अमेरिकी महिला फुटबॉल खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षांव होतो आहे तो विजयाच्या विक्रमाबद्दल आणि अध्यक्षांस त्यांची जागा दाखवून दिल्याबद्दलही..

ट्रम्प यांचा पाणउतारा हा अमेरिकेचा अपमान कसा काय ठरतो, असे विचारले जात आहे. या संदर्भात दाखला दिला जातो, तो सीएनएन या वृत्तवाहिनीचा..

देशावर प्रेम असण्यासाठी आणि ते व्यक्त करण्यासाठी देश चालवणाऱ्यांविषयी प्रेम असायला आणि व्यक्त करायलाच हवे असे नाही, अशा अर्थाचे एक वचन आहे. अमेरिकेत जे काही घडले त्यामुळे या वचनाची वास्तविकताच चच्रेस आली असून त्यामुळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायची वेळ आल्याचे दिसते. अर्थात या साऱ्यात प्रौढ आणि समंजस लोकशाही कशी असते याचेही दर्शन होत असल्याने हे नाटय़ समजून घ्यावे असे आहे. झाले ते असे.

महिलांच्या जागतिक फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अमेरिका विश्वविजेती ठरली. त्या देशासाठी ही मोठीच कामगिरी ठरते. पुरुषांच्या विश्वचषक फुटबॉल सामन्यांप्रमाणे महिलांची विश्वचषक स्पर्धादेखील दर चार वर्षांनी भरवली जाते आणि पुरुषांच्या स्पर्धेप्रमाणे तिचे आयोजनदेखील ‘फिफा’ या संघटनेमार्फतच केले जाते. यंदा या स्पर्धेसाठी अंतिम सामना रविवारी नेदरलँड्स आणि अमेरिका यांच्यात पार पडला. त्यात अमेरिकेने विश्वचषक जिंकला. त्या देशाने असा विक्रम नोंदवण्याची ही चौथी खेप. त्यामुळे अमेरिकी संघावर शुभेच्छांचा वर्षांव होत असून अमेरिकी पुरुष संघास जे जमले नाही, ते महिलांनी करून दाखवले असे मानले जात आहे. यास आणखी एक किनार आहे ती समान मानधन मिळावे या महिला संघाच्या मागणीची. पुरुष खेळाडूंसाठी जितके मानधन दिले जाते तितकेच आम्हालाही मिळावे अशी महिला खेळाडूंची मागणी असून याबाबत कज्जाखटलादेखील तेथे सुरू आहे. ताज्या विजयाने महिला खेळाडूंच्या मागणीस अधिक धार येईल असे मानले जाते. तथापि या संदर्भातील ताज्या नाटय़ास सुरुवात झाली, २९ जून या दिवशी.

त्या दिवशी अमेरिकी संघाने फ्रान्स संघास पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. ही बाबदेखील मोठी. याचे कारण पुरुषांप्रमाणे फ्रान्सचा महिला संघदेखील कौशल्यात सरस असून स्पर्धा फ्रान्समध्येच सुरू असल्याने त्यांना मोठे पाठबळसुद्धा होते. तरीही अमेरिकी संघाने यजमान संघास धूळ चारली. त्या विजयाने भारून जात अमेरिकेच्या रिपब्लिकन संघाच्या प्रतिनिधी अलेक्झांड्रिया कॉर्टेज यांनी विश्वविजेतेपद पटकावून या महिला संघाने अमेरिकी प्रतिनिधी सभागृहास भेट द्यावी असे आमंत्रण दिले. ते देताना अलेक्झांड्रिया म्हणाल्या : आमचे सदन भले व्हाइट हाऊस इतके देखणे वा प्रभावशाली नसेल; पण आम्ही अत्यंत आपुलकीने तुमचे स्वागत करू.

हे प्रकरण खरे तर तेथेच संपले. तथापि या संदर्भात अनौपचारिकपणे वार्ताहरांशी बोलताना अमेरिकी संघाच्या कर्णधार मेगन रॅपिनो यांना प्रश्न केला गेला, समजा व्हाइट हाऊसचे निमंत्रण आले तर तुम्ही ते स्वीकाराल का? यावर या कर्णधाराचे उत्तर स्फोटक होते. ‘‘मी त्या **** व्हाइट हाऊसमध्ये पाऊलही टाकणार नाही. तशी मला इच्छादेखील नाही. आणि दुसरे म्हणजे आम्हाला तेथून निमंत्रणही येणार नाही.’’

वास्तविक ही बाब अध्यक्षांनी दखल घ्यावी इतकी महत्त्वाची होती का याबाबतच मुळात शंका असताना अध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे यांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि पाठोपाठ तीन ट्वीट करून त्यांनी अमेरिकी महिला फुटबॉल संघाच्या कर्णधार रॅपिनो यांना छेडले. ‘आधी मुळात रॅपिनो यांनी विश्वचषक जिंकून दाखवावा,’ असे ट्रम्प म्हणालेच. पण वर अनेक अमेरिकी क्रीडा संघ व्हाइट हाऊसला भेट देण्यास कसे उत्सुक असतात हे ट्रम्प यांनी नमूद केले. ‘तेव्हा व्हाइट हाऊसचे निमंत्रण येणार की नाही, तो प्रश्न नंतर. आधी या रॅपिनो यांच्या संघाने विजेतेपद मिळवून दाखवावे. ते काम अद्याप बाकी आहे. आणि विजेतेपद मिळाले अथवा नाही तरी देशाचा अपमान करू नये. या देशाने त्यांच्यासाठी इतके केले आहे, तेव्हा देशाचा असा अपमान करणे योग्य नाही,’ अशा अर्थाचा युक्तिवाद ट्रम्प यांनी ट्वीटमधून केला. त्यावर अध्यक्षांनी हे जरा अतिच केले अशी प्रतिक्रिया अमेरिकेत उमटली.

