स्थानिक भौगोलिक परिस्थिती, ऋतुमान, जीवनशैली यांस सुसंगत असेच कालविभाग पूर्वी होते. आज ईशान्य भारतही नेमकी हीच सोय मागत आहे.

मनगटावरचे घडय़ाळ मानगुटीवर आले आणि घडय़ाळाच्या काटय़ाची पराणी झाली. त्या टोचणीला माणसे घाबरू लागली. त्या काटय़ावर पळू लागली. थांबला तो संपला, काळ मागे लागला हे नव्या युगाचे गीत झाले. यालाही आता बरीच वष्रे झाली. पण अखेरीस काळालाही अवकाशाची मर्यादा असते. अवकाश नसेल, तर त्याला अर्थ तरी काय राहणार? आणि तो देणार तरी कोण? त्याला पाहणारा कोणी असेल, तरच त्याच्या अस्तित्वाला अर्थ. नाही तर पूर्वीही तो असाच निरंतर वाहतच होता की! कोण विचारीत होते त्याला तेव्हा? त्याला अर्थ दिला माणसांनी. हे आपल्या प्राचीन तत्त्वज्ञांचे ऋणच, की त्यांनी काळ ‘पाहिला’. ग्रह, ताऱ्यांच्या हालचालींतून, ऋतूंच्या बदलांतून त्यांनी त्याला रूप दिले वर्तुळाकार. नंतर त्यांच्या लक्षात आले, की हे काळाचे वर्तुळ फिरत असते एका रेषेत. तेच त्याचे खरे स्वरूप. ते जाणून घेण्यासाठी त्याचे भाग करणे आवश्यक होते. युग, कल्प, वष्रे, मास ते निमिषापर्यंत सारे काळाचे भागच आपण आपल्या सोयीने केलेले. ही सोय महत्त्वाची. कृषिप्रधान संस्कृतीत काळाचे मोठे भाग बहुसंख्यांची गरज भागवून जात. औद्योगिकीकरणाने मात्र त्याचे लहान लहान भाग केले. किती वाजले, हा आजही विचारला जाणारा प्रश्न तेव्हापासून चालत आला आहे. कुठे तरी एखाद्या प्रार्थनास्थळातील वाळूच्या घडय़ाळात एक प्रहर होई. ते सर्वाना कळावे म्हणून तेथील घंटा वाजविली जाई. त्या घंटेचे किती टोले ‘वाजले’ यावरून दिवसातील किती प्रहर उलटले ते समजे. आज तो प्रश्न कायम असला, तरी आपले घडय़ाळ फारच पुढे गेले आहे. हातातील घडय़ाळापासून भूगोलापर्यंत आपण कालाचीही विभागणी केली. जग आज प्रमाण वेळांमध्ये विभागले आहे. कारण- सोय. हातातील वा भिंतीवरील घडय़ाळाने औद्योगिक उत्पादन व्यवस्थेला आधार दिला. प्रमाण वेळांच्या विभागणीने त्यांच्या व्यापाराला, जागतिक अर्थव्यवस्थेला. ती नसती तर गोंधळ मातला असता सारा. जसा तो आपल्या ईशान्येकडील राज्यांमध्ये माजलेला आहे. त्यांच्या सामाजिक जीवनापासून अर्थव्यवस्थेपर्यंत सर्वच बाबींना भारतीय प्रमाण वेळेने ग्रहण लावले आहे. आणि म्हणूनच आज ते या काळाच्या गुंत्यातून सुटकेची याचना करीत आहेत. भारतात दोन कालविभाग करण्याची मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे. त्यांची मागणी आहे प्रमाण वेळेच्या फाळणीची. देशाची विभागणी दोन कालविभागांत करावी असे त्यांचे म्हणणे आहे.

परंतु प्रश्न देशाचा आणि त्यातही पुन्हा तुकडे वगरे करण्याचा म्हटल्यावर सारेच तर्कशास्त्र आणि विवेकवाद निष्प्रभ ठरतो. त्यामुळे या मागणीला विरोध होत आहे. वेळ बदलली तर लगेच ईशान्येकडील फुटीरतावादाला चांगला काळ येईल ही त्यामागील भीती. घडय़ाळालाही राष्ट्रवादाचे काटे बसविले की असे भय उत्पन्न होणारच. पण अनेकदा भीती जोगवते, फोफावते ती अज्ञानावर. काळ या संकल्पनेच्या आणि तिच्या दृश्य स्वरूपाबाबतच्या अडाणीपणातूनच आपल्याकडे आहे त्याच, एकाच एका प्रमाण वेळेबाबत आग्रह धरला जात आहे. वस्तुत: त्यात जगावेगळे असे काहीही नाही. अमेरिकेत आज चार प्रमाण वेळा आहेत. अलास्का आणि हवाईतील प्रमाण वेळा गणल्या, तर सात. ऑस्ट्रेलियात पाच आहेत. रशियात तर तब्बल नऊ स्थानिक प्रमाण वेळा वापरल्या जातात. हे सारे देश खंडप्राय. अशा राष्ट्रांत एकच एक प्रमाण वेळ असणे हे तसेही अनसर्गिकच. परंतु आपल्याला त्या अनसर्गिकतेची गेल्या सहा दशकांत एवढी सवय झालेली आहे की या देशातही वेगळे कालविभाग होते हे आपल्या गावीही नसते. तसे आपण भारतीय म्हणजे कोणत्याही कालविभागात न मोडणारे. भलेही आजच्या उत्तर प्रदेशातल्या मिर्झापूरजवळचा शंकरगढ किल्ला हा आपल्या प्रमाण वेळेचा भोज्जा असेल. तेथील वेळेवर सर्व देशाची घडय़ाळे लावली जात असतील. पण आपला एक वेगळा ‘इंडियन स्टँ.टा.’ असतोच. थोडक्यात एकाच प्रमाण वेळेचे पावित्र्य मानणाऱ्यांतले आपण नव्हेत. पूर्वीही आपल्याकडे बॉम्बे टाइम, कलकत्ता टाइम असे कालविभाग होते. ब्रिटिश भारतात तर बऱ्याच शहरांचे व्यवहार स्थानिक वेळेनुसार चालत. पुढे १९०५ मध्ये ब्रिटिशांनी भारतीय प्रमाण वेळ सुरू केली. तो काळ लाल-बाल-पाल यांच्या आंदोलनाचा. बंगालची फाळणी नुकतीच जाहीर झालेली. टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यातून निर्माण झालेल्या असंतोषाचा परिणाम असा, की लोकांनी ही प्रमाण वेळ स्वीकारण्यास नकार दिला. भारतात १९५५ पर्यंत बॉम्बे टाइम सुरू होता. स्थानिक भौगोलिक परिस्थिती, ऋतुमान, जीवनशैली यांस सुसंगत असेच ते कालविभाग होते. आज ईशान्य भारतही नेमकी हीच सोय मागत आहे. आणि त्यामागे बळकट कारणे आहेत.

