‘युरोपियन सुपर लीग’ बासनात गुंडाळावी लागली खरी पण गुणवत्तेला, महत्त्वाकांक्षेला, संधी मिळण्याच्या हक्काला गौण लेखण्याची प्रवृत्ती तेवढ्याने थांबेल का?

सर्वसमावेशकत्वाचा आणि निकोप स्पर्धेचा विचार करण्याची संवेदनशीलता युरोपातील बड्या क्लबांच्या मालकांकडे नाही, हेच या प्रकरणातून दिसून आले…

बहुचर्चित आणि वादग्रस्त युरोपियन सुपर लीग फुटबॉल साखळी स्पर्धा उदयाला येण्यापूर्वीच रसिकक्षोभापायी गुंडाळली गेली, तरी अनन्यसाधारणत्वाचे (एक्स्लुझिविझम) हे बीज पूर्णतया जळून-विरघळून गेले आहे असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. अनन्यसाधारणत्व किंवा अभिजनवाद ही मानवाची आदिम भावना. कळपांचे समाज बनले तरी तिचे अस्तित्व सार्वत्रिक आहे. धास्ती ही शक्तिमानांच्या मनातच सर्वाधिक असते, असे समाजशास्त्र सांगते. याचे कारण काय असावे? शक्ती ही बहुतेकदा अजेयत्वाकडे नेते, पण त्या अजेयत्वात उद्दिष्टपूर्तीचा पूर्णविराम का सापडू शकत नाही? येथे ‘कुंगफू पांडा’ चित्रपटातील मास्टर ऊगवे या कासवावतारी गुरुजींच्या मुखातील शब्द आठवतात… ‘जितके अधिक घ्याल, तितके कमीच पडेल!’ कॉर्पोरेट विश्वात, राजकारणात, क्रीडा क्षेत्रात अभिजनांचे कंपू तयार होतात. खरे तर असे व्हायला नको. कारण उच्चस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या गळेकापू, तीव्र स्पर्धेवर स्वार होऊन तिला जिंकून ही मंडळी अग्रणी बनतात, त्या स्पर्धेचाच अचानक तिटकारा का वाटावा? युरोपातील अत्यंत यशस्वी आणि श्रीमंत अशा फुटबॉल क्लबांनी एकत्र येऊन एक बंदिस्त, निर्वात कंपू बनवला. या कंपूचे नाव युरोपियन सुपर लीग. या सुपर लीगच्या माध्यमातून स्पर्धात्मकतेचाच गळा घोटण्याचा प्रयत्न झाला. फुटबॉल या खेळाला इतर प्रमुख खेळांप्रमाणेच ओजस्वी इतिहास आहे आणि या इतिहासात प्रतिकूलतेवर मात करून अग्रस्थानी पोहोचलेल्या खेळाडूंच्या, राष्ट्रीय संघांच्या, क्लब संघांच्या अद्भुत कहाण्या तर असंख्य. कोणत्याही खेळामध्ये बलाढ्य संघ किती उत्कृष्ट खेळतात यापेक्षाही, कागदावर कमकुवत, कच्चे मानले जाणाऱ्या संघांनी बलवानांना कसे चारीमुंड्या चीत केले यांच्याच कहाण्या स्फूर्तिदायक ठरतात नि मुलांना त्या खेळाकडे आकृष्ट करतात. फुटबॉलमध्ये ब्राझील आणि क्रिकेटमध्ये भारत ही ठसठशीत उदाहरणे. युरोपियन सुपर लीगच्या निर्मात्यांना या स्पर्धासौंदर्याची आणि अशाश्वततेच्या जादूची फिकीर नाही. त्यांना नफेखोरी करायची होती. यासाठी शाश्वत आणि रडेगिरीचे प्रारूप हवे होते. म्हणूनच बंदिस्त स्पर्धेचा घाट घातला गेला. या योजनेच्या ठिकऱ्या युरोपातील फुटबॉल रसिकांनी आणि राष्ट्रीय सरकारांनी एकत्र येऊन उडवल्या. गेल्या काही दिवसांतील या घडामोडी अद््भुत मानाव्यात अशाच होत्या.

