01 June 2020

News Flash

निरोगी नात्यासाठी..

काश्मीरमधील छायावृत्तकारांचा मुद्दा आपल्या दृष्टीने महत्त्वाचा. पण बाकीच्यांची दखल घ्यावीच लागेल.

संग्रहित छायाचित्र

पुलित्झर विजेत्यांसाठी- विशेषत: पत्रकारांसाठी उपेक्षा आणि टीका नवी नाही.. परंतु वास्तव समोर आणण्याची हिंमत जोवर आहे, तोवर ‘पुलित्झर’चे मोठेपण अबाधित राहील..

काश्मीरमध्ये आठ महिने संचारबंदी, संपर्कबंदी असताना लोकांचे वागणे कॅमेराबद्ध करणाऱ्या तिघांना पत्रकारितेतील श्रेष्ठ मानले जाणारे हे पारितोषिक मिळाले. अन्य विजेत्यांनीही आपापल्या क्षेत्रातील वैगुण्ये दाखवून दिली. त्यांच्यावर टीका केल्याने वास्तव कसे लपणार?

जम्मू-काश्मीरमध्ये असोसिएटेड प्रेस अर्थात एपी या जागतिक वृत्तसंस्थेसाठी छायाचित्रण करणाऱ्या तीन छायावृत्तकारांना यंदा पत्रकारितेतील पुलित्झर पारितोषिक जाहीर झाले आहे. पुलित्झर हे पत्रकारितेतील ऑस्कर वा नोबेल. पत्रकारिता, संगीत, साहित्य या क्षेत्रांतील निष्णात कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या या पारितोषिकांसाठी वाद नवे नाहीत. १९१५ मध्ये जोसेफ पुलित्झर या धनाढय़ वृत्तपत्र मालकाने पाश्चिमात्य दानशूरतेला अनुसरून स्वत:च्या देणगीतून एक निधी स्थापला, यातून पुलित्झर पारितोषिकाचा जन्म झाला. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि १५ हजार डॉलरची घसघशीत रक्कम असे त्याचे स्वरूप. काही तरी आव्हानात्मक स्थिती असल्याशिवाय पत्रकारितेचा, छायावृत्तकारांचा कस लागत नाही. जेथे कस नाही तेथे पारितोषिक देण्यात पुलित्झरकर्त्यांना कोणताच रस नाही. त्यामुळे संघर्षक्षेत्रांत म्हणजे ‘कॉन्फ्लिक्ट झोन’मध्ये वार्ताकन, छायांकन, छायावृत्तांकन करणाऱ्यांनाच पत्रकारितेतले पुलित्झर प्रामुख्याने मिळते. यंदाच्या वा गेल्या काही वर्षांतील विजेत्यांच्या वार्ताक्षेत्रांवर नजर टाकल्यास हे पुरेसे स्पष्ट होते. काश्मीरमधील छायावृत्तकारांचा मुद्दा आपल्या दृष्टीने महत्त्वाचा. पण बाकीच्यांची दखल घ्यावीच लागेल.

यंदा सर्वाधिक पुरस्कार ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ला मिळाले. छायावृत्तांकनासाठी ‘ताजी बातमी’ विभागात रॉयटर्स या वृत्तसंस्थेला हाँगकाँगमधील चीनविरोधी निदर्शनांच्या वार्ताकनासाठी पारितोषिक जाहीर झाले. रशियातील व्लादिमीर पुतिन सरकारची कृष्णकृत्ये विविध देशांतून, जिवावर उदार होऊन जगासमोर आणल्याबद्दल न्यू यॉर्क टाइम्सचे बातमीदार पारितोषिकपात्र ठरले. असोसिएटेड प्रेसचे चन्नी आनंद, मुख्तार खान आणि दार यासिन यांनी गेल्या वर्षी ५ ऑगस्टनंतरच्या काश्मीरमधील परिस्थितीला कॅमेऱ्यांमध्ये बद्ध केले. त्या दिवशी संविधानातील काश्मीरविषयक अनुच्छेद ३७०मध्ये फेरफार करून जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांत केले गेले. आज जो टाळेबंदी हा शब्द रूढ झाला आहे, तशी टाळेबंदी आणि संपर्कबंदी काश्मीरमध्ये गेल्या ऑगस्टमध्येच लागू करण्यात आली. याविषयी स्थानिक जनतेमध्ये असलेली नाराजी एपीच्या छायावृत्तकार त्रयीने टिपलेली आहे. त्या छायाचित्रांबद्दल पुलित्झर मिळाल्यामुळे एका मोठय़ा वर्गास हे भारतविरोधी कृत्य वाटले असणार.

