आंतरराष्ट्रीय पातळीवर महिला दिनानिमित्ताने महिलांना भेडसावणारी परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न होतो. परंतु आपला प्रश्न देशांतर्गत आहे..

ज्या समाजात योग्य ते कित्ते न घेता अडकित्तेच घेण्याची अहमहमिका सुरू असते त्या समाजात अशा दिनांचा ताबा अलगदपणे चतुर बाजारपेठेच्या हाती जातो आणि असे दिवस म्हणजे केवळ इव्हेंट होतात. महिला दिनाचे असे झाले आहे..

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Can you feed ducks bread
तुम्ही बदकांना ब्रेड खायला घालू शकता का? बदकांना काय खायला द्यावे, काय नाही?

अलीकडे दिवस घालण्याची प्रथा फारच रूढ झाली आहे. मातृ दिन, पितृ दिन, प्रेम दिन, विज्ञान दिन, मातृभाषा दिन, मराठी दिन, पत्रकार दिन आदी. एरवी आई-वडिलांकडे ढुंकूनही न पाहणारे मातृ-पितृ दिनांच्या निमित्ताने पालक-प्रेमाचे कढ काढतात आणि मराठीचे दैनंदिन मारेकरी उसने अवसान आणत तो दिवस सेलिब्रेट करतात. या निमित्ताने कोणी तरी रिकामटेकडा संगीतकार कलात्मक झटापट आणि माल-विक्रीकौशल्याची खटपट करीत अभिमानगीत गात लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो. विज्ञान दिनाची अवस्था तर याहूनही वाईट. अंधश्रद्धा पसरवण्यात आघाडीवर असणारे, आपल्या दैनंदिन व्यवहारात आपल्या उत्पादन विक्रीसाठी देवादिकांच्या कुबडय़ा घेणारेही या एका दिवसापुरते विज्ञानवादी होतात. पत्रकार दिन म्हणून साजऱ्या होणाऱ्या दिवसाचेही तसेच. वास्तविक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारितेचा धर्म पाळणाऱ्या दिवंगत बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून पाळली जाते. अन्य अनेक दिनांप्रमाणे त्याचाही आता इव्हेंट झाला असून नको त्यांची मदत आणि आधार घेत पत्रकार मंडळी तो आता साजरा करतात. असो. वरवर पाहता त्यात गर ते काय, असा प्रश्न अनेकांना पडू शकेल. अशा दिनांच्या निमित्ताने बाजारपेठेत काही उलाढाल होते आणि संबंधित विषय चíचले जातात. तेव्हा यात आक्षेप घ्यावे असे काय, असेही अनेकांना वाटेल. मुद्दा आक्षेपांचा नाही. तर तो आहे या दिनांचे खरे माहात्म्य बाजूस पडून केवळ बाजारपेठीय झगमगाट उरला, हा. अशा अनेक समारंभीय दिनमालिकेतील महत्त्वाचा दिन म्हणजे महिला दिन.

