द्विराष्ट्रवाद सिद्धांताचा इतिहास अभ्यासल्याविना राजकीय सोयीसाठी कुणावरही खापर फोडता येतेच, पण इतिहास माहीत करून घेतला तर काय दिसते?

भारत-पाकिस्तान यांच्यातील फाळणीची मागणी होण्याआधी, १९२४ साली आर्य समाजाचे लाला लजपत राय यांनी हिंदू आणि मुस्लीम राष्ट्रांसाठी भौगोलिक रचना सुचवली होती.. मात्र धर्माधारित फाळणी होऊन पाकिस्तान टिकवता आला का?

‘पंतप्रधानपद मिळावे म्हणून देशाची फाळणी केली गेली,’ अशा अर्थाचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केले. यात त्यांनी ‘कोणी’ या प्रश्नास नि:संदिग्धपणे स्पर्श केला नाही. संदिग्धता हा प्रचारकी राजकारणाचा कणा. तेव्हा जे झाले ते त्यानुसार. तथापि पंतप्रधानपदावरील व्यक्तीने हे विधान केलेले असल्याने ते सर्वागाने तपासून घेणे आवश्यक ठरते. मोदी यांचे विधान दोन व्यक्तींनाच लागू होते. एक ‘पाकिस्तान’कर्ते महंमद अली जिना आणि दुसरे जवाहरलाल नेहरू. या दोघांपैकी मोदी आणि त्यांच्या पक्षास अधिक घृणा कोणाविषयी, हे सांगणे कठीण. या दोघांनी वा दोघांतील एकाने पंतप्रधानपद मिळावे यासाठी देशाची फाळणी केली, असा मोदी यांच्या विधानाचा अर्थ. वास्तव इतिहास आणि तो तपासण्यासाठी किमान तर्कसंगतता याआधारे पाहू गेल्यास यातील असत्य आणि तर्कदुष्टता समजून घेणे अवघड जाणार नाही. अन्यांसाठी या इतिहासाची उजळणी आवश्यक ठरते. त्यासाठी द्विराष्ट्रवाद सिद्धांताच्या मुळाशी जावे लागेल.

याचे कारण आपल्याकडे सर्रास करून देण्यात आलेला आणि बहुसंख्यांना आनंदाने करून घेण्यास आवडणारा समज म्हणजे- देशाची फाळणी व्हावी ही जिना वा अन्य मुसलमान राजकारण्यांची इच्छा. कागदोपत्री उपलब्ध इतिहास दर्शवतो की, मुस्लीम लीग, जिना, डॉ. आंबेडकर किंवा वि. दा. सावरकर यांच्याही किती तरी आधी हिंदूंसाठी स्वतंत्र राष्ट्राच्या गरजेचा मुद्दा मांडला गेला होता. द्विराष्ट्रवादाची चर्चा एकोणिसाव्या शतकात सुरू करणाऱ्यांमध्ये जसे सर सय्यद अहमद खान होते, तसेच काही मान्यवर बंगाली हिंदूही होते. राजनारायण बसू आणि नबगोपाल मित्र ही त्यांची नावे. यातील बसू हे अरविंद घोष यांचे आजोबा. विसावे शतक उगवायच्याही आधी, म्हणजे अर्थातच बंगालचा दुष्काळ, मुस्लीम लीगची स्थापना, त्यास प्रत्युत्तर म्हणून आकारास आलेली हिंदू महासभा वगैरे क्षितिजावरही नसताना, बसू यांनी या संदर्भात मांडणी केली आणि नेटिव्ह हिंदूंत राष्ट्रवादाची भावना वाढीस लागावी यासाठी संस्थेची स्थापना केली. हिंदू धर्मातील जातीची उतरंड मान्य केली तरीही (त्यांना जातिव्यवस्थेचा अभिमानच होता) हा धर्म ख्रिश्चन वा इस्लाम यांपेक्षा श्रेष्ठ ठरतो, या प्रतिपादनार्थ ते काम करीत. अखिल भारतीय हिंदू संघटना स्थापन करण्याचे सूतोवाच सर्वप्रथम त्यांचेच. अशा संघटनेच्या मदतीने ‘आर्याची सत्ता’ स्थापन करता येईल असे ते मानत. नबगोपाल मित्र यांनी एक पाऊल पुढे जात वार्षिक हिंदू मेळे सुरू केले. ‘हिंदू हे स्वतंत्र राष्ट्र’ ही त्यांची धारणा होती. बंगालातील या हिंदू जागृतीनंतरच्या काळात उत्तरेत आर्य समाजींनी ही मागणी रेटल्याचे आढळून येते. या समाजाचे भाई परमानंद हे गदर पक्ष आणि नंतर हिंदू महासभा या दोहोंशी संबंधित होते. इस्लाम आणि हिंदू धर्माचे अनुयायी या दोन स्वतंत्र राष्ट्रकल्पना आहेत, अशी थेट मांडणी त्यांची. इतकेच नव्हे, तर काही प्रांतांतून हिंदू आणि मुसलमान यांची अदलाबदल केली जावी असेही त्यांचे प्रयत्न होते आणि त्यासाठी ते भडक प्रचार करीत. आफ्रिकेत जाऊन त्यांनी महात्मापूर्व गांधींच्या कार्याशी स्वत:स जोडून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि नंतर लाला लजपत राय यांच्याशीही ते संबंधित होते. हिंदू-मुसलमान संदर्भातील त्यांची मते आत्मचरित्रातून समजून घेता येतील.

