आजच्या विविधांगी मराठी साहित्याचा खरा उत्सव जसा असायला हवा, तसा तो होत नाही.

केरळमधल्या कोची शहरातील फोर्ट कोची बेटावर सध्या ‘कोची-मुझिरिस बिएनाले’ सुरू आहे. मुंबईतील सारी कलादालने- म्हणजे आर्ट गॅलऱ्या- येत्या बुधवारपासून ‘मुंबई गॅलरी वीकएण्ड’ साजरा करीत आहेत. मध्य मुंबईत ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’ हा उपेक्षित चित्रकार आणि कलादालनांना कलाव्यापाराची संधी देणारा कलाव्यापार उत्सवही येत्या बुधवारपासून सुरू होतो आहे, त्यात औरंगाबाद- नागपूरच्याही नव्या दृश्यकलावंतांचा समावेश आहे. तर जानेवारीच्या अखेरीस राजधानी दिल्लीत, कलाव्यापारासाठी प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘इंडिया आर्ट फेअर’ हा कलाव्यापार मेळा भरतो आहे. महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाच्या कलाविद्यार्थी आणि व्यावसायिक चित्रकार गट अशा दोन गटांपैकी व्यावसायिक गटाचे कलाप्रदर्शन सध्या मुंबईत सुरू असून ते सोमवारी संपेल आणि फेब्रुवारीत बॉम्बे आर्ट सोसायटीचे १२७ वे वार्षिक स्पर्धात्मक प्रदर्शन, तर मार्चमध्ये आर्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे १०१ वे स्पर्धात्मक प्रदर्शन भरेल. महाराष्ट्रातील तरुण चित्रकारांना आज जेथे सहभागी व्हावे किंवा निव्वळ प्रेक्षक म्हणून रीतसर तिकीट काढून जावे असे वाटते, असे हे सारे उपक्रम आहेत. दुसरीकडे यवतमाळमध्ये, ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही शुक्रवारपासून सुरू झाले आहे. कामगार साहित्य संमेलन, उपनगर साहित्य संमेलन आणि त्याखेरीज अन्य कैक मराठी साहित्य संमेलने पुढील दोन महिन्यांच्या काळात पार पडतील. म्हणजे चित्रकलेच्या क्षेत्रात जसा विविध उपक्रमांना तोटा नाही, तसा तो मराठी साहित्याच्याही क्षेत्रात नाही, असे वरवर पाहता वाटेल. एक मोठा फरक असा की, चित्रकलेचे विशेषत: गेल्या दशकभरात सुरू झालेले तीन उपक्रम हे स्वरूप, कार्य, आयोजनपद्धती या साऱ्याच बाबतींत मोठे आहेत आणि ते मराठी साहित्य संमेलनांसारखे एकसुरी झालेले नाहीत. चित्रकला आणि साहित्य क्षेत्रांतील उपक्रमांची तुलना नकोच, कारण ती गैरलागू ठरेल असा आक्षेप घेतला जाईल. तो योग्यच. तुलना होऊ नयेच. परंतु ज्या उदाहरणांवरून काही शिकता येण्याजोगे असेल, ती नाकारूही नयेत. तेव्हा दृश्यकलेचे उपक्रम हे साहित्य संमेलनापेक्षा निराळे आहेतच, हे मान्य करून या उपक्रमांनी कोणती अनुकरणीय उदाहरणे घालून दिली आहेत, हे पाहिले पाहिजे.