स्पर्धात्मक फुटबॉलचा जन्म युरोपातला. आज या खेळाचे केंद्र नि:संशय युरोपकडे सरकलेले आहे. युरोपिय क्लब फुटबॉलमध्ये कोट्यवधींची उलाढाल होते आणि हजारोंच्या रोजगाराची सोय होते. इंग्लंड, स्पेन, इटली, जर्मनी, फ्रान्स या पाच देशांतील फुटबॉल साखळ्या प्रतिष्ठित आणि प्रथितयश मानल्या जातात. हे सगळेच देश जागतिक फुटबॉलमधील मातब्बर आहेत हा योगायोग नाही. तरीही स्पेन, इटली आणि इंग्लंडमधील १२ बडे क्लब – रेआल माद्रिद, बार्सिलोना, अ‍ॅटलेटिको माद्रिद (तिन्ही स्पेन); एसी मिलान, इंटर मिलान, युव्हेंटस (तिन्ही इटली); मँचेस्टर युनायटेड, लिव्हरपूल, मँचेस्टर सिटी, चेल्सी, आर्सेनल आणि टॉटनहॅम (सहाही इंग्लंड) – एकत्र आले. त्यांनी मूलत: युरोपियन चँपियन्स लीग या जगातील सर्वांत प्रतिष्ठेच्या स्पर्धेपासून फारकत घेऊन २० क्लबांची सुपर लीग स्थापली. १५ स्थायी संघ आणि ५ अस्थायी संघ अशी रचना. युरोपियम चँपियन्स लीगविषयी या मंडळींचा आक्षेप हा, की फुटकळ संघही तिथे खेळतात. ते फारसे गंभीर नसतात. शिवाय बक्षिसाची रक्कमही बड्या क्लबमालकांना कमी वाटली. किती कमी? तर विजेत्यांना मिळतात अवघे नऊ कोटी युरो (साधारण १४ अब्ज रुपये)! उलट प्रस्तावित लीगमध्ये साडेतीनशे कोटी युरोंची (३१,६०० कोटी रुपये) उलाढाल अपेक्षित. उत्पन्न आणि परतावा यांचा न्याय्य मेळ साधला जात नाही हा यांचा आणखी एक आक्षेप. युरोपातील बड्या पाच देशांतील क्लब साखळ्यांचे एकत्रित उत्पन्न ‘युएफा’ अर्थात युरोपियन फुटबॉल संघटनेशी संलग्न सर्व संघटनांच्या एकत्रित उत्पन्नाच्या ७४ टक्के असते. परंतु ‘युएफा’कडून त्यांना त्या तुलनेत अत्यल्प परतावा मिळतो. बड्या पाच देशांना युरोपियन चँपियन्स लीगमध्ये केवळ प्रत्येकी तीन थेट जागा उपलब्ध असतात. बाकीच्या जागांसाठी पात्रता फेऱ्या खेळाव्या लागतात. याउलट ऑस्ट्रिया किंवा ग्रीससारख्या छोट्या देशांतूनही काही संघ थेट चँपियन्स लीगमध्ये जातात. ते कशासाठी, असा सुपर लीगवाल्यांचा सवाल. तेव्हा पात्रता फेरी वगैरे भानगडच नको. आमच्याकडच्या वलयांकित खेळाडूंनाच पाहायला प्रेक्षक आणि पुरस्कर्ते येतात ना. मग वलयांकितांचीच वलयांकित स्पर्धा भरवायला काय हरकत आहे, असा रोकडा विचार. सर्वसमावेशकत्वाचा आणि स्पर्धेचा विचार करण्याची  संवेदनशीलता युरोपातील बड्या क्लबांच्या – विशेषत: इंग्लिश, स्पॅनिश आणि इटालियन – बहुतेक मालकांमध्ये नाही आणि तशी गरजही त्यांना वाटत नाही. यांतील