लाला लजपत राय यांचीही वाटचाल पुढे त्याच मार्गाने झाली हा इतिहास आहे. त्याआधी गदर पक्षाचे लाला हरदयाल यांना तर हिंदुराष्ट्रनिर्मिती इतकेच अफगाणिस्तानचेदेखील हिंदूकरण हवे होते. भारत-पाकिस्तान यांच्यातील फाळणीची मागणी जिना आणि मुस्लीम लीग यांच्याकडून झाली ती १९३९ साली. तथापि त्याआधी किमान १५ वर्षे, म्हणजे १९२४ साली, राय यांनी मुसलमानांसाठी वायव्य प्रांत, पश्चिम पंजाब, सिंध आणि पूर्व बंगाल अशा प्रकारची स्वंतत्र भौगोलिक रचना सुचवली होती आणि देशाच्या अन्य प्रांतांतही बहुसंख्य मुसलमान जेथे असतील तेथे त्यांच्यासाठी ‘अशा प्रकारची’ रचना केली जावी असा त्यांचा प्रस्ताव होता. त्याच आसपास डॉ. बी. एस. मुंजे या मूळ काँग्रेस आणि नंतर हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी संबंधित नेत्याने ‘इंग्लंड ज्याप्रमाणे इंग्लिशांचे, फ्रान्स जसा फ्रेंचांचा, जर्मनी जर्मनांचा तद्वत भारत हिंदूंचा’ अशा प्रतिपादनातून हिंदू राष्ट्रवादाचाच पुरस्कार केला होता. त्यानंतर सावरकर यांनी ‘हिंदू महासभे’च्या १९३७ साली अहमदाबाद येथे भरलेल्या अधिवेशनात- भारतात ‘हिंदूू आणि मुसलमान’ अशी दोन राष्ट्रे आहेत, असे विधान केल्याची नोंद आहे आणि ‘समग्र सावरकर’ ग्रंथात त्याचा तपशीलही आढळतो. अर्थात, या एका विधानामुळे सावरकर यांना संपूर्णपणे या वादात ओढणे अन्याय्य ठरेल. याचे कारण त्याच भाषणात त्यांनी पुढे भारताची एकता आणि अल्पसंख्याकांचे हितरक्षण आदींबाबतही भाष्य केले.

