News Flash

भांडवल

देहूमधील एक अतिशय संपन्न, आदरप्राप्त आणि मातबर घराणे म्हणून तुकोबांच्या कुटुंबाचा लौकिक होता

(संग्रहित छायाचित्र)

 

– अभय टिळक

देहूमधील एक अतिशय संपन्न, आदरप्राप्त आणि मातबर घराणे म्हणून तुकोबांच्या कुटुंबाचा लौकिक होता. घराण्यात विठ्ठलभक्तीची परंपरा आठ पिढ्यांची. शेतीवाडीबरोबरच पेठेत दुकान, व्यापार आणि सावकारीही होती. याच्याच जोडीने तुकोबांच्या घराण्यात होती देहूची महाजनकीही. पेठेतील दुकानांमधील वजने व मापे यांची निर्दोषता तपासणे, व्यापाऱ्यांकडून करांची वसुली करणे, पेठेमध्ये प्रसंगोपात्त उद्भवणाऱ्या तंट्यांवर समाधानकारक तोडगा काढणे… या साऱ्या महाजनकीच्या वतनाशी संलग्न जबाबदाऱ्या. वयाच्या १३-१४ व्या वर्षापासूनच वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तुकोबांनी घरातील या अवघ्या बारदानाची उस्तवार करण्यास सुरुवात केलेली होती. साहजिकच, व्यापारउदिमाशी निगडित असंख्य संज्ञा-संकल्पनांची पखरण त्यांच्या अभंगसंभारात ठायी ठायी दृष्टोत्पत्तीस पडते. व्याज, मुद्दल, तोटा, व्यवसाय, व्यापार, हिशेब, गहाण, ऋण, धंदा… हे किंवा यांसारखे वाणिज्यविषयक शब्द व व्यापारविषयक व्यवहारांवर बेतलेली नानाविध रूपके व दृष्टान्त तुकोबा कमालीच्या सहजपणे आणि चपखल योजताना दिसतात त्याचे गमक तेच. लौकिक धनाच्या जोडीनेच- ‘‘जोडिलें न सरे हें धन। अविनाश आनंदघन। अमूर्तमूर्ति मधुसूदन। सम चरण देखियेले।’’ अशा शब्दांत तुकोबा जिचे वर्णन करतात ती विठ्ठलरूप अक्षय संपदाही तुकोबांनी परम कष्टसायासांनी संपादन केली. किंबहुना- ‘‘विठ्ठल अवघ्या भांडवला। विठ्ठल बोला विठ्ठल।’’ अशा निरपवाद शैलीमध्ये, विठ्ठल हेच माझे सर्वात मोठे भांडवल होय, असे तुकोबा खणखणीतपणे विदित करतात. त्याच वेळी, भागवत धर्माला अभिप्रेत असलेल्या विभूतिमत्त्वाचे आद्यगुणलक्षण तुकोबा- ‘‘भूतांची दया हे भांडवल संतां। आपुली ममता नाहीं देहीं।’’ अशा विलक्षण मार्मिक पद्धतीने वर्णितात. दोन ठिकाणी दोन वरकरणी भिन्न भासणाऱ्या संदर्भांत तुकोबांनी ‘भांडवल’ हा एकच शब्द योजावा, यात एक रम्य मौज आहे. पंढरी क्षेत्रामध्ये विटेवर समचरण उभा असलेला एकदेशी श्रीविठ्ठल व अखिल भूतमात्रांच्या रूपाने विलसणारे त्याच विठ्ठलाचे विश्वात्मक रूप ही एकाच ‘भांडवला’ची दोन परिमाणे होत, हेच तुकोबा इथे उलगडून मांडत आहेत. जगातील जीवमात्रांची सेवा हीच विश्वरूपाने प्रगटलेल्या जगदीश्वराची सेवा, हे भागवत धर्माने शिरोधार्य मानलेल्या भक्तितत्त्वाचे वैशिष्ट्य तुकोबा असे अधोरेखित करतात. प्रतिकूलतेचे दान पदरी पडलेल्या दु:खितांच्या वेदना दूर करण्यासाठी अखंड झटणे हीच भक्ती आणि अशी सेवारूप उपासनाच परमतत्त्वाला सर्वाधिक प्रिय होय, हा भागवत धर्मविचाराचा गाभा ठरतो तो असा. जगातील जीवमात्रांची पीडा दूर करण्यासाठी कार्यरत राहणे हाच भागवत धर्मोपासकाचा जीवनधर्म बनतो. हा जीवनधर्म जिच्या रोजच्या जगण्यात प्रतिबिंबित होतो अशा विभूतीलाच भागवत धर्म ‘संत’ असे संबोधतो. ‘‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति। देह कष्टविती परोपकारें।’’ या तुकोक्तीत अनुस्यूत सूचनाचा उलगडा आता पुरेपूर व्हावा. अशा भागवताची जीवनरीत, गीताभाष्य ‘ज्ञानेश्वरी’च्या १६ व्या अध्यायात- ‘‘निम्न भरलिया उणें। पाणी ढळोंचि नेणे। तेवीं श्रांता तोषौनि जाणें। सामोरेया।’’ अशा प्रत्ययकारी शब्दकळेद्वारे ज्ञानदेव वर्णन करतात. वाटेत आलेला खड्डा भरल्याखेरीज पाणी जसे पुढे सरकत नाही, अगदी त्याचप्रमाणे, पुढ्यात आलेल्या दु:खिताची पीडा निवारण केल्याखेरीज भक्त राहात नाही, हेच ज्ञानदेवांचे सांगणे. भागवत धर्मप्रणीत भक्तितत्त्वाचे सामाजिक परिमाण हे असे आहे.

agtilak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2021 12:01 am

Web Title: loksatta capital advayabodh article abn 97
Next Stories
1 भागवत
2 विष्णुमय
3 विश्वरूप
Just Now!
X