ब्रिटन आणि युरोपात आज हुरहुर आहे ती ब्रिटिश पंतप्रधानपदासाठी निवड झालेले बोरिस जॉन्सन हे ‘ब्रेग्झिट’चे नक्की काय करतील, याबाबत..

वाह्य़ातपणा आणि वावदूकपणा हे जर गुण असतील, तर अलेक्झांडर बोरिस द फेफेल जॉन्सन ऊर्फ बोरिस जॉन्सन यांची गणना काही मोजक्या गुणवंतांत सहज होऊ शकेल. बेजबाबदार व्यक्ती जे काही करू शकते ते सारे आचरट उद्योग बोरिस यांच्या नावावर आहेत. आणि ते केवळ त्यांनी तरुणपणीच केलेले आहेत असे नाही. मोठेपणीदेखील चतकोर विजारीत धावणे, फाटके कपडे घालून वावरणे, लंडनचे महापौर असताना स्वत: दलदलीत शिरणे, उंच दोरीवरून लोंबकळणे, कमालीचा बाहेरख्यालीपणा असे सर्व काही उद्योग या इसमाच्या नावावर आहेत. पहिल्या पत्नीपासून चार आणि अंगवस्त्रापासून अन्य काही अपत्यांचा जन्मदाता असा हा गृहस्थ पुढील आठवडय़ात ‘१०, डाउिनग स्ट्रीट’ या पत्त्यावर गृहप्रवेश करेल, तेव्हा त्यांच्यासमवेत अधिकृत अर्धागी नसेल. एक नवीनच सहचारिणी त्यांना साथ देईल. या निमित्ताने पहिल्यांदाच ब्रिटिश जनतेस विधुर पंतप्रधान लाभेल. या साऱ्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष करून व्यावसायिक कारकीर्द पाहू गेल्यास तेथेही असेच उद्योग त्यांच्या नावावर आढळतात. हा गृहस्थ मूळचा पत्रकार. आताही स्तंभलेखनातून ते भरभक्कम कमाई करतात. पण म्हणून पत्रकारिता धर्मास जागला म्हणावे, तर तेही नाही. काही महत्त्वाचे वृत्तलेखन कल्पनेच्या आधारे केल्याबद्दल त्यांनी आपली वर्तमानपत्रीय चाकरी गमावली. पुढे सत्ताधारी हुजूर पक्षाचा प्रवक्ता असतानाही असत्य कथनासाठी त्यांना शासन झालेले आहे. कोणा एका प्रश्नावर त्यांच्या भूमिकेत सातत्य नसणे ही नित्याचीच बाब. तेव्हा अशी व्यक्ती ज्या वेळी मावळत्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी परराष्ट्रमंत्रिपदी नेमली, त्या वेळी एका युरोपीय नेत्याची प्रतिक्रिया होती : ‘याचा अर्थ आता ड्रॅक्युलादेखील आरोग्यमंत्री होऊ शकतो’! तसे होईल तेव्हा होवो. तूर्त हे बोरिस ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवडले गेले आहेत. आता पुढे काय वाढून ठेवले आहे, याचा अंदाज यावा यासाठी नमनालाच इतके घडाभर तेल घालवल्यानंतर या संदर्भातील राजकारणाचा विचार करायला हवा.

बोरिस यांना त्यांच्या पक्षाने पंतप्रधानपदासाठी निवडले ते युरोपीय समुदायास त्यांचा कडवा विरोध आहे म्हणून. पण ही जॉन्सन यांची मूळ भूमिका नाही. म्हणजे सध्या जरी ते युरोपीय समुदायविरोधी असले, तरी मूलत: ते त्या विचाराचे नाहीत. ही कडवी भूमिका त्यांनी घेतली ती थेरेसा मे यांना नेतृत्वाच्या शर्यतीत अपशकुन करता यावा यासाठी. पण तरीही हुजूर पक्षाच्या नेतृत्वशर्यतीत मेबाईंनी बोरिसना धूळ चारली. त्यानंतर त्यांना शांत करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून लंडनच्या या माजी महापौरास त्यांनी मंत्रिमंडळात घेतले. पण गेल्या वर्षी त्यांनी मे यांच्या मवाळ ब्रेग्झिट भूमिकेचा निषेध म्हणून मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. परंतु मे यांच्या भूमिकेवर जेव्हा पार्लमेंटमध्ये मतदानाची वेळ आली, तेव्हा त्यांनी मे यांच्या ठरावाच्या बाजूने मतदान केले. कडवे ब्रेग्झिट समर्थक या नात्याने बोरिसबाबा स्थलांतरितांविरोधात आता मोठी जोरदार भाषणबाजी करतात हे खरे. पण अगदी अलीकडेपर्यंत ते स्थलांतरितांच्या कल्याणार्थ काय काय करता येईल यासाठी पुढाकार घेत होते. हा झाला इतिहास. बोरिस यांना त्याच्याशी काही देणेघेणे नाही आणि ब्रिटनलाही त्याचे काही सोयरसुतक नाही. दोघांच्याही चिंतेचा विषय आहे तो वर्तमान.