तथापि या सगळ्याचा मथितार्थ इतकाच की, मुस्लीम लीग, जिना यांनी उघडपणे पाकिस्तानची मागणी करण्याच्या किती तरी आधी हिंदुत्वाच्या भूमिकेतून द्विराष्ट्रवादाचे बीज भारतीयांच्या मनात रुजवण्याचे प्रयत्न सुरू होते. पुढे या हिंदुत्ववाद्यांच्या सुरात मुसलमान नेत्यांचा सूर मिसळला गेल्यानंतर तीस जोर चढला आणि ‘फोडा आणि झोडा’ या नीतीने राजकारण करणाऱ्या ब्रिटिशांनी त्या आगीत तेल ओतले. दोन्ही धर्माच्या आघाडीवरचे अतिरेकी समर्थक या एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा आहेत, याचे डॉ. आंबेडकर यांनी केलेले विवेचन जिज्ञासूंनी अभ्यासले असेलच. तेव्हा पंतप्रधानपद मिळावे यासाठी फाळणीचा घाट घातला गेला, हे विधान सत्यापलाप करणारे आणि अत्यंत हास्यास्पद ठरते.

असे म्हणण्याची आणखी दोन कारणे. एक म्हणजे पं. नेहरू आणि भारताचे अखेरचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्यातील संबंध. ते किती ‘मधुर’ होते, हे चवीचवीने चर्चिण्यात कोणास रस आहे, हे सर्व जाणतातच. तेव्हा हे संबंध लक्षात घेतले, तर पंतप्रधानपदावर पं. नेहरू हेच विराजमान व्हावेत यासाठी माऊंटबॅटन यांनी तसेही प्रयत्न केले असते. त्यांचा अधिकार आणि लंडनात राणीच्या दरबारातील वजन लक्षात घेता ते निश्चितच यशस्वी ठरले असते. म्हणजे फाळणी झाली नसती तरीही पंतप्रधानपदी पं. नेहरूच येणे निश्चित होते. तेव्हा त्यासाठी त्यांना फाळणीची गरज नव्हती. आणि दुसरा मुद्दा असा की, समजा पं. नेहरू यांनी देश दुभंगावा यासाठी प्रयत्न केला असे मानले, तर प्रश्न असा की, त्यांना न रोखण्याइतक्या हिंदुत्ववादी संघटना अशक्त होत्या काय? हिंदू महासभेची स्थापना १९१५ सालची आणि त्यातून बाहेर पडून डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला १९२५ साली. म्हणजे या संघटना ४२ च्या लढय़ाच्या वेळी अनुक्रमे २७ आणि १७ वर्षांच्या होत्या. म्हणजे ऐन तारुण्यात होत्या. तेव्हा त्यांनी पं. नेहरूंचे उद्योग रोखण्यासाठी काय केले?

हा इतिहास समजून घ्यायचा, कारण धर्माधिष्ठित देशनिर्मितीचे अपयश लक्षात यावे म्हणून. धर्माच्या आधारे आकारास आलेला पाकिस्तान नंतर दुभंगला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. तोही इस्लामीच. पण एकत्र राहू शकला नाही. १९१९ साली फुटलेल्या ऑटोमान साम्राज्यातून अनेक देश निर्माण झाले, पण धर्म त्यांना एकत्र ठेवू शकला नाही. आजच्या पश्चिम आशियाची अवस्था लक्षात घेतल्यास हे सत्य उमगावे. इतकेच काय, हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरच स्थापन झालेल्या हिंदू महासभा आणि नंतर रा. स्व. संघ या संघटनादेखील एकमताने राहू शकल्या नाहीत. तेव्हा या इतिहासापासून काही तरी बोध घेत संबंधितांनी द्विराष्ट्रवादाचे मढे पुन्हा नव्याने उकरून काढू नये. त्यातून भविष्यातील फुटीची बीजे रोवली जाण्याचा धोका आहे. क्षुद्र राजकारणासाठी तो तरी टाळायला हवा.