News Flash

संस्कृतीचा शिमगा!

शिमगा संस्कृतीबद्दलच अंतर्मुख करायला लावणारा आहे..

संस्कृतीचा शिमगा!
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

प्राचीन वसंतोत्सवापासून आजच्या ‘बुरा न मानो होली है’पर्यंत पोहोचलेला शिमगा संस्कृतीबद्दलच अंतर्मुख करायला लावणारा आहे..

नारळापेक्षा नरोटय़ांची उपासना करण्यातच काहींना अधिक रस का असावा? प्रत्येक चांगल्या गोष्टीचे मातेरे केल्याशिवाय त्यांना राहवत का नसावे? हे आजचेच वास्तव आहे अशातला भाग नाही. वर्षांनुवर्षे, अनेक बाबतींत हे असेच चाललेले आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणून शुक्रवारी संपूर्ण देशाने साजऱ्या केलेल्या धुळवडीकडे बोट दाखवता येईल. हा होलिकोत्सवाचा एक भाग. हुताशनी पौर्णिमेला सर्वानी एकत्र यावे, अंगणात रचलेल्या होळीची साग्रसंगीत पूजा करावी, ती पेटवावी. दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करावी. ऋतू बदललेला असतो. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते. अशा वेळी साजरा केला जाणारा हा उत्सव. आज त्या उत्सवातील सर्व मांगल्याची राखरांगोळी झाली असून, होलिकोत्सव म्हणजे केवळ बीभत्स धुळवड असेच त्याचे स्वरूप झाले आहे. समाजातील सुसंस्कृत नागरिकांसाठी ही खरी चिंतेची बाब असायला हवी. धार्मिक श्रद्धा आणि परंपरांच्या आडून समाजातील ओंगळवाणेपणाला ‘सँक्शन’ या अर्थाने एक मान्यता तर आपण देत नाही ना, याचा विचार किमान महाराष्ट्रीय संस्कृतीशी नाते सांगणाऱ्यांनी तरी आता करावयास हवा. कधी नव्हे एवढे आज ते आवश्यक बनले आहे.

विविध पुराणकथांचा या होलिकोत्सवाशी संबंध आहे.  या पुराणकथांमुळेच त्याला धार्मिक आणि सांस्कृतिक कोंदण प्राप्त झाले. पुढे काव्य-संगीताने त्याला दिव्यत्व बहाल केले. होरीसारख्या उपशास्त्रीय संगीत प्रकाराच्या मुळाशी जायचे तर आपल्याला होलिकोत्सवाकडेच यावे लागते. प्राचीन भारतात कधीकाळी वसंतोत्सव साजरा केला जात असे. त्याच्याही काही गिरक्या आणि झोके कुठे रासलीलेने उचलल्या, तर कुठे होलिकोत्सवात सामावल्या गेल्या. परंतु या पुराणकथांच्याही आधी होळी होतीच. महाराष्ट्रात नवाश्मयुगात वस्तीस आलेल्या गोपालकांच्या एका प्रघातातून तिची सुरुवात झाली. हे गोपालक आपल्या गाईगुरांच्या शेणाचा ढिगारा करून ठेवत असत आणि वर्षांतून एकदा तो जाळून टाकत असत. त्या प्रथेतून पुढे होळीचा सण उत्क्रांत झाला असे काही अभ्यासकांचे मत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान हा तर गोपट्टाच. तेव्हा तेथे होळीची चाल अशीच पडली असावी. ते काहीही असो. एक गोष्ट मात्र खरी, की महाराष्ट्रातील होळी आणि उत्तर भारतातील होळी यांतील परंपरांमध्ये फरक आहे. आपल्याकडे होळी जाळणे आणि त्यानंतरचा शिमगा याला महत्त्व आहे. हा शिमगा म्हणजे यादवकाळातील ‘सीमुगा सींपण्या’चा उत्सव. होळीच्या दिवशी चिखल, माती, राख आणि शेण, झालेच तर कापूर, कस्तुरी, चंदन हे एकमेकांच्या अंगास मळायचे. वाद्ये वाजवायची. आनंद लुटायचा. असे ते सगळे असे. त्यात बीभत्सता, किळसवाणेपणा याला स्थान नव्हते. शिमग्यात आजच्या धुळवडीला जागा नव्हती. त्यात रंगही नव्हते. त्यांची पंचमी येई ती होळीनंतर पाच दिवसांनी. तेथेही ते रंगशिंपण सौम्यपणेच चाले. ग्रामीण महाराष्ट्रात आजही तीच परंपरा दिसते. त्यातील शिमगा आणि रंगांचा तो उग्रपणा हे उत्तर भारतातील होळीचे वैशिष्टय़. आपण ते उचलले म्हणून फार खंतावण्याचे कारण नाही. चित्रपट आणि दूरचित्रवाणी यांच्यातून झालेला तो सांस्कृतिक पाझर आपल्याही अंगणाला कधी तरी ओले करणारच होता. परंतु खंत याची आहे, की त्या रंगांना चिकटून आलेली विकृत वैशिष्टय़ेही आपण आणि आपली नागरी संस्कृती आज डोक्यावर घेऊन नाचत आहे.