काही अरब वा रशियन तेलसम्राट आहेत. काही अमेरिकेत बंदिस्त लीगच बघत लहानाचे मोठे झालेले धनदांडगे आहेत. इटलीतील युव्हेंटस या क्लबची मालकी असलेले अग्नेली कुटुंब फेरारी मोटारींचे निर्माते. रस्त्यांवर सगळ्या फेरारीच धावाव्यात, तद्वत क्लब फुटबॉल केवळ मोजक्यांसाठीच असावे, असा यांचा हिशोब. अग्नेली हे सुपर लीगचे एक प्रणेते. पण या नफेखोर कंपूला विशेषत: इंग्लिश फुटबॉल चाहत्यांनी वठणीवर आणले. त्यांनी केलेल्या निदर्शनांसमोर भल्याभल्या क्लबांची भंबेरी उडाली. सहाही इंग्लिश क्लब सुपर लीगमधून बाहेर पडलेच. काहींच्या उच्चपदस्थांना राजीनामे द्यावे लागले. या बहुतांनी ‘आम्ही चुकलो’ असे पत्र प्रसृत करून जाहीर माफी मागितली.

पण अभिजनवादाचे हे लोण युरोपियन क्लब फुटबॉलपुरते मर्यादित नाही. स्पर्धेचा तिटकारा आहे, कारण सर्वसमावेशकता ही अडचण वाटते. आपल्याला जे मिळते, ते वृद्धिंगत करायचे तर लाभातील वाटेकरी कमी झाले पाहिजेत ही भावना. स्पर्धेतूनच निम्नस्तरातील कुणी वरचढ होईल ही भीती. यांच्यातील कोणाचीही असा विचार करण्याची क्षमता नाही, की हे दहा-बारा क्लब पृथ्वीवर एखादा धूमकेतू आदळल्यामुळे प्रकट झालेले नाहीत. एखादा वेन रूनी एव्हर्टनसारख्या छोट्या क्लबमधूनच मँचेस्टर युनायटेडकडे येतो. सर्वसमावेशकता आणि निकोप स्पर्धा आहे म्हणूनच इजिप्तमध्ये जन्मलेला एखादा मोहम्मद सालाह लिव्हरपूलकडून चमकू शकतो. पोर्तुगालसारख्या युरोपीय निकषांवर गरीब असलेल्या देशात जन्मलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो सुपर लीगच्या संस्कृतीत वाढूच शकला नसता. युरोपातील सच्च्या फुटबॉलप्रेमींनी सुपर लीगचा पहिला प्रयोग हाणून पाडला हे खरे, पण एक संकल्पना म्हणून या लीगला तिच्या निर्मात्यांनी मूठमाती दिलेली नाही. ते ही संकल्पना रेटत राहणार. ‘आम्ही आणि आमचेच’ एकत्र आलो, तरच जगाचे भले होणार ही प्रवृत्ती बाकीच्यांतील गुणवत्तेला, महत्त्वाकांक्षेला, संधी मिळण्याच्या हक्काला गौण लेखते. परंतु स्वत:ला संधी मिळाल्यामुळे उच्चस्थानी पोहोचलेल्यांकडूनच हा घोळ कसा काय होतो हे न सुटलेले कोडे आहे. युरोपातील फुटबॉल हा प्राधान्याने बहुजनांचा, कष्टाळू वर्गाचा, उदरनिर्वाह आणि युद्धांमधून वेळ काढून आनंदण्याचा विरंगुळा होता. त्याच भावनेतून विद्यमान प्रयोगाला विरोध झाला असला, तरी अभिजनवादाला पूर्णविराम मिळाला असे मानता येणार नाही. तो अजून तरी अल्पविरामच असल्यासारखा वाटतो.