20 January 2018

News Flash

‘कोर्टा’तील कविता

निखळनितांत सुंदर हे विशेषण फेडररच्या खेळाचे वर्णन करण्यास अपुरे ठरेल.

लोकसत्ता टीम | Updated: July 18, 2017 5:42 AM

विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतर रॉजर फेडरर

रॉजर फेडररसारखा साधासुधा माणूस विम्बल्डनवरील जेतेपद सहजी खिशात टाकतो तेव्हा ते एका व्यक्तीचे जिंकणे राहात नाही..

ज्या काळात सौंदर्यापेक्षा सामर्थ्यांस, मार्दवापेक्षा मर्दानगीस, सौहार्दापेक्षा सूडभावनेस, नजाकतीपेक्षा नाठाळपणास, मौनापेक्षा मस्तवालपणास, अदबशीरतेपेक्षा आडदांडपणास, अभिजाततेपेक्षा अर्धवटपणास महत्त्व दिले जाते त्या काळात रॉजर रॉबर्ट फेडरर याच्या आठव्या विम्बल्डन विजेतेपदाचे मोल ‘खेळ’ या संकल्पनेपुरतेच मर्यादित राहात नाही. ते खेळाच्या सीमा ओलांडून समग्र समाजजीवनास व्यापून टाकते. निखळनितांत सुंदर हे विशेषण फेडररच्या खेळाचे वर्णन करण्यास अपुरे ठरेल. अत्यंत शिष्टसंमत आणि अभिजनांच्या साक्षीने खेळल्या जाणाऱ्या विम्बल्डन स्पध्रेत रविवारी रॉजर फेडरर याने क्रोएशियाच्या मरिन चिलीच याचा अगदीच सहज पराभव केला. मान्य आहे की हा सामना अंतिमतेच्या दर्जापेक्षा दशांगुळे कमीच होता. मान्य की या सामन्यात चिलीच हा कोणीही चिरडून जावे इतका साधा खेळाडू भासला. हेही मान्य की यामुळे फेडररची विक्रम नोंदणी अधिक सुलभ झाली. परंतु या निरीक्षणांसमोर मान तुकवताना हेही मान्य करावयास हवे की संपूर्ण विम्बल्डन स्पर्धा मालिकेत एकही सेट न गमावता थेट विजेतेपद पटकावणारा फेडरर हा गेल्या ४६ वर्षांतील एकमेव खेळाडू आहे. जे विजेतेपद धापा टाकत, घामाच्या धारा पुसत, आपल्यातील उद्दाम ऊर्जेचे दर्शन घडवत पटकावयाचे असते ते दुष्प्राप्य अजिंक्यपद रॉजर फेडरर हा अगदीच किरकोळ देहयष्टीचा, प्रचलित निकषांनुसार अजिबात पुरुषी न वाटणारा आणि कालबाह्य़ मानली जाणारी कुटुंबवत्सलता मिरवणारा इसम सहजी खिशात टाकतो तेव्हा ते एका व्यक्तीचे जिंकणे राहात नाही. ती संस्कृतीने सामर्थ्यांला दिलेली संयत परंतु ठाम समज असते.

टेनिस या सभ्य आणि तरीही क्लेशदायी खेळाने अलीकडच्या पाच दशकांत तीन महान कलाकार जगास दिले. बियाँ बोर्ग, पीट साम्प्रास आणि अर्थातच रॉजर फेडरर. तिघांच्या खेळाची वैशिष्टय़े भिन्न. तरीही त्यातला एक धागा समान. तो म्हणजे डोक्यातील शीतकपाटाचा. या तिघांनीही खेळताना कधीही भावनांचे प्रदर्शन केले नाही. समोर जॉन मॅकेन्रो याच्यासारखा शीघ्रकोपी, थयथयाटी खेळाडू असो, जिमी कॉनर्ससारखा सुप्त आक्रमक स्पर्धक असो किंवा इव्हान लेंडल याच्यासारखा कष्टकरी प्रयत्नवादी असो. बोर्गच्या चेहऱ्यावर एक कायम योगिक शांतपणा असे. ८० साली विम्बल्डनमध्ये त्याने मॅकेन्रो याचा केलेला पराभव म्हणजे टेनिसच्या इतिहासातील एक महाकाव्यच. कधीही वाचले तरी तितकेच आनंददायी.  बोर्ग याची ही विराट विरागी कर्तृत्वाची परंपरा अमेरिकी साम्प्रास याने अंगी बाणवली.  चमत्कृतीपूर्ण शैलीदार आंद्रे आगास्सी, बुम बुम बोरिस बेकर आदी एकापेक्षा एक गुणवान स्पर्धक असताना साम्प्रास इतक्या सहजपणे विजेतेपद खिशात घालून जात असे की अचंबित व्हावे. त्याच्यात एक विचित्र गुणवंत कायम दडलेला होता. परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत मदानावर धुडगूस घालूनही परीक्षेत पहिला क्रमांक पटकावण्याची कला जशी काहींकडे असते, तसा साम्प्रास होता. अंगभूत गुणवान. अत्यंत किमान कष्टात कमाल पराक्रम करणारा. या दोघांतील उत्तमांचा गुणाकार म्हणजे आजचा रॉजर फेडरर.