काश्मीर हा त्या राज्याबाहेरीलही कित्येकांसाठी विलक्षण संवेदनशील मुद्दा आहे. पाकिस्तानने त्या मुद्दय़ाचे चालवलेले विद्रूपीकरण आणि आंतरराष्ट्रीयीकरण हे निषेधार्हच आहे. पण पुलित्झर विजेत्या ‘त्या’ छायाचित्रांमधून काश्मीरमधील विभाजनवादी मूल्यांना, म्हणजे पर्यायाने पाकिस्तानच्या भूमिकेला बळकटी मिळते असा आक्षेप व्यक्त होताना दिसतो तो अयोग्य ठरतो. काश्मीरचा विशेष दर्जा संसदेने रद्दबातल ठरवला असून, त्याला न्यायपालिकेचीही संमती आहे हे जसे वास्तव, तसेच भूभागाचा दर्जा काढला म्हणून तेथील जनतेला सलग आठ महिने टाळेबंदी भोगावी लागली हेही वास्तवच. तेच या छायाचित्रकारांनी दाखवले. म्हणजे त्यांनी आपले व्यावसायिक कर्तव्य बजावले. सरकार म्हणून एखादी भूमिका घेणे आणि ती अमलात आणणे ही सरकारची बाजू. आणि त्या अंमलबजावणीवरील प्रतिक्रिया जगासमोर प्रदर्शित करणे ही माध्यमांची बाजू. ती माध्यमांनी मांडली आणि त्यासाठी त्यांचा झालेला गौरव हा टीकेचा मुद्दा कसा? आज आपल्याकडे आपल्याच शहरात एका गल्लीतून दुसऱ्या आळीत जाता येत नाही म्हणून आपण त्रागा करतो. असा प्रदीर्घ त्रागा तेथील जनता जवळपास नऊ महिने सहन करते आहे. त्यातून आलेली अस्वस्थता नागरिकांत व्यक्त होणार. ती या तिघांनी चित्रित केली. त्यासाठी त्यांना मिळालेला पुरस्कार अभिनंदनीयच.

आपले हे कर्तव्य बजावताना या छायाचित्रकारांनी मोठी जोखीम पत्करली. एकीकडे सुरक्षा दलांची संचारबंदी, दुसरीकडे काही भागांमध्ये नागरिकांचा असंतोष, तिसरीकडे विभाजनवाद्यांचे डावपेच. या त्रांगडय़ात न सापडता आपले काम करत राहणे आणि दर्जा टिकवणे सोपे नाही. चन्नी आनंद, मुख्तार खान आणि दार यासिन यांनी ही किमया साधली. मुळात भारतीय मंडळींना आंतरराष्ट्रीय पारितोषिक, पुरस्कार मिळण्याचे प्रसंग कमीच येतात. अशा परिस्थितीत पुलित्झरसारखा पुरस्कार मिळाल्याबद्दल आज भारतीयांचे कौतुक होण्याऐवजी, त्यांच्या छायाकृतींची राष्ट्रवादाच्या निकषांवर चिकित्सा होत असेल तर ते दुर्दैवी ठरते.

