घराघरात पोहोचलेल्या या बिस्किटाच्या कंपनीत दहा टक्के कामगारकपात होणार, याची चर्चा घरोघरी पोहोचल्यानंतर दिलासा मिळाला..

काही गोष्टी कितीही ‘जुन्या’ झाल्या, तरी त्या ‘पुराण्या’ वाटतच नाहीत. ही त्यातलीच एक गोष्ट आहे. गेल्या नऊ दशकांत या गोष्टीत नवनव्या उपकथांची भर पडली आणि ती अधिकाधिक ‘चवदार’ होत गेली. बरोबर नव्वद वर्षांपूर्वी, १९२९ मध्ये जेव्हा या गोष्टीचा जन्म झाला, तेव्हाच ती ‘स्टोरी ऑफ इंडिया’ ठरली.. ‘पार्ले स्टोरी’ म्हणून जनमानसात पोहोचली. स्वदेशीच्या मंत्राने भारावलेल्या मनमोहन दयाल नावाच्या माणसाने, आपला रेशीम आयातीचा प्रस्थापित उद्योग बंद केला आणि त्या काळच्या मुंबईबाहेरील पारले या गावी- म्हणजे आताच्या पाल्रे उपनगरात १२ कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन या ‘स्टोरी ऑफ इंडिया’चे नवे प्रकरण सुरू केले. ‘पाल्रे हाऊस’मधून बाजारात आलेल्या वेगवेगळ्या चवीच्या गोळ्या चघळण्याची सवय तेव्हाच्या मुंबईकरांना अगोदर लावली आणि पुढच्या दहा-बारा वर्षांत, १९३१ मध्ये ‘पार्ले ग्लुकोज’ नावाची एक नवी, तजेलावर्धक, ‘स्वदेशी चव’ बाजारपेठेत अवतरली. मुंबईच्या विलेपाल्रे उपनगरास ओळख देणारा हा ‘बिसकुट’ नावाचा हा विलायती पदार्थच जेमतेम मोजक्या घरांपर्यंतच पोहोचला होता आणि अगदीच आनंदाच्या एखाद्या प्रसंगी त्याचे दर्शन घडायचे. आज नव्वद वर्षांनंतर, गेल्या अवघ्या दोन-तीन दिवसांत याच कंपनीविषयीची जी चर्चा कानोकानी आणि घरोघरी पसरली, ती मात्र तितकीशी गोड नव्हती. कंपनीच्या ज्या अधिकाऱ्याच्या मुलाखतींमुळे ही चर्चा सुरू झाली, तिचे निराकरण करण्यासाठी त्याच अधिकाऱ्याने खुलासाही केला. हे बरेच झाले. पण एखाद्या उद्योगाची दोन-चार दिवसांत इतकी चर्चा होण्याचे कारण निराळे आहे.

ते कारण या ‘पार्ले स्टोरी’मध्ये दडलेले आहे. ‘पार्ले-जी’  नावाच्या बिस्किटाची ही नव्वदीतली गोष्ट. जेमतेम पाऊण लाखांच्या भांडवलावर सुरू झालेल्या आणि तब्बल साडेसात हजार कोटींच्या उलाढालीच्या टप्प्यावर पोहोचलेल्या उद्योगाच्या पुस्तकातील, ‘पार्ले-जी’ हे एक पान!.. हे सगळेच पुस्तक कुणी वाचलेले नसेलही, पण त्यातील ‘पार्ले-जी’चे पान मात्र, कानोकानी होऊनही घरोघरी पोहोचले आणि ते एवढे ओळखीचे झाले, की अनेक घरांत ‘पार्ले-जी’खेरीज पान हलेनासे झाले. घरी आलेल्या पाहुण्याचा, चहासोबत, ‘पार्ले-जी’च्या बिस्किटांनी पाहुणचार करूनच ‘गृहस्थी’ची परंपरा पाळावी, अशी जणू प्रथाच पडली. रक्तदान शिबिरांत रक्तदात्यांना उष्मांकवर्धक आहार म्हणून हीच बिस्किटे आणि शहरातील मोक्याच्या जागी थव्याथव्यांनी थांबून रोजंदारीची प्रतीक्षा करणाऱ्या नाका कामगारांसाठी हाच पोषक आहार. अलीकडच्या ‘सेक्रेड गेम्स’ या आंतरजाल-मालिकेतही ‘पार्ले-जी बिनदुधाच्या चहात बुडवून दिवस कंठावे लागताहेत’ असा संवाद होता. नाका कामगारांना विचाराल तर, आधी या बिस्किटांचा पुडा पाण्यात बुडवून संपवावा आणि मग कटिंग चहा प्यावा, पोट भरते- हे त्यांचे अनुभवातून आलेले शहाणपण. चिवट जीवनेच्छेचे जणू एक प्रतीक बनलेली ही बिस्किटे. त्यावरील ते लहान मूल, वर्षांनुवर्षे तसेच ‘संपलं- आणखी हवं-’ असे हातवाऱ्यांनीच सांगत जगाकडे आणखी आशेने पाहणारे!

