रॉबर्ट वढेरा यांच्यावर गैरव्यवहाराचे अनेक आरोप होत असले तरी ते मात्र मोकळे कसे हे गूढच आहे..
वढेरा यांच्या कंपनीने हरयाणात केलेल्या सर्व संशयास्पद उद्योगांचे तपशील बाहेर आले असूनही कोणत्याही यंत्रणेस सरकारने वड्रा यांची चौकशी करण्यास सांगितलेले नाही. खरे तर सत्यवादी किरीट सोमय्या यांनी भाजपच्या या निष्क्रियतेबद्दलही आवाज उठवावयास हवा. पण तेही मौन पाळणे पसंत करतात.
समस्त काँग्रेसजनांचे अवघड जागेचे दुखणे असलेले रॉबर्ट वढेरा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि यात त्यांची बाजू घ्यावी असे काहीही नाही. या रॉबर्टाने म्हणे लंडन येथे आलिशान घर केले असून तो सगळाच व्यवहार बेनामी असल्याचे बोलले जाते. वास्तविक यात धक्का बसावे असे काहीच नाही. आज देशात फारच थोडे- अगदी हाताच्या बोटावर मोजावेत असे आणि इतकेच- नेते असे असतील की ज्यांची लंडन वा दुबई वा अन्यत्र परदेशात स्थावर मालमत्ता नाही. किंबहुना लंडन वा दुबई येथील विमानतळ हे भारताचे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणता येतील, अशी अवस्था आहे. तेव्हा लंडनात घर असणे हे काही फारसे अप्रूप नाही. त्या कथित घराची बातमी आली आणि या वड्रा यांच्याकडे पुन्हा सगळ्यांचे लक्ष गेले. त्याआधी या बातमीसंदर्भात एक योगायोग लक्षात घ्यावा असा. या बातमीतील कागदपत्रे प्रसारमाध्यमे आणि भाजपचे फक्त भ्रष्टाचार आरोपदार खासदार किरीट सोमय्या यांना एकाच वेळी मिळाली. या सोमय्या यांचा भ्रष्टाचाराचे आरोप करण्यासाठी नवनवी गिऱ्हाईके शोधण्याचा वेग अण्णा हजारे यांच्यापेक्षाही भारी म्हणावा लागेल. या सोमय्या यांनी तोंड उघडले रे उघडले की आता कोणाचा भ्रष्टाचार चव्हाटय़ावर येणार असा प्रश्न पडतो. हे असे आरोप करीत लक्ष वेधून घेणे हा त्यांचा पूर्णवेळचा व्यवसाय असल्याने सोमय्या सतत नवनव्या गिऱ्हाईकांच्या शोधात असतात. याबाबतचा त्यांचा वेग काळजी वाढवणारा आहे. ती अशासाठी की एखादे दिवस सोमय्या यांना आरोप करण्यासाठी कोणी मिळाले नाही तर ते स्वत:वरच भ्रष्टाचाराचे आरोप करून चौकशीची मागणी करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. असो. सोमय्या यांचे किरीटे आरोप हा काही दखल घ्यावा असा मुद्दा अजिबातच नाही.
दखल घ्यावयाची ती भाजपची. याआधी तीन वर्षांपूर्वी रॉबर्ट वढेरा यांनी हरयाणात हडपलेल्या जमिनीचे प्रकरण बाहेर आले होते. एका बडय़ा बिल्डराने दयावान होऊन या वढेरा यांना भलीथोरली जमीन देऊ केली होती आणि त्या बदल्यात त्यास बरेच काही मिळाल्याची वदंता होती. हे रॉबर्ट वढेरा इतके कर्तृत्ववान की काहीही भांडवल, व्यवसाय नसताना घरबांधणी क्षेत्रातल्या बडय़ा कंपन्यांनी त्यांच्या कंपन्यांत गुंतवणूक केली. काही लाखांचे खेळते भांडवल असलेल्या वढेरा यांच्या कंपनीत इतके मोठमोठे बांधकामदार कोटी कोटींचे हिस्से घेऊ लागले. त्या वेळी अर्थातच केंद्रात आणि हरयाणात काँग्रेस सत्तेवर होती. या सत्तेची ताकद इतकी की ऊठसूट पत्रकारितेवर प्रवचने झोडत नैतिकतेचा आव आणणाऱ्या दक्षिणेतील एका बडय़ा वर्तमानपत्राने हाती असूनही ही बातमी छापण्याचे धैर्य दाखवले नाही. हा बहुधा त्या वर्तमानपत्राच्या निधर्मी धोरणाचा भाग असावा. असो. अखेर ही बातमी मिळवणाऱ्या वार्ताहराने निराश होऊन हे प्रकरण प्रशांत भूषण आदी वकिलांहाती सोपवले. मगच त्यास वाचा फुटली आणि हा गैरव्यवहार उघडकीस आला. परंतु हे प्रकरण बाहेर काढणाऱ्या अधिकाऱ्याचीच त्या वेळी बदली झाली. कारण हरयाणात त्या वेळी सरकार काँग्रेसचे होते. तेव्हा काँग्रेसच्या जामातास असे अडचणीत आणणाऱ्या अधिकाऱ्यास शिक्षा तर होणारच. ती झाली. परंतु पुढे काँग्रेसी मनसबदार भूपिंदरसिंग हुडा यांचे सरकार जाऊन भाजपस राज्यशकट हाताळण्याची संधी मिळाली. अशा वेळी नीतिमंत भाजप सरकारने खरे तर या काँग्रेसी बांडगुळाची पाळेमुळे खणून काढावयास हवी होती. वढेरा यास जमीन मिळालीच कशी, कोणामुळे, त्यासाठी कोणी दबाव आणला, या जमिनीच्या बदल्यात बिल्डराचे हित कशात साधले गेले वगैरे मौलिक प्रश्नांची उत्तरे मनोहरलाल खट्टर यांच्यासारख्या तडफदार नेत्याने देणे गरजचे होते. परंतु या सत्यवान खट्टराने काहीही केले नाही. थोर महात्मे बाबा रामदेव हे आपल्या राज्याचे दूत कसे बनू शकतील याच्याच विवंचनेत हे खट्टर होते आणि आहेत. तेव्हा वास्तविक अजूनही भाजपसाठी वेळ गेलेली नाही. या पक्षातील सत्यवानांनी खट्टर यांच्यामागे भुणभुण लावून रॉबर्ट वढेरा यांच्यावर कारवाई करण्यासाठी आग्रह धरावयास हवा. पण तसे होताना दिसत नाही. वढेरा आपले मोकळेच.