मध्यमवर्गीय स्विस घरात जन्मलेला. वडील रॉबर्ट हे सिबा या स्विस औषध कंपनीतील मध्यव्यवस्थापक. आई गृहिणी. अशा वातावरणात जन्मलेल्यावर काही किमान मूल्यसंस्कार सहज होतात. रॉजरवर ते तसे झाले. कुमारावस्थेतच अमेरिकेत टेनिस स्पध्रेत विजेता ठरल्यावर मिळालेल्या पशातले अवघे २०० डॉलर त्याने केस रंगवण्यावर खर्च केले म्हणून आईवडिलांनी त्याचे कान उपटले होते. दोघांचे म्हणणे असे की आपल्याला काय मिळवायचे आहे हे आणि त्यासाठी काय करावयाचे नाही, हे तुला कळायला हवे. झुलपे रंगवणे आदी उटपटांग गोष्टींत वेळ आणि पसा घालवत बसलास तर तुझ्यातील खेळाडू मागे पडायचा धोका आहे. रॉजरने हे बोल गांभीर्याने घेतले आणि पुढे कधीही टेनिसखेरीज कशावरही वेळ घालवला नाही. फेडरर दाम्पत्याचे मोठेपण म्हणजे त्यांनी रॉजरची आवड प्राणपणाने जपली. वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी त्याने स्वित्र्झलडच्या दुसऱ्या टोकास असलेल्या विशेष प्रशिक्षण केंद्रात जेव्हा दाखल होण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्याच्या पालकांनी त्यास सहज अनुमती दिली. ही गोष्ट का महत्त्वाची? तर त्या वेळी त्याच्या आईला रॉजरच्या टेनिसमधील गुणवत्तेची काहीही माहिती नव्हती. तरीही आपल्या पोरावर त्यांनी विश्वास टाकला आणि रॉजरने त्यास कधीही तडा जाऊ दिला नाही. पालकत्वाच्या आधुनिक संकल्पना, मुलांचा कल ओळखण्याच्या १०१ युक्त्या किंवा आपल्या मुलास ‘लिट्लि चॅम्प’ कसे करावे वगरे काहीही फेडरर दाम्पत्यास ठाऊक नव्हते. ठाऊक होते ते इतकेच की आपल्या मुलास फुटबॉल आणि टेनिस दोन्हीही खेळांत उत्तम गती आहे आणि त्यातील त्याला जे हवे ते करू दिले तर त्याला त्यात आनंद मिळेल.

रॉजर तो आजही भरभरून लुटतो. त्याच्या यशात ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. याचे कारण त्याचे अनेक समकालीन आईवडिलांच्या हट्टाखातर किंवा काही तरी मिळवण्यासाठी म्हणून टेनिसकडे वळले. रॉजर केवळ आनंदासाठी खेळू लागला. याचा परिणाम असा की त्याला त्यामुळे सरावाचा, खेळण्याचा कधीही कंटाळा येत नाही. गेली जवळपास २५ वष्रे रॉजर सतत खेळतो आहे. खेळाची असोशी इतकी की त्यामुळे आजारपणाची सुटीही त्याला कधी घ्यावी लागलेली नाही. त्याचाच समकालीन असणाऱ्या स्पेनच्या राफेल नादालकडे पाहिले की याचे महत्त्व लक्षात यावे. खरे तर नादाल हा फेडररपेक्षा पाच वर्षांनी लहान. परंतु त्याच्या शरीरातील जवळपास सर्वच बिजागऱ्या एव्हाना बदलून झाल्या आहेत. त्यामुळे त्यास खेळताना किती आटापिटा करावा लागतो. रॉजर फेडरर याचे तसे नाही. त्याच्या खेळातील सहजता थक्क करणारी आहे. ही सहजता हेच थोरपणाचे लक्षण असते. म्हणजे जे तानापलटे घेता यावेत यासाठी अनेक गवयांना कित्येक तास गळामेहनत करावी लागते ती तान लताबाई सहजपणे फेकतात. त्यामुळे गाणेच सोपे वाटू लागते. किंवा दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमापार करण्यासाठी अन्य मर्त्य फलंदाजांना कष्ट उचलावे लागत असताना सुनील गावस्कर किंवा सचिन तेंडुलकर इतक्या सहजपणे फटके लगावतात की क्रिकेट सोपे वाटू लागते. तसे रॉजर फेडरर या अद्भुताचे आहे. सामर्थ्य हे मिरवायचे असते असे मानले जाण्याच्या काळात यशासाठी सामर्थ्यांची गरजच काय, असा प्रश्न त्याची शैली विचारते तेव्हा ती खरी वाटू लागते.

