वैश्विकतेचा दावा करणाऱ्या इंग्रजीस ‘स्थानिक’ संबोधण्याची हिंमत ऑस्करविजेत्या कोरियन दिग्दर्शकाने दाखविली, तेव्हा अनेकांचे खुजेपण दिसले..

या खुजेपणावर मात करण्याचा प्रयत्न ऑस्कर सोहळा आणि तो आयोजित करणारी अकॅडमी, वय न लपवता सोहळ्यास उपस्थित राहणारे आणि बोलण्याची संधी मिळाल्यास राजकीय मते मांडताना भीड न बाळगणारे कलावंत करू लागले आहेतच, तरी यंदाचा सोहळा निराळा..

‘हे अवार्ड म्हणजे माझ्यासाठी लाइक ड्रीम कमिंग ट्र’ अशा भयानक मराठीत बिनडोक बडबड करीत कोणता तरी टिनपाट पुरस्कार ‘पॅरेंट्स ना डेडिकेट’ करणाऱ्या ‘नेटिव्ह’ कलावंतांना सहन करायची सवय झाली की ऑस्करसारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर जगाची, आसपासच्या चकचकीत आणि तुकतुकीत गौरवर्णीयांची तमा न बाळगता ठासून आपल्या मातृभाषेतच बोलणारा बाँग जून-हो डोळ्यांच्या कडा ओलावतो. त्याची कारणे दोन. एक म्हणजे चित्रपटाचा विषय आणि आशय आणि दुसरे कारण म्हणजे त्याची भाषिक अभिव्यक्ती. हे दुसरे कारण आपल्याला आपल्यांचे खुजेपण दाखवून जाते आणि त्यामुळे त्याच्या कलाकृतीने ओघळणारे आनंदाश्रू आपल्या जखमांवर मीठ चोळणारे ठरतात. गेल्या वर्षांत तीन कलाकृतींनी हे केले. जगण्यातील अंधाराला हात घालणारा ‘जोकर’, कॅमेऱ्याच्या नव्याच पद्धतीने महायुद्धाच्या रणभूमीवर दर्शकांना घेऊन जाणारा, गतिमान ‘१९१७’ आणि दक्षिण कोरियातला ‘पॅरासाइट’. यातील शेवटचा अद्याप अनुभववायचा आहे.  पण त्यानेच सोमवारी ऑस्करमधे बाजी मारली आणि इतिहास घडला.

अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस अर्थात ऑस्कर पुरस्कारांची यंदाची ९२वी आवृत्ती अनेक अर्थानी ऐतिहासिक. दक्षिण कोरियन दिग्दर्शक बाँग जून-हो यांनी दिग्दर्शित केलेला ‘पॅरासाइट’ हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागाबरोबरच मुख्य प्रवाहातही सर्वोत्कृष्ट ठरला. आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागाला गेल्या वर्षीपर्यंत ‘परभाषिक’ किंवा बिगर-इंग्रजी चित्रपट विभाग असे संबोधले जायचे. या विभागाचे नाव यंदा बदलले गेले. आजवर या विभागातील विजेत्या चित्रपटांना आतापर्यंत मुख्य प्रवाहात नामांकन मिळाले होते, पण ते विजेते ठरले नव्हते. ती प्रथा ‘पॅरासाइट’ने मोडून काढली. ‘पॅरासाइट’ म्हणजे परजीवी. दुसऱ्याच्या जिवावर जगणारे. बांडगूळ.

