22 November 2019

News Flash

मक्तेदारीचा मखमली विळखा

फेडरर, नदाल आणि जोकोविच यांना टेनिसमध्ये आव्हान मिळालेच नाही, असे नव्हे.

फेडरर, नदाल आणि जोकोविच यांना टेनिसमध्ये आव्हान मिळालेच नाही, असे नव्हे. पण  सर्वाधिक स्पर्धा या तिघांनीच जिंकल्या..

फ्रेंच ओपन स्पर्धेत स्पेनच्या राफाएल नदालने बाराव्यांदा अजिंक्यपद पटकावल्यामुळे त्याच्या चाहत्यांना अत्यानंद झाला असला, तरी माजी विम्बल्डनविजेता बोरिस बेकर काहीसा उदास आहे. टेनिसचे घडय़ाळ जणू थबकलेले आहे आणि त्याची टिकटिक लवकर सुरू होण्याची चिन्हे नाहीत, असे त्याच्याप्रमाणे आणखीही काही जणांना वाटू लागले आहे. रॉजर फेडरर, राफाएल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांचे गेली अनेक वष्रे कौतुक करून आता विश्लेषकांच्या लेखण्या झिजून, मोडून पडल्या आहेत! २००३ मध्ये विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत रॉजर फेडररने पीट सॅम्प्रासला हरवून त्याची सद्दी संपवली आणि पुढे ती स्पर्धाही जिंकली. २००५ मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेत १९ वर्षीय नदालने चौथ्या फेरीत त्या स्पर्धेतील अव्वल मानांकित रॉजर फेडररला हरवले आणि पुढे ती स्पर्धा जिंकली. फेडरर आणि नदाल या दोन महान विजेत्यांचा उदय असा दोन वर्षांच्या अंतराने झाला. पुढे अनेक वष्रे विम्बल्डनच्या हिरवळीवर फेडररचे आणि फ्रेंच ओपनच्या लाल मातीवर नदालचे साम्राज्य उभे राहिले. नोव्हाक जोकोविचच्या आगमनापूर्वी ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन खुल्या स्पर्धाच्या हार्डकोर्टवरही फेडररची सद्दी होती. या दशकाच्या पूर्वार्धात जोकोविच आणि इंग्लंडच्या अँडी मरेने फेडरर-नदाल द्विमक्तेदारीला आव्हान देण्यास सुरुवात केली. त्यात जोकोविच बराचसा आणि मरे काही प्रमाणात यशस्वी झाला. दरम्यानच्या काळात स्टॅनिस्लॉस वाविरका, हुआन मार्टिन डेल पोत्रो आणि मारिन चिलिच यांनी काही ग्रँड स्लॅम स्पर्धात अजिंक्यपद पटकावले. मरे दुखापतींनी बेजार होऊन आता निवृत्त होत आहे. हे अपवाद सोडल्यास २०१७ पासून तर फेडरर, नदाल आणि जोकोविचशिवाय ग्रँड स्लॅम स्पर्धा कुणी जिंकूच शकलेले नाही. ही बाब या टेनिसपटूंसाठी गौरवास्पद आणि कदाचित टेनिसरसिकांसाठी आनंददायी असेलही. पण खेळासाठी हे फार चांगले लक्षण नाही.