हे रॉजर फेडरर याचे मोठेपण. ते मानायचे अशासाठी की आसपास सगळे आपल्यातील सामर्थ्यांच्या जाहीर आविष्कारासाठी संधीच्या प्रतीक्षेत असताना हा जिवाची कोणतीही उरस्फोड न करता जे काय म्हणायचे ते म्हणतो. ते म्हणताना ना आनंदाची भावना असते. ना रागाची. त्वेषाची तर नसतेच नसते. ज्यासाठी प्रयत्न करावयाचा ते साध्य झाले की त्याचा आनंद अश्रूद्वारे सांडला तर त्याला त्यात कमीपणा वाटत नाही. अलीकडे जगभरात बहुतेकांचा आपल्यातील पौरुषतेच्या हिंस्र प्रदर्शनावर भर दिसून येतो. त्यामुळे सौंदर्य हे सामर्थ्यांस मारक असते, असा एक खुळचट समज वातावरणात भरून राहिलेला आहे. नजाकत, अभिजातता हे जणू दुर्गुणच आहेत असेच सगळे वागू लागलेत. अशा वेळी वातावरणातील हा दोष दूर करण्याचे ऐतिहासिक महत्त्वाचे कार्य रॉजर फेडरर हा खेळाडू करतो. म्हणून त्याचे जिंकणे हा केवळ एका खेळाडूचा विजय नसतो. ती कवितेने कर्तृत्वावर केलेली मात असते. टेनिसच्या खेळमदानास कोर्ट म्हणतात. रॉजर फेडरर याचे खेळणे ही त्या कोर्टातील कविता आहे. त्याची प्रचंड यशोगाथा ही त्या काव्यगुणाचा गौरव ठरते. प्रगतीसाठी सामर्थ्यांइतकीच संस्कृतीचीही गरज असते, हे जमेल तेथे दाखवून द्यायलाच हवे.

 • बियाँ बोर्ग, पीट साम्प्रास आणि रॉजर फेडरर या तिघांनीही खेळताना कधी भावनांचे प्रदर्शन केले नाही. आनंदासाठी खेळणारा फेडरर हा तर बोर्ग आणि साम्प्रास या दोघांतील उत्तमांचा गुणाकार. नजाकत, अभिजातता यांचा सहज आविष्कार..

