‘मी अमेरिकेत पुरेसा बदल घडवू शकलो नाही’ हे कबूल करण्याचा प्रांजळपणा असल्यानेच ‘खोटे बोल, पण रेटून बोल’ या वृत्तीवर ओबामांनी केलेली टीका सार्थ होते..

विद्वत्ता, ऋजुता आणि सभ्यपणा या त्रिगुणास केवळ धडाडी हा पर्याय असू शकत नाही. किंबहुना या तीन गुणांच्या अभावी धडाडी ही वावदूकपणाच ठरण्याचा धोका अधिक. याचे गांभीर्य अधोरेखित करणारे नेतृत्व जगभर फोफावत असताना अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी अफ्रिकेत केलेले भाषण या तीन गुणांची सार्वत्रिक अनुपस्थिती अधिकच जाणवून देणारी आहे. दक्षिण अफ्रिकेतील वर्णविद्वेषास तिलांजली देण्यासाठी आपले आयुष्य पणास लावणारे नेल्सन मंडेला यांच्या स्मरणार्थ आयोजित व्याख्यानासाठी ओबामा अफ्रिकेत होते. दोन वर्षांपूर्वी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर माजी अध्यक्ष या नात्याने ओबामा यांचा हा पहिलाच अधिकृत दौरा आणि पहिलेच अधिकृत भाषण. त्यासाठी त्यांनी निवडलेला मुहूर्तही महत्त्वाचा. मंडेला आज हयात असते तर आपल्या जगण्याचा शतकमहोत्सव साजरा करते. महात्मा गांधी यांच्या विचारांवर त्यांची दृढ निष्ठा होती आणि गांधीच्या नावे केवळ शब्दसेवा न करता ते त्या तत्त्वांधारे जगले. कित्येक दशके निग्रो म्हणून हिणवल्या गेलेल्या जगभरातील अफ्रिकी नागरिकांच्या अंधाऱ्या आयुष्यांत मंडेला हे दीपस्तंभ आहेत. अमेरिकेच्या इतिहासात अब्राहम लिंकन आणि मार्टिन ल्यूथर किंग आणि यांनी याच अफ्रिकींसाठी लढा दिला. ओबामा यांची अध्यक्षपदी निवड ही या सगळ्यांच्या लढय़ास लागलेले मधुर फळ. म्हणूनच, अब्राहम लिंकन ते महात्मा गांधी ते मार्टिन ल्यूथर किंग ते मंडेला या विचारसाखळीतील एक महत्त्वाचा दुवा असलेले ओबामा यांचे भाषण आणि त्यांची भूमिका, विद्यमान वातावरणात आशावादी आणि म्हणून दखलपात्र ठरते.

Iran Israel conflict wrong us policy worsening the west asia situation
अन्वयार्थ : अमेरिकेच्या चुकांची परिणती
us ambassador to india
“भविष्य घडवायचं असेल, तर भारतात या”; अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांच्याकडून भारताचं कौतुक
america statement on cm arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अमेरिकेची टिप्पणी, भारताने नोंदवला तीव्र आक्षेप
america bridge collapse
विश्लेषण : अमेरिकेत ४७ वर्ष जुना पूल कसा कोसळला? किती जणांनी गमावला जीव?

जगात सध्या एखाद्यास महानायक ठरवून विभूतीपूजेची प्रवृत्ती वाढू लागली आहे. ओबामा या भाषणात या विरोधात इशारा देतात. व्यवस्थेपेक्षा व्यक्ती कधीच मोठी असता नये, अशा अर्थाचा त्यांचा विचार. तो थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी नाते सांगणारा ठरतो. ‘‘धर्मपंथात भक्ती हा कदाचित आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असेलही. परंतु राजकारणात भक्ती वा व्यक्तिपूजा ही आधी लोकशाहीच्या अशक्तीकरणास आणि पुढे निश्चित हुकूमशाहीस जन्म देणारी असते,’’ इतक्या स्वच्छ शब्दांत २५ नोव्हेंबर १९४९ या दिवशी घटनासमितीत भाषण करताना डॉ. आंबेडकर यांनी आपले मत व्यक्त केले होते. ओबामा आज तीच चिंता व्यक्त करतात. जनसामान्यांना घाबरवून राजकीय विचार पुढे रेटण्याच्या प्रयत्नांबाबतही ओबामा यांनी केलेले भाष्य पुरेसे सूचक म्हणावे लागेल. ‘‘जन्माला येताना कोणतीही व्यक्ती धार्मिक वा वांशिक भेद घेऊन जन्माला येत नाही. या पृथ्वीवर येताना सर्वच समान असतात. धर्म, जात, पंथ याची शिकवण त्यांना नंतर दिली जाते. ज्या अर्थी असे क्षुद्र विचार त्यांच्या मनात नंतर रुजवता येत असतील तर त्याच पद्धतीने या विचारांना दूर कसे सारायचे याचेही शिक्षण देणे शक्य आहे,’’ असे ओबामा सांगतात आणि त्याच वेळी अमेरिकेसारख्या आधुनिक देशातही अद्याप वंशभेद पाळला जात असल्याचे कबूल करतात. हे असे करणे अवघड असते. आपण ज्या देशाचे नेतृत्व केले त्या देशास आपल्या काळात आपण पुरेसे बदलवू शकलो नाही, हे मान्य करण्यास धर्य आणि मनाचा मोठेपणा लागतो. एरवी आपल्यामुळे काय काय बदलले याची छातीठोक बढाई मारणाऱ्यांची संख्या कमी नाही.

