12 August 2020

News Flash

विष आणि विषाणू

अर्थातच यामुळे करोनाच्या प्रसाराची गती मर्यादित झाली. पण तरीही ती थांबवता आली नाही.

 

ज्या देशात करोना साथीची उत्पत्ती झाली आणि ज्या देशांत तिने अनेकांचे बळी घेतले, हे वास्तव करोना या आजारापेक्षा त्या देशांबद्दल अधिक भाष्य करणारे आहे..

चीन, इराण, इटली आणि काही प्रमाणात अमेरिका या देशांत या आजाराचे सर्वाधिक बळी आहेत.  यापैकी चीन दोन आठवडे साथच मान्य न करणारा, तर इटली आणि अमेरिका हे या साथीच्या नावाने स्थलांतरितांना बोल लावणारे!

विख्यात फ्रेंच तत्त्ववेत्ता, नोबेल विजेता लेखक अल्बर्ट कामू याची चाळीसच्या दशकात प्रकाशित झालेली ‘द प्लेग’ ही कादंबरी या जीवघेण्या साथीच्या आजारास सामान्य नागरिक कसे सामोरे जातात, याचे हृद्य वर्णन करते. त्यात अनेकांना अशी काही साथ आहे हेच मान्य नसते आणि काहींना ते आपोआप संपुष्टात येणारे दु:स्वप्न असेल असे वाटते. त्याआधी विसाव्या शतकाच्या प्रारंभी जगभर पसरलेल्या फ्लू साथीतही याचेच दर्शन घडले होते. आकाशातील ग्रहताऱ्यांच्या ‘अभद्र’ (?) युतीपासून रशियातील अशुद्ध पिकापर्यंत अनेक कारणे त्या वेळी या आजाराच्या साथीसाठी दिली गेली. जगभरात त्या वेळी पाच कोटी जण फ्लूच्या साथीत बळी पडले. परंतु तेव्हा बराच काळ माणसे कोणत्या आजाराने मरतात हेच कळत नव्हते. कशाचा तरी परिणामस्वरूप येणारा ज्वर प्राणघातक ठरतो, इतकेच त्यामुळे त्या वेळी मानले गेले. म्हणूनच या ज्वरास ‘इन्फ्लुएंझा’ (इन्फ्लुअंस = परिणाम) असे नाव पडले. हा अर्थातच प्रतिजैविके (अ‍ॅण्टिबायोटिक्स) विकसित होण्याआधीचा काळ. त्यामुळे त्या वेळी त्या साथीवर नियंत्रण मिळवणे अवघड ठरले. या आजाराने बळी पडलेल्यांच्या शवविच्छेदनात या सर्वाच्या फुप्फुसात काही एक विशिष्ट विषाणू आढळले. त्यातून त्यांच्या नियंत्रणाची उपाययोजना आणि तद्अनुषंगिक संशोधन सुरू झाले. विज्ञानाने त्यावर विजय मिळवला खरा. पण तो तात्पुरता ठरला. कारण औषधाप्रमाणे मानवी फुप्फुसांना ग्रासणाऱ्या या विषाणूच्याही नवनव्या ‘सुधारित’ जाती/ प्रजाती/ उपजाती विकसित होत गेल्या. त्यामुळे गेल्या शंभरभर वर्षांत जगभरात पसरलेल्या दहा प्रमुख आजारांच्या साथीत तीन वा चार साथी या साध्या फ्लू याच आजाराच्या आहेत. साध्या गोष्टीच दुरुस्त करण्यात खरे आव्हान असल्यामुळे या फ्लू साथीवर आपणास अद्यापही विजय मिळवता आलेला नाही. सध्या करोना विषाणूच्या निमित्ताने जगभर थमान घालणारी आजारसाथ हेच दर्शवते.

तथापि आधीच्या आणि विद्यमान साथीत दोन मुद्दय़ांचा फरक. त्या वेळी या आजारांची डोकेदुखी आहे त्यापेक्षा अधिक वाढवणारी समाजमाध्यमे नव्हती आणि या आजारांवर गोमूत्र/गोबर हा कसा रामबाण इलाज आहे असे सांगणारे ‘देसी’ तज्ज्ञ नव्हते. हे दोन मुद्दे वगळता करोनाची तीव्रता आधीच्या फ्लूंपेक्षा अधिक आहे. पण ज्या देशात या साथीची उत्पत्ती झाली आणि ज्या देशांत तिने अनेकांचे बळी घेतले, हे वास्तव करोना या आजारापेक्षा त्या देशांबद्दल अधिक भाष्य करणारे आहे. हा आजार निपजला चीनच्या पोटी. त्या भूभागांतील जनता प्रत्येक सजीव हा आपल्या भक्षणासाठीच आहे, असे मानते. त्यातूनच वटवाघळे आणि खवले मांजर यांच्याशी आलेल्या अतिसंपर्कामुळे या आजाराचे विषाणू मानवी फुप्फुसांत प्रवेश करते झाले, असा एक निष्कर्ष आहे. तो असत्य असण्याची शक्यता नाही. तथापि असे झाल्यानंतर किमान दोन आठवडे चीनने त्याचे गांभीर्य मान्यच केले नाही. अशी कोणतीही साथ नाही, असे त्यामुळे माणसे मरू लागली तेव्हाही चीन मानत होता. हे नकारात जगणे महाग पडले. तोपर्यंत हा आजार सर्वत्र पसरू लागला. त्यानंतरही जे करायला नको होते तेच चीनने केले. नागरिकांना घरांत डांबले. त्यामुळे आजाराचे गांभीर्य किती आहे आणि ते कोठपर्यंत पसरलेले आहे, हे समजून घेण्यातच बराच काळ गेला. या आजाराचा विषाणू पसरत गेला.