टीव्हीच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला टेनिस येऊ लागले होते. बियाँ बोर्ग, जॉन मॅकेन्रो, जिमी कॉनर्स असे टेनिसपटू घराघरांत पोहोचले. १९८५ मध्ये १७ वर्षांच्या पोरसवदा बोरिस बेकरने पहिल्यांदा विम्बल्डन स्पर्धा जिंकली आणि युवा प्रेक्षकही मोठय़ा संख्येने टेनिसचा आस्वाद घेऊ लागला. बोर्ग, कॉनर्स, मॅकेन्रो अस्ताला जात असताना इव्हान लेंडल, मॅट्स विलँडर, बोरिस बेकर, स्टीफन एडबर्ग उदयाला आले. नव्वदच्या दशकात पीट सँप्रास, आंद्रे आगासी, जिम कुरियर, गोरान इवानिसेविच चमकू लागले. जवळपास प्रत्येक वर्षी प्रस्थापितांना हादरा देऊन एखादा नवीनच भिडू एखादी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकून जायचा. मग तो एकमेव फ्रेंच ओपन जिंकणारा मायकेल चँग असेल किंवा अगदी अनपेक्षितरीत्या एकदा विम्बल्डन जिंकणारा मायकेल श्टीश किंवा पॅट कॅश असेल. बेकर, एडबर्ग, सँप्रास यांना फ्रेंच ओपनच्या लाल मातीवर कधीच जिंकता आले नाही. विम्बल्डनला गाईंचे कुरण म्हणून हिणवणाऱ्या लेंडलला किंवा विलँडरला टेनिसमधील ते सर्वाधिक प्रतिष्ठेचे अजिंक्यपद कधी फळले नाही. फ्रेंच ओपनची तर सदैव तिरकी चाल. कधी अमेरिकेचा १७ वर्षीय चँग ती स्पर्धा जिंकला, तर कधी इक्वेडोरचा ३५ वर्षीय आंद्रेस गोमेझ तिथे विजेता ठरला. स्पेनचा सग्रेई ब्रुगेरा किंवा ब्राझीलचा गुस्ताव क्युर्तन तर दोन-दोन वेळा ही स्पर्धा जिंकून गेले. यांच्यापकी कुणालाही इतर कोणतीही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकता आली नाही. आंद्रे आगासी हा त्या काळातला एकमेव असा टेनिसपटू ज्याने त्याच्या कारकीर्दीत चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकून दाखवल्या होत्या. त्याच्या किंवा अगदी बोर्ग-मॅकेन्रो यांच्याही काळात, चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा एकटय़ाने जिंकणे खडतर होते. प्रत्येक स्पर्धेतील कोर्टची धाटणी वेगळी, त्यावर जिंकण्यासाठीचे कौशल्य वेगळे. विम्बल्डनवर ताकदीची सव्‍‌र्हिस आणि नेटजवळचा खेळ हे चलनी नाणे ठरते. फ्रेंच ओपनमध्ये बहुतेकदा बेसलाइनवरून चिवटपणे खेळताना कस लागतो. ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन स्पर्धेत या दोन्हींच्या जरा मधले कौशल्य दाखवावे लागते. अशा प्रकारचे बहुपलुत्व गत शतक सरताना केवळ आगासी दाखवू शकला होता. त्याच्या आधी बिल टिल्डेन, रॉड लेव्हर, डॉन बज, केन रोझवाल ही यादी फार मोठी नाही. गेल्या काही वर्षांत मात्र फेडरर, नदाल आणि जोकोविच या तिघांनीही चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा प्रत्येकी किमान एकदा तरी जिंकून दाखवल्या आहेत. फरक इतकाच की हे तिघेही समकालीन असल्यामुळे त्यांच्या विजयमालिकेत इतर टेनिसपटूंची आणि पर्यायाने पुरुष एकेरीतील स्पर्धेचीच धूळधाण उडाली आहे.

