कोणत्याही माकडाने अमेरिकी अध्यक्षांस अपशकुन करणे आपणास परवडणारे नव्हते. माकडांच्या बंदोबस्तासाठी माकडेच हवी, हेही यानिमित्ताने उमगले..

अयोध्येत उच्छाद मांडणाऱ्या वानरांना घाबरवण्यासाठी त्यांच्याहून शक्तिशाली हुप्पे आणणे हा तो सोपा उपाय. आग्रा येथील काही रहिवाशांनी तो अंमलात आणल्याचे वर्तमानपत्रांनी साधार दाखवून दिल्यावर तोच मार्ग बोभाटा टाळून निवडण्यात आला..

आग्रा येथील अधिकाऱ्यांनी सोमवारी संध्याकाळी सुटकेचा नि:श्वास बहुधा सोडलेला असेल. मुमताज आणि शहाजहान यांच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या आग्रा येथील ताजमहाल या वास्तूचे दर्शन जगातील एकमेव महासत्तेच्या प्रमुखास कोणत्याही अडथळ्याशिवाय सपत्नीक घेता आले, यासाठी तो नि:श्वास. तसेच या वास्तूच्या पार्श्वभूमीवरडोनाल्ड आणि मेलनिया यांना आपले सेल्फीही विनासायास क्लिकता आले हेही अधिकाऱ्यांच्या नि:श्वासाचे आणखी एक कारण. ट्रम्प यांच्याबरोबर त्यांची कन्या इव्हान्का आणि जामात जेराड कुशनेर हेदेखील भारत दौऱ्यात आहेत. तेदेखील ताजमहाल या प्रेमवास्तूचे दर्शन घेण्यासाठी गेले आणि त्यांनाही प्रेमिकांच्या तेजोमहालाचे दर्शन विनाव्यत्यय घेता आले असेल. हे दिव्य शिल्प पाहून ट्रम्प आणि मंडळी मंगळवारी, राजधानी दिल्लीत व्यवसायाच्या किचकट वाटाघाटीस सुखेनव लागू शकतात. अमेरिकी अध्यक्षांच्या आग्रा भेटीस कोणतेही गालबोट लागलेले नाही आणि त्यामुळे भारतीय अधिकारीही निश्चिंत झाले. तसे ते लागू नये म्हणून शक्य तो सर्व द्विपादांचा बंदोबस्त भारत सरकारने केला होता. सर्व काही सुरळीत पार पडेल यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली गेली होती. त्यामुळे जमिनीस पदस्पर्श करून वावरणाऱ्या कोणत्याही मनुष्यप्राण्यापासून अमेरिकी पाहुण्यांचा रसभंग होणार नाही, याची रास्त खातरजमा केली गेली होती. तेव्हा अध्यक्षांच्या आग्रा भेटीस कोणाही मर्त्य मानवाकडून खोडा घातला जाण्याची वा काही एक अपशकुन केला जाण्याची शक्यता नव्हती. माणसाचा प्रश्न नव्हता.

तो होता त्याच्या पूर्वजांचा. म्हणजेच मर्कटांचा. वृक्षलतावेलींच्या आधाराने आणि मनुष्यप्राण्यांच्या निवासस्थानांवरून सुखेनव संचार करणारी ही मर्कटसेना आग्रावासीयांची सध्याची सर्वात मोठी डोकेदुखी. या माकडांच्या हल्ल्यात अलीकडे एक ज्येष्ठ नागरिक महिला मारली गेली. एका घरातील महिलेच्या मांडीवरून या मर्कटटोळ्यांनी एक तान्हुले अर्भक पळवून नेले आणि त्यांच्या चाव्यांनी ते गतप्राण झाले. इतक्या हिंस्र होत गेलेल्या मर्कटलीलांनी आग्रावासीय हैराण झाले असून या माकडांपासून वाचवा असे आपल्या राज्य सरकारला ते सांगून सांगून थकले. पण त्यांना आवरणार कोण? माकड म्हणजे काय सामान्य प्राणी थोडाच आहे? साक्षात वनारी अंजनीसुत अशा रामदूत हनुमानाचे ते रूप. आजच्या काळातल्या उत्तर प्रदेशपुरतेच सांगायचे तर साहेबाचा दूत हा साहेबापेक्षा मोठा असतो, हे हल्ली साऱ्यांनाच ठावकी असल्याने उत्तर प्रदेशातील या शहरात माकडे फारच मोकाट सुटली. केवळ आग्राच असे नाही. अयोध्या, चित्रकूट, वृंदावन अशा सर्वच पावनभूमींवर माकडांनी उच्छाद मांडल्याचे वर्तमान अलीकडेच अनेक वर्तमानपत्रांनी छापले. या निमित्ताने काही दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या स्टुडिओतील चच्रेच्या केंद्रस्थानीही मर्कटलीला झडल्या. या माकडांचा बंदोबस्त कसा करता येईल यावर अनेक तज्ज्ञांनी आपली अभ्यासपूर्ण मते मांडली. त्याचा कितपत उपयोग झाला हे कळावयास मार्ग नाही. पण त्यामुळे माकडांस सर्व गांभीर्याने घेऊ लागले. त्यात ट्रम्प हे आग्य्राची सपत्नीक सर करणार असे जाहीर झाल्याने तर सर्वाचीच पाचावर धारण बसली. अमेरिकी अध्यक्ष आणि त्यांच्या सौभाग्यवती ताजमहालचे दर्शन घेत आहेत आणि सुरक्षारक्षकांचे कडे भेदून समजा काही वानरांनी त्यांच्या हातातील काही अमूल्य ऐवज पळवला तर ते भारतास कितीला पडेल या कल्पनेनेच उत्तर प्रदेशच्या सरकारी अधिकाऱ्यांना घाम फुटला. त्यांनी पोलिसांची मदत मागून पाहिली. त्यांनी त्यास नकार दिला. आम्ही गोशाळा सोडून कसे येणार या पोलिसांच्या प्रश्नावर बहुधा सरकारी अधिकारी निरुत्तर झाले असावेत. आणि तसेही पोलिसांना मोकाट गाई आणि मुकाट जनता यांना हाताळण्याची सवय. हे दोन्हीही तसे जमिनीवरचे. पण अर्ध-आस्मानी संकट असलेल्या मर्कटांना हाताळण्याचे कसब त्यांच्या ठायी नाही. म्हणून अमेरिकी अध्यक्षांसमोर संभाव्य मर्कटोद्योगाचा धोका टाळण्यासाठी आपल्याला पोलिसांचाही काही उपयोग नाही, हे सरकारी अधिकाऱ्यांना उमगले. तेव्हा हे मर्कट संकट टाळावे कसे हा प्रश्न त्यांना भेडसावत असताना अचानक त्यांना मार्ग सापडला.