या चित्रपटात एक सधन कुटुंब आणि त्या कुटुंबाच्या आश्रयाला आलेले आणखी एक कुटुंब यांची कहाणी आहे. परंतु आश्रयाला आले म्हणून त्या कुटुंबाला मालक कुटुंब फुकट पोसत नाही. त्यांच्याकडून सेवा करवून घेते. त्याचा फायदा मालक कुटुंबालाही होत असतोच. या परिप्रेक्ष्यामध्ये परजीवी हे खरेच परजीवी ठरतात का, याची चर्चा ‘पॅरासाइट’ या चित्रपटामध्ये कोणत्याही अभिनिवेशाविना खुमासदार शैलीत आणि चित्रपट माध्यमाची लोकानुनयी गरज ओळखून मांडण्यात आलेली आहे. हा विषय केवळ कोरियापुरता किंवा ऑस्करपुरता मर्यादित नाही. त्याला वैश्विक परिमाण आहे. ते आसपास डोळे उघडे ठेवून पाहणाऱ्यांना दिसत असेलच. सांप्रतकाळी बंद मनांचे राजकारणी देशांच्या सीमाही बंद करण्यात पौरुष मानत असताना आणि अशांनाच मोठे समजले जात असताना हा चित्रपट ‘परजीवी’ या संकल्पनेचा नव्याने विचार करावयास भाग पाडतो. म्हणून तो विजयी.

सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागात यंदा पहिल्या महायुद्धावर आधारित ‘१९१७’ तसेच मार्टिन स्कोर्सेसी आणि क्वेंटिन टॅरँटिनो या प्रथितयश व मुख्य प्रवाहातील दिग्दर्शकांचे अनुक्रमे ‘द आयरिशमन’ आणि ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवूड’ हे चित्रपटही होते. तरीही सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट या पुरस्कारांबरोबरच सवरेकृष्ट दिग्दर्शक हे आणखी एक प्रतिष्ठेचे ऑस्करही ‘पॅरासाइट’ला मिळाले. यातून अकॅडमीने आपल्या कक्षा विस्तारण्यावर भर दिलेला दिसतो, असा एक निष्कर्ष निघतो. परंतु त्यास दुसरी बाजू आहे. यंदा एकाही महिलेला दिग्दर्शन विभागात नामांकन नव्हते. तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विभागातील एक अपवाद वगळता (सिंथिया एरिवो) अभिनयातील पारितोषिकासाठी एकाही गौरेतराचा विचार झालेला नाही. गेल्या वर्षी मेक्सिकन दिग्दर्शक अल्फोन्सो कुआरॉन दिग्दर्शित ‘रोमा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे ऑस्कर मिळायला हवे होते, असे चित्रपट दर्दीना आजही वाटते. पण त्या खेपेला ‘ग्रीन बुक’ हा चित्रपट बाजी मारून गेला. जाणिवा आणि नेणिवा विस्तारण्याच्या प्रयत्नात असलेल्या अकॅडमीची ती निवड अनेकांना खुपणारी ठरली, कारण संहिता आणि सादरीकरणाच्या निकषांवर ‘ग्रीन बुक’ प्रतिगामी वाटावा असाच होता.

आजच्या चित्रपटरसिकांना ऑस्कर सोहळ्याकडून निव्वळ पुरस्कार वितरण नव्हे, तर राजकीय भाष्याचीही अपेक्षा असते. ऑस्करच्या मंचावरील कलाकार अपेक्षाभंग करीत नाहीत. म्हणूनच हल्लीच्या काळात हा सोहळा निव्वळ सादरीकरण आणि नेटकेपणा यापेक्षाही, तेथील विविध विजेते प्रस्थापित व्यवस्थेवर कसलाही मुलाहिजा न बाळगता जे आसूड ओढतात यासाठीही महत्त्वाचा असतो. हे त्यांच्या कलाकृतींइतकेच आनंददायी असते. ऑस्करविजेत्या कोरियन दिग्दर्शकाने एकीकडे हॉलीवूडमधील दिग्दर्शकांचे कौतुक करतानाच, ‘हा सोहळा फारच स्थानिक बनून गेला आहे’, असा मार्मिक टोमणा मारला. वैश्विकतेचा दावा करणाऱ्या इंग्रजीस ‘स्थानिक’ संबोधण्याची हिंमत ही ‘आवाज कुणाचा..’ या व अशा घोषणांत नेतृत्वाची धन्यता मानणाऱ्यांचा पोकळपणा उघड करते.  पुरस्कार स्वीकारताना इंग्रजी बोलता येत असूनही बाँग जून-हो आवर्जून कोरियन भाषेतच बोलत राहिला. त्याच्या सहकलाकाराचेही कोरियन भाषण अनुवादित करून इंग्रजीत सांगितले जात होते आणि त्याचेही इंग्रजी कलाकारांकडून मोकळे, उत्स्फूर्त कौतुक होत होते. ब्रॅड पिट या विख्यात अभिनेत्याला कारकीर्दीतले पहिले अभिनयातले ऑस्कर मिळाले. तरीही ते स्वीकारताना ‘माझे ४५ सेकंदांचे भाषण डोनाल्ड ट्रम्प महाभियोग खटल्यातील साक्षीदार जॉन बोल्टन यांना दिल्या गेलेल्या वेळेपेक्षा ४५ सेकंदांनी अधिक होते’ हे बोलायला तो विसरला वा धास्तावला नाही!

