07 March 2021

News Flash

राजपुत्र आणि डार्लिंग

सौदीच्या राजपुत्राची भारतभेट ही आपल्या गरजेपेक्षा त्याच्यासाठी अधिक निकडीची होती.

सौदीच्या राजपुत्राची भारतभेट ही आपल्या गरजेपेक्षा त्याच्यासाठी अधिक निकडीची होती.

पाहुण्यांचे स्वागत आणि आदरातिथ्य हे जोमात व्हायलाच हवे. ही भारतीय परंपरा. त्यात पाहुणा हा थेट राजा वा संभाव्य राजा असेल तर या आदरातिथ्यात कोणतीही, कसलीही कमतरता राहणार नाही, याची काळजी कोणताही यजमान घेईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ती घेतली. पाहुणा होता सौदी अरेबियाचा आगामी राजा महंमद बिन सलमान बिन अब्दुल अझीझ अल सौद. त्यांची ओळख १९ फेब्रुवारीच्या संपादकीयात (‘पाहुण्यांचा परिचय’) वाचकांना झाली असेलच. आता हा पाहुणा भारतात आल्यानंतर काय काय घडले, याचा हिशेब. प्रथम तो कोणत्या परिस्थितीत भारतात आला आणि आपण केलेल्या त्यांच्या स्वागताची पाश्र्वभूमी याचा ऊहापोह.

आज कोणताही पाश्चात्त्य देश राजपुत्र सलमान यांना आपल्या दारात उभा करण्यास तयार नाही. याचा अर्थ दारामागून यांचे काहीच संबंध नाहीत असा नाही. परंतु पाश्चात्त्य देशांना सभ्यतेच्या काही मर्यादा सार्वजनिकरीत्या तरी पाळाव्या लागतात. म्हणूनच तालिबान्यांशी अमेरिकी कंपन्यांचे व्यवहार होते तरीही अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या गृहमंत्री मेंडेलिन ऑलब्राइट यांनी तालिबानी राजवटीस सातत्याने फटकारले आणि कोणत्याही पद्धतीची मान्यता देण्यास नकार दिला. म्हणूनच विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जामात कुशनेर आणि सौदी राजपुत्र सलमान यांचा दोस्ताना असला तरी अमेरिकेचे दरवाजे या राजपुत्रासाठी बंद आहेत. यामागील अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे या राजपुत्राचे रक्ताळलेले हात. पत्रकार खशोगी याची उघड हत्या, सीरियातील भयानक हत्याकांड, केवळ वैयक्तिक रागापोटी येमेनमधील रुग्णालयावर घडवून आणलेली बॉम्बफेक आणि त्यात झालेली अश्रापांची होरपळ अशी अनेक रक्तरंजित पापकृत्ये या राजपुत्राच्या खात्यावर जमा आहेत. इराण हा या राजपुत्राचा दुसरा निषेधाचा विषय. या इराणचे काय करावे आणि काय नाही, असे त्यास झाले आहे. हे झाले बाह्य़उद्योग. देशांतर्गत पातळीवरील अशा उद्योगांची संख्या कमी नाही. त्यामुळे, सौदीचे राजेपद त्याच्याकडे येणार असले तरी आता त्याच्याबाबत सर्व काही आलबेल अशी स्थिती नाही. किंबहुना सौदीत अनेकांप्रमाणे सख्ख्या/सावत्र अशा भाईबंदांकडून त्याच्या जिवालाच धोका आहे. तेव्हा हा धोका कमी करण्याचा त्याचा उपाय काय?

पाकिस्तानी फौज हे त्याचे उत्तर. पाकिस्तानी लष्कर आणि त्या देशाची पाताळयंत्री गुप्तहेर यंत्रणा आयएसआय यांच्याकडे या राजपुत्राच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. सौदी राजपुत्राने भारतात येण्याआधी पाकिस्तानला भेट देऊन भरघोस आश्वासने का दिली, त्यामागील हे कारण. तेव्हा पाकिस्तानचे सहकार्य त्याच्यासाठी महत्त्वाचे. त्या बदल्यात पाकिस्तानला काय मिळते? तर भारताविरोधात आगळीक करता यावी यासाठी मदत, सुन्नी धर्मवेडय़ांना रसदपुरवठा आणि पाक लष्कराच्या देशांतर्गत आव्हानवीरांना आवरण्यासाठी पुरेपूर साहाय्य. पाक आणि सौदी अरेबिया हे दोघेही सुन्नी पंथीय. तेव्हा त्यांच्यातील बंध आधी समजून घ्यायला हवे. कारण त्यात आहे त्याच्या आशिया खंडातील दौऱ्यामागचे इंगित.

