हिंदू धर्मातील कालबाह्य रूढी नाहीशा करण्याची हाक सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली आहे. हिंदू धर्मातील अनेक मागास रूढी आणि परंपरा यांना पूर्णपणे मूठमाती देण्यात संबंधितांना यश आले आहे, असे नाही. ते करायचे तर, रूढींइतक्याच निर्थक असलेल्या कल्पनांना आधी ‘मुक्ती’ द्यावी लागेल.. कुंभमेळय़ातील साधूंच्या स्नानासाठी पाणी न सोडण्याचा निर्णयही मग रूढीनाशाकडे नेणारा ठरेल!

सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी िहदू धर्मातील कालबाह्य़ रूढींना मूठमाती देण्याची भाषा करावी आणि त्याच वेळी मुंबई उच्च न्यायालयाने नाशकात भरलेल्या कुंभमेळ्यात स्नानासाठी अतिरिक्त पाणी सोडणे बेकायदा ठरवावे हा- ज्योतिषाचा आधार घ्यायचा झाल्यास- गुरुपुष्यासारखा पवित्र योग मानता येईल. राजस्थानातील जयपूर येथे एका परिषदेत बोलताना सरसंघचालकांनी ही रूढीत्यागाची सूचना केली. तिचे भरभरून स्वागत व्हावयास हवे. अवैज्ञानिक रूढींचा त्याग केला जावा ही सूचना करण्यासाठी सरसंघचालकांनी राजस्थानातील जयपूरची निवड करावी हा योगायोगही अत्यंत महत्त्वाचा. याचे कारण याच राजस्थानात काही दशकांपूर्वी रूपकुंवर ही तरुणी पतीच्या सरणावर आपला देह लोटून सती गेली होती आणि काही िहदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांनी तिची भलामण केली होती. रा. स्व. संघ ज्या पक्षासाठी गुरुकुल आहे त्या पक्षाच्या तत्कालीन ज्येष्ठ नेत्या आणि ज्या राजस्थानात सरसंघचालकांनी ही सूचना केली त्या राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या मातोश्री राजमाता विजयाराजे िशदे यांनी त्या वेळी रूपकुंवरचे सती जाणे योग्य ठरवले होते. एखादी महिला स्वच्छेने सती जात असेल तर त्यात गर काय, असा प्रश्न राजमातांनी त्या वेळी विचारला होता. आता त्या नाहीत. अत्यंत आधुनिक जीवनशैली जगणाऱ्या त्यांच्या कन्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत आणि सतीचे प्रकारही रूपकुंवरनंतर घडलेले नाहीत. परंतु िहदू धर्मातील अन्य मागास रूढी आणि परंपरा यांना पूर्णपणे मूठमाती देण्यात संबंधितांना यश आले आहे, असे नाही. या ढळढळीत अपयशाच्या पाश्र्वभूमीवर सरसंघचालकांची सूचना अत्यंत स्वागतार्ह ठरते. तिची अंमलबजावणी त्यामुळे आता लगोलग सुरू होईल, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.
त्यामुळे दीनानाथ बात्रा आणि संबंधित आचरटांनी सध्या जो काही धुमाकूळ घातला आहे, त्यास आळा बसू शकेल. आमच्याकडे सर्व काही होते, असे या बात्राकुलातील अनेकांचे मत आहे. गंगेत स्नान केल्याने पापनाशन होते, गोमूत्र किंवा गोबर हा सर्व आजारांवर रामबाण इलाज आहे, तुळशीमुळे प्रदूषण कमी होते, रुद्राक्ष धारण केल्याने रक्तदाबादी व्याधी होत नाहीत, मेलेल्या माणसाचा आत्मा कावळ्याच्या रूपाने श्राद्धदिनी येतो, पुनर्जन्म, खाली वाकून नमस्कार केल्याने शरीरातून विशिष्ट लहरी बाहेर पडतात वगरे काही बाष्कळ कल्पना घेऊन हा वर्ग जगत असतो. अशा कल्पना बाळगणारे मूर्खाच्या नंदनवनाचे आनंदी रहिवासी असतात.
सरसंघचालकांनीच आता अवैज्ञानिक रूढी, समज दूर करण्याची सूचना केलेली असल्यामुळे या अज्ञानींचे या नंदनवनातील नागरिकत्व धोक्यात येऊ शकते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कडवे संघ स्वयंसेवक आहेत. काही दिवसांपूर्वी भारताच्या उज्ज्वल वैज्ञानिक परंपरेची महती गाताना त्यांनी आपल्याकडे पुराणकाळात प्लॅस्टिक सर्जरीदेखील केली जात होती, असे अनेकांना अभिमानास्पद वाटेल असे विधान केले होते. त्याच्या पुष्टय़र्थ त्यांनी दाखला दिला तो गणेशाच्या मूर्तीचा. मानवी देहावर प्लॅस्टिक सर्जरीद्वारे हत्तीच्या शिराचे आरोपण करून गणेश तयार झाला, असे पंतप्रधान म्हणाले. सरसंघचालकांच्या कालच्या विधानानंतर आपले पंतप्रधान पुन्हा असे बोलणार नाहीत. कारण पंतप्रधान मोदी म्हणाले ती कल्पनाच अवैज्ञानिक आहे. समजा वादासाठी ती खरी मानली तर प्रश्न असा पडतो की माणसाचे धड इतके अरुंद असते तेव्हा त्यावर भलेथोरले दणकट रुंद असे हत्तीचे शिर कसे काय बसवता येईल? आणि दुसरे असे की त्या वेळी जर प्लॅस्टिक सर्जरी िहदुस्थानात विकसित झालेली होती तर मानवी धडावर मानवाचेच शिर का नाही बसवले गेले, असेही विचारता येईल. असो. मात्र पुराणातील वानगी विज्ञानाच्या आभासी तुपात घोळवून आरोग्यदायी आणि वैज्ञानिक असल्याच्या बढाया मारण्याची गरज आता भासणार नाही. अवैज्ञानिक रूढींना मुक्ती देण्याची सूचना थेट सरसंघचालकांनीच केलेली असल्याने त्या आपोआपच आता नष्ट होतील. संघाचेच दुसरे स्वयंसेवक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील आता गोवंश हत्या बंदी कायद्याचा निश्चितच पुनर्विचार करतील. कारण गाय ही इतर प्राण्यांपेक्षा पवित्र वगरे असते आणि त्यामुळे तीस मारता नये, ही कल्पनाच अन्य अनेक विचारांप्रमाणे भाकड वैज्ञानिक आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभर रस्तोरस्ती हाडांचे सांगाडे वर आलेल्या हजारो गोमाता मुक्तीच्या प्रतीक्षेत िहडत आहेत. अवैज्ञानिक प्रथांचे उच्चाटन झाल्यास त्यांच्याही हालअपेष्टांचा अंत होईल.
