इस्रायलच्या सैनिकी कारवायांशी बरोबरी वा तुलना करण्याआधी त्या देशाचा लष्करी इतिहास पाहायला हवा.. कारगिल, पठाणकोट आणि उरी या आपल्या मार्च महिन्यातल्या परीक्षा आहेत. त्यात आपण सपशेल अपयशी ठरलो आणि नंतर मात्र जोर लावून ऑक्टोबरात यशस्वी झालो. इस्रायलचे असे एकदाही झालेले नाही..

शाळा वा महाविद्यालयाच्या ज्या वर्गात अल्बर्ट आइन्स्टाइन शिकत असतो त्या वर्गात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या विद्यार्थ्यांने उत्तरायुष्यात शालेय कारकीर्दीविषयी बोलताना आइन्स्टाइन आणि मी पुढेमागेच होतो असे विधान केले तर ते असत्य नव्हे. परंतु तरीही ते सत्य नव्हेच नव्हे. याचे कारण या विधानावरून आइन्स्टाइन आणि ते विधानकर्त्यांची तुलना होत असताना या दोघांतील प्रत्यक्ष बौद्धिक अंतर किती हे वास्तव सोयीस्कररीत्या लपवले जाते. आइन्स्टाइनसारखा विद्यार्थी पहिला असणार हे उघड आहे आणि अशा वर्गात दुसरा क्रमांक कोणी तरी पटकावणार हेही उघड आहे. परंतु म्हणून दुसऱ्या क्रमांकाने स्वत:ची बरोबरी आइन्स्टाइनसारख्या व्यक्तीशी करण्याचे औद्धत्य दाखवावयाचे नसते. ते केविलवाणे हास्यास्पद ठरते. हा दृष्टान्त केवळ उदाहरणार्थ. जे व्यक्तींचे ते देशाचेही. म्हणजे एका देशाने अनेकदा एखादी कृती केली, उदाहरणार्थ इस्रायल, आणि कालांतराने दुसऱ्या देशाने तसेच काही हातपाय मारावयाचा प्रयत्न केला, उदाहरणार्थ भारत, तर ज्याप्रमाणे दुसऱ्या विद्यार्थ्यांने स्वत:ची तुलना आइन्स्टाइनबरोबर करणे हास्यास्पद तद्वत भारताने आपला पाट इस्रायलच्या पंगतीत स्वत:च मांडून घेणे केविलवाणे. राष्ट्रप्रेमाने भारलेल्यांना हा मुद्दा समजून घेणे बरीक अवघड असले तरी ज्यांची विचारक्षमता शाबूत आहे त्यांच्यासाठी काही महत्त्वाचे दाखले त्या पुष्टय़र्थ देणे उपयोगी ठरावे बहुधा.

सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे की शत्रुराष्ट्राचे सैनिक वा दहशतवादी हे इस्रायली जवानांच्या निजघरापर्यंत येण्याइतका इस्रायल गाफील राहिल्याचे एकही उदाहरण नाही. भारताबाबत अगदी अलीकडच्या काळातदेखील असे अनेक दाखले देता येतील. पठाणकोट आणि उरी हे अगदी ताजे. ही दोनही स्थळे सीमेलगत. म्हणजे यात प्रत्येकी दोनदा घुसखोरी झाली. भारत आणि पाक सीमेवर पहिली आणि दुसरी भारतीय लष्करी केंद्राच्या कुंपणातून झाली, ती. असे एकदा नव्हे तर दोन वेळा घडले. म्हणजे एकूण चार घुसखोऱ्या भारतीय सुरक्षा रक्षकांच्या नाकाखाली घडल्या. याशिवाय भारतीय जवानांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून बोट दाखवले जाणारे कारगिल. हे तिसरे उदाहरण. वास्तविक लष्करी अभ्यासकांच्या मते कारगिलइतकी नामुष्की आपल्या इतिहासात अन्य नाही. यास नामुष्की म्हणावयाचे कारण पाकिस्तानी जवान इतक्या खोलवर आपल्या प्रदेशात येतात, एक टेकडीच्या टेकडी पादाक्रांत करतात आणि त्या अवस्थेत काही आठवडे निवांत राहतात. याचा कोणताही सुगावा भारतीय लष्करास लागत नाही. जो लागतो तोदेखील स्थानिक मेंढपाळांनी माहिती दिल्याने. मग मात्र आपले शौर्य जागे होते आणि मोठय़ा तुंबळ युद्धानंतर आपण पाकिस्तानी घुसखोरांचा पराभव करतो. हा ‘विजय’ साजरा करणे म्हणजे मार्च महिन्यात दहावीला अनुत्तीर्ण झालेल्याने ऑक्टोबरच्या परीक्षेत शाळेत पहिला क्रमांक येणे साजरे करण्यासारखे. अशा वेळी या विद्यार्थ्यांस आनंदोत्सव काय करतोस, तू मुदलात आधी अनुत्तीर्ण झाला होतास, असे विचारणे हे आसपासच्या शहाण्यांचे कर्तव्य ठरते. जी गत विद्यार्थ्यांची तीच आपल्या देशाची. कारगिल, पठाणकोट आणि उरी या आपल्या मार्च महिन्यातल्या परीक्षा आहेत. त्यात आपण सपशेल अपयशी ठरलो आणि नंतर मात्र जोर लावून ऑक्टोबरात यशस्वी झालो. इस्रायलचे असे एकदाही झालेले नाही. याउलट शत्रूस जाग यायच्या आधीच इस्रायलने शत्रुराष्ट्रात घुसून शत्रुराष्ट्राच्या भूमीतच त्यास गारद केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

