अनेक जुनी प्रतीके, चिन्हे आज आपल्या राजकीय जीवनात पुन्हा वापरली जातात..

काळ गोल फिरत असतो की बिचारा नाकासमोर थेट जात असतो? काही तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिकांचे म्हणणे असे की तो कुठेही जात-येत नसतो. तो स्थिरच असतो. सारे वस्तुमात्र बदलत असते आणि काळ त्याला हातभार लावत असतो. ते काहीही असो. आपणा भारतीयांसाठी तो सतत हलता असतो. एवढेच नव्हे, तर सतत मागे-पुढे जात असतो. म्हणजे पाहा : आपण वर्तमानात असूनही सतत २०२५ कडे पाहात असतो की तेव्हा आपल्या देशी ‘बुडाली सर्वही पापे, हिंदुस्थान बळावले’ आणि ‘अ-भक्तांचा क्षयो झाला’ असे काहीसे होईल. भविष्याची गोड स्वप्ने पाहणे केव्हाही चांगलेच. पण भविष्यातून आपण पुन्हा वर्तमानमार्गे सतत भूतकाळात उत्खनन करीत फिरत असतो. या भूतकाळाच्या भुताने आपल्या मनाला एवढे झपाटलेले असते की आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट आणि तितकीच खरी भासणाऱ्या – ऑगमेन्टेड रिअ‍ॅलिटीच्या – काळात, आजच्या हैड्रोजनयुद्धाच्या आणि संगणकयुद्धाच्या काळात आपल्या डोळ्यांसमोर असतात त्या प्रतिमा आणि चिन्हे चार-पाच हजार वर्षांपूर्वीचीच. हे आठवण्याचे कारण म्हणजे नुकतीच अयोध्येहून मार्गस्थ झालेली रामराज्य रथयात्रा.

अयोध्या हे रामायणातले क्षेत्र. तेथून ही टाटा मिन्रिटकवरील रथाची यात्रा गेल्या मंगळवारी निघाली. ती ४१ दिवस चालेल. म्हणजे खरोखरच चालेल. यात्रेत रथाचा ट्रक किंवा ट्रकचा रथ असला, तरी बाकीची मंडळी पायीच चालणार आहेत. अंतिम स्थान आहे रामेश्वरम्. आता ही यात्रा उत्तर प्रदेशातून निघून मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू अशी जाणार असल्याने तिच्यावर भाजपच्या दक्षिण दिग्विजयाचा हेत्वारोप करण्यात येत आहे. यात्रेचे जे संयोजक आहेत, त्यांचे म्हणणे वेगळेच आहे. हा एक विशुद्ध धार्मिक उपक्रम आहे, हे सारे देशात रामराज्य आणण्यासाठी सुरू आहे, असा त्यांचा दावा आहे. आपण तूर्तास या दावे-प्रतिदाव्यांच्या खेळात पडण्याचे कारण नाही. ते काम च्यॅनेलीचर्चिलांवर सोडून देऊन आपण आपल्या मुख्य मुद्दय़ाकडे वळू या. मुद्दा असा की, आजही आपण भूतकालीन प्रतिमांच्या पाठीवर बसूनच वर्तमानकालीन गरजांचा गाडा हाकीत असतो.

येथे रथयात्रेचा भूतकाल म्हटले तर अनेकांच्या नजरेसमोर २८ वर्षांपूर्वीची ती लालकृष्ण अडवाणी यांची दिव्य रथयात्रा येईल. काहींना त्याही आधीची गंगाजलाने देश सांधू इच्छिणारी रथयात्रा स्मरेल. परंतु हा तर अलीकडचा भूतकाळ झाला. अडवाणींच्या राजकीय स्थानाप्रमाणेच हल्ली त्याच्याही स्मृती फिकट झाल्या आहेत हा भाग वेगळा. परंतु खरे तर या रथयात्रांचे नाते अर्वाचीन, प्राचीन वगैरे भूतकाळाच्याही मागे असलेल्या काळाशी आहे. आज बंदूकगोळीच्या वेगाने धावणाऱ्या अग्निरथाची(!), अर्थात बुलेट ट्रेनची स्वप्ने पाहात असलेले आपण ज्या रथाच्या प्रतिमा आणि प्रतिमेत गुंतलेलो आहोत, तो रथ आपल्याकडे ऋग्वेद काळाच्याही आधीपासून आहे. ऋग्वेदातील अनेक देवतांकडे रथ आहेत. त्यात एक पूषन् नामक पशुपालक देवताही आहे. आता ही अवघ्या सात सूक्तांमध्ये बोळवण झालेली देवता. पण तिच्याकडेही रथ आहे. फक्त त्याला अश्वांऐवजी मेंढे जोडलेले आहेत. आता ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ हाच स्वभावधर्म असलेले, बिनडोकपणे केव्हाही टकरीस तयार होणारे मेंढे रथाच्या कामाला जुंपणे यात कुणाला खूपच प्रतीकात्मकता दिसेल. परंतु तेव्हाही असे रथ होते आणि त्याही आधीच्या, सिंधू संस्कृतीच्या काळातही युद्धामध्ये रथ वापरले जात असत. अहमदनगर जिल्ह्य़ातल्या दायमाबाद येथे इसवी सनपूर्व बावीसशे ते दोन हजार या काळातला एक रथ सापडला होता. तो लहान मुलांच्या खेळातला होता आणि त्याला बैल जोडलेले होते. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, की रथाचे घोडय़ांप्रमाणेच मेंढय़ांशी, बैलांशी आणि गाढवांशीही नाते आहे. ऋग्वेदकालीन संस्कृतात अश्व या शब्दाचा एक अर्थ गाढव असाही आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो, की सुमारे चार हजार वर्षांचा भूतकाळ असलेल्या, म्हणजेच तितकी वर्षे जुन्या असलेल्या रथाची चाके धरून आजही आपण का बसलो आहोत? आणि हे केवळ रथाबाबतच नाही. अशी अनेक जुनी प्रतीके, चिन्हे आज आपल्या राजकीय जीवनात पुन्हा वापरली जातात. उदाहरणार्थ तलवारी, धनुष्य-बाण, जुनी शिरोभूषणे आदी.