याचे कारण रॅपिनो आणि ट्रम्प यांच्यातील द्वंद्व नवे नाही. या आधीही रॅपिनो यांनी ट्रम्प यांना त्यांच्या सामाजिक मतांबाबत जाहीर विरोध केला होता. ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. सामाजिक प्रश्नांवर या पक्षाचे नेते बरेच सनातनी आहेत. त्यांचा गर्भपातास विरोध आहे, स्कंद पेशी संशोधन (स्टेमसेल) त्यांना मान्य नाही आणि समलैंगिकता हा या पक्षाच्या नेत्यांना आजार वाटतो. त्यामुळे अमेरिकेतील सुधारणावादी वा आधुनिक जीवनशैली जगणाऱ्यांचा त्यांना विरोध आहे. त्यात रॅपिनो या स्वत: समलैंगिक संबंधांच्या पुरस्कर्त्यां असून त्यांना ट्रम्प यांची ही मते अर्थातच मान्य नाहीत. त्याचप्रमाणे स्थलांतरितांच्या प्रश्नांवर ट्रम्प यांची भूमिका हादेखील उभयतांतील तणावाचा मुद्दा आहे. याआधी ट्रम्प यांच्या देखत राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे न राहता त्यांचा राजकीय निषेध नोंदवणाऱ्या खेळाडूंतही रॅपिनो यांचा समावेश होता. त्यामुळे ट्रम्प आणि ही महिला खेळाडू यांच्यातील संबंध तसे तणावाचेच होते. त्यात आता या प्रकरणाची भर.

हे प्रकरण अधिक ताणले गेले ते अमेरिका आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्याप्रसंगी. या सामन्यात आपल्या संघास उत्तेजन देण्यासाठी अमेरिकी प्रेक्षक सातत्याने अध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात अश्लाघ्य घोषणा देत होते. रॅपिनो यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात जो असंसदीय शब्दप्रयोग केला त्याचाच आधार घेत सामना सुरू असताना अमेरिकी अध्यक्षांचा निषेध होत गेला. अखेर रॅपिनो यांच्या संघाने विश्वविजेतेपद मिळवल्यावर त्यांच्या जयजयकाराइतक्या ट्रम्प निषेधाच्या घोषणाही दुमदुमल्या. दुसऱ्या दिवशी अमेरिकी माध्यमांनीही यानिमित्ताने ट्रम्प यांच्यावर टीका केली. आता तुम्ही या संघास निमंत्रण देणार का, असे विचारता ओशाळे झालेले ट्रम्प ‘‘मी विचार करीन’’,  इतकेच काय ते म्हणू शकले.

या नाटय़ाचे अमेरिकी समाजजीवनात चांगलेच पडसाद उमटत असून ट्रम्प यांचा पाणउतारा हा अमेरिकेचा अपमान कसा काय ठरतो, असे विचारले जात आहे. या संदर्भात दाखला दिला जातो, तो सीएनएन या वृत्तवाहिनीचा. अध्यक्षपदी निवड झाल्यावर या आंतरराष्ट्रीय वाहिनीने ट्रम्प यांची बरीच कुलंगडी बाहेर काढली. त्यास आक्षेप घेताना ट्रम्प यांनी या वाहिनीवर देशाची प्रतिमा मलिन करीत असल्याचा आरोप केला. तो तितक्याच जाहीरपणे फेटाळताना सीएनएनने उत्तर दिले : अमेरिकेची प्रतिष्ठा राखणे हे तुमचे काम आहे, आमचे नाही. आमचे काम आहे बातम्या देणे. तेच आम्ही करीत आहोत. तसेच अध्यक्षपदावरील व्यक्तीच्या प्रतिष्ठेशी देशाची प्रतिमा बांधणे कसे अयोग्य आहे, त्याचीही चर्चा त्या वेळेस अमेरिकेत विविध पातळ्यांवर झाली. आताही तेच होत असून महिला फुटबॉल खेळाडूंनी अध्यक्षांस त्यांची जागा दाखवून दिली याबद्दल रॅपिनो आणि संघावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. याआधी राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धात विजयी ठरलेल्या ‘गोल्डन स्टेट वॉरियर्स’ संघानेही अध्यक्ष ट्रम्प यांचे निमंत्रण झिडकारले होते.

आपल्याकडे लहानमोठय़ा विजयीवीरांत, चित्रपट तारेतारकांत सत्ताधाऱ्यांसमोर सेल्फीसाठी झुंबड उडते आणि हा वर्ग सत्तेसमोर लवण्यात कशी धन्यता मानतो तेच दिसते. त्या पाश्र्वभूमीवर विश्वचषक क्रिकेट सामने अंतिम टप्प्यात आलेले असताना ही घटना फारच सूचक म्हणायला हवी. तीमधून जसे अमेरिकी लोकशाहीचे दर्शन होते तसेच कणा असलेला आणि नसलेला समाज यांतील फरकही दिसून येतो.