गतवर्षांप्रमाणे या सोहळ्यात कोणीही सादरकर्ता सूत्रधार नव्हता. तरीही राजकीय भाष्याची उणीव नव्हतीच. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवलेल्या ‘जोकर’ व्होकिन फीनिक्सने एक राष्ट्र, एक वर्ण, एक धर्म, एक प्रजाती यांच्याकडून होत असलेल्या पिळवणुकीवर प्रहार केले. ते वेदनादायी होतेच. पण ज्यांना ‘भोगवादी’ म्हणून आपण हिणवतो त्यांच्यातील संवेदनशीलता आणि बांधिलकी दाखवून देणारे होते. सुरुवातीला सादरकर्ता म्हणून आलेला ख्रिस रॉक असो किंवा मधल्या वेळेत रॅप संगीतावर सभागृहाला थिरकायला लावणारा उत्कर्ष आंबुडकर असो, या सगळ्यांनीच अकॅडमीच्या एकारलेपणावरही बोट ठेवले.

सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा पुरस्कार ‘पॅरासाइट’ला मिळाला, तर रूपांतरित पटकथेचा पुरस्कार तायका वायतिती या न्यूझीलंडमधील माओरी वंशाच्या लेखकाला ‘जोजो रॅबिट’ चित्रपटासाठी मिळाला. त्याने पुरस्कार स्वीकारताना जगभर फोफावणाऱ्या उजव्या कट्टरवादाच्या संदर्भात उच्चारलेले शब्द खरोखरीच थरकाप उडवणारे ठरले. तो म्हणाला, ‘पूर्वी तुम्ही नाझी होता, त्या वेळी तुम्हाला तुरुंगात पाठवले जायचे. आता तुम्ही नाझी असाल, तर खुशाल तुमच्या सहविचारींबरोबर शहरातल्या चौकात मोर्चे काढू शकता’! हे सर्व चित्रपट, साहित्य, संगीत अशा माध्यमांची महत्ता दाखवून देणारे आणि म्हणून अधिक अनुभवनीय असेच होते.

हे ऑस्कर सोहळे आणि जागतिक चित्रपट सातत्याने पाहणाऱ्यांना त्यांतील एक मुद्दा सहज जाणवेल. तो म्हणजे त्यातील व्यापकता आणि ते मांडण्याची अस्सल, अभ्रष्ट आणि तरीही आशयपूर्ण शैली. हे कलाकार आपण जे नाही ते दाखवायला जात नाहीत. मेरिल स्ट्रीप वा आज रंगमंचावर आलेली जेन फोंडा वा लिओनार्दो दि काप्रिओ आपले वय लपवत नाहीत वा व्होकिन फिनिक्स, डेंझिल वॉशिंग्टन वा ब्रॅड पीट वा अन्य कोणी आपले खरेपण टाळत नाहीत. आपल्याकडे रजनीकांत हा असा एखादा अपवाद. एरवी सर्वाचे प्रयत्न आपण जे नाही ते दाखवण्याचे. मग ते वय असो वा भाषा. अस्सलतेच्या आविष्कारातच कला आणि कलावंत यांची महत्ता असते याचे    काही भानच नाही. म्हणून आपली ‘बाहुली’ लहानच राहते आणि ‘मोठी तिची सावली’ जग व्यापत नाही.