ज्ञान हे सक्षमीकरणाचे अमोघ साधन होय, हे कथन निव्वळ सैद्धान्तिक पातळीवर नांदून उपयोग नसतो. उभा ज्ञानव्यवहार त्या वस्तुस्थितीने मंडित होण्यासाठी संस्थात्मक तसेच उपकरणात्मक पातळीवर अनुरूप बदल घडवून आणणे क्रमप्राप्त ठरते. कोणत्याही प्रकारच्या आडकाठय़ांपायी कुंपणग्रस्त बनलेला अध्ययन-अध्यापनव्यवहार ज्ञानप्रसारणाद्वारे समाजपुरुषाचे सक्षमीकरण घडवून आणण्यास कुचकामी ठरतो. समकालीन ज्ञानव्यवहार रोगट बनविणारे घटक कधी सांस्कृतिक, कधी धार्मिक, कधी राजकीय, तर कधी आर्थिक असतात. त्यांचे निराकरण घडवून आणण्यासाठी त्या-त्या काळातील धुरीणांना हरतऱ्हेने कृतिशील बनावे लागते. अद्वयबोधाच्या अधिष्ठानावर साकारलेल्या भागवतधर्मविचाराने उतरंडप्रधान अशा वर्णाश्रमधर्म-जीवनपद्धतीने संकुचित बनविलेला तत्कालीन ज्ञानव्यवहार प्रवाही, सर्वसमावेशक आणि लवचीक बनविण्यासाठी विविध आघाडय़ांवर प्रयत्न केले. पर्यायी व्यवस्था कार्यान्वित केल्या. शिक्षणव्यवहार संस्थात्मक व्यवस्थेमध्ये जखडला जाऊन स्थितीज, एकदेशी बनण्याचा धोका हेरून तो मेघवृष्टीसारखा उदार बनावा ही दृष्टी तत्कालीन समाजमनात रुजविली. शिक्षक वा गुरू ही संस्थाही भ्रमणशील असली पाहिजे, या बोधांकुराचे संगोपन-सिंचन संतविचाराने डोळसपणे केले. शिकण्याची अदम्य ऊर्मी ही ज्ञानव्यवहारातील कळीची बाब होय, ही जाणीव तुकोबांनी त्यांच्या जीवनक्रमाद्वारे समूर्त-साकार केली. आश्रमवासी वा फिरस्ती अंगीकारलेले मानवी देहधारी गुरू, समजा भेटलेच नाहीत एखाद्याला तर त्याने स्वयंअध्ययन कोणाच्या मार्गदर्शनाखाली कसे करावे, हा आणखी एक प्रश्न पुढे उभा राहतो. पैठणनिवासी नाथांचे नातू महाकवी मुक्तेश्वर या बिंदूवर मदतीला धावून येतात. ‘‘विवेकासारखा नाही गुरू। चित्तासारखा शिष्य चतुरू।’’ हे त्यांचे वचन खरोखरच सार्वकालिक दीपस्तंभासारखे होय. अवघ्या ज्ञानव्यवहारातील परावलंबन आणि त्यांपायी लादली जाणारी परवशता पार मोडून काढण्याचे सामर्थ्य या जीवनदृष्टीत सामावलेले आहे. प्रत्येकाच्या ठायी असणारी सारासार विचारशक्ती हीच ज्याची-त्याची मार्गदर्शक गुरू होय, हे मुक्तेश्वरांचे ठाम प्रतिपादन. मुक्तेश्वरांचा स्पष्ट रोख आहे तो ‘गुरुत्व’ या अमूर्त मूल्यनिधीकडे; ‘गुरू’ या अधिष्ठानाच्या शारीर अस्तित्वाकडे नाही! मुक्तेश्वरांना इथे महत्ता विदित करायची आहे ती विद्यार्थ्यांने त्याच्या ठायी जोपासण्याच्या शिष्यत्वाची. शिकण्याची असीम प्रेरणा चित्तात ओतप्रोत भरलेली असेल तर, बाह्य़ मार्गदर्शकाच्या भेटीसाठी आडून-खोळंबून न बसता, स्वत:मध्येच वास करणाऱ्या सारासार विवेकाकडे गुरुत्व सुपूर्द करून शिष्याने अध्ययनास सुरुवात करावी, हे आहे मुक्तेश्वरांच्या कथनातील केंद्रवर्ती सूचन. ‘गुरू’ व ‘शिष्य’ या दोन अधिष्ठानांचे संपूर्ण आंतरिकीकरण अभिप्रेत आहे, या अध्ययनदृष्टीला. कोणत्याही काळातील ज्ञानव्यवहारास एक आगळाच आयाम प्रदान करणाऱ्या मुक्तेश्वरांच्या या भूमिकेचा उगम आपल्याला आढळतो ‘ज्ञानदेवी’च्या पहिल्या अध्यायातील नमनाच्या एका ओवीत. ‘‘मज हृदयीं सद्गुरू। जेणें तारिलों हा संसारपुरु। म्हणौनि विशेषें अत्यादरू। विवेकावरी।’’ इतके नि:संदेह प्रतिपादन आहे ज्ञानदेवांचे. प्रत्येकाच्या अंत:करणात तेवणारा विवेकदीप हेच ते चिरंतन असे गुरुतत्त्व व त्याच्या अक्षय मार्गदर्शनाखाली प्रत्येकाने आपला अभ्यास चालू ठेवायचा असतो, हेच ज्ञानदेव सांगत आहेत.

अभय टिळक agtilak@gmail.com