राजीव गांधी यांनी १९८४ मधील शिखांच्या शिरकाणाबद्दल स्वपक्षीयांनादेखील शासन करण्याचा राजधर्म पाळला असता तर देशात नंतरचा अनर्थ टळला असता..

काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना १९८४ च्या शीख दंगलीत शिक्षा ठोठावण्याच्या न्यायालयीन निर्णयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्ष आपल्या पापाची फळे भोगेल असे विधान कायदेमंत्री अरुण जेटली यांनी केले. या विधानाचे मन:पूर्वक स्वागत. जेटली स्वत: मोठे विधिज्ञ आणि या सरकारातील वजनदार नाव. त्यांनीच याविषयी सरकारची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यावरून सरकारचा न्यायसंस्थेविषयीचा आदरच दिसून आला. त्याची गरज होतीच. त्याआधी एक दिवस माजी काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मतदारसंघात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही न्यायसंस्थेवरील संकटांचा उल्लेख केला. काँग्रेस पक्ष न्यायपालिकेवर दबाव आणत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनीच असे विधान केल्याने त्याच्या सत्यासत्यतेविषयी शंका घेणे अयोग्यच ठरेल. या विधानावरून पंतप्रधानांचीही न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याविषयी असलेली अव्यभिचारी निष्ठाच दिसून येते. खरे तर दाराशी जेमतेम चार डझन खासदार असलेला काँग्रेस पक्ष न्यायपालिकेवर कसा दबाव आणतो, हे अधिक स्पष्ट करून त्यांनी त्या पक्षाच्या उरल्यासुरल्या अब्रूची लक्तरे चव्हाटय़ावर मांडायला हवी होती. ही राहून गेलेली बाब पंतप्रधान उर्वरित काळात पूर्ण करतील, अशी आशा. असो. या पाश्र्वभूमीवर दुसऱ्याच दिवशी दिल्ली उच्च न्यायालयाने सज्जन कुमार यांना दोषी ठरवून मरेपर्यंत जन्मठेपेची सजा सुनावली. १९८४ सालच्या ३१ ऑक्टोबरनंतर नवी दिल्ली आणि परिसरात जे काही घडले ते सारे मानवतेस काळिमा फासणारे होते. इतका नृशंस गुन्हा करणाऱ्यांना शासन होणे ही काळाची गरज होती. ती पूर्ण झाली. म्हणून या निर्णयाचे स्वागत.

न्यायपालिकेविषयी जनतेच्या मनात केव्हा संदेह निर्माण होतो? तर प्रत्यक्ष गुन्हा घडलेला असूनही त्यामागील गुन्हेगारांना शासन होत नाही, असे ढळढळीतपणे दिसून येते तेव्हा. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर जे घडले त्यातून हेच दिसून आले. त्यांची हत्या शीख माथेफिरूने केली. धर्मवेडय़ा शिखांचा इंदिरा गांधी यांच्यावर राग. कारण ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही त्यांनी केलेली कारवाई. धर्माचा आधार घेऊन भारतात खलिस्तानची फुटीरतावादी चळवळ उभी करणाऱ्या जन्रेलसिंग िभद्रनवाले याचा बीमोड करण्यासाठी अमृतसरातील सुवर्ण मंदिरात लष्कर घुसवावे लागले. राजकीय इतिहास असा की िभद्रनवाले यांना उभे केले ते इंदिरा गांधी यांनीच. पंजाबातील मध्यममार्गी अणि नेमस्त प्रतापसिंग केरॉ आदींना नमवून त्या राज्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी िभद्रनवाले यास हाताशी धरले. पुढे त्याचा भस्मासुर हाताबाहेर गेला. तो त्यांच्याच डोक्यावर हात ठेवण्यास गेल्यानंतर इंदिरा गांधी यांना लष्कर पाठवून त्याचा नायनाट करावा लागला. सौदी अरेबियातील इखवान हे अतिरेकी धर्मवेडे असोत वा अमेरिकेच्या बळावर मोठा झालेला ओसामा बिन लादेन असो. क्षुद्र, तात्कालिक राजकारणासाठी धर्माचा आधार घेतल्यास त्यातून निर्माण होणारे भस्मासुर हे निर्मात्यावरच उलटतात. जगाच्या इतिहासात याचे अनेक दाखले आढळतील. तरीही धर्माची चूल पेटवून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीच सगळ्यांचे प्रयत्न असतात. इंदिरा गांधी यांनी तेच केले. पण अंगाशी आले. सुवर्ण मंदिरात लष्कर हा धर्माचा अपमान असे मानणारे धर्मप्रेमी संतापले आणि अशातल्याच एकाने इंदिरा गांधी यांना गोळ्या घातल्या.

