भाजपने किती नामांकित, महनीय नरपुंगवांस उदार अंत:करणाने आपल्या पोटात सामावून घेतले आहे. इतकी क्षमाशीलता अन्य कोठे आढळेल बरे?

मोठा विलक्षण योग आहे म्हणायचा हा. इतका पवित्र पद्यात्मक न्याय (आम्ही ‘काव्यात्म’ म्हणणार होतो. पण काव्यबिव्य ते छचोर काँग्रेसीवाल्यांसाठी. राष्ट्रप्रेमी भाजपसाठी असते ते पवित्र पद्य.) याआधी कधी पाहावयास मिळाला नसेल. आज अनंत चतुर्दशी. या दिवशी बुद्धिदेव गणेश आपला मुक्काम हलवतात आणि ‘घरवापसी’ करतात. (आता या सणाचा आणि बुद्धीचा काय संबंध, असा प्रश्न काहींना पडल्यास तेच मुळात बुद्धिभ्रष्टतेचे लक्षण. अशा बुद्धिभ्रष्टांना सरळ करण्यासाठी उर्वरित आयुष्य पंचगव्य सेवनास आणि बौद्धिके श्रवणास भाग पाडणे हाच एक मार्ग उरतो.) तर या गणेशोत्सव काळात अर्वाचीन महाराष्ट्रात जागोजाग ‘राजें’ची प्रतिष्ठापना होते. त्या त्या भूप्रदेशातील दांडग्यांचा सक्रिय पाठिंबा हा या ‘राजां’ना असतो. तसा तो नसेल तर रस्ता, वाहतूक, वीज, ध्वनी आदी वाटेल त्या नियमांचे उल्लंघन करून हे ‘राजे’ रस्त्यावर ठाण मांडून बसू शकतेच ना. या हंगामी राजांच्या हंगामी महालांकडे (पक्षी : मंडप) जाण्याच्या रस्त्यावर भले दरीखोऱ्यांइतके खोल खड्डे असोत, नागरी सुविधांचीही बोंब असो किंवा स्थानिकांना या ११ दिवसीय ‘राजां’मुळे अतोनात यातनांना तोंड द्यावे लागत असो; पण त्याचा ‘राजां’च्या मुक्कामावर काही परिणाम होत नाही. पण अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर मात्र गावोगावच्या या ११ दिवसांच्या ‘राजां’चे विसर्जन केले जाते.

या मूर्तीय राजे विसर्जनाच्या पूर्वसंध्येस सत्ताधारी भाजपच्या अथांग सागरात अशा अनेक हलत्याबोलत्या राजांचे विसर्जन होत आहे, हा तो आम्ही म्हणतो तो योगायोग. किती नामांकित, महनीय नरपुंगव या निमित्ताने भाजपच्या सागरात विसर्जित होत आहेत, हे पाहिल्यावर कोणाही लोकशाहीप्रेमीचा ऊर आनंद आणि अभिमानाने उचंबळून येईल यात तिळमात्र शंका नाही. परत त्यात भाजप इतका मोठय़ा मनाचा आणि धर्मनिरपेक्ष, की अशा राजांच्या विसर्जनासाठी तो बारा महिने चौदा काळ अनंत चतुर्दशीच पाळतो. ते कसे हे समजून घेण्याआधी, आज  कोणकोणते राजे भाजपत विसर्जित होणार ते पाहायला हवे. जसे की, सांताक्रुझचा राजा कृपाशंकर, नवी मुंबईचा गणेश नाईक, इंदापूरचा बालनृत्यराजा हर्षवर्धन पाटील असे काही नामांकित आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर भाजपत विसर्जित होणार. पण उदारमतवादी भाजपने याही आधी अन्य नामांकित- जसे की, नगरचे राजे राधाकृष्ण विख्यात पाटील, समाजवादी लक्षभोजनकार अकलूजचे राजे मोहिते पाटील, तळकोकणाचा राजा नारायण राणे, आदिवासी-नरेश मधुकर पिचड, उपभोगशून्य स्वामी म्हणून गौरविले गेलेल्या छत्रपतींचे उपभोगी उत्तराधिकारी.. किती नावे सांगावीत.. या साऱ्या राजांना उदार अंत:करणाने आपल्या पोटात सामावून घेतले आहे.