First Published on July 18, 2017 3:11 am

Web Title: wimbledon 2017 roger federer tennis game eighth wimbledon title
 1. R
  rohan
  Jul 22, 2017 at 3:14 pm
  फेडरर स्वतः मोठा झालेला लेजेंड आहे... नादल त्याच्यासमोर काही नाही असे लिहून फेडरर मोठा होत नाही... त्यामुळे नादल कसा खेळतो वगैरे सांगून म्हणून फेडरर कसा महान हे सांगण्यापेक्षा फेडरर हा मुळातच महान आहे...त्यासाठी कुणाला लहान करण्याची गरज नव्हती... आणि नादल सारख्याल तर नाहीच... तसे ा दोघांचाही खेळ आवडतो... शेवटी व्यक्ती ही तिच्यातल्या तत्वामुळेच तर वेगळी म्हणून ओळखली जाते...म्हणून तर व्यक्तिमत्व महत्वाचे...
  Reply
  1. संदेश केसरकर
   Jul 21, 2017 at 12:22 am
   खूप सुंदर लेख असं मी म्हणणार नाही तर अतिशय सुंदर विचारांचे निरीक्षण असे मी म्हणीन. कारण घटना एकाच असते पण त्याचा अर्थ सर्वच सकारात्मक व सत्याचा शोध घेणारा असं काढतीलाच असे नाही. त्यामुळे लहांना पासून थोरांपर्यंत वाचावा असं लेख असे मी म्हणेन.
   Reply
   1. K
    Kumar
    Jul 19, 2017 at 11:53 am
    एरवी तैरवि संस्कृतिच्या नावाने बोम्बा मारणारे कुबेर साहेब लिहितात... प्रगतीसाठी सामर्थ्यांइतकीच संस्कृतीचीही गरज असते,... सुखद धक्का...
    Reply
    1. A
     AMIT
     Jul 19, 2017 at 11:31 am
     संपादकांनी नेहमी असे अग्रलेख लिहावेत. काँग्रेस च्या काळात सरकार वर टीका झाली असेल तर ती योग्य होती पण आता मोदी जी सत्तेत आल्यावर सरकारवर टीका करणे म्हणजे देशद्रोह. आमच्या काही मित्रांची सवय कि काय ती तुटली ना राव - हे काय बरे नव्हे कुबेर. आजकाल च्या गढूळ वातावरणात तुम्ही नेहमी "फील गुड" वाल्या बातम्या देत जा बरे. आज आम्हाला मळमळ बाहेर काढता आली नाही , बहुतेक डॉक्टरांकडे जावे लागणार.
     Reply
     1. K
      kiran patil
      Jul 18, 2017 at 11:46 pm
      माध्यमांनी कायम विरोधी भूमिकेत असणं वगैरे सगळं आवश्यकच पण असे लेख जास्त निर्माण होणं आता काळाची गरज आहे. अलीकडच्या वाढत्या नैराश्याचं एक मुख्य कारण दररोज नित्य नेमाने अक्ख्या जगातील मूर्खपणा,अन्याय आणि दुःखआपल्यापर्यंत पोहोचवणारी, आपली हतबलता क्षणोक्षणी अधोरेखित करणारी, दर्जा खालावलेली आणि पैशाला चटावलेली माध्यमं आहे. रॉजर फेडररच्या वेड लागलेल्या चाहत्यांपैकी मी नाही पण त्याच्या व्यक्तिमत्वातील आणि खेळातील सौंदर्य अचूक दाखवून देणारा, खूप अस्सल आणि सर्वार्थाने आनंद देणारा लेख. मनापासून धन्यवाद लोकसत्ता आणि कुबेरजी.
      Reply
      1. U
       umesh
       Jul 18, 2017 at 9:54 pm
       पहिली ओळ वाचली आणि थेट क्रीडा पानावर गेलो असल्या अराजकीय विषयांवर अग्रलेख वाचायची सवयच तुटली ना केतकर आल्यापासून विद्याधर गोखले संपादक असताना रविवारी शेरोशायरीवरील अप्रतिम अग्रलेख असायचे अर्थात बालवयात त्या अग्रलेखांची उंची काय समजणार? पण लोकसत्ता फक्त आर्थिक किंवा राजकीय संपादकीय लिहित असल्याने आम्हालाही बिगर राजकीय विषयांवरील अग्रलेख वाचवत नाहीत बाकी हा अग्रलेख कुबेरांनी लिहिला नसावा असा माझा अंदाज आहे
       Reply
       1. S
        sachin
        Jul 18, 2017 at 9:53 pm
        जुन्या सामन्यांपैकी स्टेफी ग्राफ - याना नोवोतना यांचा १९९३ चा विम्बल्डन अंतिम सामना पाहावा.हाता तोंडाशी आलेला विजयाचा घास स्टेफीने हिरावून घेतल्यावर याना नोवोतना अक्षरशः हमसाहमशी रडली होती.सौन्दर्य आणि कौशल्य यांचा संगम म्हणजे स्टेफी ग्राफ.८०-९० च्या दशकाने स्टेफी ,सांचेझ,सेलेस,सबातीनी,हिंगीस ,बेकर,अगासी,एडबर्ग,गोरान इवानीसवीच अशी एकापेक्षा एक रत्ने दिली.फेडरर ते ८०-९० चे रिले चे बॅटन घेऊन पुढे आलाय.ग्रेट! आपला अमदावादवाला
        Reply
        1. S
         sachin k
         Jul 18, 2017 at 9:47 pm
         ग्रेट लेख सर.
         Reply
         1. E
