अ. भा. मराठी साहित्य संमेलनापासून रसिक का दूर राहिले याचे उत्तर संमेलनाध्यक्षांचे भाषण व त्यातील बोटचेपी भूमिका यांतूनही मिळतेच..

आसपास घडणाऱ्या घटनांवर समाज दखल घेईल असे भाष्य करण्याचा नैतिक अधिकार मिळवणे हे साहित्यिकांचे कर्तव्य ज्यांनी पाळले, त्यांचे साहित्य हे काळावर मात करून उरते. कोस्लर वा ऑर्वेल हे लेखक आणि त्यांचे वाङ्मय या संमेलनीय मंडळींना फारच दूरचे वाटत असेल तर अलीकडच्या काळातील दुर्गा भागवत, नरहर कुरुंदकर आदींचे तेजस्वी लिखाण तरी त्यांनी लक्षात घ्यावे.. 

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

खरे तर संपादकीय लिहून अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची पुन्हा एकदा दखल घ्यावी असे काहीही घडलेले नाही. याआधी गतसाली ‘उडदामाजी काळे गोरे’ (१३ डिसेंबर) या संपादकीयाद्वारे आम्ही डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या संमेलनाध्यक्षपदी झालेल्या निवडीची दखल घेतली होतीच. डोंबिवलीत भरलेल्या या संमेलनाचे रविवारी सूप वाजले. याआधीच्या संपादकीयात वर्तवलेल्या भाकिताप्रमाणे हे संमेलन अत्यंत शुष्कपणे पार पडले. ना साहित्यिकांना त्यात रस होता ना वाचक वा साहित्यप्रेमींना. वाचकांसाठी संमेलनात आवडीने यावे असा एकमेव प्रसंग होता तो डॉ. जयंत नारळीकर यांचा सत्कार. डॉ. नारळीकर पेशाने आणि वृत्तीने वैज्ञानिक. परंतु तरीही त्यांची साहित्यातील पुण्याई ही संमेलनातील एकंदर आजी, माजी आणि भावी अध्यक्ष यांच्यापेक्षा वजनाने आणि सत्त्वाने अधिक भरावी. या वैज्ञानिक आणि साहित्यिकास पाहणे/ ऐकणे इतकाच काय तो आनंद या ९०व्या साहित्य संमेलनाने दिला असेल. बाकी सगळा मामला अनुल्लेखाने मारावा इतका दुय्यम. परंतु तरीही या संमेलनासंदर्भात पुन्हा संपादकीय लिहिणे अगत्याचे ठरते. याचे कारण या संमेलनाच्या व्यासपीठावर काय घडले हे नसून काय घडले नाही, हे आहे. साहित्यिक, कलाकार यांनी समाजास बौद्धिक नेतृत्व देणे अपेक्षित असते आणि आसपास घडणाऱ्या घटनांवर समाज दखल घेईल असे भाष्य करण्याचा नैतिक अधिकार मिळवणे हे त्यांचे कर्तव्य असते. असे कर्तव्य पालन करणारे साहित्यिक आणि त्यांचे साहित्य हे काळावर मात करून उरत असते. म्हणूनच कम्युनिझमचा उदो उदो सुरू असताना डार्कनेस अ‍ॅट नून लिहिणारे आर्थर कोस्लर अथवा अ‍ॅनिमल फार्म लिहिणारे जॉर्ज ऑर्वेल हे कादंबरीकार आजही वाचले जातात. हे लेखक आणि त्यांचे वाङ्मय या संमेलनीय मंडळींना फारच दूरचे वाटत असेल तर अलीकडच्या काळातील दुर्गा भागवत, नरहर कुरुंदकर आदींचे तेजस्वी लिखाण तरी त्यांनी लक्षात घ्यावे. अशी असंख्य उदाहरणे देता येतील. त्यातून अधोरेखित होते ती एकच बाब.