अर्थात पुलित्झर विजेत्यांसाठी अशी उपेक्षा नवी नाहीच. व्हिएतनाम युद्धादरम्यान अमेरिकेकडून होणाऱ्या नरसंहाराचे वृत्तांकन केल्याबद्दल विख्यात पत्रकार सेमूर हर्श यांच्यावर तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून टीका झाली होती. १९७१ मधील बांगलादेश युद्धादरम्यान पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात झालेले गुफ्तगू अमेरिकी पत्रकार जॅक अँडरसन यांनी चव्हाटय़ावर आणले. त्यांना १९७२ मध्ये पुलित्झर मिळाले होते, पण वाद त्याही वेळी झालाच. रोनाल्ड रेगनविरोधात प्रसिद्ध लेखक, पत्रकार बॉब वुडवर्ड यांनी केलेले लिखाण असो किंवा वॉटरगेट प्रकरणात ‘वॉशिंग्टन पोस्ट’वर रिचर्ड निक्सन यांच्याकडून झालेली टीका असो, पुलित्झर विजेते बहुतेक सरकारांना अडचणीचेच वाटत आले आहेत. आणखी एक अपसमज म्हणजे, पाश्चिमात्य चष्म्यातून केवळ गरीब, अविकसित देशांच्या समस्या मांडल्या- पाहिल्या जातात आणि त्या मांडणीला पुरस्कारही मिळतात, असे अनेक देशप्रेमींना वाटते. हे मत ठरवून बाळगलेल्या अज्ञानावर आधारित आहे. अगदी या वर्षीच्या विजेत्यांच्या यादीवर नजर टाकल्यास ही बाब पुरेशी स्पष्ट होईल. यात बोइंग कंपनीच्या ७३७- मॅक्स विमानांमधील त्रुटी चव्हाटय़ावर आणल्याबद्दल ‘सिएटल टाइम्स’ला गौरवण्यात आले. या वार्ताकनानंतर या विमानांचा बाजार थंडावलाच. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अर्कचित्रे सातत्याने काढल्याबद्दल ‘द न्यूयॉर्कर’च्या बॅरी ब्लिट यांना पारितोषिक जाहीर झाले. लॉस एंजलिसमधील कलासंग्रहालयाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय कसा चुकीचा आहे, हे अनेक स्तंभांमधून मुद्देसूद मांडल्याबद्दल ख्रिस्तोफर नाइट या कलासमीक्षकाचा गौरव झाला. अल कायदाशी संबंधित असल्याच्या संशयाबद्दल क्युबाजवळील व्हांतानामो बे येथील कुप्रसिद्ध तुरुंगात १५ वर्षे डांबल्या गेलेल्या एका अभियंत्याची कहाणी ‘द न्यूयॉर्कर’ला पारितोषिक देऊन गेली. व्लादिमीर पुतिन यांच्या कारवाया चव्हाटय़ावर आणण्यासाठी न्यूयॉर्क टाइम्सचे बातमीदार युक्रेन, मादागास्कर, बल्गेरिया, लिबिया अशा विविध ठिकाणांहून सातत्याने आणि जोखीम पत्करून वार्ताकन करत होते. त्यांनाही पारितोषिक जाहीर झाले. त्या सर्वाचे अभिनंदन.

या जगात पूर्वीही होती, पण आता अधिक अमूल्य आणि दुर्मीळ होऊ लागलेली बाब म्हणजे अभिव्यक्ती! ती विविध माध्यमांतून होत राहणे निरोगी लोकशाहीसाठी अत्यावश्यक आहे. आज परिस्थिती अशी आहे, की अनेकांना लोकशाहीच नकोशी वाटते. आहे ती लोकशाही रोगट करण्यात अन्य काहींचे हितसंबंध. अशा वेळी अभिव्यक्ती जिवंत आणि जागृत ठेवण्याचे महत्कार्य पुलित्झर पुरस्कारांकडून होत असते. अभिव्यक्तीचे आजही सामर्थ्य आणि महत्त्व आहे हे खरेच. पण त्यासाठी तिचे लोकशाहीशी असलेले अतूट नाते प्रथम स्वीकारावे लागेल. त्या नात्यावर ज्यांचा विश्वास आहे आणि ते अधिकाधिक निरोगी व्हायला हवे अशी धारणा आहे अशा प्रत्येक सुजाणाकडून या पुरस्कारांचे स्वागतच होईल आणि ते मिळालेल्यांचे अभिनंदनही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 12:04 am

Web Title: editorial on pulitzer award winners abn 97
Next Stories
1 डॉक्टरांचा सल्ला
2 ‘बंदी’शाळेचे विद्यार्थी!
3 गुलामीतली गोडी
Just Now!
X