अभय टिळक

निखळ लौकिकासाठी अनेक गोष्टी आपण करत असतो अथवा आपल्याला कराव्या लागतात. उदरनिर्वाहासाठी, प्रसंगी निसर्गदत्त प्रवृत्तीशी प्रतारणा करणारी कामे करण्यावाचून सर्वसामान्य संसारी माणसाला गत्यंतरच नसते. अंत:प्रेरणेशी विसंगत असणाऱ्या बाबींवर पाणी सोडण्यासाठी अपार धैर्य अंगी असावे लागते. इतके प्रबळ आत्मबळ असणारी व्यक्तिमत्त्वे विरळच असतात. तुकोबांचे शिष्यत्व प्राप्त करून घेतलेले निळोबा पिंपळनेरकर अशा दुर्मीळांमधीलच एक. शिरूर हे निळोबांचे जन्मगाव. वाचन, मनन, चिंतन यांकडेच उपजत ओढा असलेल्या निळोबांकडे घराण्यातील कुलकर्णपण परंपरेने सांभाळण्यास आले. कुलकर्णी वतनाच्या कामकाजाची धुरा हिरिरीने कार्यरत राखण्यासाठी आवश्यक असलेली प्रबळ प्रवृत्ती पारमार्थिक वृत्ती जन्मजात लाभलेल्या निळोबांपाशी मुदलातच नव्हती. मनाचा निसर्गदत्त कल झुकलेल्या परमार्थाच्या आड, कुलकर्णी वतनाशी संबंधित कामकाजाचा भार येत राहण्याने विटलेल्या निळोबांनी कुलकर्णी वतन आपल्याच कुळातील एका शाखेकडे सुपूर्द केले आणि निरंतर अक्षरोपासनेसाठी ते मोकळे झाले. पंढरपूर क्षेत्रामध्ये तुकोबांची कीर्ती त्यांच्या कानी पडली आणि ती ऐकून निळोबा मग देहूस आले. तुकोबांचे नित्य भजन जिथे चालत असे त्या आनंदओवरीमध्ये तुकोबांच्या दर्शनासाठी निळोबांनी आर्त आळवणी केली. प्रार्थनांती लाभलेल्या तुकोबांच्या कृपाप्रसादाचा वृत्तान्त- ‘‘येऊ नियां कृपावंतें। तुकयास्वामी सद्गुरू नाथें। हात ठेविला मस्तकीं। देऊ नि प्रसाद केलें सुखीं।’’ अशा शब्दांत निळोबांनी कथन करून ठेवलेला आहे. अनुग्रहाद्वारे अंत:करणावर उमटलेला अद्वयदर्शनाचा ठसा निळोबांनी नितांत रसाळपणे शब्दबद्ध केलेला आहे तो व्रजवासिनी गवळणींच्या रूपकाद्वारे. स्वरूपत: निराकार, निरवयव, स्पंदमात्र अस्तित्वरूपात स्थित असलेल्या विश्वोत्तीर्ण परमतत्त्वाला विश्वात्मक होऊन प्रगटण्याची ऊर्मीच का यावी, या जिज्ञासेची पूर्ती निळोबा- ‘‘त्याचा संकल्पचि झाला त्याला प्रसवता वो’’ इतक्या नितळ शब्दकळेद्वारे करतात. आपले एकलत्व विसर्जित करून विश्वात्मकपणे आता प्रगटावे असा संकल्प तरी त्या चैतन्याला का स्फुरावा, हा पुढचा प्रश्न यातून स्वाभाविकपणे निर्माण होतो. त्यासही निळोबांचे उत्तर तयार आहे. एकटेपणाचा कंटाळा आला म्हणून विरंगुळ्यासाठी विश्वात्मक प्रगटनाचा पसारा परमशिव मांडतो, अशी उपपत्ती- ‘‘येकलें न कंठेचि म्हणोनियां येणें। केलीं निर्माणें वो चौदाही भुवनें। गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणें। पांचही महाभूतें भौतिकें भिन्नें भिन्नें वो।’’ अशा प्रकारे निळोबा मांडतात. चैतन्यालाही विरंगुळ्याची निकड भासते ही कल्पनाच मोठी रोचक आणि आकर्षक आहे! परंतु निळोबारायांच्या प्रतिभेची धाव केवळ एवढय़ावरच थांबत नाही. हातून देखणी शिल्पाकृती साकारलेल्या शिल्पकाराने आपणच निर्मिलेल्या कलाविष्काराच्या प्रेमात आकंठ बुडून जावे, अशीच जणू अवस्था त्या परमतत्त्वाचीदेखील होते, असे निळोबांचे कथन सांगते. विश्वोत्तीर्ण अवस्थेचा त्याग करून विश्वात्मकपणे प्रगटल्यानंतर आपल्याच नानाविध रूपवेशांच्या प्रेमात पार हरपून गेलेल्या परमशिवाला क्षणभरही त्या आकारांचा वियोग सहन होईना आणि म्हणून प्रत्येक आविष्काराला तो अंतर्बाह्य़ बिलगून राहिलेला आहे, असे निळोबांचे दृश्य जगाच्या वास्तव स्वरूपासंदर्भातील डोळस प्रतिपादन. निखळ अद्वयानुभूतीचे अधिष्ठान संपूर्ण अस्तित्वाला लाभल्याची अंतर्खूणच जणू ही!

agtilak@gmail.com