25 April 2019

News Flash

अवनतीचा नीचांक

राजद आणि जनता दल यांच्यातील पडद्यामागील घर्षणाच्या ठिणग्या आता पडद्यामागून पुढे येऊ लागल्या आहेत.

प्रश्न केवळ नितीशकुमारांच्या राजकीय भवितव्याचा नसून बिहारची वाटचाल पुन्हा एकदा जंगलराजकडे सुरू  होणे अधिक गंभीर आहे..

तुरुंगातून सुटल्यानंतर अवघ्या ४८ तासांत शहाबुद्दीन या कुख्यात माजी खासदाराने बिहारच्या राजकारणाचा रंगच पालटून टाकला. त्याने थेट मुख्यमंत्र्यांच्या अधिकारास आव्हान दिले. राजद आणि जनता दल यांच्यातील पडद्यामागील घर्षणाच्या ठिणग्या आता पडद्यामागून पुढे येऊ लागल्या आहेत..

एखाद्यावरील अन्यायाची परिसीमा काय असू शकते? बिहारातील सिवन गावचे चंद्रकेश्वर प्रसाद आणि कलावती हे याचे अंतिम उदाहरण. या वृद्ध दाम्पत्याच्या चार मुलांपैकी आता फक्त एकच हयात आहे आणि तोही विकलांग आहे. अन्य तिघे चांगले धट्टेकट्टे होते. पण ते तिघेही मारले गेले. लोकशाहीचे पवित्र मंदिर वगैरे मानल्या जाणाऱ्या संसदेचा सदस्य असलेल्या महंमद शहाबुद्दीन याने या तिघांपैकी दोघांना अंगावर अ‍ॅसिड ओतून ठार केले आणि तिसऱ्याने ही कृती पाहिली म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यालाही मारून टाकले. या प्रकरणात शहाबुद्दीन याच्यावर खटला भरण्यात आला असून दोन वर्षे झाली तरी तो उभाच राहिलेला नाही. परंतु शहाबुद्दीन या माजी खासदारावर इतकेच गुन्हे नाहीत. या तिघांच्या खुनांशिवाय अन्य किमान पाच डझन गंभीर गुन्ह्यांची नोंद त्याच्या खात्यावर आहे. परंतु यातील कोणताही खटला उभा न राहिल्याने या सद्गृहस्थास पाटणा उच्च न्यायालयाने ११ वर्षांच्या तुरुंगवासानंतर जामीन दिला. त्यानंतर माजी खासदार शहाबुद्दीन भागलपूर तुरुंगातून सुटला आणि एखाद्या विजयीवीराच्या थाटात, चंद्रकेश्वर प्रसाद आणि कलावती यांच्या नाकावर टिच्चून शहाबुद्दीन याची भव्य मिरवणूक काढली गेली. ती इतकी भव्य होती की भागलपूर ते सिवन हे जेमतेम पाच तासांचे अंतर कापण्यास त्यास सुमारे ३४ तासांचा अवधी लागला. १५०० दांडगट मोटारींतून हजारो तशाच दांडगटांचा ताफा या मिरवणुकीत होता आणि वाटेत कोणताही टोल आदी देण्याचा किमान नागरी सोपस्कार पाळण्याचे सौजन्य या माजी खासदाराने वा त्याच्या ताफ्यातील एकाही सदस्याने दाखवले नाही. अशा या शहाबुद्दीनच्या तुरुंगातून सुटण्याने बिहारातील मूळच्याच तोळामासा व्यवस्थेत भीतीची लाट पसरली असली तरी चंद्रकेश्वर प्रसाद आणि कलावती यांची मात्र स्थिती बरोबर उलट आहे. तीन तीन मुलगे मारले गेल्याचे डोळ्यांनी पाहिल्यावर भीतीची भावनादेखील आता शिल्लक नाही, आहे ते एक असहाय हताशपण असे ते म्हणतात. यातील विचित्र योगायोग असा की बिहारातील या सामान्य नागरिकाचे हताशपण आणखी एका व्यक्तीच्या हताशपणाशी सांधले गेले आहे. ही दुसरी व्यक्ती चंद्रकेश्वर प्रसाद यांच्यासारखी सामान्य नाही. हवे ते अधिकार, दिमतीला यंत्रणेची ताकद या दुसऱ्या व्यक्तीस उपलब्ध आहे. पण तरीही त्या व्यक्तीचे हताशपण काही जात नाही.

