11 December 2017

News Flash

तरुणींच्या बंडाचे स्वागत

लिंगभेदी व्यक्ती इतक्या उच्च पदावर असणे हेच मुळात लाज वाटायला लावणारे आहे.

लोकसत्ता टीम | Updated: September 27, 2017 2:32 AM

महिलांवरच मर्यादाभंगाचा आरोप करण्याची मानसिकता बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या कुलगुरूंनीही दाखविली..

संस्कार हे संस्कृतीप्रमाणे प्रवाही असतात आणि त्यामुळे त्यात काळानुरूप बदल होत जाणे गरजेचे असते. ते बदलले तर त्याचबरोबर शिस्त या संकल्पनेतही आवश्यक बदल होत जातो कारण शिस्त ही संस्कारोद्भव असते. हे सत्य समजून घेतले नाही आणि वृत्तीत आवश्यक तो बदल झाला नाही तर जे काही घडू शकते ते सारे सध्या बनारस हिंदू विश्वविद्यालयात होताना दिसते. या विद्यापीठातील तरुणींनी गेले आठवडाभर आंदोलन सुरू केले असून उत्तर प्रदेशातील शूर पोलिसांनी निर्घृण लाठीहल्ला करून ते चिरडण्याचा प्रयत्न केला. या मुलींच्या रागाचे निमित्त अगदी तात्कालिक. या विद्यापीठाच्या आवारात काही तरुणींची छेडछाड झाली. त्यावर या तरुणी तक्रार करण्यास गेल्या असता छेडछाड करणाऱ्यांकडे बोट दाखवून कारवाईचे आश्वासन देण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनी या तरुणींनाच धारेवर धरले आणि तुम्ही तिथे गेलातच का, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारून आरोपींनाच दोषी ठरवण्याच्या सध्याच्या मानसिकतेचे दर्शन घडवले. हे नवीन नाही. उत्तर भारतात तर नाहीच नाही. एरवीही ही अशी मानसिकता प्राय: महिलांबाबतच्या अत्याचार वा गुन्ह्यांबाबत आपल्याकडे नेहमीच दिसते. पुरुषांनी सर्व सांस्कृतिक बंध, समाजनियमांची पायमल्ली करून महिलांचा शारीर, भावनिक अपमान केला तरीदेखील पुरुषांवरील दोषारोप तपासण्याऐवजी महिलांवरच मर्यादाभंगाचा आरोप केला जातो. ही अधमवृत्ती एका पिढीने सहन केली. परंतु आजची पिढी ही केवळ वडिलकीचाच आदर्श मानणारी नसल्याने ती व्यवस्थेला आव्हान देते आणि त्यातून बनारस विश्वविद्यालयात जे घडते ते घडून येते. तरुणींच्या या बंडखोरीचे मन:पूर्वक स्वागत.