स्वरूप, परिणामकारकता आणि आयोजन या तिन्ही अंगांनी कोची बिएनालेचा विचार करायला हवा. मुळात बिएनाले- म्हणजे कलेची दर दोन वर्षांनी भरणारी प्रदर्शने- १८९५ सालात व्हेनिसमध्ये भरलेल्या पहिल्या द्वैवार्षिक कलाप्रदर्शनापासून सुरू झाली. साहित्य संमेलनाची परंपरा त्याही आधीची, म्हणजे १८७८ सालापासूनची आहे. परंपरेचे पुनर्वाचन, पुनर्नवीकरण यांचा जो आग्रह संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे यांनी अध्यक्षीय भाषणातही मांडला, त्याचे मूर्तिमंत रूप म्हणजे जगभरातील सुमारे २०० हून अधिक बिएनाले किंवा द्वैवार्षिक दृश्यकला महाप्रदर्शनांचे पालटत गेले स्वरूप. बिएनालेचा इतिहास व्हेनिसमध्ये १८९३ सालापासून सुरू झाला असला, तरी १९८४ पासून क्युबात सुरू झालेल्या ‘हवाना बिएनाले’पासून बिएनालेंचं स्वरूपच नव्हे तर परिणामही बदलला. दृश्यकलेच्या द्वैवार्षिक महाप्रदर्शनातून विचारांना चालना मिळालीच पाहिजे, असा दंडक दक्षिण अमेरिकेतल्या तशा गरीबच देशातल्या त्या बिएनालेने घालून दिला. ते उदाहरण शिरोधार्य मानून, चक्क व्हेनिसची बिएनालेसुद्धा बदलली! कोची बिएनाले ही खूप नंतर, २०१२ पासून सुरू झाली. सध्या कोचीमधील बिएनालेची चौथी खेप सुरू असताना, निव्वळ दृश्यकला नव्हे तर संगीत, चित्रपट, साहित्यिकांची सादरीकरणे आणि यंदा तर ‘पाककला’ या अन्य कलांनाही मानाचे स्थान कोचीत मिळाले आहे. यंदाच्या कोची बिएनालेची गुंफण करणाऱ्या अनिता दुबे यांचे स्त्रीवादी विचार, त्यास मिळालेली ‘एलजीबीटी’ समावेशकतेची जोड हे सारे यंदा कलाकृतींमधून, सादरीकरणांतून आणि पाककलेचा विचार वारसा-प्रयोग, परंपरा-नवता या अंगाने करण्यास दिलेल्या प्रोत्साहनातून दिसून येते. दृश्यकलेत वैचारिक आशयाची भर घालणे, हेच कोचीच्या या द्वैवार्षिक प्रदर्शनाने आपले कार्य मानले आणि अभिरुची घडवण्यात आपला वाटा उचलला. दिल्लीचा कलाव्यापार मेळा हा कलेचा बाजारच. पण बाजार अधिकाधिक अभिरुचीसंपन्न व्हावा, यासाठी गेल्या काही वर्षांत ‘इंडिया आर्ट फेअर’च्या आयोजकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. गेल्या वर्षीपासून तर, वर्षभर समाजमाध्यमांद्वारे या व्यापारमेळय़ाचे आयोजक तमाम कलारसिकांशी- पर्यायाने संभाव्य ग्राहकांशी देखील- संवाद साधत राहिले. ‘मुंबई गॅलरी वीकएण्ड’ने २०१२ साली एका पंचतारांकित हॉटेलात मोठे प्रदर्शन भरवून सुरुवात केली, पण पुढे आपापल्या गॅलऱ्यांतच ऐन हिवाळय़ात चांगली प्रदर्शने भरवावीत आणि प्रेक्षकांना कलाकृतींची माहिती देत गॅलऱ्यांतून हिंडविणे- म्हणजे ‘वॉक थ्रू’- काही महत्त्वाची व्याख्याने आयोजित करणे अशा तऱ्हेने प्रेक्षक घडवण्यावरच याही उपक्रमाने भर दिला.

