दृढ धारणा. इतके कमालीचे आत्मविलोपन साधणे ही खायची बाब नव्हे! कर्मसंन्यासाची ही तर म्हणायची चरमसीमा. कर्तेपणा लोपल्यामुळे केलेल्या कामांचा शीण नाही. अनादी काळापासून तळपणाऱ्या व्योमराज सूर्याला होतात का क्लेश कधी अविरत प्रकाश देण्याच्या त्याच्या स्वकर्माचे? कर्म करण्याची ही अनोखी युक्तीच जणू. नामचिंतन हा जगण्याचा स्वभाव बनल्याची ही अंतर्खूण. जागृतीचे दान जगाला देण्यासाठी उभे जीवन काया कष्टविणाऱ्या तुकोबांनी- ‘‘सूर्याचिया परी। तुका लोकीं क्रीडा करी।’’ इतक्या नितळ शब्दांत आपल्या जीवनयज्ञाचे कथन करावे, हे कर्मसंन्यासाचे नव्हे तर मग कशाचे लक्षण मानायचे? ‘‘म्हणोनि संकल्प विकल्प। अवघे जाहले भगवद्रूप। यालागी भक्त नित्य निष्पाप। सत्य संकल्प हरिदास।’’ अशा नेमक्या शब्दकळेद्वारे नाथराय वर्णन करतात समाजहितरत कर्मसंन्यासी हरिभक्तांचा जीवनक्रम. तर, ‘‘संन्यास तो त्याग संकल्पाचा’’ इतक्या सहजपणे तुकोबाराय विदित करतात लौकिक व्यवहारातील संन्यासलक्षण. नाथराय आणि तुकोबाराय यांचे आंतरिक नाते आहे असे व इतके प्रगाढ!