ते करताना ही बंडखोरी होते तेव्हा एक विशिष्ट राजकीय पक्ष सत्तेवर आहे हा मुद्दा पूर्णपणे गौण आहे. याचे कारण महिलांविषयीच्या वृत्तीबाबत सर्वच राजकीय पक्ष कमी-अधिक प्रमाणात एकसारखेच आहेत. मुलींनी दिवेलागणीस घरात परतावे, मुलांशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नये, मुलगा आणि मुलगी यांच्यासाठी शिस्तीचे नियम स्वतंत्रच असायला हवेत, मुलांना मुलींच्या तुलनेत अधिक पौष्टिक अन्न द्यावे लागते, मुलगे रात्री १० वाजेपर्यंत भटकू शकतात, मुलींनी मात्र आठच्या आत आपापल्या खोल्यांत परतायलाच हवे, वायफायसारखी आधुनिक सुविधा तरुणांच्या वसतिगृहात, मुलींना मात्र त्यासाठीदेखील आंदोलन आदी आजच्या काळाशी केवळ घृणास्पद म्हणता येतील अशाच साऱ्या घटना बनारस हिंदू विश्वविद्यालयात गेले काही महिने घडत होत्या. विषम नियमांमुळे त्या विश्वविद्यालयातील तरुणी चिडल्या. विश्वविद्यालय या इतक्या प्रतिगामी वृत्तीचे असल्याने या तरुणींचा संताप समजून घ्यायला हवा. याचे कारण विद्यापीठाचे प्रशासन ही इतकी हीन सांस्कृतिक मानसिकता केवळ महिलांबाबतच दाखवते. या सांस्कृतिक मानसिकतेतून आकारास येणारा शिस्तीचा बडगादेखील फक्त महिलांनाच सहन करावा लागतो. वास्तविक पुरुष म्हणून हा वर्ग संस्कृतीचे उल्लंघन स्वत:च्या सोयीनुसार करीत असतोच. परंतु महिलांचा प्रश्न आला की त्यास संस्कृती आणि परंपरा आठवते. म्हणजे प्राचीन हिंदू संस्कृतीत समुद्र ओलांडणे हे पाप मानले जाते. महिलांबाबत पापपुण्याचा हिशेब मांडणारे पुरुष म्हणून परदेशगमनाची संधी नाकारतात का? मुलगा आठ वर्षांचा झाला की आजही व्रतबंध नामक धर्मसंस्कार करणारे या मुलास त्याच धर्मसंस्कारांप्रमाणे गुरुगृही पाठवतात काय? किंवा याच कालबाह्य़ अशा व्रतबंध संस्कारात सांगितले गेलेले यमनियम आपला मुलगा पाळतोय किंवा काय, याची काळजी आपल्या पाल्यांचा व्रतबंध करणारे पालक घेतात का? ठरावीक वयानंतर वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करावा असे हिंदू धर्म सांगतो. या धर्माचे पालन करणारे हा वानप्रस्थाश्रमाचा सल्ला किती पाळतात? असे अनेक दाखले देता येतील. त्यातून फक्त या लबाड पुरुषी मानसिकतेचे सोयीस्कर धर्मप्रेमच अधिकाधिक अधोरेखित होईल. ते लक्षात घेतल्यास या विश्वविद्यालयातील तरुणी का संतापल्या हे समजून घेता येईल.