त्यास कारणीभूत ठरली सिंगापूर येथील परिषद. तीसाठी जगभरातून १०९ तज्ज्ञ  हजर  होते. त्या परिषदेतील चीनमधून आलेल्या एका सहभागीस या आजाराची लागण झालेली होती. पण ना या रुग्णास याची माहिती होती ना आयोजकांस. परिणामी या परिषदेतून जाताना हे १०९ जण करोनाचे विषाणूदेखील आपल्या समवेत नकळतपणे घेऊन गेले. ही बातमी पसरल्यावर जागतिक आरोग्य संघटना, सिंगापूर आणि विविध देशांची सरकारे अशा सर्वानी या १९८ जणांचा छडा तर लावलाच. पण हे सर्व कोणा कोणास भेटले, याचादेखील संपूर्ण माग काढला. अर्थातच यामुळे करोनाच्या प्रसाराची गती मर्यादित झाली. पण तरीही ती थांबवता आली नाही. या रोगाचे विषाणू दरम्यान अनेक देशांत सुखेनव मुक्कामास गेले होते.

तथापि ज्या देशांना याचा विशेष तडाखा बसला ती नावे सूचक ठरतात. युरोपात इतके देश आहेत. पण या आजाराचा सर्वाधिक प्रसार हा इटली या देशात झाला. एके काळी बलाढय़ जागतिक सत्ता असलेला हा देश अलीकडच्या काळात आर्थिक गत्रेत सापडलेला आहे आणि त्या देशातही संकुचित प्रवृत्तींना बळ मिळत असल्याची चिन्हे आहेत. त्याचमुळे करोना आजाराची लागण झाल्याची बातमी आल्या आल्या इटलीतील कडव्या उजव्या विचारांचे नेते मातिओ साल्व्हिनी यांनी मागणी केली ती देशाच्या सीमा सीलबंद करून टाकण्याची आणि नागरिकांना घरांतून बाहेर पडण्यास मनाई करण्याची. या आजाराचे निमित्त साधत साल्व्हिनी यांनी स्थलांतरितांबाबतची आपली मळमळही व्यक्त केली. वास्तविक इटलीत मोठय़ा प्रमाणावर आलेल्या आफ्रिकी निर्वासितांमुळे हा आजार पसरत असल्याचा कोणताही पुरावा नाही. पण तरीही स्थानिक राजकारण्यांनी आपले मागास राजकारण यानिमित्ताने पुढे रेटले.

इराणबाबतही असेच म्हणता येईल. या देशातही करोनाचे बळी गेले. इटलीप्रमाणे अलीकडच्या काळात इराणमध्येही अतिरेकी प्रवृत्ती वाढू लागल्या असून ताज्या निवडणुकांत या शियाबहुल देशात धर्मवाद्यांचा विजय झाला. आधीच या देशाची अर्थव्यवस्था रसातळास गेलेली. अमेरिकेशी सुरू असलेल्या मतभेदांमुळे या देशावर आर्थिक निर्बंध आहेत. त्यामुळे नागरिकांस मोठय़ा हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. गेल्याच महिन्यात आर्थिक तंगीमुळे इराणातील शहरांत दंगेधोपे झाले. त्यात या निवडणुकांत झालेला कडव्या धर्मवाद्यांचा विजय. परिणामी इराणमधील परिस्थिती चिंताजनक म्हणावी अशी आहे. करोना विषाणूच्या लाटेत या देशात ५० हून अधिक मृत्युमुखी पडले. इराण सरकारनेदेखील त्याबाबत इशारा दिला. पण पंचाईत अशी की, इराणच्या या दाव्यांवर खुद्द वैद्यकीय क्षेत्रातच विश्वास नाही. करोना साथीचा उपयोग इराणी राज्यकत्रे आपल्या प्रचारासाठी करत असावेत असे बोलले जाते. त्यामुळे या देशांतील करोना बळींच्या संख्येबाबतदेखील अविश्वासाची भावना आहे. तितकी लबाडी अमेरिकेतील राज्यकर्त्यांना करता येणारी नाही. पण तरीही अमेरिकेत पसरू लागलेल्या या आजाराच्या निमित्ताने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे साथी स्थलांतरितांविरोधात हवा तापवतील, अशी भीती संबंधित वर्तुळात व्यक्त होते. विशेषत: अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. तेव्हा या निवडणुकीत ट्रम्प यांना आपला स्थलांतरित-विरोधाचा मुद्दा रेटण्यासाठी करोनाची साथ चांगलीच पथ्यावर पडू शकते.

हे देश वगळता अन्यत्र अनेक ठिकाणी करोनाचा प्रसार होताना दिसतो. पण तरीही या आजारास बळी पडणाऱ्यांची संख्या अन्य देशांत तितकी नाही. त्या तुलनेत चीन, इराण, इटली आणि काही प्रमाणात अमेरिका याच देशांत या आजाराचे सर्वाधिक बळी आहेत. म्हणजे या देशांत करोनाच्या साथीत बळी पडण्यासाठी त्या विषाणूइतकेच त्या देशांच्या वातावरणातील विषदेखील कारणीभूत आहे, असा अर्थ निघत असल्यास ते गर ठरेल काय? कामूच्या नाटकातील धर्मगुरू प्लेगच्या साथीमागे परमेश्वराचा कोप असल्याचे सांगतो. सध्याचे राजगुरू राजकीय कारण सांगतात, इतकाच काय तो फरक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2020 12:04 am

Web Title: editorial page poisons and viruses corono virus china iran italy and to some extent the united states influenza antibiotics akp 94
Next Stories
1 असमर्थ समर्थ
2 ना ‘पटेल’ ही ‘प्रीती’!
3 ‘विदा’नंद शिव सुंदर ते..!
Just Now!
X