अभिरुची घडवण्याचे हे कार्य अ. भा. मराठी साहित्य संमेलन करते काय, असा प्रश्न येथे विचारणे म्हणजे तुलना करणे. ती टाळून पुढल्या मुद्दय़ाकडे जाऊ. हा मुद्दा आर्थिक. कोची बिएनालेने आखाती देशांतील केरळी धनिकांकडून पैसा उभारण्यावर आक्षेप नोंदविले गेल्याने २०१२ मध्ये या उपक्रमावर केरळ सरकारने चौकशी लादली. त्यातून तावूनसुलाखून बाहेर पडून ही बिएनाले सुरू झाली. ‘इंडिया आर्ट फेअर’ हा अखेर व्यापारमेळाच. त्याचे आयोजक हे त्याचे मालकच. पण आर्थिक कारणांमुळे ही मालकी गेल्या ११ वर्षांत दोनदा बदलली आणि सध्या, ‘आर्ट बाझल’ या स्वित्र्झलडमधील अतिप्रतिष्ठित कलाव्यापार मेळय़ाच्या आयोजक कंपनीकडे दिल्लीतील या मेळय़ाची सूत्रे आहेत. मुंबईत पुढील आठवडय़ात भरणारा कलाव्यापार उत्सव हा प्रामुख्याने, कलावंत आणि कलादालने यांच्याकडूनच मिळणाऱ्या पैशावर सुरू आहे. बॉम्बे आर्ट सोसायटी आणि आर्ट सोसायटी ऑफ इंडिया या मोठय़ा आणि जुन्या कला संस्थांनी त्यांच्या वार्षिक स्पर्धा-प्रदर्शनांत विविध बक्षिसे देण्यासाठी स्थायी निधी उभारले आहेत. निधी हवा म्हणून राज्य सरकारपुढे दरवर्षी हात पसरण्याची वेळच या उपक्रमांना येत नाही. उलट, ‘बीएमडब्ल्यू’सारखे तगडे प्रायोजक कोची बिएनाले वा दिल्लीच्या व्यापारमेळय़ाचा आर्थिक पाठिंबा दर खेपेला कायम ठेवतात. या दोन्ही उपक्रमांना प्रेक्षकांचा आणि कला क्षेत्रातील मंडळींचा प्रचंड प्रतिसाद मिळतोच. पाटण्याहून दिल्लीला केवळ कलाव्यापार मेळा पाहण्यासाठी तरुण येतात, पाचशे रुपयांचे तिकीट काढावे लागले तरी सहन करतात. कोची बिएनाले हा दक्षिण आशियातील सर्वात मोठा आणि यशस्वी कला-उपक्रम, अशी दखल आता पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांनाही घ्यावी लागते. हे यश मिळते, याचे कारण आपण जे करायचे आहे ते उत्तमच, अशी आयोजकांची धारणा.

साहित्य संमेलनात बदल जर घडवायचे, तर जयपूर आदी ठिकाणचे ‘लिटफेस्ट’ उपक्रम अनुकरणीय आहेत असेही कुणाला वाटेल. ते ठीकच. पण मुळात आपल्याला कुणाचा प्रतिसाद हवा आहे, नेमक्या कोणत्या दिशेने आपल्याला आजची अभिरुची घडवायची आहे आणि त्यासाठी आपण काय करणार, याची उत्तरे प्रमुख आयोजकांनी शोधल्याखेरीज कोणताही उपक्रम गुणात्मकदृष्टय़ा वाढत नाही. मराठी साहित्याचे क्षेत्र आपणहून वाढते आहेच. पण मराठी साहित्य संमेलनांची वाढ मात्र फार तर संख्येने होते आहे. आजच्या विविधांगी मराठी साहित्याचा खरा उत्सव जसा असायला हवा, तसा तो होत नाही. आहे त्याहून फारच कमी सांगणाऱ्या, वास्तवाचे लघुरूपच मांडणाऱ्या ऊनोक्ती या अलंकाराची आठवण व्हावी, असे मराठी साहित्याच्या या सर्वोच्च उत्सवाचे स्वरूप आज उरले आहे. ते बदलावे, ही सदिच्छा.