त्यानंतर नवी दिल्लीत शिखांचे शब्दश: शिरकाण झाले. काँग्रेस पक्षाचा छोटा-मोठा नेता बेफाम जमावाच्या झुंडीच्या झुंडी घेऊन शिखांना वेचून काढत होता आणि मिळेल त्या शस्त्र वा अस्त्राने त्यांचे प्राण घेत होता. वातावरण इतके दूषित झाले की शिखांची घरेच्या घरे जाळली गेली आणि तरीही कोणाला काहीही वाटले नाही. एखादा मोठा वृक्ष कोसळला की त्याच्या पायाशी असलेले छोटे-मोठे चिरडले जातात, असे या हिंसाचाराचे विवेकशून्य समर्थन तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्या वेळी केले. देशाच्या सर्वोच्च स्थानावरील व्यक्तीच जेव्हा इतके बेजबाबदार वर्तन वा विधान करते तेव्हा त्या पक्षाच्या साजिंद्यांना तुम्ही घाबरू नका. मी आहे तुमच्या मागे, असाच संदेश असतो. म्हणून उच्चपदस्थांनी धर्म/जात आदी मुद्दय़ांवर जमाव अधिकच क्षुब्ध होईल असे वागायचे वा बोलायचे नसते. अनेकांचे हे भान कसे सुटते हे या देशाने त्या वेळी आणि त्यानंतरही अनेकदा अनुभवले. असे झाल्यास हिंसेचे तांडव अधिकच रौद्र होऊ लागते. ८४ साली तसेच ते झाले. काँग्रेसचे जगदीश टायटलर, हरकिशनलाल भगत, सज्जनकुमार आदी अनेक त्या वेळी हिंसेचे नेतृत्व करण्यात आघाडीवर होते. त्यानंतरच्या निवडणुकांत इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे तयार झालेल्या सहानुभूतीचा फायदा राजीव गांधी यांना मिळाला आणि ते प्रचंड मताधिक्याने निवडून आले. चारशे खासदारांचा टप्पा ओलांडणाऱ्या काँग्रेससमोर त्या वेळी प्रमुख असलेल्या भाजप या विरोधी पक्षाचे अवघे दोन जण निवडून आले. इतकी विरोधकांची धूळधाण या निवडणुकीने केली.

वास्तविक अशा वेळी असे प्रचंड बहुमत उपभोगणाऱ्या काँग्रेस पक्षाने या दंगलीत हात असणाऱ्यांना शासन होईल यासाठी आवश्यक ती पावले उचलणे गरजेचे होते. जमावाच्या भावना प्रक्षुब्ध करून अश्रापांचे प्राण घेणाऱ्यांना कठोरतम शिक्षा व्हावी यासाठी आवश्यक ते ते करणे हा प्रत्येक सरकारचा खरे तर राजधर्म. राजीव गांधी यांनी तो पायदळी तुडवला. हे असे त्यांना करावेसे वाटले याचे कारण दंगलीतील अपराधी हे त्यांच्याच पक्षाचे. कायदेभंग केल्यास स्वपक्षीयांचीही गय न करण्याचा रामशास्त्रीबाणा या देशात क्वचितच दिसला. तेव्हा त्यासाठी काँग्रेसचा अपवाद करता येणार नाही, इतका हा प्रकार आपल्याकडे सर्रास होतो. कायद्यास राजकीय सोयीच्या आधारे वाकवले जाण्याचे ते काही पहिले उदाहरण नाही आणि शेवटचे तर नाहीच नाही. त्या वेळी त्यामुळे उलट या दंगलीतील दोषींना वाचवण्याचाच प्रयत्न झाला. पुढे सत्ताबदलानंतर हे प्रकरण पुन्हा नव्याने खुले केले गेले, त्यात केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागास आणले गेले आणि नंतर नेमला गेलेला नाणावटी आयोग यामुळे ते धसास लागले. तरीही कनिष्ठ न्यायालयात सज्जनकुमार यांच्यावरील गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. ते निर्दोष सुटले. यास दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान मिळाले आणि त्यावर सोमवारी निकाल लागून सज्जनकुमार दोषी ठरले. कनिष्ठ न्यायालयाची चूक वरिष्ठ न्यायालयाने सुधारली.

काँग्रेसचे पाप असे अरुण जेटली म्हणतात ते हेच. वास्तविक याच मुद्दय़ावर राजीव गांधी अधिक प्रगल्भपणे वागले असते आणि स्वपक्षीयांनादेखील शासन करताना दिसले असते तर या देशात नंतरचा अनर्थ टळला असता. राजीव गांधी यांच्या या कृत्यामुळे उच्चपदस्थांनी राजधर्म न पाळण्याची आणि अल्पसंख्याकांना बहुसंख्याकांच्या तोंडी देण्याची प्रथाच पडत गेली. सत्तेच्या आणि बहुमत/ बहुसंख्याकत्वाच्या जोरावर कितीही हिंसा केली, निरपराधांचे जीव घेतले, त्यांना जिवंत जाळले तरी सत्ताधारी वा सत्ताधारी समर्थकांना शिक्षा होतेच असे नाही, असा संदेश राजीव गांधी यांच्या कृतीने जनमानसात गेला. हे त्यांचे मोठेच पाप. म्हणून त्या पक्षाच्या नेत्यास न्यायालयाने दोषी ठरवल्याबद्दल जेटली यांना झालेला आनंद कायदाप्रेमींना उत्साहित करतो. देशातील अन्य दंगलींतील गुन्हेगारांनाही आज ना उद्या शिक्षा होऊ शकेल अशी आशा त्यातून निर्माण होते. असे भीषण पाप करणाऱ्या प्रत्येकास प्रायश्चित्त मिळायलाच हवे असे त्यांना वाटते ही बाब निश्चितच आश्वासक.