या त्यांच्या मोकळेपणामुळेच त्यांना उसंत मिळाली आणि हे लंडनमधील जागेचे प्रकरण उघडकीस आले. वास्तविक भाजपतील सत्यवानांनी रॉबर्ट वढेरा यांच्यावर कारवाई करून त्यांची गठडी वळली असती, तर पुढचा प्रकार टळला असता. तसेच भाजपतील राष्ट्रीय पातळीवरच्या काही सोमय्यांनाही आपण काही देशासाठी केल्याचे समाधान मिळाले असते. भाजपने ही संधी गमावली. किंबहुना ती आपल्या हातून जावीच असा भाजपचा विचार होता किंवा काय, असे मानण्यास जागा आहे. याचे कारण भाजपने हरयाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावून दिला आहे. न्या. एस एन धिंग्रा यांच्या आयोगातर्फे हे चौकशीचे काम सुरू असून तीत हुडा यांच्या काळातील सर्वच जमीन गैरव्यवहारांचा माग काढला जाणार आहे. परंतु यातील आश्चर्याची बाब म्हणजे या चौकशीत वढेरा यांना मात्र वगळण्यात आले आहे. इतकेच नाही तर वढेरा यांच्या कंपनीने केलेल्या सर्व संशयास्पद उद्योगांचे तपशील बाहेर आले असूनही कंपनी खाते वा सक्तवसुली संचालनालय किंवा गेलाबाजार सीबीआय तरी. अशा कोणत्याही यंत्रणेस सरकारने वढेरा यांची चौकशी करण्यास सांगितलेले नाही. खरे तर सत्यवादी किरीट सोमय्या यांनी भाजपच्या या निष्क्रियतेबद्दलही आवाज उठवावयास हवा. पण तेही मौन पाळणे पसंत करतात. वढेरा यांचे प्रकरण उघडकीस आले असता तत्कालीन अर्थमंत्री पी चिदम्बरम यांनी त्यांच्या चौकशीची मागणी फेटाळली होती. वढेरा यांनी केलेला व्यवहार खासगी आहे, त्याची सरकारी चौकशी करण्याची गरजच काय, असे चिदम्बरम यांचे मत होते. परंतु आता या चिदम्बरम यांच्या बोलवित्या धनी सोनिया गांधी यांच्याकडे सत्ता नाही. तरीही वढेरा यांना संरक्षण दिले जात असेल तर संशयाचा धूर आला तर ते साहजिकच म्हणावे लागेल.
आणि आता हे लंडनमधील घराचे प्रकरण. वढेरा याने हुडा यांच्या साथीने केलेल्या उद्योगांची नसेल चौकशी करावयाची सरकारला. पण निदान या नव्या प्रकरणाच्या रीतसर चौकशीचे आदेश न देण्यात काय हशील? याआधी ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणातही आम्ही अशीच भूमिका घेतली होती. भ्रष्टाचाराचा संशय जरी असेल तर लगेच त्याची चौकशी होऊन रीतसर कारवाई केली जावी. भले तो करणारी व्यक्ती मग कोणत्याही पदावर असो. परंतु त्या प्रकरणातही सरकारने आरोपांच्या पलीकडे काहीही केलेले नाही. अशा वेळी सरकार आणि हा काँग्रेस परिवार यांच्यात जे काही सुरू आहे, तो नुरा कुस्तीचा तर प्रकार नाही, अशा प्रकारचा संशय निर्माण होतो. यांनी आरोप करावयाचे आणि त्यांनी प्रत्युत्तर द्यायचे, इतकेच काय ते. सगळा माध्यमकेंद्रित खेळ. याच खेळाचा भाग म्हणून मग सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते शहेनशहा नाहीत याची आठवण करून दिली. मोदी शहेनशहा नाहीत, हे मान्य. परंतु त्याच वेळी आपणही काँग्रेसनामक मधाच्या (तूर्त मधशून्य) पोळ्यातील राणीमाशी नाही, हे सोनिया गांधी यांनीही लक्षात घ्यावयास हवे. काँग्रेस सत्तेत असताना त्यांचे वर्तन हे या राणीमाशीसारखेच होते आणि काँग्रेसजन त्यासाठी राबणाऱ्या साध्या मधमाश्यांसारखे वागत होते. या नात्याने रॉबर्ट वढेरा हे या राणीमाशीचे जावई ठरतात. आताच्या भाजप सरकारने तरी त्यांची पत्रास बाळगण्याचे कारण नाही.