या राजपुत्राच्या एकंदर उद्योगांमुळे पाश्चात्त्य देश त्याकडे पाठ फिरवीत असताना आपल्याला कसा अजूनही जगात पाठिंबा आहे हे दाखवण्याच्या त्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणजे त्याचा हा दौरा. त्यात त्याने पाकिस्तानला उपकृत केले तर ते निश्चितच समजून घेण्यासारखे. परंतु लोकशाहीवादी देशातही आपल्याला तितकाच मान आहे, याच्या प्रदर्शनासाठी म्हणून त्याची ही भारतभेट. याचा अर्थ असा की या राजपुत्राची भारतभेट ही आपल्या गरजेपेक्षा त्याच्यासाठी अधिक निकडीची होती. अशा वेळी त्याची गरज म्हणून जर आपण त्याचे लाल पायघडय़ांनी स्वागत करणार असू तर त्या बदल्यात त्याने आपल्या देशासाठी अधिक काही करणे अपेक्षित होते. ते त्यांनी केले का हे तपासणे आवश्यक ठरते. याचे कारण हा सौदीसारख्या दणदणीत श्रीमंत देशाचा भावी राजा असला तरी सर्वच देश त्याच्या स्वागतासाठी आपल्यासारखे उत्सुक नाहीत. यात अगदी इस्लामधर्मीय मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांचादेखील अंतर्भाव करता येईल. त्याचमुळे या आशिया खंडातील दौऱ्यात राजपुत्र महंमद यांना या दोन देशांची भेट रद्द करावी लागली, ही बाब लक्षात घ्यायला हवी. म्हणजे इस्लामधर्मीय असूनही या दोन देशांनी सौदी राजपुत्राच्या स्वागताची लगीनघाई आपल्या वागण्यांतून दाखवून दिली नाही. मलेशियासारख्या देशात तर सौदीबरोबरील काही करारांचा मुद्दा पणास लागला. पण म्हणून तो देश सौदी राजपुत्रासाठी स्वागतोत्सुक असल्यासारखा वागला नाही. सौदी राजपुत्राची या दोन्हीही देशांची भेट रद्द का झाली, त्यामागील कारणे या दोन्हीही देशांनी उघड केलेली नाहीत. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याबाबत बरेच चर्वितचर्वण सुरू आहे. तेव्हा अशा या राजपुत्राची सरबराई करून आपणास काय मिळाले? पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याप्रमाणे आपलेही पंतप्रधान राजनैतिक संकेत बाजूस ठेवून या राजपुत्राच्या स्वागतासाठी जातीने विमानतळावर गेले आणि आपल्या प्रेमाची साक्ष देते झाले. त्यानंतर या उभय नेत्यांत चर्चा झाली. तिची फलनिष्पत्ती काय?

त्याआधी काही दिवस पाकिस्तानी पुरस्कृत दहशतवाद्यांनी पुलवामा हत्याकांड घडवून आणले, त्याचा कोणताही उल्लेख उभयतांच्या चर्चेत झाला नाही. वास्तविक उभयतांच्या वार्ताहर परिषदेत त्यांनी पाकिस्तानचा धडधडीत निषेध नाही, पण निदान उल्लेख जरी केला असता तर आपल्या रक्तबंबाळ जखमांवर काहीशी फुंकर घातली गेली असती. राजपुत्र माघारी गेल्यानंतर प्रसृत करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दहशतवादाचा निषेध करण्यात आला. पण सौदी आणि पाकिस्तान यांच्या वतीने पाकिस्तानी भूमीतून प्रकाशित करण्यात आलेल्या निवेदनातही तो करण्यात आला होता. म्हणजे जो देश दहशतवादाचा पुरस्कर्ता आहे आणि जो देश दहशतवादाला सातत्याने बळी पडत आहे अशा दोन्हीही देशांना सौदीकडून दिली गेलेली वागणूक समानच. पाकिस्तानी भूमीवर असताना या राजपुत्राने जैश ए महंमदचा प्रमुख मसूद अझर यावर जागतिक निर्बंध घालण्याचा प्रस्ताव हाणून पाडला. त्यानंतर भारतात त्याने संयुक्त राष्ट्राच्या अखत्यारीत दहशतवाद्यांवर निर्बंध घालण्याची गरज व्यक्त केली. तसेच पाकिस्तान आणि भारत यांनी आपसातील प्रश्न चर्चेने सोडविण्याचे शहाजोगी महत्त्वही त्याने विशद केले. यातील हास्यास्पद (की गंभीर?) भाग असा की पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१६ सालच्या एप्रिल महिन्यात सौदी भेटीवर असताना उभय देशांनी दहशतवादासंदर्भात जे काही संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले ते शब्द न शब्द तसेच्या तसे सौदी राजपुत्राच्या दिल्लीभेटीनंतरच्या निवेदनातही आहेत. म्हणजे या दोन भेटींदरम्यान जणू पुलवामा घडलेच नाही. राजपुत्राची पाठ फिरल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात पाकिस्तानचा उल्लेख येतो. पण तो कसा? तर, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेजारी राष्ट्र पाकिस्तानशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी घेत असलेल्या विशेष प्रयत्नांचे’’ कौतुक करण्यासाठी. पण यातही मखलाशी अशी की याच राजपुत्राच्या पाकिस्तान दौऱ्यानंतरच्या निवेदनात भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान करीत असलेल्या विशेष प्रयत्नांची आणि त्यांच्या मनमोकळ्या स्वभावाची स्तुती आहे. इम्रान खान यांचे भारत संबंध सुधारण्याचे प्रयत्न या राजपुत्रास कोठून दिसले, हा तसा प्रश्नच.

येथून सलमान चीनला रवाना झाले. म्हणजे ज्या दोन आघाडय़ांवर भारत लढतो आहे त्याच दोन आघाडय़ांच्या मध्ये त्यांची भारतभेट झाली. अलीकडच्या सत्ताधाऱ्यांच्या रिवाजाप्रमाणे आपण त्यांना कडकडून मिठी मारली वगैरे ठीक. गूढवादी कवी ग्रेस यांच्या एका कवितासंग्रहाचे नाव आहे राजपुत्र आणि डार्लिग. सलमान यांच्या भारत दौऱ्याचे यश (?) हे एक असेच गूढ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 2:50 am

Web Title: editorial on saudi arabia prince mohammed bin salman visit in india
Next Stories
1 संधिकाळातील मंदी
2 शोकांतिका की फार्स?
3 पाहुण्यांचा परिचय
Just Now!
X