तो दाखवणाराही माकडच. म्हणजे अयोध्येत उच्छाद मांडणाऱ्या वानरांना घाबरवण्यासाठी त्यांच्याहून शक्तिशाली हुप्पे आणणे हा तो सोपा उपाय. आग्रा येथील काही रहिवाशांनी तो अमलात आणल्याचे वर्तमानपत्रांनी साधार दाखवून दिल्यावर स्थानिक अधिकाऱ्यांनीही याच मार्गाने जाण्याचे ठरवले. पण अडचण ही की त्याची वाच्यता त्यांना करता येईना. कारण भारतीय वन्यजीव संरक्षक कायद्यानुसार ही शक्तिशाली माकडे विकणे, त्यांना भाडय़ाने देणे वा त्यांना सेवेस जुंपणे यास मनाई आहे. पण आपले ईप्सित साध्य करण्यासाठी सरकारी नियमांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रघात इथेही पाळायचा निर्णय सरकारी अधिकाऱ्यांनी घेतला. त्यातूनच वानरांना पळवून लावण्यासाठी मोठी माकडे भाडय़ाने आणण्याचा निर्णय घेतला गेला. जेवणखाण आणि वर किमान १०० ते ३०० रुपये अशा दराने आग्य्रात अशी मर्कटसेवा पुरवणारे नवे व्यावसायिक तयार झाले आहेत. त्या शहरांतील उच्चभ्रू वस्त्यांवर अशी धिप्पाड माकडे तनात केली जातात. काहींनी माकडध्वनी काढून माकडांना घाबरवणाऱ्या माणसांची सेवाही वापरून पाहिली. पण ती माकडांइतकी प्रभावी आणि परिणामकारक नसल्याने वानरांना रोखण्यासाठी माकडांनाच मदानात उतरवणे हाच पर्याय यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार श्री आणि सौ ट्रम्प यांच्या आग्रा दौऱ्यात वानरसेनेकडून काही रसभंग होऊ नये यासाठी आग्रा प्रशासन काही बलदंड हुप्पे तनात करणार असल्याचे वृत्त त्या प्रदेशांतील अग्रणींनी छापले. माकडांना हाताळण्यात माणसांपेक्षा माकडेच प्रभावी ठरतात हे वैश्विक सत्यदेखील यातून यानिमित्ताने समोर आले.

खरे तर ते उमगण्यासाठी इतका काळ का लागावा हा प्रश्नच म्हणायचा. कारण संपूर्ण राजकारण याच सत्याआधारे फिरते हे खरे नव्हे काय? ‘ठकासी व्हावे ठक’ आणि ‘खटासी व्हावे खट’ असा सल्ला तर ‘पहिले ते राजकारण’ असे सांगणाऱ्या समर्थ रामदासांनीच देऊन ठेवलेला आहे. जो कोणी काही एक डोकेदुखी निर्माण करत असेल त्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्यातीलच काहींची ढाल सत्ताधारी नेहमीच पुढे करत असतात. उचापती करणाऱ्या माकडांना घाबरवण्यासाठी त्यांच्यामधले जे अधिक टगे असतील त्यांना फोडायचे आणि आपण मजा पाहात बसायचे हे सरकारांसाठी नवीन नाही. फोडा आणि झोडा हे काही फक्त परकीय राज्यकर्त्यांचेच कारभार तत्त्व असते असे नव्हे. अगदी स्थानिक राजकारणातही याच तत्त्वाच्या आधारे डावपेच लढवले जातात.

तेव्हा माकडांचा उच्छाद रोखण्यासाठी काही माकडांचीच मदत घ्यायला हवी हे समजण्यास माणसास इतका वेळ का लागावा, हे आश्चर्यच आहे. त्याची चौकशी यथावकाश केली जाईल. पण तोपर्यंत अमेरिकी अध्यक्षांचा अयोध्या दौरा सुफलसंपूर्ण झाला असेल. ते महत्त्वाचे होते. कोणत्याही माकडाने अमेरिकी अध्यक्षांस अपशकुन करणे आपणास परवडणारे नाही. तसा तो झाला नाही हीदेखील एक प्रकारची वानरसेवाच. त्याबद्दल आपण त्यांचे आभारी असायला हवे.