ती म्हणजे साहित्यिक/ कलावंतांनी आसपास घडणाऱ्या घटनांबाबत भूमिका घेणे. परंतु मराठी भाषक इतके कर्मदरिद्री की अ. भा. म्हणवून घेणाऱ्या साहित्य संमेलनाने आसपासच्या घटनांवर सर्वार्थसाधक मौन पाळणेच पसंत केले. या संमेलनाने एकमुखाने भूमिका घ्यायलाच हवी होती अशी घटना म्हणजे राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची विटंबना. साहित्य संमेलन म्हणजे भाषेचा उत्सव आणि राम गणेश तर साक्षात भाषाप्रभू. परंतु डोंबिवलीत जमलेल्या संमेलनीय भाषासेवकांना आपल्याच क्षेत्रातील प्रभूच्या झालेल्या अपमानाबद्दल अवाक्षरही काढावेसे वाटले नाही यावरून या लेखकूंच्या सत्त्वशून्य लिखाण आणि जगण्याची कीव यावी. संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने या विषयाला हात घालणे हे  डॉ. अक्षयकुमार काळे यांचे कर्तव्य होते. परंतु अत्यंत कंटाळवाण्या भिकार मराठीत अदखलपात्र भाषण करणे इतकेच काय ते साहित्य संमेलन अध्यक्षाचे काम असावे, असा त्यांचा समज झालेला दिसतो. अध्यक्षीय भाषण हे असे असणार याचा सुगावा बहुधा डोंबिवलीतील चाणाक्ष प्रेक्षकांना आधीच लागला असावा. कारण ते संमेलनस्थळी फिरकलेच नाहीत. तेव्हा साहित्य रसिकांची या संमेलनातली अनुपस्थिती क्षम्य मानावयास हवी. काळे यांच्या अध्यक्षीय भाषणातील हे काही नमुने पाहा. मराठी भाषेच्या विकासासंदर्भात ते म्हणतात, ‘‘अर्थाची प्रतीतिगम्यता नष्ट होऊन या विकासात गतिरुद्धता निर्माण होईल.’’ मराठी पंडितकवींचे ‘‘नावीन्यशोधनाचे इंद्रिय लुळे पडले’’, असे त्यांचे निरीक्षण. ‘‘एरवी अशा मनाअभावी निर्माण झालेल्या लेखनाच्या प्रेरणा बहुधा बाह्य़ स्वरूपाच्या, उथळ आणि बाजारू असतात; तथापि लेखकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की समकालीन सामान्य अभिरुचीचा, बाजारलक्ष्यी विचाराचा किंवा तशी विचारगणिते करण्यात प्रवीण असणाऱ्या प्रकाशकांच्या आग्रहाचा विचार करून आपले साहित्य; विशेषत: नाटके आणि कादंबऱ्या निर्माण करण्यापेक्षा आपले हृदय, मन, चित्त ज्या अनुभूतीने भारले गेले आहे तिचे मर्म समजून आपल्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत वाङ्मयप्रकारात निर्मिती केल्यास तिला काहीएक दर्जा मिळू शकेल,’’ हे इतके मालगाडीसारखे न संपणारे वाक्य वाचताना वाचकांचे विचारेंद्रीयदेखील लुळे पडेल. ही अशी वाक्ये काळे लिहीत असले तरी पुढे ते असेही म्हणतात की, ‘‘खूप अलंकारिक बोलणे/ लिहिणे किंवा योजनापूर्वक संस्कृत शब्द भाषेत घुसडणे म्हणजे मराठीची श्रीमंती टिकविणे असा माझा अजिबात समज नाही.’’ परंतु आपल्या भाषणात काळे स्वत:च तो समज दूर करतात. उदाहरणार्थ ‘‘मराठी लेखकाच्या कल्पनात्मक प्रतिक्रियांतील निर्जीव आवर्तितता आणि अंतर्निष्ठ अनुभवविस्तृततेचा अभाव’’ हा शब्दप्रयोग असो किंवा ‘‘कलाकृतीला आस्वाद्यमान करणारी खरी घटकसूत्रे आणि व्याज रंजनसूत्रे यांच्या स्वीकारासंबंधीचा सूक्ष्म विवेक लेखकाच्या ठायी कायमच असला पाहिजे कारण प्रतिभापूरित सर्जनशीलतेचा एक अंगभूत पैलूच आहे,’’ हा त्यांचा सल्ला असो. संमेलनाध्यक्ष वाचक/श्रोत्यांस मराठीपासून दूर करण्याचे कार्य मनोभावे पार पाडतात. हे एक वेळ क्षम्य म्हणता आले असते.

