News Flash

वजाबाकी

ज्ञानाचा अभाव असला तरी मायेच्या ठिकाणी कर्तृत्वशक्ती आहे

कथन आणि अंतिम बोध एकच असला तरी ‘अद्वैत’ आणि ‘अद्वय’ या दोन परस्परांपेक्षा गुणात्मकरीत्या वेगळ्या संकल्पना होत. या दोन दर्शनांच्या परंपराही वेगवेगळ्या आहेत. ज्या जगात आपण राहतो, व्यवहार करतो, त्या जगाची निर्मिती आणि त्याचे स्वरूप या दोहोंसंदर्भात या दोन परंपरांचे सांगणे निरनिराळे आहे. विश्वाच्या उत्पत्तीसाठी ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ ही दोन्ही तत्त्वे अनिवार्य आहेत, यांबद्दलही या दोन परंपरांचे एकमत आहे. फरक आहे तो या दोन तत्त्वांचे स्वरूप आणि त्यांच्या एकमेकांशी असलेल्या नात्याबाबतच्या विश्लेषणात. विश्वनिर्मितीच्या मुळाशी ‘ब्रह्म’ व ‘माया’ हे युगुल आहे, असे अद्वैतदर्शनाचे सांगणे. तर अद्वयदर्शनाच्या प्रतिपादनानुसार, ‘शिव’ व ‘शक्ती’ या दाम्पत्याने, ज्ञानदेवांच्या शब्दांत मांडायचे झाले तर, जगाएवढे बाळ जन्माला घातलेले आहे. इथपर्यंत ही दोन्ही दर्शने समांतर आहेत. फरकाचे वळण येते ते या टप्प्यावर. अद्वैतदर्शनातील ब्रह्म हे तत्त्व विशुद्ध ज्ञानमय आणि शाश्वत असे आहे. मायेचे मात्र तसे नाही. ती अशाश्वत आहे व तिच्या ठायी आहे ज्ञानाचा अभाव. त्याच वेळी, ज्ञानयुक्त अथवा ज्ञानमय असणाऱ्या ब्रह्माच्या ठिकाणी अभाव आहे क्रियाशीलतेचा. याच्या बरोबर उलट आहे माया. ज्ञानाचा अभाव असला तरी मायेच्या ठिकाणी कर्तृत्वशक्ती आहे. खरी गंमत आहे ती ही आणि इथेच. विश्वासारख्या अचाट पदार्थाची निर्मिती माया किंवा ब्रह्म एकेकटे करू शकत नाहीत. कारण साहचर्याने नांदल्याखेरीज त्यांच्या परस्परशबलतांचे निराकरण घडून येणे अशक्यच होय. जग निर्माण करण्याचे ज्ञान ब्रह्माला असले तरी कर्तृत्वाचा तिथे अभाव असल्याने ब्रह्म एकटे जगाची निर्मिती करू शकत नाही. तर, जवळ कर्तृत्व असले तरी ज्ञानाचा पत्ता नसल्याने माया हे तत्त्वही एकटय़ाने जग आकारास आणण्याबाबतीत हतबलच ठरते. कोणतीही गोष्ट निर्माण करण्यासाठी उत्पादनाचे केवळ ज्ञान असून भागत नाही. जवळ क्रियाशीलताही लागते. त्याचप्रमाणे, अंगात ताकद भरपूर आहे, पण सर्जनाचे ज्ञानच नसेल तर ती सक्रियता विफल ठरते. तेव्हा अद्वैतदर्शनानुसार, ज्ञानस्वरूप असणारे ब्रह्म व कर्तृत्वशालिनी माया यांच्या साहचर्याद्वारे दृश्य जग आकाराला येते. याचा स्वाभाविक परिणाम असा की, जगाची निर्मिक माया असल्यामुळे, कार्यकारणभावानुसार, कारणाचे यच्चयावत गुणावगुण कार्यात उतरतात. साहजिकच ज्या जगाचे आपण घटक आहोत ते जग मायावी, अशाश्वत ठरते. या मायावी जगाचे पालाण पडल्यामुळे निखळ ज्ञानस्वरूप असणारे शाश्वत असे ब्रह्म तत्त्व झाकून गेलेले आहे, असे सिद्धान्तन यातून प्रसवते. मायावी असणाऱ्या असत्य, अज्ञानमय जगाचे पांघरूण दूर सारून त्याखाली झाकली गेलेली शाश्वत अशी ‘ब्रह्म’नामक वस्तू हस्तगत करून घेणे, हेच मग या जगातील प्रत्येक जीवाचे इतिकर्तव्य ठरते, हा अद्वैतदर्शनाचा सांगावा या तर्कप्रक्रियेमधून उमललेला आहे. जग हा मायेचा पसारा आहे व या पसाऱ्याच्या मागे अथवा मुळाशी अदृश्यरूपाने नांदणारे जे एकमेव आणि ज्ञानमय असे ‘ब्रह्म’ नावाचे तत्त्व आहे त्याच्याशी एकरूप होण्यासाठीच जीवनामध्ये साधनेची परिसीमा करणे मग अध्याहृत बनते. मायेमध्ये आणि तिने जन्माला घातलेल्या मायावी जगामध्ये गुंतायचे नसते, तर मायेचे पटल दूर करून ब्रह्माशी तादात्म्य पावायचे. गणिताची परिभाषा वापरायची झाली तर, ‘ब्रह्म’ आणि ‘माया’ या युगुलातील ‘माया’ नावाचे तत्त्व वजा केल्याखेरीज ब्रह्मापर्यंत पोहोचता येत नाही. म्हणून अद्वैतात आहे वजाबाकी!

अभय टिळक agtilak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 1:01 am

Web Title: loksatta advayabodh subtraction zws 70
Next Stories
1 विश्व देव सत्यत्वें
2 आभास
3 विमर्श
Just Now!
X