मुख्यमंत्री नितीशकुमार ही ती दुसरी हताश व्यक्ती. शहाबुद्दीन याने तुरुंगातून सुटल्या सुटल्या पहिला हल्लाबोल मुख्यमंत्र्यांवर केला आणि केवळ परिस्थितीने मुख्यमंत्रिपदी आरूढ झालेली व्यक्ती असे त्यांचे वर्णन केले. त्याचा अर्थ इतकाच की शहाबुद्दीन याने थेट मुख्यमंत्र्यांच्या अधिकारास आव्हान दिले. नितीशकुमार यांच्या असहायतेमागे तेवढेच कारण नाही. शहाबुद्दीन जेव्हा तुरुंगात गेला तेव्हा- २००५ साली,  शहाबुद्दीन ज्या पक्षाशी संबंधित आहे त्या लालूप्रसाद यांचा राजद आणि नितीशकुमार यांच्यातील हाडवैर टिपेला होते. शहाबुद्दीन यांच्यासारख्या गुंडांची साथसंगत उघडपणे मिरवणाऱ्या लालू यांच्या काळात बिहारचे रूपांतर कसे जंगलराजमध्ये झाले आहे, हे नितीशकुमार हिरिरीने सांगत. हे जंगलराज समाप्त केल्याखेरीज बिहारची गाडी रुळांवर येणार नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता. त्यावर विश्वास ठेवून बिहारी जनतेने नंतरच्याच निवडणुकांत नितीशकुमार आणि संगतीला असलेला भाजप यांच्या हाती राज्याची सूत्रे सोपवली. त्यानंतर कुमार यांनी खरोखरच बिहारची गाडी रुळांवर आणली आणि काही किमान कायदा व सुव्यवस्था राखली जाईल इतपत बिहारला सुसंस्कृत केले. त्याचमुळे नितीशकुमार यांना दोन वेळा सलग बिहारचे मुख्यमंत्रिपद मिळाले. तिसऱ्या खेपेसही ते मिळाले असते. परंतु त्या वेळी नितीशकुमार यांच्यातला जुना समाजवादी जागा झाला आणि ते भाजपच्या विरोधात गेले. त्याविषयी कोणाचा आक्षेप असावयाचे काही कारण नाही. राजकारण म्हटले की हे असे उद्योग आलेच. परंतु त्यापुढची कुमार यांची कोलांटउडी म्हणजे बिहारात मुख्यमंत्रिपद राखण्यासाठी त्यांनी थेट लालूप्रसाद यांच्या राजदशी पाट लावला. ज्या पक्षाच्या विरोधावर नितीशकुमार यांची राजकीय ओळख बनली त्याच लालूंच्या साह्याने, त्यांच्या चिरंजीवास उपमुख्यमंत्री करीत नितीश तिसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले. आता त्याच त्यांच्या सहकारी पक्षाचा शहाबुद्दीन नावाचा कुख्यात गुंड नेता तुरुंगातून सुटून आला असून मुख्यमंत्र्यांच्या अस्तित्वास आव्हान देऊ लागला आहे.