जर काळे यांनी गडकरी पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध केला असता. परंतु या घटनेचा उल्लेखही साहित्य संमेलनाध्यक्षाने न करणे हे अक्षम्य पाप ठरते. वस्तुत: काळे आपल्या भाषणात ‘‘निर्मितीच्या ध्रुवीकरणाबरोबर आस्वाद प्रक्रियेच्या ध्रुवीकरणाचे’’ धोके विशद करतात आणि असे झाल्याने ‘‘वाचक निर्लेप मनाने कलाकृतीला सामोरे जाण्यापेक्षा केवळ आपल्या जातिगटाचा तेवढा विचार करतो,’’ असेही नमूद करतात. असे होणे हा निकोप साहित्य व्यवहारास धोका आहे, हेदेखील त्यांना पटते. परंतु तरीही गडकरींचा पुतळा पाडला जाणे त्यांना निषेधार्ह वाटत नाही, यास काय म्हणावे? काळे यांच्या मते ‘‘आपल्या समाजातील जातीयता, धार्मिकता, प्रादेशिकता, लिंगभेद, वर्णविग्रह आडमार्गाने साहित्यात शिरून पूर्वद्वेषाची आणि वैमनस्याची बीजे नव्याने पेरीत असतील तर ते साहित्य विकृत मूलतत्त्ववादाचे, जात्यंधतेचे, धार्मिक दुरभिमानाचे प्रतिनिधित्व करू लागेल.’’ म्हणजे हे असे होत आहे, हे त्यांना कळते, जाणवते. परंतु त्यावर भाष्य करणे मात्र ते टाळतात. आपल्या समग्र भाषणात काळे मराठी साहित्य जागतिक पातळीवर वगैरे कसे जाईल याचा ऊहापोह करतात आणि ‘‘जातिधर्माच्या संकुचित सीमाच जर ते ओलांडू शकले नाही, तर ते श्रेष्ठ साहित्याची पातळी कशी गाठू शकेल?’’ असा प्रश्न स्वत:च विचारतात. तरीही साहित्याला अशा संकुचिततेत डांबण्याच्या वाढत्या प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवावा असे काही त्यांना वाटत नाही. लेखकांना, विचारांना आळा घालणाऱ्या प्रवृत्ती आसपास फोफावत असताना आणि त्या रोखण्यासाठी छातीठोक भूमिका घेऊन उभे राहण्याची गरज असताना मराठी साहित्य संमेलन जेमतेम बोटचेपी भूमिका घेते हे लाजिरवाणे आहे.

या अशांच्या लिखाणापासून वाचक का लांब जातात त्याचे हे एक कारण. जगण्याची नीतितत्त्वे आणि प्रत्यक्ष जगणे यात काही साधम्र्य आढळले तरच साहित्यिकाच्या शब्दाला तेज प्राप्त होत असते आणि अशा साहित्यिकास ऐकायला वाचक उत्सुक असतात. डोंबिवलीत संमेलनाचा मंडप रिकामा का होता, ते यावरून कळेल. संमेलनाचा मंडप साहित्यप्रेमींनी ओसंडून जावा अशी इच्छा असेल तर मराठी सारस्वतांना प्रथम आपल्यातील सत्त्व जागे करावे लागेल. विचारांचे तेज शब्दांत आणि शब्दांतील ओज कृतीत यावा लागेल. अन्यथा हे सत्त्वहीन सारस्वत असेच दुर्लक्षित राहतील.