एखाद्या प्रकारचे प्रश्न कुणी विचारत नाही, म्हणून ते नसतातच असे नव्हे. ते न विचारले जाण्याची कारणे मात्र अनेक असतात!

दखल घेण्यासाठी कुणीतरी काहीतरी केले, म्हणून त्याची दखल घेतली जाईलच असे नाही. प्रत्येकाला आपापले व्याप आणि आपापले प्राधान्यक्रम असतात. त्यातून दखल कुणाची घ्यायची, हे ठरत जाते. काही वेळा मात्र कोणत्याही प्राधान्यक्रमात नसलेल्या गोष्टींचीही दखल घेतली जाते. मुंबईच्या राफाएल सॅम्युअल या २७ वर्षे वयाच्या तरुणाची काही वृत्तपत्रांनी आणि अनेक वाचकांनी घेतलेली दखल, हे अशा प्रकारचे ताजे उदाहरण. राफाएलने स्वत:च्या आईवडिलांवर खटला गुदरण्याचा विचार जाहीर केला. खटला कशासाठी? तर ‘या दोघांनी माझ्या संमतीशिवाय मला जन्म दिला’ म्हणून! हे काही जणांना मजेशीर आणि विनोदी वाटेल, काहींना मूर्खपणाचे किंवा बालिश वाटेल, तर आणखी काहींना हल्लीची मुले ‘मग जन्म कशाला दिलात’ असे सुनावण्याचा उद्धटपणा करतात, याची आठवणही येऊ शकेल. एक मनोरंजक बातमी, एवढेच सॅम्युअलच्या बातमीचे मूल्य या वाचकांसाठी राहील. ते साहजिकही आहे. पण याच बातमीचा जरा गांभीर्याने विचार केल्यास जन्मदात्यांना बोल लावणारा किती हा स्वार्थी मुलगा, असेच अनेकांना वाटेल. किंवा काही थोडय़ांना, राफाएल सॅम्युअलला सत्ताविसाव्या वर्षीच अस्तित्वाविषयीचे प्रश्न पडतात, म्हणून कौतुकही वाटेल. या परस्पर कौतुकाला जसा अर्थ नाही तसाच कुणा राफाएलची ती बातमी होती म्हणून केवळ त्याला स्वार्थी ठरवण्यात अर्थ नाही. याला कारणे दोन. एक तर, ‘आत्मनास्तुकामाय र्सव प्रियं भवति’ असे जे बृहदारण्यकोपनिषदात याज्ञवल्क्य ऋषींनी त्यांच्या विद्वान् पत्नीला – मैत्रेयीला –  सांगितले, ते आपणा सर्वाबाबत थोडय़ा फार फरकाने खरे ठरत असते. दुसरे कारण म्हणजे, आपल्या अस्तित्वाबद्दलचे प्रश्न सर्वानाच कधी ना कधी पडू शकतात. हे प्रश्न प्रत्येकाला सारख्याच तीव्रतेने पडतील, असे नाही. किंवा मुळात हे प्रश्न पडतीलच, असेही नाही. का नाही? याची उत्तरेही आधुनिक तत्त्वज्ञानात सापडतात. त्या उत्तरांपुरती आधुनिक तत्त्वज्ञानाची चर्चा येथे करू. प्रथम ‘आधुनिक’ तत्त्वज्ञान म्हणजे काय, याबद्दल.

आधुनिक म्हणजे सुधारित किंवा सर्वात जास्त उपयुक्त, असा अर्थ तत्त्वज्ञानात तरी अभिप्रेत नाही. सतराव्या शतकापासून युरोपात सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीतून, ‘निसर्गावर मात’ करण्याच्या प्रेरणेचा प्रस्फोट दिसू लागला. मानवी जीवन माणसानेच सुधारायचे आहे, ईश्वरी शक्तीने नव्हे, असा विश्वास मूळ धरू लागला. या नव्या विचारव्यूहांची तपासणी करणारे, ते आधुनिक तत्त्वज्ञान. ते पाश्चात्त्य आहे म्हणून आपले नाही, असे म्हणण्यात अर्थ नाही. कारण भारतीय तत्त्वज्ञान जसे मूलत: आध्यात्मिक आहे, तसेच आधुनिकतापूर्व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानही ईश्वरकेंद्रितच होते. परंतु आधुनिक तत्त्वज्ञानाने कोणत्याही एका धर्माच्या वा ‘मुक्ती’सारख्या परमध्येयाच्या वर्चस्वाला नाकारले. या आधुनिक तत्त्वज्ञानालाही पहिल्या महायुद्धानंतर निराळे धुमारे फुटले. अस्तित्ववाद हा शब्द १९४५च्या आसपास- म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर- रूढ झाला आणि अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाने नेमाडे, चित्रे, विलास सारंग आदी लेखकांच्या एका पिढीलाही भारून टाकले. पण या अस्तित्ववादाची पूर्वरूपे पहिल्या महायुद्धानंतर दिसू लागली होती. त्यापैकी एक म्हणजे अँटी-नॅटलिझम किंवा ‘जन्मविरोधवाद’. नॅटल/ नेटल म्हणजे जन्म-विषयक. ख्रिस्तजन्म या अर्थाने ‘नाताळ’चे जे इंग्रजी स्पेलिंग आहे, तेच या ‘नॅटल’चेही. थोडक्यात, जन्म-प्रक्रियेला आणि तिच्या कारक घटकांना तात्त्विक विरोध करणारा विचारप्रवाह, तो ‘अँटी-नॅटलिझम’. आपण या जगात येतो ते ‘आपल्या इच्छे’ने नव्हे. ज्याला ‘नैसर्गिक मरण’ म्हणतात तेही ‘आपल्या इच्छे’ने नसतेच. आणि समजा जर आपण जगात आलोच नसतो तर मरणाबिरणाची भानगडच उद्भवली नसती, असे या जन्मविरोधवादाचे म्हणणे.