मुंबईच्या पश्चिम उपनगरातून कामधंद्यानिमित्त शहराकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना या चवीचीच नव्हे, तर वासाचीही एक चटक लागली होती. इतकी, की संध्याकाळच्या वेळी, उपनगरी गाडीने घरी परतताना गाडीत बसल्या जागी डोळा लागल्यावरही, ‘पार्ले-जी’च्या घमघमाटाने जाग यावी आणि गाडीने विलेपाल्रे पार केल्यावर उतरायच्या तयारीला लागावे, अशी सवयच अनेकांना लागली. ही झाली जुन्या मुंबईचा चार-पाच दशकांचा सहवास लाभलेल्यांची कथा.. तसे पाहिले, तर ‘पार्ले-जी’चे मुंबईशी असलेले ‘गंधयुक्त’ नाते, सुमारे तीन वर्षांपूर्वीच संपुष्टात आले होते. या कारखान्याबाहेर दरवळणारा ‘पार्ले-जी’चा गंध ज्या दिवशी लुप्त झाला, तेव्हाही मुंबईकर या नात्याच्या दुरावलेपणाच्या भावनेने काहीसा हळवा झाला होता. सकाळच्या चहासोबत, वाहतूक कोंडीमुळे कंटाळवाण्या झालेल्या प्रवासातील शिणवटय़ाच्या प्रसंगी आणि मुंबईतून गावाकडे जाताना तिकडच्या मुलाबाळांसाठी ‘खाऊ’ म्हणून आठवणीने सोबत घ्यायचा ‘पार्ले-जी’चा ‘पुडा’ आता मिळणार की नाही, या शंकेने अस्वस्थही झाला होता.. हे भोळसट म्हणावे तर अवघ्या तीन-चार वर्षांपूर्वी असे काही मुंबईकरांना वाटत होते.

तशीच अस्वस्थता गेल्या दोन-तीन दिवसांत सर्वदूर पसरलेल्या चर्चेमागे होती. ‘पार्ले-जी’ उत्पादक उद्योगातील मयांक शहा या उच्चपदस्थाने आर्थिक मंदीच्या छायेविषयी अर्थविषयक दैनिकांशी बोलताना, दहा हजार कामगारांना आमच्या कंपनीतून कमी करावे लागेल, असे सूतोवाच केल्याची बातमी थडकली आणि ही अस्वस्थता वाढू लागली. हे खरे की, प्रत्यक्ष या कंपनीत रीतसर नोकरीस असणारे कामगार आजघडीला कमीच आहेत. पण अप्रत्यक्षरीत्या या कंपनीशी संबंधित असलेल्या कामगारांची संख्या एक लाखांवर आहे. याचे कारण असे की देशभर पसरलेल्या छोटय़ामोठय़ा कंपन्यांतून माल बनवून घेतला जातो आणि थेट ‘पार्ले’च्या नाममुद्रेसह बाजारात उपलब्ध होतो. तरीही जीवनेच्छा आणि आशा यांचे प्रतीक असलेले हे बिस्किट स्वत:च दहा हजार जणांना- म्हणजे सुमारे दहा टक्के कामगारांना- बेरोजगारीच्या खाईत ढकलणार, हे या अस्वस्थतेमागील कारण होते. कंपनीच्या नफ्यात सात ते आठ टक्क्यांनी घसरण सुरू आहे, म्हणून ही दहा टक्के कपात? अखेर ही चर्चा वाढू लागल्यावर, ‘परिस्थिती आणखी बिघडत राहिली तर आमच्यावर कपातीची वेळ येऊ शकते’ असा खुलासा याच मयांक शहा यांनी केला.

खुलासा मोघम खरा, पण तो वेळीच केला गेला हे बरे झाले. ‘पार्ले-जी’ने उठविलेले चर्चेचे हे वादळ चहाच्या पेल्यातलेच आहे, असा एक आभासी दिलासा तरी त्यात होता. हे उत्तमच. मात्र मंदीची चिन्हे दिसत असतानाच पाल्रे उद्योगसमूहातील कामगारकपातीची चर्चा सुरू होणे हे निराळ्या अर्थाने अनिष्टसूचक होते. इमारतबांधणी, मोटारी अशा खर्चीक गोष्टींपासून सुरू झालेली मंदीची चर्चा हळूहळू वस्त्रोद्योग आणि तयार कपडय़ांपर्यंत पोहोचली आणि तेथून ती थेट आपल्या घराच्या आसपास, कोपऱ्यावरल्या दुकानात मिळणाऱ्या बिस्किटापर्यंत आली हे सामान्य माणसाला धडकी भरवणारेच ठरणार, यात शंका नाही. एफएमसीजी – म्हणजे फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स- म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, जीवनावश्यक नसूनही रोजच्या वापरातच असणाऱ्या वस्तूंच्या विक्री-उद्योगात अशी मंदीची चर्चा असणे हे मंदीने ठाणच मांडल्याचे लक्षण, असे अर्थशास्त्रज्ञही मानतात. त्या साऱ्या शंका, एका खुलाशाने विरून जात असतील तर तो उत्तमच दिलासा म्हणायला हवा.

मात्र हा दिलासा येईपर्यंत बोभाटा झाला होता. हा बोभाटा मंदीचा होता, हे निराळे सांगण्याची गरज नाही. तो का झाला, असे काहींना वाटेल. घडल्या गोष्टींना अनावश्यक ठरविणे ठीकच. परंतु ‘का बोभाटा झाला जी?’ असे म्हणता म्हणता जुन्या, मळलेल्या वाटा मोडून तर पडल्या नाहीत ना अशी शंका घेणे केव्हाही रास्त. देशाच्या अर्थमंत्र्यांनी मंदीच्या या सर्वदूर बोभाटय़ाची आणि अर्थव्यवस्थेच्या वाटा मोडून पडत असल्याच्या शंकेची दखल शनिवारीच घेतली, त्याविषयी सोमवारच्या अंकात.