          ex vachak
          Jul 18, 2017 at 8:26 pm
          फार सुंदर अग्रलेख! खूप दिवसांनी लेखक कुबेर दिसले.. नाहीतर त्यांना आजकाल मोदी आणि ट्रम्प सोडून बाकी काही सुचतच नाही असे वाटत होते.. मध्ये मध्ये असेच राजकारणापासून दूर जाऊन किशोरी ताई , फेडरर सारखे सुरेख अग्रलेख लिहीत जा! नाहीतर आम्ही आशेने येतो आणि ट्रम्प-मोदीविरोधी गरळ ओकलेली वाचून आणि प्रतिक्रियाकारांची तुंबळ खडाजंगी बघून परत जातो!
          Reply
          1. अविनाश
           Jul 18, 2017 at 8:17 pm
           अप्रतिम लेख.
           Reply
           1. S
            Somnath
            Jul 18, 2017 at 8:00 pm
            लेख छान आहे पण थोडेफार कवित्व आपल्या भारतीय खेळाडूंचे (जे कोणताही वशिला न घेता कर्तृत्व सिद्ध केले असे) गावे नाही ज ्यास निदान लेखणी खरडू कविता.
            Reply
            1. M
             MAHESH
             Jul 18, 2017 at 6:07 pm
             डिअर लोकसत्ता टीम , मी नेहमी तुमचे लेख वाचतो, ा ते सत्याच्या जवळचे आणि चुकीच्या गोष्टीं चे कोथळा बाहेर काढणारे असेच वाटत आले आहेत. आपल्या सर्वांच्या लाडका रॉजर वरचा हा अत्यंत सोप्या भाषेतला आणि तरीही त्याच्या गुणांची उंची दाखवून देणारा आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. एक सामान्य चाहता
             Reply
             1. R
              RT Patil
              Jul 18, 2017 at 5:37 pm
              सर्वांग सुंदर असा अग्रलेख !
              Reply
              1. मनीष
               Jul 18, 2017 at 3:42 pm
               खूप दिवसांनी असा चांगला लेख वाचायला मिळाला सगळ्यात महत्वाचे कोणालाही अनुलेखाने शाल जोडीतील मारलेले नाहीत.
               Reply
               1. S
                Suraj
                Jul 18, 2017 at 2:23 pm
                ते म्हणताना ना आनंदाची भावना असते. ना रागाची. त्वेषाची तर नसतेच नसते. ज्यासाठी प्रयत्न करावयाचा ते साध्य झाले की त्याचा आनंद अश्रूद्वारे सांडला तर त्याला त्यात कमीपणा वाटत नाही. सुंदर लेख.
                Reply
                1. B
                 bhakti
                 Jul 18, 2017 at 1:51 pm
                 बरं कि हा फेडरर मोदींना भेटला नाही .. नाहीतर सगळी ४ हि विजेतेपद पटवली तरी तो कसा खराब खेळतो असा अग्रलेख आला असता...हा हा हा
                 Reply
                 1. G
                  Gajanan Masurkar
                  Jul 18, 2017 at 1:49 pm
                  फारच सुंदर लेख
                  Reply
                  1. U
                   Ulhas
                   Jul 18, 2017 at 12:52 pm
                   अग्रलेखाचा मथळा (‘कोर्टा’तील कविता) देखील मनोरम आहे.
                   Reply
                   1. U
                    Ulhas
                    Jul 18, 2017 at 12:49 pm
                    अप्रतिम अग्रलेख. अभिनंदन.
                    Reply
                    1. R
                     Raj
                     Jul 18, 2017 at 12:17 pm
                     वेस्ट इंडिजचा द्रुतगती गोलंदाज मायकेल होल्डींगला " Poetry in Motion " म्हणायचे. कृपया ही प्रतिक्रिया गायब करू नये.
                     Reply
                     1. P
                      pamar
                      Jul 18, 2017 at 11:53 am
                      संपादकांनी फक्त अराजकीय लेख लिहिण्याचे आवश्यक आहे. त्यातच त्यांचे कर्तृत्व दिसते. नाहीतर रोज रोज मोदींवर दुगाण्या झाडण्यात संपादकाला धान्य वाटत असेल आणि खर्या मालकाची चाकरी होत असेल पण त्यात काही दम नाही.
                      Reply
                      1. Load More Comments