हिमालयाच्या कुशीतला तो भाग. तेथे सूर्य लवकर उगवतो. सूर्यास्त लवकर होतो. पहाटे चार वाजता लोकांचा दिवस सुरू होतो तेथे. त्यांनी भारतीय प्रमाण वेळेनुसार कार्यालयीन व्यवहार सुरू होण्यासाठी सहा तास वाट पाहत बसायची? आणि सायंकाळी चार वाजता अंधारायला सुरुवात होते तेव्हा एक तास आधीच घराची वाट धरायची? यात किती ऊर्जा, किती वीज वाया जाते याचा विचारही केला जात नाही. या एका प्रमाण वेळेच्या दावणीला बांधल्यामुळे तेथील जनजीवनावर, उत्पादनक्षमतेवर परिणाम झाला आहे. तेव्हा वेगळ्या कालविभागाची त्यांची मागणी मान्य करण्यात तत्त्वत: तरी काही अडचण नाही. किंबहुना आज आसाममध्ये त्यांची स्वतंत्र चायबगान वेळ चालतेच. यालाच अधिकृत स्वरूप द्यावे. भारतीय कालविभागाची विभागणी करावी. ईशान्येकडील राज्यांची वेगळी, तेथील भौगोलिक परिस्थितीला अनुरूप अशी प्रमाण वेळ ठेवावी. या मागण्या मान्य होण्यास कोणाचीही हरकत असता कामा नये. ११ वर्षांपूर्वी नियोजन मंडळाने तशी शिफारसही केली होती. ती अर्थातच दुर्लक्षित करण्यात आली. न्यायालयानेही ती झिडकारली. यातून एक मधला मार्ग पुढे आला आहे. तो म्हणजे देशाचे दोन कालविभाग करण्याऐवजी या प्रदेशांतील प्रमाण वेळ अध्र्या तासाने पुढे करावी. यातून काही काळ गोंधळ उडेल हे खरेच आहे. परंतु रूळ बदलताना खडखडाट होणारच. तेथे पाहायचे असते ते खडखडाटाचा त्रास अधिक की रूळ बदलल्याचा फायदा जास्त. त्या निकषावर सध्या तरी वेगळे कालविभाग हा पर्याय अधिक लाभदायक दिसतो आहे. आणि काही अभ्यासकांनी तो लाभ प्रत्यक्ष पशांत मोजून दाखविला आहे. प्रमाण वेळ साधी अध्र्या तासाने वाढविली तरी दर वर्षी विजेच्या २७० कोटी युनिटची बचत होईल. परंतु अशा आर्थिक गणितांच्या पलीकडेही काही सामाजिक, सांस्कृतिक समीकरणे असतात. आज ईशान्येकडील राज्यांमध्ये सातत्याने दडपले गेल्याची जी भावना निर्माण झालेली आहे, त्याचे कारण या अशा छोटय़ा परंतु महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आहे. गेल्या किमान ४० वर्षांपासून भिजत पडलेला हा प्रश्न कधी कोणत्या रूपाने वर येऊन पेट घेईल हे सांगणे कठीण.

आता ऐवीतेवी अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी हा विषय उचलून धरला आहेच, तर त्यावर राष्ट्रव्यापी चर्चा झाली पाहिजे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने याचा अभ्यास सुरू केला आहे. परंतु हल्ली एकूणच अभ्यास सुरू आहे म्हटल्यावर नागरिकांच्या पोटात गोळाच येतो. निदान याबाबत तरी तसे होऊ नये. काळ बदलतो आहे. वेळही बदललेली आहे. अशा परिस्थितीत अरुणाचलची सकाळ उत्तर प्रदेशच्या वेळेनुसार व्हावी याला काही अर्थ नाही. त्यांचा सूर्योदय त्यांच्याच घडय़ाळानुसार व्हावा हे अधिक भले. हे करताना आपल्याला आपली वैचारिक घडय़ाळे जरा पुढे लावावी लागतील एवढेच..