ते इथेच संपत नाही. जन्माविषयीचे हे प्रश्न आपल्याला पडत कसे नाहीत, आपण सुखाने किंवा सुखासाठी कसे काय जगत राहतो, हा जीवनविषयक प्रश्नही खंदा जन्मविरोधवादी तत्त्वज्ञ पीटर वेस्सेल झाप्फे याने १९३३ मध्ये ‘द लास्ट मसीहा’ या निबंधात हाताळले. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात खळबळ माजवणारा हा निबंध प्रकाशित झाला, तेव्हा पीटर होता अवघा ३४ वर्षांचा. पण त्याने अनेक क्षेत्रांतील तात्त्विक मुद्दय़ांची सांगड घालून, ‘आपल्याला सहसा अस्तित्वविषयक प्रश्नच पडत नाहीत, ते कसे?’ याचे उत्तर शोधले. त्याने मांडलेली मते निराळ्या शब्दांत सांगायची तर, हे प्रश्न खरोखरच पडलेला माणूस हा केवळ ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे’ एवढेच न म्हणता, ‘विश्वाचे आर्त, माझ्या मनी प्रकाशले’ अशा अवस्थेला जाईल आणि जगण्याच्या पार जाणे हीच त्याच्यासाठी पुढली पायरी उरेल. या निबंधाच्या सुरुवातीला पीटर सुचवतो की, धनुष्यबाणासारखी हत्यारे वापरून शिकार करणाऱ्या माणसाची जर अशी अवस्था झाली असती तर मानवजात कदाचित नष्टप्रायच झाली असती. पुढे याच निबंधात, ती तशी का नष्ट झाली नाही याची कारणे मनुष्यस्वभावातून शोधलेली आहेत. अस्तित्वविषयक गहन प्रश्नांना सामोरे जाण्याऐवजी मानव नेहमी त्यांच्यापासून दूर राहतो, तर्काला आणि विचाराला कुंपणे घालतो, असे मनुष्यावर अजिबात दोषारोप न करता पीटर सांगतो. अशा विचारांपासून दूर राहण्यासाठी  ‘आपण बरे आपले छोटेसे जग बरे’ असे थेट विचारकुंपण उपयोगी पडतेच, पण हे आपले जग जर छोटेसे राहणार नसेल, तर मग त्या-त्या वेळचे लिप्ताळे- त्या-त्या कालखंडातले संबंधित सारे- असे कुंपण सर्व वयांच्या, सर्व आर्थिक स्थितींतल्या मानवांकडून वापरले जाते. तरीदेखील प्रश्न पडूच नये, म्हणून मग आणखी एक प्रकारचे कुंपण शोधून काढणे मनुष्यांना साधते. हे कुंपण असते ध्येयपरायणतेचे. मग ध्येय व्यवसायातले असो की आध्यात्मिक. ध्येय साध्य करण्यापेक्षा ध्येयासाठीची प्रक्रिया किंवा परायणता यालाच महत्त्व दिले जाते आणि ते योग्यही ठरते. मात्र याहीपुढे अस्तित्वविषयक दुखरे प्रश्न पडण्याची शक्यता असलीच, तर ती बुजवण्यासाठी निराळ्या प्रकारची रममाण अवस्था लागते. हे कुंपण नसते- उलट इथे, ‘हे विश्वाचे आंगण, आम्हां दिले आहे आंदण’ असा कलावंताला शोभणारा आत्मविश्वास असतो. काव्य, नाटय़, संगीत, शास्त्र, दृश्यकला यांत प्रयोग करण्यासाठी हा आत्मविश्वास उपयोगी पडतो. वरवर पाहता हे सारे साधेच आणि परिचयाचे वाटेल. पण पीटरने हे वर्गीकरण केले आणि पुढे- या वर्गीकरणाच्या चक्रात असल्यामुळेच अस्तित्वाच्या प्रश्नांनी माणसे कासावीस होत नाहीत, असेही स्पष्ट केले. समजा कुणी कासावीस झालेच, तर त्याच्या सोडवणुकीसाठी कुणी प्रेषित, कुणी ‘मसीहा’ येणार नाही.. आणि समजा ‘मसीहा’ आलाच, तर ‘जन्मचक्र थांबवा. पृथ्वी हा जर अनंत विश्वाचा भाग असेल, तर बाकीच्या विश्वाप्रमाणेच तिला राहू द्या, तिच्यात तुम्ही लुडबुड करू नका आणि मुले जन्माला घालून लुडबुड वाढवू नका’ असा संदेश देऊन हा अखेरचा मसीहा लुप्त होईल, असे पीटरचे म्हणणे.

या निबंधाची चर्चा आजवर अनेक विद्वानांनी केली. अस्तित्वाच्याच नव्हे, तर साऱ्याच तात्त्विक प्रश्नांपासून सामान्यजन दूर का राहतात, हे या निबंधातून उमगते. मात्र म्हणून प्रश्न विचारणाऱ्याला वेडा, मूर्ख, बालिश ठरविण्यात अर्थ नाही. जन्माच्या गाठी ‘निसर्गदत्त’ मानून स्वीकाराव्यात की नाही, हा तत्त्वज्ञानातील प्रश्न आहे. तो कुणा एका राफाएल सॅम्युएलच्या प्रस्तावित खटल्यातून सुटणारा नाही.