जनाधार घसरल्याचे पुरेसे स्पष्ट झाल्यानंतर आता, अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या चौकशीची चिंताही चांगली ग्रासू लागली आहे..

अमेरिकी अध्यक्षांचे पारंपरिक आणि बहुप्रतीक्षित ‘स्टेट ऑफ द युनियन’ भाषण यंदा होणार की नाही, याची खात्री काही दिवसांपूर्वीपर्यंत कुणी देऊ शकत नव्हते. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोकॅट्र-बहुल प्रतिनिधिगृह यांच्यात मेक्सिको व अमेरिकादरम्यान भिंत उभारण्याच्या मुद्दय़ावरून तीव्र मतभेद झाल्यामुळे अमेरिकेत ऐतिहासिक टाळेबंदी सुरू होती. ही टाळेबंदी विसंवादातून नव्हे, तर संवादाच्या पूर्ण अभावातून उद्भवली होती. वास्तविक ट्रम्प महाशयांना भाषणे द्यायला आवडते. पण ती बरीचशी उत्स्फूर्त असतात. ‘स्टेट ऑफ द युनियन’सारखी छापील नसतात. उत्स्फूर्त भाषणे आणि ट्वीट्स यांपलीकडे ट्रम्प फारसे व्यक्त होत नाहीत. तरीही अमेरिकी वेळेनुसार मंगळवारी रात्री झालेले भाषण ट्रम्प यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. कारण ट्रम्प यांना झोतात राहायलाही तितकेच आवडते. हे भाषण तसे पाहायला गेल्यास, ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतले दुसरेच, पण महत्त्वाचे. कारण प्रतिनिधिगृहावर मध्यावधी निवडणुकीत डेमोकॅट्रिक पक्षाने ताबा मिळवला असून, सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाकडे काठावरचे बहुमत आहे. गेल्या वर्षी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये रिपब्लिकन पक्ष बहुमतात होता. आता दुभंगलेल्या काँग्रेससमोर ट्रम्प यांना तितकीशी मिजास – ते मान्य करीत नसले तरी- दाखवता येणार नाही. ट्रम्प भाषण करीत होते, त्यांच्याबरोबर मागे नॅन्सी पलोसी बसल्या होत्या आणि ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान त्यांनी मोजक्याच विधानांना दाद दिली. बाकी बहुतेक वेळ त्या गंभीरच होत्या. या पलोसी प्रतिनिधिगृहात डेमोकॅट्रिक पक्षाच्या गटनेत्या आहेत. येत्या दोन वर्षांमध्ये त्यांची भूमिका अनन्यसाधारण ठरणार आहे. अमेरिकी अध्यक्षांची आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचा अधिकार अमेरिकी प्रतिनिधिगृहाला असतो. या अधिकारांतर्गत आता ट्रम्प यांच्या विविध निर्णयांची, धोरणांची, २०१६ मधील निवडणुकीतील कथित रशियन हस्तक्षेपाची चौकशी होऊ शकते. या वास्तवातून आलेली अस्वस्थता ट्रम्प यांच्या भाषणात प्रतिबिंबित झाली.

सुडाच्या आणि अडथळ्याच्या राजकारणाचा आपण त्याग केला पाहिजे, असे ट्रम्प यांनी सुरुवातीलाच सांगितले. अमेरिकी जनतेसाठीचा कार्यक्रम आपण सभागृहासमोर मांडत आहोत. अमेरिकेत आर्थिक चमत्कार घडून येत आहे. अशा वेळी युद्ध, राजकारण किंवा चौकशांचा ससेमिरा असे घटक त्यात खोडा घालत आहेत, असा तक्रारसूर त्यांनी आळवला. त्यात खरोखरीचा सात्त्विक संताप कमी आणि धास्तीच अधिक दिसून आली. सर्वसहमतीची सर्वपक्षीय दाद किती मिळते, यावर अशा भाषणांचे गुणांकन, विश्लेषण केले जाते. ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान असे प्रसंग मोजके होते. वादग्रस्त नसलेल्या मुद्दय़ांवर त्यांना डेमोकॅट्रिक सदस्यांकडूनही दाद मिळाली. मात्र मेक्सिको भिंतीसारख्या ट्रम्प यांना विशेष प्रिय असलेल्या मुद्दय़ावर त्यांचे रिपब्लिकन सहकारीही अनेकदा मख्ख चेहऱ्याने थंड बसून राहिले! अर्थात पाच अब्ज डॉलर्सच्या भिंतीचा लाडका मुद्दा ट्रम्प सहजी सोडणार नाहीत, हेही स्पष्ट झाले. मेक्सिकोतील अमेरिकेत येणाऱ्या निर्वासितांचा/ स्थलांतरितांचा मुद्दा गंभीर असला, तरी ट्रम्प म्हणतात त्याप्रमाणे यांतील सगळेच काही अमली पदार्थाचे तस्कर, माफिया किंवा बलात्कारी नसतात. मेक्सिकोतील शहरांमधून ही मंडळी बस भरभरून सीमेकडे येतात आणि अमेरिकेत घुसतात हा दावाही ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मांडला. जोडीला काही तरी नाटय़मयता हवी म्हणून, अमेरिकी सीमेपर्यंत येईस्तोवर दर तीनपैकी एका मेक्सिकन महिलेवर बलात्कार झालेला असतो, असे टोकाचे विधानही त्यांनी केले. ही भिंत न झाल्यास अमेरिकनांच्या नोकऱ्या जातील, समाजात गुन्हे वाढतील, शाळा नि रुग्णालये भरून जातील वगैरे हृदयस्पर्शी मुद्दय़ांची खैरात होती. मेक्सिको भिंत हा नैतिक मुद्दा असून आपण १५ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहू. तोपर्यंत निर्णय न झाल्यास आपण पाहिजे तो निर्णय घेण्यास मोकळे आहोत, असा इशारा त्यांनी यापूर्वीही दिलेला होता. १५ फेब्रुवारीपर्यंत कोंडी न फुटल्यास ट्रम्प सीमावर्ती भागात आणीबाणी घोषित करण्याची दाट शक्यता आहे. पण या टोकाच्या निर्णयासाठी मशागत म्हणून ट्रम्प यांना ‘स्टेट ऑफ द युनियन’ भाषणाचा आधार घ्यावा लागला हे उघड आहे.