यातील सर्वात मोठे उदाहरण म्हणजे १९६७ सालातील सिक्स डे वॉर नावाने ओळखले जाणारे युद्ध. त्याची पाश्र्वभूमी अशी की त्या आधी काही वर्षे इजिप्तचे गमाल अब्दुल नासर यांना आपण अरबांचे सर्वोच्च नेते असल्याचा भास होऊ लागला होता. तत्कालीन सोविएत रशियाच्या मदतीच्या जिवावर फुगू लागलेला नासर यांचा बेडूक बैलाएवढा झाला आणि इस्रायलला ढुशा देऊ लागला. सोबतीस नासर यांनी शेजारील जॉर्डन आणि सीरिया या दोन देशांनाही घेतले आणि इस्रायलचा घास घेण्याचे मनसुबे आखले गेले. त्यावर काही होण्याआधीच इस्रायली विमानांनी ६७ सालातील जून महिन्यातल्या एका पहाटे इजिप्तमध्ये घुसून शत्रुराष्ट्रांची विमाने जागच्या जागी टिपली. या हल्ल्याचा झपाटा इतका होता की इजिप्त, सीरिया आणि जॉर्डन या तीन देशांपैकी एकाच्याही विमानाला उडण्याचीदेखील संधी मिळाली नाही. इस्रायलच्या या माऱ्यात तब्बल ४५० विमाने बसल्याजागीच उद्ध्वस्त झाली. त्यानंतर सात वर्षांनी १९७३ सालच्या योम किप्पुर युद्धात इजिप्तने आधीच्या युद्धात झालेला अपमान दूर करण्याचा प्रयत्न केला. सीरियाच्या साथीने इजिप्तने योम किप्पुर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या यहुदींसाठीच्या पवित्र दिवशी इस्रायलमध्ये फौजा घुसवल्या. सुरुवातीला काही काळ इस्रायल हडबडले. परंतु लवकरच विलक्षण लष्करी चापल्य दाखवत इस्रायलने असा काही प्रतिहल्ला केला की त्यात उलट शत्रुराष्ट्राने आपलाच भूभाग गमावला. म्हणजे या युद्धाआधी इस्रायलचा जो काही भूभाग होता त्यात या युद्धानंतर वाढ झाली. यातले काहीही आपल्याला करता आलेले नाही. इस्रायलच्या या आणि अशा शौर्याचे दाखले कित्येक डझनांनी देता येतील. आपल्याकडे असे किती दाखले आहेत?

इस्रायलच्या शौर्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे त्या देशाच्या सैनिकांनी हाती घेतलेले ऑपरेशन एंटेबे. ही घटना १९७६ सालातील. तेल अविव येथून पॅरिस येथे जाण्यासाठी निघालेले विमान पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी युगांडातील एंटेबे येथे पळवून नेले. हे साधेसुधे अपहरण नव्हते. कारण अपहरणकर्त्यांचे स्वागत युगांडाचा क्रूरकर्मा सत्ताधीश इदी अमीन याने केले. परिणामी ओलिसांची सुटका करणे अधिकच जोखमीचे झाले. असा प्रयत्न झाल्यास इस्रायली जवानांवर युगांडाचे सैनिक हल्ला करतील अशी धमकी अमीन याने दिली होती. तरीही त्याची कोणतीही पर्वा न करता सात दिवसांच्या अखंड योजकतेनंतर इस्रायलने एंटेबे विमानतळावर घुसून कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी फक्त १०० कमांडोज चार हजार किलोमीटरचे अंतर कापून एका रात्री एंटेबे येथे उतरले आणि आपल्या एकाही नागरिकाचा बळी न देता या जवानांनी अपहरणकर्त्यांना आणि त्यांच्या मदतीला आलेल्या युगांडाच्या जवानांना ठार केले. या प्रचंड गुंतागुंतीच्या, धाडसी कारवाईत इस्रायलने फक्त एक कमांडो गमावला. लेफ्टनंट कर्नल योनातन नेतान्याहू हे त्याचे नाव. इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांचे ते ज्येष्ठ बंधू. याउलट आपल्याला सामोरे जावे लागलेल्या एकमेव विमान अपहरण प्रकरणात आपले परराष्ट्रमंत्री अपहरणकर्त्यांच्या मागणीपुढे शरणागत होत काश्मिरातील बंदीवान दहशतवाद्याची मुक्तता करण्यासाठी जातीने हात बांधून सादर झाले. त्यासाठी ते अफगाणिस्तानातील कंदाहार येथे स्वत: गेले. तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग यांनी त्या वेळी मुक्त केलेला दहशतवादी म्हणजे आजचा मौलाना मसूद अझर. भारत सरकारच्या औदार्यानंतर त्याच वर्षी त्याने जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेची स्थापना केली आणि आज आपण त्याच्याच नावाने शंख करीत असतो. इस्रायलने हा असला उद्योग केल्याचे किती दाखले सापडतील?

इतके शौर्य आणि विजिगीषु वृत्ती असूनही लक्षात घेण्याची बाब म्हणजे इतक्या युद्धखोरीनंतरही इस्रायलला पॅलेस्टिनचा प्रश्न इतक्या वर्षांनंतरही मिटवता आलेला नाही. तेव्हा इस्रायल अािण भारत या देशांच्या वास्तवात इतकी महाप्रचंड दरी असूनही आपली बरोबरी इस्रायलशी करण्याचे औद्धत्य कोणी दाखवत असेल तर वास्तवाच्या जवळ जाणारी, किमान बुद्धिमानांनाही समजेल अशी एकच प्रतिक्रिया उमटेल : काहीही हं श्रीयुत.