वाफेच्या इंजिनाने वाहनांचे सगळेच रूपडे बदलले. तरीही आपले नेते अजूनही ‘अतिरथी’, ‘महारथी’ असतात आणि गल्लीतला दिग्गज नगरसेवकही रथ घेऊन प्रचारात उतरतो. विद्युतशक्तीवर, लोखंडी रुळांवरून धावणाऱ्या वातानुकूलित रेल्वेगाडीला गरीब‘रथ’ असे नाव ठेवले जाते. हे जसे कालविसंगत, तसेच सभासंमेलनांत नेतेमंडळींना तलवारी देणे हे हास्यास्पद. पण ते केले जाते. ते नेतेही मग त्या तलवारी उपसून वगैरे छायाचित्रे काढून घेत असतात. पुढे या तलवारी साधी कोथिंबीर चिरण्याच्या कामीही येत नसतात, हा पुन्हा वेगळाच भाग. मुळात संसदीय लोकशाही राजकारणात अशा शस्त्रांना स्थान नसते आणि नसावे. हे या मंडळींना ठाऊक नसते असे नाही. पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. ही भूतकालातील चिन्हे वर्तमानात मिरवून काय साधले जाते हे सर्वसामान्यांच्या ध्यानात येत नसले, तरी राजकीय बुद्धिबळाच्या निष्णात खेळाडूंना ते व्यवस्थित माहीत असते. त्या पटावरून ते खेळत असतात तो मनभुलीचा खेळ. समोरील जनतेच्या मनाला आपणास हवे तसे वाकवण्याचे हत्यार म्हणून ही प्राचीनतम साधने वापरली जात असतात. ती उपयुक्त ठरतात कारण लोकसंस्कृतीने या साधनांना, या रथांना, तलवारींना, त्या शिरोभूषणांना काही संकेत चिकटविलेले असतात. विशिष्ट गुणांची प्रतीके म्हणून या वस्तू आता लोकमानसात मुरलेल्या असतात. आपल्या नेत्याच्या हातातील तलवार ही अभ्युत्थानमर्धस्य – धर्माच्या अभ्युत्थानासाठी – आहे. ती सुष्टांचे संरक्षण करणारी आणि दुष्टांचा शिरच्छेद करणारी आहे असे संदेश त्यातून प्रसृत करण्यात येत असतात. एखाद्या नेत्याच्या डोक्यावर समारंभात पगडी वा मुंडासे वा फेटा टाळ्यांच्या गजरात चढविला जातो. तो नेताही ते शिरोभूषण कार्यक्रम संपेपर्यंत आपल्या मस्तकी धारण करून बसतो. यातून काय साधायचे असते? वरवर पाहता हे सारे फार किरकोळ वाटेल. परंतु या पगडय़ा, ती मुंडाशी, ते पटके ही सारी त्या-त्या समाजाने जपलेली टॉटेम वा कुलचिन्हेच असतात. त्यातून ते मुंडासे घातलेली व्यक्ती ही आपल्या समाजाचा भाग आहे अशी धारणा निर्माण होत असते. हे सारे कोणी उघडपणे, विस्ताराने सांगण्याचीही आवश्यकता नसते. अनुयायांच्या अंतर्मनात आपोआपच तशा प्रतिमा निर्माण करण्याची क्षमता त्या प्रतीकांमध्ये परंपरेने आलेली असते. त्यांवर सफाईने डल्ला मारला की झाले. लोकांच्या भावनांशी खेळणे सोपेच होते त्याने.

हे सारे आपल्याच साक्षीने पद्धतशीरपणे चाललेले असते. आपणही – आपली इच्छा असो वा नसो – त्या खेळाचाच एक भाग असतो. हे समजून न घेतल्यामुळेच आज आपल्याला कळेनासे झाले आहे की लोकशाहीला ही अवकळा कुठून आली? आपले लोकप्रतिनिधी, आपले लोकसेवक हे पाहता पाहता अतिरथी, महारथी आणि दिग्गज वगैरे कसे काय झाले? ही नवराजेशाही कुठून अवतरली? पूर्वीच्या नाटकांच्या पुस्तकांत लिहिल्याप्रमाणे, आपले हे नवराजे नेहमीच ‘कंसात- तलवार उपसून’ आपल्यासमोर का येत असतात? ते समजून घ्यायचे असेल, तर पहिल्यांदा आपणांस वर्तमानात नीट उतरावे लागेल. अन्यथा या जुन्यापुराण्या तलवारींचा खणखणाट हेच आपले भागधेय असेल.