आणि ते घडवण्यासाठी या नव्या पंतप्रधानास अवधी आहे तो अवघ्या १०० दिवसांचा. तीन महिन्यांनी- ३१ ऑक्टोबरला ब्रिटनने युरोपीय समुदायातून बाहेर पडण्यासाठी घालून दिलेली मुदत संपेल. ती आता अधिक वाढवून दिली जाणार नाही, असे युरोपीय समुदायाने वारंवार स्पष्ट केले आहे. ब्रिटनकडून या मुद्दय़ावर जो काही घोळ घातला जात आहे, त्यावर जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्केल यांनी अलीकडेच नाराजी व्यक्त केली आणि या संदर्भातच एका राजकारण्याने या प्रक्रियेची बरोबरी प्रसूतीशी केली. ‘आम्ही कोणीही इंग्लंडसाठी या प्रसूतीत दाईची भूमिका बजावायला तयार नाही,’ असे तो म्हणाला. तरीही बोरिसबाबा मात्र या प्रश्नावर अत्यंत आत्मविश्वास व्यक्त करतात. गेले महिनाभर केलेल्या देशयात्रेत त्यांनी आपण ब्रेग्झिटला किती बांधील आहोत, हे आपल्या देशबांधवांना वारंवार समजावून सांगितले. इतकेच नाही, तर आपल्या ब्रेग्झिट करारावर युरोपीय समुदायाशी मतक्य होऊ शकले नाही तरी आपण ब्रिटनला ३१ ऑक्टोबरला त्यापासून विलग केलेले असेल, अशी प्रतिज्ञाही त्यांनी केली.

ब्रिटनला घाम फुटू लागला आहे तो याच मुद्दय़ावर. कारण युरोपीय समुदाय आणि ब्रिटन यांच्यात आतापर्यंत अर्धा डझन वेळा करारांची देवाणघेवाण झाली. पण उभयपक्षी मान्य असा काही तोडगा त्यावर अद्याप निघालेला नाही. कधी युरोपीय समुदायाच्या अटी ब्रिटनला जाचक वाटतात, तर कधी ब्रिटनच्या मागण्या युरोपीय समुदायासाठी अव्यवहार्य ठरतात. शिवाय नुकसानभरपाईपोटी ब्रिटन युरोपीय समुदायास देणे असलेल्या शेकडो कोटी पौंडांचाही मुद्दा प्रलंबित आहे. या सगळ्यावर बोरिस अतिरेकी भूमिका घेतात. त्यामुळे ते चांगलेच लोकप्रिय आहेत. जगात अलीकडे अशा अतिरेकी नेत्यांना चांगले दिवस आले आहेत. नेमस्तांपेक्षा हे असली टोकाची भूमिका घेणारेच आपले प्रश्न सोडवू शकतात, असे मानणाऱ्या दूधखुळ्यांची संख्या ब्रिटनमध्ये वाढल्याने बोरिस यांना मोठा पािठबा आहे. खुद्द त्यांच्या हुजूर पक्षातही त्यांना आव्हान नाही. त्या देशातील विवेकींना काळजी आहे ती याच मुद्दय़ाची. कोणत्याही कराराशिवाय वा सहमतीशिवाय या बोरिसने आपल्या देशास युरोपीय समुदायातून ओढून बाहेर काढले.. म्हणजे ‘हार्ड ब्रेग्झिट’ झाले.. तर ते आपल्याला कितीला पडेल याचे अंदाज बांधण्यास त्यामुळे तेथे आताच सुरुवात झाली आहे. असे खरोखरच झाले, तर त्याची मोठी आर्थिक किंमत ब्रिटनला मोजावी लागेल, हे उघड आहे. आधीच अलीकडच्या काळात त्या देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली नसली, तरी संकटात मात्र निश्चितच आहे. अशा वेळी सावधपणा दाखवण्याची गरज असताना अत्यंत हडेलहप्पी वागण्याचा लौकिक असलेले बोरिस या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होत आहेत.

ब्रिटनचे, ‘स्वत:चे असे ट्रम्प’ ही त्यांची ओळख त्यांच्याविषयी बरेच काही सांगून जाते. इतकेच नाही, तर ट्रम्प आणि बोरिस हे एकमेकांचे चांगले मित्रदेखील आहेत. कोणाही विचारी व्यक्तीची झोप उडवण्यासाठी ही बाब पुरेशी ठरू शकेल. त्यामुळे ब्रिटन आणि युरोपात आज हुरहुर आहे ती हा गृहस्थ नक्की काय करेल, याबाबत. राजकीय मतभेद त्या देशास कोणत्याही लोकशाही देशाप्रमाणे नवे नाहीत. पण राजकारणाच्या पलीकडे जात एक सर्वपक्षीय काळजी ब्रिटनमध्ये दाटून आहे. त्याचे कारण अर्थातच बोरिस यांचे बेभरवशाचे राजकारण. ‘बोरिस राजकारणात आतापर्यंत यशस्वी ठरले ते काही त्यांच्या भरीव कार्यक्षमतेमुळे नव्हे. तर केवळ निवडून येण्याच्या क्षमतेमुळे,’ असे त्यांचे वर्णन फायनान्शियल टाइम्सने केले आहेच.

या क्षमतेपल्याड आपल्याकडे काही आहे, हे त्यांना आता सिद्ध करून दाखवावे लागेल. पत्रकारिता ते राजकारण हा त्यांचा प्रवास निश्चितच दिलखेचक खरा. पण त्यात त्यांच्या नावावर भरीव असे काही नाही. अलीकडे अनेक क्षेत्रांत चौपाटीच्या भेळेप्रमाणे चटपटीतपणास यश म्हणायची प्रथा पडून गेली आहे. तिचा हा ब्रिटिश अवतार. काही दमदार, अर्थपूर्ण मुद्दय़ापेक्षा चमकदारपणावर सभा मारून नेणाऱ्यांची संभावना आचार्य अत्रे यांनी ‘बालिश बहु बायकांत बडबडला’ अशा मोरोपंती शब्दांत केली आहे. नव्या ब्रिटिश पंतप्रधानाचा आजवरचा लौकिक पाहता ‘बोरिस बहु..’ असे म्हटल्यास ते गैर ठरणार नाही.