यातूनच हिंदू धर्माचे मोठेपण सिद्ध होत नाही काय? इतकी क्षमाशीलता अन्य कोठे आढळेल बरे? भाजपच्या ठायी ती इतकी की, अलीकडे सामावून घेतलेल्या अनेकांवर आपणच किती आणि काय काय गंभीर आरोप केले होते, याकडे या पक्षाने दुर्लक्ष केले. सोपे असते की काय असे करणे? भले असतील त्यातील काही कथित भ्रष्टाचारी, गुंडपुंडगुन्हेगार, खंडणीखोर वा दंगलखोर. हा त्यांचा का दोष? परिस्थितीने त्यांना अशी कथित कुकर्मे करावयास लावली असतील, तर त्याचा दोष या नरपुंगवांना का द्यावा, असाच विचार भाजपने केला असेल तर ती आपल्या उदात्त संस्कृतीचीच फलश्रुती नव्हे काय? ज्या एकवचनी प्रभुरामचंद्राचा आदर्श भाजप ठेवतो, त्या रघुवराने तर वाटेत पडलेल्या शिळेचा उद्धार केला. तेव्हा त्यांच्या अनुयायांनी विकासाच्या वाटेतील दगडधोंडय़ांना मुक्ती दिली, तर ते रिवाजानुसारच झाले असे म्हणता येईल. शेवटी धर्मकार्य म्हणजे हेच नव्हे काय? प्रगतीच्या संधीवाचून तळमळणाऱ्या कृपाशंकर, विखे वा मोहिते पाटील, नाईक वा अहिर वा कोणी वाघ.. अशा पुण्यात्म्यांना प्रगतीच्या हमरस्त्यावर पुन्हा आणणे म्हणजेच धर्म. आणि भाजप नेमका तेच तर करीत आहे. आता इतका प्रगत्योत्सुक भाजप समोर असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याचे पाप करणाऱ्या छगनराव भुजबळांना तुरुंगात खितपत पडावे लागले यात गैर ते काय? हाच खरा नेता.. जे की नारायणराव राणे.. आणि अन्यांतील फरक.

खरे तर इतक्या उदार अंत:करणाचा राजकीय पक्ष कलियुगात कुठला सापडायला. आपले भाग्य थोर, की इतका क्षमाशील असा एखादा राजकीय पक्ष आपल्या आसपास आहे. अन्यथा हा गाळ कोण सामावून घेता? हेदेखील पुन्हा आपल्या संस्कृतीचेच मोठेपण. त्रिनेत्री ज्वाळा आणि विषे कंठ काळा घेऊन हिमशिखरी वास करणाऱ्या भगवान शंकराने जसे विष प्राशून आपल्यासारख्यास अमृत पुरवले तद्वत सत्ताधारी भाजप या मंडळींना सामावून घेऊन आपल्यासाठी विकास प्रसवणार आहे. असा विकासाभिमुख व्यापक दृष्टिकोन आणि असे क्षमाशीलतेचे संस्कार अंगी पुरेपूर मुरलेले असल्यामुळेच भाजप इतक्या साऱ्या मुखंडांना पावन करून घेऊ  शकतो, हे आपणास कळायला हवे. यात हेतू आहे तो पावन करून घेण्याचा.

आता पावन कोणास करून घेता येईल? तर जे तसे नाहीत त्यांनाच. पुण्यवानालाच पुन्हा पावन कसे करणार? आणि म्हणून असे पावन नसलेल्यांचा शोध घेणे महत्त्वाचे ठरते. अशी मंडळी एकगठ्ठा आढळतील अशी काही मोजकी स्थानेच तर आता शिल्लक आहेत. उदाहरणार्थ काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेस. हिंदुधर्मविचार आणि त्यात पुन्हा शिवशाही मूल्ये अशा दुहेरी शुद्धीकरण प्रक्रियेत शिवसेना असल्यामुळे त्या पक्षातील नेत्यांस असे पावन करून घेण्याची सोय भाजपस नाही. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांतूनच असे नेते निवडण्याची गरज भाजपस का आहे, ते आपण समजून घ्यायला हवे.

अशा तऱ्हेने भाजप आपल्यासाठी आणि त्यामुळे पर्यायाने देशासाठी शुद्धीकरण मोहीम राबवू पाहात असेल, तर आपण त्याचे स्वागत करायला हवे. आता इतकी व्यापक पापनाशक मोहीम राबवावयाची तर भूतकाळाकडे दुर्लक्ष करावे लागते. भाजप नेमका तेच तर करतो आहे. असे हे अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर होणाऱ्या या विसर्जनाचे महत्त्व. आता काही नतद्रष्ट वा निराशावादी यावर विसर्जनानंतरच्या दुसऱ्या दिवशी शहाण्याने सागरकिनारी जायचे नसते याची आठवण करून देतील. का? तर, ठिकठिकाणच्या २०-२५ फुटी राजांचे भग्नावशेष लाटांच्या तडाख्यात किनाऱ्यावर येतात म्हणून. पण हे उदाहरण येथे गैरलागू ठरते. कारण तसा धोका फक्त मूर्तीचा आकार भव्य असेल तरच संभवतो. येथे तो नाही. कारण भले ते प्रदेशसिंह असतील; पण त्यांच्या मूर्ती तशा खुज्याच आहेत. त्यामुळे त्या पटकन दिसेनाशा होतील.

..आणि मग सगळीकडे विकासच विकास आणि आनंदच आनंद पसरेल. या विकासाला विरोध करण्यास कोणी समोर शिल्लकच राहणार नसल्याने, तो (म्हणजे विकास) न होण्याची काही शक्यताच नाही. परत इतके श्रीमंत, धनाढय़ राजे/महाराजे भाजपवासी झाल्यामुळे त्या पक्षाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सचा टप्पा सहजच गाठेल. आणि सत्ताधारी आणि देश वेगळा का असतो? भाजप श्रीमंत झाला म्हणजे देशाचीच श्रीमंती वाढली. मग त्यातील काही कण प्रजेच्या ओंजळीतही पडतीलच. म्हणजे आपणही समाधानी. अशा तऱ्हेने हा देश पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करेल. तेव्हा आता तरी या मूढजनांस भाजपच्या महाभरतीचे माहात्म्य कळेल, ही आशा.