हे केवळ घरांच्या सज्ज्यांमध्ये लपून पादचाऱ्यांना रंगांचे फुगे मारणे, एकमेकांच्या अंगावर गटारातील घाण पाणी टाकणे एवढय़ापुरतेच मर्यादित नाही. अलीकडे या विकृतीने टोक गाठले आहे यात शंकाच नाही. दिल्लीतील एका मुलींच्या वसतिगृहावर वीर्य मिसळलेल्या पाण्याचे फुगे फेकण्याचा पराक्रमही काही वीरपुरुषांनी केल्याच्या बातम्या आहेत. हे सारेच किळसवाणे आहे. त्याचा करावा तेवढा निषेध थोडाच. परंतु तो करताना हेही लक्षात घ्यायला हवे, की या अशा वर्तनामागे एक हिंस्र अशी मानसिकता कार्यरत आहे. होलिकोत्सवाचे मातेरे केले आहे ते तिनेच. ही मानसिकता आहे पुरुषी अहंकाराची. होळीच्या मंगलमय उत्सवामध्ये कधी तरी शिवीगाळ शिरली. त्याभोवतीही मग एक पुराणकथा रचून आपण त्याला धार्मिकतेचे वलय दिले. छद्मविज्ञान हे तर आपल्याकडे पाणीच भरते. तेव्हा त्या अश्लील शिव्या देण्याच्या विकृतीला आपण सामाजिक विरेचनाचा सिद्धान्त डकवून त्याला मान्यता देण्याचा प्रयत्न केला. तथापि त्या अश्लील, माताभगिनींची लाज वेशीवर टांगणाऱ्या शिव्याही पुन्हा पुरुषी अहंकारातूनच येतात हे ध्यानात घ्यायला हवे. एकीकडे अशा अभद्र शिव्या आणि दुसरीकडे ‘बुरा ना मानो होली है’ म्हणत केली जाणारी स्त्री देहाची विटंबना असे आजच्या धुळवडीचे चित्र आहे. कोणत्याही स्त्रीच्या मनाविरुद्ध तिला रंग लावणे हा एरवी विनयभंगाचा गुन्हाच. परंतु होळीच्या धार्मिक निमित्ताने तो करण्याचा खुला परवानाच आपल्याला मिळाला आहे अशा थाटात रस्तोरस्ती फिरणाऱ्या श्वापदांच्या टोळ्या हे दृश्य आज केवळ उत्तर भारतातच नव्हे, तर अगदी मुंबई आणि महाराष्ट्रातही दिसते. याचा अर्थ स्पष्ट आहे. स्त्रीच्या मनावर आणि देहावर तिची मालकीच नाही हे जाहीरपणे ते यातून दाखवून देत आहेत. खरी विकृती असेल तर ती ही आहे. फुगे फेकणाऱ्यांवर कारवाई करता येईल, पण मनात रुजलेल्या विकृत पुरुषी अहंकाराचे काय करणार? त्याची होळी कधी पेटणार? आजकाल असे प्रश्न विचारणे हेही धाडसाचे ठरू लागले आहे. कारण तातडीने त्याला धार्मिक रंग दिला जातो. त्यावरून शिमगा केला जातो. टीका करणाऱ्यांना धर्मद्रोही आणि हल्ली तर राष्ट्रद्रोही म्हटले जाते. वास्तविक आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील अशा प्रथा आणि परंपरांवर टीका केली म्हणून कोणी धर्मद्रोही ठरणार असेल, तर यापूर्वीचे सगळे समाजसुधारक आणि धर्मसुधारक त्या पंक्तीत नेऊन बसवावे लागतील याचीही जाणीव या धर्मवाद्यांना नसावी यात नवल काहीच नाही. आपल्या घरातील कचरा आपणच साफ करायचा असतो. त्याची स्वच्छता करू इच्छिणारांना, आधी शेजाऱ्यांच्या घरातील घाण साफ करा, त्याबद्दल तुम्ही काही बोलतच नाही, असे सुनवायचे नसते आणि घरात कचरा असणे ही अभिमानाने मिरवण्याचीही बाब नसते हे अतिरेकी अस्मितावाद्यांना सांगण्याची आवश्यकता आहे. पण सांगूनही त्यांना ते समजेल याची खात्री नाही. याचे कारण एकूणच धार्मिक-सांस्कृतिक बाबतीतील अहंकारजन्य अज्ञानावर त्यांच्या अस्मितांचा डोलारा उभा असतो. त्या अज्ञानाला एकदा पौरुषत्वाच्या फोल कल्पनांची जोड लाभली की मग त्यातून शिमग्याशिवाय अन्य काही जन्मूच शकत नाही. आज आपले संपूर्ण सामाजिक पर्यावरण याच शिमग्याने भरून गेलेले आहे. धुळवडीला तो अधिक गचाळपणे समोर आला एवढेच.

या सगळ्यात दिलासा देणारी बाब आहे ती एवढीच की काही विवेकी व्यक्तींनी हे सारे धिक्कारण्याचा ठाम पवित्रा घेतला आहे. ‘बुरा ना मानो’ हे चालणार नाही. जे वाईट आहे त्याला वाईटच म्हणायला हवे असा त्यांचा आग्रह आहे. त्याला बळ देणे हे तमाम सुसंस्कृतांचे आद्यकर्तव्य ठरावे. धर्म आणि परंपरांच्या नरोटय़ांची पूजा करीत त्याआड आपले पुरुषी अहंकाराचे राजकारण चालविणाऱ्यांना आज विरोध झाला नाही, तर उद्या याच शक्ती आपल्याच संस्कृतीचा शिमगा करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2018 2:55 am

Web Title: the history of holi festival
Next Stories
1 शेतकऱ्यांची पुन्हा दैना
2 कर्ते आणि सवरते
3 वाघांचे काही खरे नाही.!
Just Now!
X