या भाषणात ओबामा यांनी राजकारणात वाढू लागलेल्या ‘खोटे बोल, पण रेटून बोल’ या वृत्तीचाही समाचार घेतला. काही सत्य मान्य केल्याखेरीज संवादच होऊ शकत नाही, हे सत्य सांगताना त्यांनी दिलेले उदाहरण वरकरणी गमतीचे पण वस्तुत: गंभीर असे आहे. ‘माझ्यासमोर हा वक्त्यासाठीचा चौथरा आहे, हे सत्य. परंतु एखादा म्हणाला की तुमच्यासमोर जे काही आहे तो प्रत्यक्षात हत्ती आहे तर अशा वेळी संवाद कसा होणार? जगातील सर्व शास्त्रज्ञ पृथ्वीच्या वाढत्या तपमानाविषयी घसा फोडून इशारा देत आहेत. त्यासाठी पुरावा सादर करीत आहेत. तरीही एखादी व्यक्ती पृथ्वीचे तपमानवाढ ही फक्त अफवा आहे, असे म्हणत असेल तर अशा व्यक्तीशी तुम्ही काय संवाद साधणार?’’ हा ओबामा यांचा प्रश्न पुरेसा स्पष्ट होता. स्थलांतरित हा एक त्यांच्या भाषणातील महत्त्वाचा मुद्दा. जगण्यासाठी, अधिक प्रगती साधण्यासाठी माणसे एका देशातून, एका प्रांतातून दुसऱ्या देशांत, प्रांतात जाणार. त्यात काहीही गर नाही. उलट हा जनांचा प्रवाह प्रगतीचा निदर्शक असतो. अशा वेळी त्यांची वर्गवारी धर्म, वर्ण आदी मुद्दय़ांवरून करणे आणि त्यांना रोखणे हे अमानुष आहे. या स्थलांतरितांकडे संकट म्हणून पाहण्याऐवजी सामथ्र्य म्हणून पाहायला हवे, असे सांगत ओबामा यांनी नुकताच फुटबॉल विश्वविजेता ठरलेल्या फ्रान्स या देशाचे उदाहरण दिले. या देशाच्या विद्यमान संघातील निम्म्यापेक्षाही अधिक खेळाडू हे एकेकाळच्या निर्वासितांची मुले आहेत. तेव्हा त्यांना काय उपरे म्हणून दूर राखणार काय, असे विचारत ओबामा यांनी आपल्यासाठी आणि त्या देशातील नागरिकांसाठीही ते सारेच केवळ फ्रेंच खेळाडू आहेत. तीच त्यांची ओळख आहे आणि असायला हवी, असे नमूद केले.

जगातील एकमेव महासत्तेच्या माजी राष्ट्रप्रमुखाच्या भाषणातील एक मुद्दा विशेष चिंतनीय ठरतो. तो म्हणजे उद्योग, उद्योगपती आणि त्यांचे समाजापासून तुटणे. उद्योजकांचा एक मोठा वर्ग अलीकडे समाजापासून जास्तीत जास्त दूर जाऊ लागला आहे. तसे जगण्यातच त्यांना समाधान आणि मोठेपणा वाटतो. अशा उद्योगपतींसाठी त्यांच्या साम्राज्यातील एखादा कारखाना बंद करण्याचा निर्णय हा फक्त त्या कंपनीच्या समभागधारकांच्या हितासाठीच घेतला जातो. म्हणजे या समभागधारकांचे हित इतकेच काय ते त्यांच्यासाठी महत्त्वाचे. त्या परिसरातील वा अन्यत्र असलेल्या अन्य संबंधितांशी त्यांना काहीच देणेघेणे नसते, असा ओबामा यांच्या म्हणण्याचा सूर होता. तो रास्त म्हणावा लागेल. याचे कारण या कंपन्यांचे प्रमुख, त्यांच्याकडून स्वत:लाच दिले जाणारे महाप्रचंड वेतनादी भत्ते हा समाजातील अन्यांसाठी असंतोषाचे कारण ठरताना दिसतो. तथापि अमेरिकी माजी अध्यक्षाने या संदर्भात भाष्य करणे हे महत्त्वाचे. याचे कारण जगातील महाधनाढय़ हे मोठय़ा संख्येने त्याच देशात आढळतात.

त्यांच्या संपूर्ण भाषणाचा मध्यवर्ती धागा म्हणजे लोकशाही या मूल्याविषयीची चिंता. एकटय़ादुकटय़ाची कार्यक्षमता किंवा त्याचा तसा दावा हा खऱ्या लोकशाहीस पर्याय ठरू शकत नाही, हे त्यांचे विधान सर्वार्थाने सर्वकालिक सत्य ठरते. लोकशाही व्यवस्था ही प्रसंगी वेळखाऊ आहे, कंठाळी आहे, गोंधळ वाढवणारी आहे, हे मान्य. परंतु तरीही ती लोकशाही आहे आणि अंतिमत: जनसामान्यांच्या कल्याणाची क्षमता तिच्यातच आहे. कार्यक्षमतेचे एकांडय़ा शिलेदारांचे दावे हे खोटे आणि हुकूमशाहीकडेच नेणारे असतात, याबाबत ओबामा ठामपणे बोलले. माध्यमांतून बातमी आणि मनोरंजन यातील पुसट चाललेल्या सीमारेषेबाबतही त्यांनी काळजी व्यक्त केली. ती आपल्यालाही जशीच्या तशी लागू पडते.

या संपूर्ण भाषणात ओबामा यांनी कोठेही ट्रम्प यांचे नाव घेतले नाही वा त्या दिशेने काही निर्देश केला नाही. तरीही त्यांच्या प्रतिपादनाचा रोख स्पष्ट होता. सभ्यपणे, मर्यादाभंग न होता राजकीय मतभेदांवरदेखील संयत पण धारदार भाष्य करता येते, किंबहुना कसे करायचे असते, हे ओबामा यांच्या भाषणातून अनेकांनी शिकण्यासारखे आहे.