कशी ते समजून घेण्यासाठी थोडी आकडेवारी पाहावी लागेल. फेडरर, नदाल, जोकोविच या तिघांनी आजवर अनुक्रमे २०, १८ आणि १५ स्पर्धा जिंकल्या आहेत. फेडररने २००३ पासून, नदालने २००५ पासून, जोकोविचने २००८ पासून ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्यास सुरुवात केली. २००८च्या ऑस्ट्रेलियन ओपनपासून परवा संपलेल्या फ्रेंच ओपनपर्यंत ४६ ग्रँड स्लॅम स्पर्धापकी केवळ आठ स्पर्धा या तिघांव्यतिरिक्त इतरांनी (तेही मरे, वाविरका, डेल पोत्रो आणि चिलिच असे चौघेच) जिंकल्या आहेत. त्यातही २०१७ पासून फेडरर, नदाल आणि जोकोविच हेच जिंकत आहेत. त्यांना आव्हान मिळालेच नाही असे नाही. ग्रिगॉर दिमित्रॉव, मिलोस राओनिक आणि अलीकडे डॉमनिक थीएम, अलेक्झांडर झ्वेरेव, स्टेफानोस त्सित्सिपास अशी काही नावे अधूनमधून झळकतात. पण त्यांना प्रस्थापित तिघांची सद्दी मोडून काढता आलेली नाही. असे का घडत आहे याचे उत्तर कोणालाच सापडलेले नाही. बोरिस बेकरच्या मते जिंकण्यासाठी केवळ तंदुरुस्ती आणि ताकद पुरेशी नाही. गेल्या काही स्पर्धामध्ये थीएम वगळता २८ वर्षांखालील एकही टेनिसपटू अंतिम फेरीपर्यंतदेखील पोहोचू शकलेला नाही, याकडे बेकर लक्ष वेधतो. जिंकण्यासाठीची महत्त्वाकांक्षा आणि इच्छाशक्ती अन्य बहुतेक टेनिसपटूंमध्ये अभावानेच आढळते, असे बेकरला वाटते.

एकीकडे फेडरर, नदाल, जोकोविच यांच्या जिद्दीचे, तंदुरुस्तीचे, कौशल्याचे रास्त गोडवे गायले जात असताना, त्यांच्या अपराजित साम्राज्यामुळे पुरुषांचे टेनिस एकसुरी आणि कंटाळवाणे होत आहे का यावर चर्चा सुरू झाली आहे. या तिघांच्या खेळात अजूनही पाहण्यासारखे, आस्वादण्यासारखे खूप काही आहे. पण त्यांच्या अटळ अस्तानंतर त्यांच्यावर प्रेम करणारी एक पिढीच टेनिसला अंतर देऊ शकते. कारण त्यांना इतर काही आणि कोणी पाहण्याची सवयच राहिलेली नाही. फ्रान्समध्ये विशेषत: फ्रेंच ओपनची प्रेक्षकसंख्या घटलेली आढळते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, जर्मनी या एकेकाळच्या ‘खाणीं’मधून हल्ली टेनिसरत्ने मिळेनाशी झाली आहेत. इतर बहुतेक खेळांमध्ये मोजक्या विजेत्यांची मक्तेदारी इतका प्रदीर्घ काळ पाहायला मिळत नाही. या मक्तेदारीमुळेच कदाचित नवीन मुले या खेळाकडे वळत नसावीत काय? कदाचित युरोपातली क्रीडा गुणवत्ता फुटबॉलकडे अधिक वळत असेल. अमेरिकेत तेथील स्थानिक खेळ, जलतलण, अ‍ॅथलेटिक्स, गॉल्फ तिथल्या युवकांना अधिक पसा मिळवून देणारे वाटत असतील. ऑस्ट्रेलियात रग्बी वा क्रिकेट हे युवकांना अधिक यश, स्थर्य मिळवून देणारे वाटत असतील. रशिया, पूर्व युरोप, दक्षिण अमेरिका येथेही टेनिस गुणवत्तेबाबत उदासीनता ठळकपणे दिसू लागली आहे. फेडरर, नदाल आणि जोकोविच यांचे यशसातत्य जितके थक्क करणारे आहे, तितकेच त्यांच्या मक्तेदारीचा मखमली विळखा सोडवणारे इतर कोणी उदयालाच येत नाही हे वास्तव बुचकळ्यात टाकणारे आहे. या तिघांच्या खेळाचा अमृतकुंभ आटल्यानंतर टेनिसरसिक तहानलेलेच राहतील काय, ही हुरहुर यातूनच निर्माण झालेली आहे.

First Published on June 15, 2019 2:07 am

Web Title: roger federer rafael nadal novak djokovic
Just Now!
X