समस्या इतकीच नाही. तर या शहाबुद्दीन यांच्या सुरात सूर मिसळण्याचे पुण्यकर्म राजद नेत्यांकडून सुरू झाले असून या उचापतींना दस्तुरखुद्द लालूप्रसाद यादव यांची साथ वा फूस नाही, असे मानता येणार नाही. तुरुंगातून सुटल्यानंतर अवघ्या ४८ तासांत या शहाबुद्दीनाने बिहारच्या राजकारणाचा रंगच पालटून टाकला असून त्याचे करायचे काय हा प्रश्न नितीशकुमार यांना पडला आहे. याचे कारण लालूंच्या राजदचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंग यांनी शहाबुद्दीन याच्या सुरात सूर मिसळला. त्यापाठोपाठ राजदचे छोटेमोठे नेतेदेखील नितीशकुमार यांना टपल्या मारू लागले असून त्यांना रोखण्याचा कोणताही प्रयत्न लालू वा त्यांच्या चिरंजीव उपमुख्यमंत्र्यांनी अद्याप केलेला नाही. त्याचमुळे शहाबुद्दीन यांना बळ देण्यामागे खुद्द लालूच असावेत असे मानले जाते. तसे मानण्याचे आणखी एक कारण म्हणजे शहाबुद्दीन यांच्या ताफ्यातील १५०० गाडय़ांना टोल मागू नका, असे आदेश थेट सरकारातील उच्चपदस्थांकडून देण्यात आले होते. सध्या बिहारचे सरकार चौमुखी आहे. मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार,  उपमुख्यमंत्री लालूपुत्र तेजस्वीप्रसाद, नुकतीच खासदार झालेली लालूकन्या मिसादेवी आणि कुमार यांचा जनता दल आणि राजद यांच्यातील महायुतीचे भाग्यविधाते खुद्द लालूप्रसाद यांच्याकडे सत्तासूत्रे आहेत. म्हणजेच टोल घेतला जाऊ नये, शहाबुद्दीन यांचा मोटारकाफिला सरकारी इतमामात सोडला जावा असे आदेश नितीशकुमार वगळता अन्य तिघांकडून दिले गेले असणार, हे उघड आहे.

नितीशकुमार अस्वस्थ आणि असहाय आहेत ते याचमुळे. जे काही झाले त्याचा माध्यमांत बभ्रा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वीप्रसाद याने जनता दल आणि राजद यांच्यातील युती किती अभेद्य आहे, याच्या जाहीर आणाभाका घेतल्या. परंतु वास्तवात अशा आणाभाकांना किती महत्त्व द्यावयाचे हे सर्वानाच ठाऊक असल्याने त्यामुळे सरकारवरील प्रश्नचिन्ह पुसले गेले नाही. परिणामी राजद आणि जनता दल यांच्यातील पडद्यामागील घर्षणाच्या ठिणग्या आता पडद्यासमोर येऊ लागल्या आहेत. तसे होण्यामागील आणखी एक कारण म्हणजे नितीशकुमार यांचा ताजा दारूबंदीचा निर्णय. या निर्णयाने राज्यात असंतोष खदखदत असून आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठीच नितीशकुमार यांनी शहाबुद्दीनला मोकळे सोडण्याचा राजद-अनुनयी निर्णय घेतला असे उघड बोलले जाते. या वातावरणातील राजकीय संधीचा सुगावा विरोधी भाजपला लागला नसता तरच नवल. परंतु त्या पक्षासही राजकीय मतभेदांचा वारा लागला असून इतके दिवस बिहार भाजपचा चेहरा बनून राहिलेले सुशील मोदी बाजूला फेकले गेले आहेत.

अशा परिस्थितीत बिहारची वाटचाल पुन्हा एकदा जंगलराजकडे सुरू असलेली दिसते. या वाटचालीत नितीशकुमार यांचे काय व्हायचे ते होवो. परंतु राज्यातील असंख्य चंद्रकेश्वर प्रसाद आणि कलावती यांना न्याय मिळणार का हा खरा गंभीर प्रश्न आहे. ज्या समाजात सर्वोच्च सत्ताधीश आणि सामान्य नागरिक हे दोघेही तितकेच असहाय असतात तो समाज नीचांकी अवनतीचा निदर्शक असतो.

First Published on September 14, 2016 3:07 am

Web Title: criminal shahabuddin disputes with nitish kumar