ट्रम्प यांच्या दाव्यांची चिरफाड करणारे वृत्तांत विविध माध्यमांमध्ये त्यांचे भाषण संपल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये प्रसृत होऊ लागले आहेत. आर्थिक विकासदर अभूतपूर्व वेगाने दोन वर्षांत वाढला असे ट्रम्प म्हणतात, तो ३.८ असा आहे. हा दर अमेरिकेसारख्या प्रगत अर्थव्यवस्थेच्या मानाने समाधानकारक असला तरी अभूतपूर्व नक्कीच नाही. तोही यंदा करकपात मागे घेतल्यानंतर आणि व्यापारी निर्बंधयुद्ध शिगेला पोहोचल्यावर घसरेल, असा अंदाज आहे. वेतनमान प्रचंड वाढले, असेही ट्रम्प सांगतात. गेल्या वर्षी कामगार वेतनमानात ३.४ टक्के वाढ झाली. हे प्रमाण २००८च्या मंदीपूर्वी ४ टक्के इतके होते. तो दर अजूनही गाठता आलेला नाही. औषधांच्या किमती गेल्या ४६ वर्षांत सर्वाधिक घटल्या असा ट्रम्प यांचा दावा आहे. प्रत्यक्षात काही औषधांच्या किमती तुलनेने कमी प्रमाणात वाढत आहेत, तर काहींच्या स्थिरावल्या आहेत. अशी आकडेवारी सविस्तर दिली गेली पाहिजे, जे ट्रम्प यांनी केलेले नाही. मानवी तस्करी आणि अल्पवयीन मेक्सिकन मुलींना अमेरिकेत आणून वेश्याव्यवसाय करायला भाग पाडले जाते. म्हणूनही भिंत उभी राहिली पाहिजे, हा आणखी एक दावा. प्रत्यक्षात अशा मुली अधिकृत प्रवेशनाक्यांतूनच सर्वाधिक येतात, असे आकडेवारीच सांगते. ट्रम्प यांच्या काही वाक्यांना पांढऱ्या पोशाखात आलेल्या डेमोकॅट्र महिला सदस्यांनी उभे राहून, आरोळ्या ठोकून, टाळ्या वाजवून दाद दिली. ही वाक्ये प्रतिनिधिगृहात वाढलेल्या महिलांच्या विक्रमी संख्येविषयी होती. ट्रम्प मात्र त्यांची दाद आपल्यालाच मिळाल्याचे वाटून किंवा मानून आनंदित झाले. जे स्वाभाविक होते, कारण एरवी फारच थोडय़ा प्रसंगी त्यांना अशी दाद मिळाली.

ट्रम्प यांना दुसऱ्याचे ऐकून घेण्याची सवय नाही. मग विरोधी पक्षीय असोत, विचारवंत असोत, प्रसारमाध्यमे असोत, स्वपक्षीय हितचिंतक असोत वा स्वत:च नेमलेले सल्लागार असोत. अनेक मुद्दय़ांवर ट्रम्प स्वत:ची ठाम मते बनवतात आणि त्या मताच्या बंद खोलीत स्वत:ला कोंडून घेतात. ही मते काही वेळा पूर्वग्रहावर आधारित असतात, तर काही वेळा गैरसमजावर. पण या मतांची खातरजमा करण्याची सवय किंवा गरजही ट्रम्प यांच्या ठायी नाही हा सर्वात मोठा धोका आहे. उदा. ट्रम्प यांच्या मते इराण हा उत्तर कोरियापेक्षाही धोकादायक देश आहे. अफगाणिस्तानातून फौजा काढून घेण्याची घाई झालेले ट्रम्प इराकमध्ये अधिक फौजा ठेवण्याविषयी आग्रही आहेत. कारण काय, तर तेथून इराणवर नजर ठेवता येते! यात इराकी सरकार आणि जनता यांच्या मतांना वा भावनांना काडीची किंमत नाही. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांना दुसऱ्यांदा भेटण्याविषयी घोषणा असो, सीरिया किंवा अफगाणिस्तानातून फौजा माघारी बोलावण्याचा मुद्दा असो, ट्रम्प यांनी त्यात नवीन काहीच सांगितलेले नाही. या सर्व घोषणांमध्ये अहंगंड होता.

पण अनेकांच्या अहंगंडाच्या मुळाशी नेहमीच एक प्रकारचा भयगंड असतो. तो ट्रम्प यांच्या भाषणातही दिसून येत होता. यातूनच चौकशा वगैरेचे आग्रह सोडा, आपण एक होऊन अमेरिकेला पुन्हा गतवैभव मिळवून देऊ या अशी अजिजी ट्रम्प अनेक वेळा करते झाले.