‘शंकराभरणम्’ ते ‘एक दूजे के लिए’मधील वैविध्य एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या गळ्याने सहज पेलले. गायनक्षमतेतून रसिकांची मने जिंकणारा हा कलावंत होता..

अभिजात संगीत शिकण्याची संधी मिळाली नसूनही ते गात राहिले. भावदर्शन हे पार्श्वगायनाचे मर्म त्यांनी अचूक ओळखले आणि देशव्यापी लोकप्रियता मिळवली..

सुमारे चाळीस हजार गाणी, भारतातील अनेक भाषांमधील गीते, कर्नाटक अभिजात संगीतातील नवनवे प्रयोग..एवढे सारे कर्तृत्व गाजवूनही सतत जमिनीवर पाय ठेवून स्वरांपुढे नम्र होणे हे अलीकडील समाजमाध्यमी काळात फारच अवघड. लोकप्रियतेच्या कळसावर असतानाही, श्रीपथी पंडिताराध्यलु बालसुब्रमण्यम या कलावंताने ती आपल्या अंगी लागू दिली नाही की तिला मिरवलेही नाही. ‘स्वरांपुढे नतमस्तक झाल्याशिवाय ते वश होत नाहीत,’ असे जे अनुभवाचे बोल संगीताच्या क्षेत्रात अनेक शतके सांगितले जात आहेत, ते एसपीबी ऊर्फ बालू यांनी आचरणात आणले. त्यामुळेच त्यांचा आवाज दक्षिणेकडीलच नव्हे, तर देशातील प्रत्येकाच्या कानात रुंजी घालत राहिला. शास्त्रीय रीतीने संगीताचे शिक्षण पूर्ण होण्याआधीच अभियंता होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या बालसुब्रमण्यम यांना टायफॉइडसारख्या आजाराने ग्रासले नसते, तर कदाचित भारतीय संगीत एका मोठय़ा कलावंताला मुकले असते. शिक्षण अर्धवट सोडून ते संगीताच्या प्रांतात शिरले.. पण अभिजात संगीत शिकण्याची संधीच नसल्याने, त्या काळातल्या समवयस्क तरुणांच्या संगीताच्या उपक्रमात ते गात होते. त्यांना बक्षिसेही मिळत होती. परंतु हे सारे वरच्या पायरीवर पोहोचण्यासाठी त्यांना फार वाट पाहावी लागली नाही. त्या वेळच्या मद्रास प्रेसिडेन्सीमधील म्हणजे आजच्या तमिळनाडूमधील कोनेटम्पेट या गावी जन्मलेल्या या कलावंताला वयाच्या विसाव्या वर्षीच चित्रपट संगीतात पार्श्वगायक म्हणून प्रवेश मिळाला. तेलुगू चित्रपटासाठी गायलेल्या या गीतानंतर अवघ्या आठवडाभरात कन्नड चित्रपटासाठी गाण्याची संधी  मिळाली. तिथून पुढल्या प्रवासात दक्षिणी चित्रपटगीतांचे लोकप्रिय गायक म्हणून तर त्यांनी नाव कमावलेच, परंतु त्यांच्या गायनाने देशातील चार पिढय़ा स्वरसंपन्न झाल्या.

१९३१ मध्ये भारतीय चित्रपट गाऊ लागला. ‘आलम आरा’ पहिल्याच बोलपटातील गाण्यांनी त्या काळात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्या वेळच्या तंत्रज्ञानाच्या मर्यादेमुळे गायक नट ही मराठी संगीत नाटकांतील अत्यावश्यक अट चित्रपटासाठीही लागू होती. गाता गळा असणाऱ्याकडे अभिनयाची बाजू जराशी हलकी असली, तरी तेव्हा चालत असे, याचे कारण चित्रपटाच्या पदार्पणातच त्याला घेरून टाकलेल्या संगीताचा प्रभाव. के. एल. सहगल हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण. तंत्रज्ञानाच्या झपाटय़ाने चित्रफितीला स्वरफीत स्वतंत्रपणे जोडता येण्याची सोय झाली आणि भारतीय चित्रपटाच्या संगीतानेही कात टाकली. पार्श्वगायन हे एक नवे, आगळेवेगळे क्षेत्र खुले झाले. अभिनेत्याने गाण्याचे फक्त आविर्भाव करायचे आणि प्रत्यक्ष गाणे वेगळ्याच कलावंताने गायचे, ही सोय चित्रपटाच्या एकूण दर्जासाठीही उपकारक ठरली. उत्तम आवाजाला भाव व्यक्त करण्याची दर्जेदार क्षमता ही त्या काळातील चित्रपट संगीताची अत्यावश्यक गरज होती. त्यामुळे चित्रपट संगीताने तोपर्यंत त्या काळातील अभिजात संगीताचे घट्ट धरलेले बोट अलगदपणे सोडून दिले. ते मुक्तपणे विहार करू लागले. त्यातून संगीत-अभिव्यक्तीच्या शक्यतांचे अक्षरश: डोंगरच उभे राहिले.