आणि या विश्वविद्यालयाच्या कुलगुरूंचे त्यावरील भाष्य पाहिले तर तेथील तरुणींचा संताप किती रास्त आहे, हेदेखील पटू शकेल. मुळात ज्यामुळे या मुली प्रक्षुब्ध झाल्या ते प्रकरण विनयभंगाचे नाही तर केवळ छेडछाडीचे आहे, असे विधान या विश्वविद्यालयाचे कुलगुरू गिरीश चंद्र त्रिपाठी यांनी केले. प्रामाणिक मराठीत या विधानाचा समाचार एका शरमशून्यतावाचक विशेषणाने घेतला गेला असता. परंतु अलीकडे याविषयीच्या जाणिवा जास्तच टोकदार झालेल्या असल्याने हे विशेषण असंसदीय ठरण्याचा धोका संभवतो. म्हणून आम्ही ते वापरण्याचा मोह टाळतो. परंतु मुद्दा असा की छेडछाड आणि विनयभंग यांतील सीमारेषा ठरवल्या कोणी? आणि त्या ठरवताना महिलांना विचारात घेतले होते की नाही? याचे उत्तर अर्थातच नकारार्थी असेल. तेव्हा कुलगुरुपदावरील व्यक्तीने हा नको ते उद्योग करण्याचे कारण नव्हते. खरे तर आपल्या विश्वविद्यालयाच्या प्रांगणात जो प्रकार घडला त्याची लाज बाळगण्याऐवजी त्याची चिकित्सा करीत बसणे हे कुलगुरुपदावरील व्यक्तीस शोभा देणारे नाही. आणि दुसरे असे की या गुन्हय़ाची तीव्रता कमी करण्याचे त्यांना काही कारणही नाही. तसेच हा गुन्हा विद्यापीठातील नाही तर बाहेरच्या तरुणांनी केला, असेही त्यांचे म्हणणे. तो कोणीही केलेला असू दे, पण तो घडला महाविद्यालयाच्या प्रांगणात हे सत्य आहे. अशा वेळी आपल्या अंगणात येऊन एखादी व्यक्ती अश्लाघ्य कृत्य करीत असेल तर ते कृत्य आपल्या घरातल्यांनी केले नाही याचा अभिमान बाळगायचा की आपल्या अंगणात बाहेरचे येऊन वाटेल ते करून जातात याची लाज बाळगायची? याच्या बरोबरीने कुलगुरूंनी विश्वविद्यालयातील तरुणींना आणखी एक मोलाचा सल्ला दिला. महिलांनो, पुरुष होण्याचा प्रयत्न करू नका, हा तो सल्ला. म्हणजे काय? पुरुष म्हणून कुलगुरू जन्माला आले त्यात मुदलात त्यांचे कर्तृत्व काही नाही. त्यात लाज बाळगावी असे जसे काही नाही तसेच अभिमान बाळगण्याचेही काही कारण नाही. अशा वेळी पुरुष होण्याचा प्रयत्न करू नका, असा सल्ला तरुणींना देणे हे तो देणाऱ्याच्या सामाजिक भानाविषयी शंका निर्माण करणारे आहे. या एकाच विधानासाठी त्यांना खरे तर नारळ द्यायला हवा. कारण स्त्री-पुरुष समानता सोडाच, पण इतकी लिंगभेदी व्यक्ती इतक्या उच्च पदावर असणे हेच मुळात लाज वाटायला लावणारे आहे. ज्यांच्या अखत्यारीत विद्यापीठांचा कारभार येतो त्या मनुष्यबळ विकास खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनादेखील या विधानाची लाज वाटत असेल. निदान ती वाटायला हवी. जावडेकर हे पुण्यातील. देशातील पहिली महिला डॉक्टर या पुण्याने दिली. अनेक सामाजिक चळवळींचा उदयही या पुण्यात झाला. तेव्हा आपल्या मातीतील संस्कारांचे स्मरण करून तरी जावडेकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्यायला हवी. ती घेण्याचा अधिकार त्यांना असेल अशी अपेक्षा बाळगणे गैर नाही.

या कुलगुरू महाशयांनी विश्वविद्यालयाच्या प्रांगणात जे काही घडले त्यास राजकीय हेतू जोडताना पंतप्रधानांच्या बनारस भेटीच्या पाश्र्वभूमीवर हे सारे जाणुनबुजून केले गेले असा आरोप केला. तो गंभीर आहे. जावडेकर यांनी कुलगुरूंना याबाबत तरी स्पष्टीकरण विचारायला हवे. तो जर खरा असेल तर संबंधितांवर गंभीर कारवाई व्हायला हवी आणि खोटा असेल तर कुलगुरूंवर. विश्वविद्यालयाच्या प्रांगणात राजकारण नको, असाही सज्जड दम हे कुलगुरू भरतात. हा त्यांचा नियम अभाविपसदेखील लागू असेल असे मानावयास हरकत नाही. वास्तविक ज्या विश्वविद्यालयाची स्थापनाच राजकारणातून झाली – आणि त्यात काही गैर आहे असे नाही – त्या संस्थेने आता राजकारण नको असे सांगणे हे राजकारण आपल्याविरुद्ध जात असल्याचे निदर्शक आहे, याचीही जाणीव कुलगुरूंना नाही. या कुलगुरूंची उंची तरुणींच्या बंडांमुळे उघड झाली. म्हणून त्यांच्या बंडाचे स्वागत.

First Published on September 27, 2017 2:32 am

Web Title: banaras hindu university bhu lathicharge up government