दादरी येथील घटनेनंतर जवळपास तीन आठवडय़ांनी पश्चिम बंगालातील वर्तमानपत्रास अल्पशी मुलाखत देऊन पंतप्रधानांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातील युक्तिवादामुळेच हा प्रयत्न केविलवाणा आणि काहीसा हास्यास्पद ठरतो..

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोंड उघडले. गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून दादरी येथे महंमद अख़लाक़ यास २८ सप्टेंबर या दिवशी स्थानिक िहदुत्ववाद्यांनी दगडांनी ठेचून मारले. त्यानंतर अर्थातच देशात आणि परदेशात प्रतिक्रियांचा आगडोंब उसळला. स्थानिक आणि अतिरेकी िहदुत्ववाद्यांनी जे झाले त्याचे समर्थनच केल्याने तो अधिक जोमाने भडकला. वस्तुत: अधिक चौकशीनंतर अखम्लाक़ याच्या घरी जे काही सापडले ते गोमांस नव्हते, असे निष्पन्न झाल्यानंतरदेखील या भयानक कृत्याविषयी संबंधितांना ना खेद वाटला ना खंत. भूतदया आणि मानवी संस्कृतीची उदात्त देशी परंपरा सांगणाऱ्यांनी जे झाले त्याचा एका शब्दाने साधा निषेधसुद्धा केला नाही. परिणामी वातावरण तापले आणि सरकारविरोधात चांगलीच नाराजी दाटून आली. दादरी हत्या, पाठोपाठ मुंबईत मोदी यांच्या पक्षाने ज्यांच्याशी हातमिळवणी केली आहे त्या शिवसेनेने गुलाम अली आणि कसुरी यांच्या मुंबई भेटीनिमित्ताने घातलेला बालसुलभ धांगडिधगा आणि या आधी दाभोलकर ते कलबुर्गी व्हाया पानसरे अशांच्या हत्या तपासात आलेले अपयश यामुळे भारतातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा कसा गळा घोटला जातोय, असे चित्र निर्माण झाले.

काही प्रमाणात ते खरेही असले- आणि आहे- तरी त्याचे गांभीर्य आहे त्यापेक्षा अधिक रंगवले गेले. तसे होणेही साहजिकच. कारण कोणताही मुद्दा हा शेवटी राजकीय वळण घेतोच घेतो. दादरी हत्येचेही तसेच झाले आणि त्यानंतर दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या लेखक, कवी, कलावंतांत सरकारचा निषेध करण्यासाठी आपापले पुरस्कार परत करण्याची जणू स्पर्धाच लागली. तेवढेच ज्ञानप्रकाशात असे म्हणत काही हौशे-गवशांनीही या पुरस्कार परतफेडीच्या प्रसिद्धी गंगेचे चार िशतोडे आपल्या अंगावर उडतील याची चतुर खबरदारी घेतली. त्यातही काही नवीन नाही. हे असे होतच असते. अशा प्रसंगात काही प्रामाणिक सात्त्विकांच्या बरोबरीने इतरांचेही फावत असतेच. तेव्हा या मंडळींनी केलेला निषेध हा मुद्दा आहेच. परंतु त्याच बरोबरीने सरकारी आघाडीवर या प्रश्नी असलेली भयाण, कानठळ्या बसवणारी शांतता हा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. दरम्यानच्या काळात महेश (बे)शर्मा आदी असांस्कृतिकांनी वाह्य़ात बडबड करून वातावरण अधिकच गढूळ केले. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पíरकर यांच्यासारख्या त्यातल्या त्यात समंजसांनी दादरी प्रसंगाने आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे नाक कापले असे सांगून सरकारमधील समंजसता अद्याप जिवंत आहे, याची जाणीव करून दिली. परंतु या सगळ्यांचे म्होरके, संवाद कलानिपुण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शांतता धक्कादायक आणि धोकादायकही होती. त्यांनी यावर काहीही भाष्य केले नाही, हे खरेच. पण एरवी टिकलीएवढय़ा घटनांवर केली जाणारी ट्विप्पणीदेखील केली नाही. त्यामुळे भाजपविरोधातील टीकेची धार अधिकच तीव्र झाली. ते योग्यच. तेव्हा आता या गदारोळानंतर पश्चिम बंगालातील आनंद बझार पत्रिका या वर्तमानपत्रास अल्पशी मुलाखत देऊन पंतप्रधानांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तो पूर्णत: केविलवाणा आणि काहीसा हास्यास्पद ठरतो. याचे कारण म्हणजे पंतप्रधानांचा युक्तिवाद. दादरी येथे आणि महाराष्ट्रात जे काही झाले त्यात केंद्राचा काय दोष, कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा प्रश्न आहे, गुलाम अली यांची मफल रद्द होणे दुर्दैवी, आता या प्रसंगांचे राजकीयीकरण सुरू असून त्यामागे कुडमुडे निधर्मीवादी आहेत, भाजपने नेहमीच या कुडमुडय़ा निधर्मीवादास विरोध केला आहे, सगळ्यात प्रामाणिक निधर्मी पक्ष भाजपच आहे- हे पंतप्रधानांच्या मुलाखतीचे सार. पंतप्रधानपदावरील व्यक्तीचा बचाव किती वरवरचा असू शकतो, ते यातून दिसेल. त्याचा प्रतिवाद करणे आवश्यक आहे.