संगीतकार, वादक, गायक अशी एक समांतर व्यवस्था भारतीय संगीतात निर्माण होत असतानाच्या काळात बालसुब्रमण्यम यांचा जन्म (१९४६) झाला. साठच्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी गायलेली गाणी लोकप्रिय होत असतानाच त्यांना नव्या संधी चालून आल्या. फक्त सुरेलपणा एवढाच गुण चित्रपट संगीतासाठी पुरेसा नसतो. सुरेल आवाजातील भाव या संगीतासाठी अत्यावश्यक. चित्रपट संगीतात शब्दांचे महत्त्वही वादातीत. त्यामुळे शब्दांचे अर्थ, त्यातील भाव, त्यांचे उच्चार या सगळ्या गुणांचा समुच्चय कलावंताच्या ठायी असणे आवश्यकच. बालसुब्रमण्यम गाऊ लागले, तेव्हा चित्रपट संगीतानेही हळूहळू आपले रंगरूप बदलण्यास सुरुवात केली होती. भारतीय मातीतील स्वरसंस्कारांच्या बरोबरीने नव्याने खुले झालेल्या जगातील अन्य देशांमधील संगीताचेही आगमन तेव्हा चित्रपट संगीतात होऊ लागले होते. परिणामी संगीतकार आणि गायक कलावंतांसाठी तो आव्हानाचाच काळ होता, तर रसिकांसाठी तो नवा आविष्कार होता. बालसुब्रमण्यम यांच्या अंगी या सगळ्या गुणांचे एकत्रीकरण झाले होते. पुरुषी आवाजातील मार्दव सर्व सप्तकांत कायम ठेवणाऱ्या आणि फिरत घेण्याचा गळ्यातील गुण भावदर्शनासाठी अचूक वापरणाऱ्या त्यांच्या शैलीमुळे दक्षिणेकडील भाषांबरोबरच भारतातील अन्य भाषांमधील त्यांची गीतेही रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. हिंदी चित्रपट संगीतातील त्यांची छोटीशी कारकीर्दही त्यांचे वेगळेपण ठसवणारी ठरली. हा आवाज ‘शंकराभरणम्’ या अभिजात संगीतावर आधारलेल्या चित्रपटामुळे जागतिक पातळीवर त्यांना मिळालेली लोकप्रियता त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी.

आपल्या पाच दशकांच्या सांगीतिक कारकीर्दीत बालसुब्रमण्यम यांनी मोठय़ा संख्येचा विक्रम नोंदवला. मात्र एकाच दिवसात २१ गीते ध्वनिमुद्रित करण्याचाही विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. हे विक्रम त्यांच्या लोकप्रियतेपेक्षा गायनक्षमतेचे. त्यांचे गायन लोकप्रिय होण्यासाठी त्यांच्याकडे असलेले कलागुणच अधिक महत्त्वाचे. पार्श्वगायक म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावर असताना, बालसुब्रमण्यम यांनी चित्रपटांतून भूमिकाही केल्या. प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांच्या तमिळ चित्रपटांचे तेलुगू संस्करण करताना, बालसुब्रमण्यम यांच्याच आवाजात संवादांचे ध्वनिमुद्रण होत असे. हरहुन्नरी असल्यामुळे ही असली कामेही ते अतिशय तन्मयतेने करीत. एवढय़ा प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांच्या वाटय़ाला पुरस्कार येणे ही तर अगदीच स्वाभाविक घटना. त्यांच्या मते हे पुरस्कार म्हणजे रसिकांच्या मनात असलेल्या भावनांचे प्रतीक. कलावंत म्हणून येणाऱ्या इवल्याशा लोकप्रियतेने हुरळून जाणाऱ्या सध्याच्या कलावंतांच्या तुलनेत बालसुब्रमण्यम यांचा स्वभाव अगदीच विरळा. शांत, संयमी आणि कलासक्त. तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या दक्षिणेकडील भाषांबरोबरच हिंदीसह १६ भारतीय भाषांमधून त्यांची गीते प्रसिद्ध झाली. ‘एक दूजे के लिये’ या हिंदी चित्रपटाने त्यांना आणखी वेगळ्या उंचीवर जाता आले. ते स्थान ‘सागर’मुळे पक्के झाले. परंतु त्या आधीही ते हिंदी गीते गातच होते. कदाचित हिंदी चित्रपटसृष्टीतील कोरडा व्यवहार, व्यावसायिक गणिते, कमालीची अटीतटीची स्पर्धा.. वा अन्य कारणांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीशी त्यांची जुळलेली नाळ अल्पकाळाची ठरली. परंतु त्याबद्दल त्यांनी कधी जाहीर वाच्यताही केली नाही.

लोकप्रियता हा काळाचा महिमा असतो, तसा शापही असतो. या कलावंताने तो महिमा जाणला होता. त्यामुळेच ते फक्त कलानंद मिळवत राहिले. तटस्थ व्यवहारातील कोरडेपणापासून अलिप्त राहिले. स्वरांची निर्लेपता हेच त्यामुळे त्यांचे आनंदाचे स्थान राहिले. कलावंताने आपल्यातील कलेची सतत मशागत करायची असते. ती करत असताना परिसरातील सांस्कृतिक व्यवहारांचे, त्यातील बदलांचे भान ठेवायचे असते, याची जाणीव बालसुब्रमण्यम यांनी आयुष्यभर ठेवली. एस. पी बालसुब्रमण्यम यांनी वयाच्या विसाव्या वर्षी सुरू केलेली स्वराराधना ५० वर्षांच्या प्रचंड कारकीर्दीनंतर थांबली. भारतीय ललित संगीतात त्यांनी केलेली दीर्घ आणि सौंदर्यपूर्ण सेवा ही त्यांच्या आवाजावर ‘दक्षिणेचा’ असा शिक्का बसूनसुद्धा दिग्विजयी ठरली. त्यांना ‘लोकसत्ता’तर्फे आदरांजली.