सरसंघचालक हे मत व्यक्त करीत असताना इकडे मुंबईत उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी नाशकात भरलेल्या कुंभमेळ्यासाठी दुष्काळात पाणी सोडण्याचा निर्णय बेकायदा ठरवला. तसे केल्याबद्दल न्यायाधीशांनी कडक शब्दांत फडणवीस सरकारचे कान उपटले. गुरू आणि सूर्य हे सिंह राशीत आले की म्हणे सिंहस्थ योग होतो. ज्यांना तो पवित्र वाटतो त्यांनी तो पाळावा. कोणी काय पवित्र मानावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु म्हणून शेतीस पाणी नसताना, पाण्याअभावी िहदू धर्मात पवित्र मानल्या गेलेल्या वृक्षवेली करपून जात असताना, हजारो-लाखो गुरांचे प्राण पाण्याच्या एका घोटासाठी कंठाशी आलेले असताना नाशकात जमलेल्या ढेरपोटय़ा, कळकट गोसावडय़ांना डुंबता यावे म्हणून सरकारने त्यांच्यासाठी पाणी राखून ठेवावे याइतके अधम कृत्य नाही. गोदेवरील धरणातून पुढे अन्य दुष्काळी भागांना पाणी जाते. हे सूर्य आणि गुरू सिंह राशीत पोहोचले नसते तर तसे ते त्यांना मिळालेही असते. परंतु या सिंहस्थ योगामुळे गोदातटावरील पुढच्या सर्वानाच पाण्यास मुकावे लागणार आहे. जमिनीतले पीक, झाडांचे आयुष्य, शेतकऱ्यांचे प्राण, गुरांचे जगणे या सगळ्यापेक्षा या गांजेकस साधूंना आंघोळीसाठी पाणी देणे सरकारला महत्त्वाचे वाटते, यापेक्षा दुर्भाग्य ते कोणते? एरवी उदंड जाहले पाणी अशी अवस्था असती तर या मंडळींना स्नानसंध्या करावया ते वेगळे राखले असते तरी एक वेळ क्षम्य ठरले असते. परंतु पाण्याअभावी हजारोंचे प्राण कंठाशी येत असताना या कथित पुण्ययोगासाठी पाणी राखण्याइतके मोठे दुसरे पाप ते काय? हे पाणी तरी केवढे? तर त्यातून समस्त नाशिककरांची तब्बल ४० दिवसांची तहान भागू शकते, एवढे. इतके पाणी केवळ या गोसावडय़ांच्या स्नानासाठी सोडायचे. खरे तर ते संन्यासी. तेव्हा त्यांनी आंघोळ केली काय किंवा न केली काय, कोणास काय फरक पडतो? तरीही त्यांच्या खात्यात काही पुण्याची जमा व्हावी म्हणून इतरांना पाणी नाकारण्याचे पाप हे सरकार करीत आहे. गिरीश महाजन हे नाशकाचे पालकमंत्री. त्यांनाही आपल्या पापाची जाणीव झाली असावी. कारण त्यांनीही या बोगस साधूंच्या बरोबर गोदेत अंग धुऊन घेतले. तेव्हा खरे तर सरसंघचालकांचीच सूचना शिरसावंद्य मानून सरकारने पुढच्या शाही स्नानांसाठी तरी इतके पाणी वाया घालवू नये. वास्तविक यास शाही स्नान का म्हणतात, हादेखील प्रश्नच आहे. हे उघडेनागडे साधू, अक्राळविक्राळ हातवारे करीत मिरवणुकीने स्नानास जातात त्यात शाही काय आहे, हे कळावयास मार्ग नाही. सुरुवात म्हणून निदान यांच्या पाण्यात खेळण्यास शाही स्नान संबोधण्याची प्रथा सरकारी जाहिरातींत तरी बंद करावी. त्यात उदात्त आणि उन्नत असे काहीही नाही.
तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या टिप्पणीचे विचारी जनांनी स्वागत करावे. त्याचप्रमाणे भाजप असो वा काँग्रेस. कोणत्याही पक्षीय सत्ताधाऱ्यांनी उगाच कोणी भगवी वस्त्रे घातली म्हणून त्यास साधुसंत वगरे म्हणू नये. नाशकात जमलेल्यांचे गंड पाहता ते साधुत्वापासून किती दूर आहेत, ते ध्यानात येईल. गुळासारखा दिसतो म्हणून गुळदगड काही गुळाच्या गुणाचा नसतो याचे भान असो द्यावे. समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे..
गुळासारखा गुळदगड। परी तो कठीण निचाड
नागकांडी आणि वेखंड। येक म्हणो नये..
सरकार सध्या ही चूक करीत आहे.