दादरी येथील घटना केंद्राच्या बेजबाबदारपणामुळे झाली, असे मोदी यांचे विरोधकही म्हणणार नाहीत. परंतु ही घटना घडून गेल्यानंतर स्थानिक आणि केंद्रीय भाजप नेते जे काही वागले त्याची दखलदेखील राज्य सरकारनेच घ्यायला हवी होती, असे मोदी यांचे म्हणणे आहे काय? मोदी यांच्या मांडीला मांडी लावून बसणारा महेश शर्मा नावाचा सांस्कृतिकमंत्री दादरीत जे काही झाले तो केवळ अपघात होता, असे पुन्हा पुन्हा म्हणत होता तेव्हा त्याच्या जिभेस आवर घालण्याचे काम आपले नव्हते, असे मोदी म्हणतील काय? हा शर्मा इतका बेशरम की सरकारचा निषेध करीत लेखक एकापाठोपाठ पुरस्कार परत करीत असताना, त्यांनी लेखन थांबवले तर काय ते बघू असे निर्लज्ज उद्गार काढत होता तेव्हा त्यास खडसावण्याचे काम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव सरकारने करणे अपेक्षित होते काय? या शिवाय उत्तर भारतातील अनेक भुक्कड साधुसाध्वींनी या घटनेवर आगलावी भाषा केली. त्यांना भाजपच्या कोणत्या ज्येष्ठ नेत्याने कधी अटकाव केला? मोदी कार्यबाहुल्यामुळे व्यग्र होते, हे मान्य. परंतु मोदी यांचे उजवे हात असलेले पक्षाध्यक्ष अमित शहा या घटनेवर कधी आणि काय बोलले? पक्षाने तरी जाहीरपणे या घटनेबद्दल नाराजी दाखवीत किमान दिलगिरी तरी व्यक्त करावी अशी काही मसलत मोदी यांनी आपल्या या उजव्या हातास का दिली नाही? आशा भोसले यांच्या चिरंजीवांचे दीर्घ आजाराने निधन झाल्यावर मोदी यांनी शोक व्यक्त करणारा ट्वीट केला. ते ठीकच. परंतु दादरी हत्येवरदेखील तो करावा असे त्यांना का वाटले नाही, हा ओवैसी यांचा प्रश्न कुडमुडा निधर्मीवाद कसा ठरतो? गलितगात्र होऊन निपचित पडलेल्या काँग्रेसमध्ये या दुर्दैवी हत्येच्या मुद्दय़ाने धुगधुगी आली आणि त्यांनी जरा हातपाय हलवले, तर ते अयोग्य ठरते काय? काँग्रेस सत्ताधारी असताना असे काही घडले असते तर मोदी आणि भाजपने त्याकडे आनंदाने काणाडोळा केला असता काय? मुंबईतील घटनेबद्दल मोदी खेद व्यक्त करतात. परंतु या घटनेस जे जबाबदार आहेत ते मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांना कधी मोदी यांनी चार शब्द सुनावले काय? किंवा आयोजकांनी गुलाम अली वा अन्य कोणाचा कार्यक्रम रद्द करण्याची काहीही गरज नाही, केंद्र सरकार संपूर्ण सुरक्षेची हमी देईल असे काही आश्वासन मोदी वा त्यांच्या सरकारातील अन्य कोणी दिले काय? आणि त्याअभावी जे काही मुंबईत झाले त्याबद्दल केंद्रीय भाजप नेतृत्वाने आपला कणा ताठ आहे, असे काही दाखवले काय? या प्रश्नावर कायमस्वरूपी पंतप्रधानोत्सुक लालकृष्ण अडवाणी वगळता भाजपच्या अन्य नेत्यांची दातखीळच बसली, ती का? मोदी म्हणतात भाजप हा निधर्मी पक्ष आहे. हे खरे असेल तर मुसलमानांची वाढती लोकसंख्या येथपासून ते शालेय अभ्यासक्रम पातळीपर्यंत जे बदल करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून होतो, तो का? गाय या प्राण्यास पूज्य मानणे हे कोणत्या निधर्मी तत्त्वांत बसते आणि एकाच प्राण्याच्या शरीरात आपल्या तब्बल ३३ कोटी देवांना कोंबणे हेदेखील निधर्मीच मानावयाचे काय? या देव वास्तव्यासंदर्भात बिचाऱ्या अन्य प्राण्यांचे काय पाप, यावर भाजपमधील कोणता निधर्मी अधिक प्रकाश टाकू शकेल?

तेव्हा इतक्या भीषण प्रकारानंतर जवळपास तीन आठवडय़ांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या भाष्यामुळे उलट अधिक प्रश्न निर्माण होतील. जे आहेत ते कसे सोडवायचे ही समस्या आहेच. तेव्हा ही प्रतिक्रिया व्यक्त करून मोदी यांनी अधिक तीव्र प्रतिक्रियांना निमंत्रण दिले आहे. देर आए, दुरुस्त आए अशी एक िहदी म्हण आहे. यातील पूर्वार्ध मोदी यांना लागू पडतो. उत्तरार्धाबाबत या मुलाखतीत ते दुरुस्त नहीं आए.. म्हणावे लागेल.