८ मार्च, म्हणजे आज, तो जगभर साजरा केला जातो. अन्य दिवस आणि महिला दिन यांत मूलत: फरक आहे. अन्य बहुतेक दिनांचा जन्म उत्सवी स्वरूपासाठीच झाला. महिला दिनाचे तसे नाही. समाजवादापासून चंगळवादाकडे असा त्याचा प्रवास आहे. अमेरिकेत तयार कपडे बनविणाऱ्या उत्पादन केंद्रात महिलांच्या होणाऱ्या शोषणाविरोधात १९०८ साली तेथील समाजवादी पक्षाने पहिल्यांदा संप केला. त्या संपाच्या स्मरणार्थ पुढील वर्षी २८ फेब्रुवारीस महिला दिन पाळला गेला. तो पहिला महिला दिन. त्यानंतर दोन वर्षांनी डेन्मार्कमध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषद भरली असता तीत सहभागी झालेल्या जर्मन प्रतिनिधींनी दर वर्षी महिला दिन पाळण्याची गरज व्यक्त केली. महिलांना एकूणच ज्या काही अत्याचारांना सामोरे जावे लागते त्याकडे लक्ष वेधण्यासाठी असा दिवस साजरा केला जावा, असे तेथे मुक्रर करण्यात आले. त्यानंतर पुढील वर्षी १९ मार्च या दिवशी संपूर्ण युरोपात महिला दिन साजरा झाला. त्या दिवशी युरोपातील अनेक शहरांत जगभरातील महिलांच्या हलाखीकडे लक्ष वेधणारी निदर्शने झाली. िलगभेदास मूठमाती दिली जावी आणि महिलांना मतदानादी अधिकार मिळावेत या प्रमुख मागण्या या निदर्शनांतून समोर आल्या. या सर्वाचा ८ मार्च या दिवसाशी काहीही संबंध नव्हता. तिकडे अमेरिकेत मात्र फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या रविवारी महिला दिन पाळण्याची परंपरा तेथील समाजवादी पक्षाने सुरू ठेवली. रशियानेही तीच प्रथा अंगीकारली. परंतु १९१४ साली पहिल्यांदा काही कारणांमुळे हा दिन ८ मार्च रोजी साजरा झाला. तेव्हापासून ८ मार्च आणि महिला दिन हे समीकरण जुळले ते जुळलेच. पुढे रशियन राज्यक्रांतीनंतर व्लादिमिर लेनिन याने ८ मार्च या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्याची प्रथा सुरू केली आणि महिला दिनाचे प्रस्थ वाढले. त्यानंतर सातत्याने महिला संघटना, संयुक्त राष्ट्रे आदींनी या महिला दिनास पावित्र्य मिळवून दिले. जागतिक राजकारणातील िहसाचारात होणारी महिलांची होरपळ, विस्थापित महिलांच्या समस्या, अनेक समाजांत महिलांना असणारे दुय्यम स्थान, त्यांचे होणारे लैंगिक शोषण आदी गंभीर विषयांकडे या दिनाच्या निमित्ताने जगाचे लक्ष वेधले गेले आणि त्यातून काही भरीव सुधारणा होण्यास मदत झाली. आजही आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांत महिला दिनाचे म्हणून गांभीर्य असून त्या निमित्ताने महिलांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न होतो. तेव्हा त्यासाठी महिला दिनाचे महत्त्व आहे, हे निश्चित.

परंतु आपला प्रश्न देशांतर्गत आहे. ज्या समाजात योग्य ते कित्ते न घेता अडकित्तेच घेण्याची अहमहमिका सुरू असते त्या समाजात अशा दिनांचा ताबा अलगदपणे चतुर बाजारपेठेच्या हाती जातो आणि असे दिवस म्हणजे केवळ इव्हेंट होतात. महिला दिनाचे असे झाले आहे. या निमित्ताने महिला मोटारचालकांच्या स्पर्धा, बडय़ा बडय़ा मॉल्समध्ये महिलांना खरेदीवर सूट, निम्म्या दरांत सिनेमाचे तिकीट आदी बावळट उपक्रमांचीच रेलचेल आपणाकडे दिसते. ते देखील हे सर्व अत्यंत सुस्थितीतील महिलांसाठी. परंतु या महिला दिनाच्या निमित्ताने शेतमजुरी करणाऱ्या वा देहविक्रय करावयाची वेळ आलेल्या वा घरातील पुरुष केंद्रित व्यवस्थेमुळे मुलीचा गर्भ पाडावा लागलेल्या महिलांच्या परिस्थितीविषयी कोणी ब्रदेखील काढताना दिसत नाही. या दिनाचे सर्व काही शहरे आणि माध्यमकेंद्रित. फेटे बांधून मोटारसायकली चालवणाऱ्या महिलांची आकर्षक छायाचित्रे छापणे म्हणजे महिला दिन साजरा करणे, ही यांची समज. खाऊनपिऊन सुखासीन घरातल्या महिलांचा एक वर्ग यांत आनंद मानणारा. त्यांनाही यात काही आक्षेपार्ह वाटेनासे झाले आहे. परिणामी हे असे दिन म्हणजे आपल्याकडे बाजारपेठीय उत्सव तेवढा ठरतो. या वातावरणात तोंडी लावावयास म्हणून शनििशगणापूर वगरे विषय असतात. पण बाकी सगळाच आनंद. हे याच असे नव्हे तर सर्वच दिनांबाबत झाले आहे. ४ ते ११ मार्च या काळात आपल्याकडे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह पाळला जातो. विविध औद्योगिक आस्थापने, सरकारी यंत्रणा यांनी अतिरिक्त सावधगिरी बाळगून या काळात अपघात आदी होऊ नयेत यासाठी काळजी घेणे अपेक्षित आहे. परंतु आपली बेफिकिरी इतकी की याच सप्ताहाच्या काळात नौदलाच्या आयएनएस विराट या एकमेव विमानवाहू नौकेवरील आगीत मुख्य अभियंता होरपळून गेला, तिकडे उत्तरेत रावी नदीच्या पाण्याच्या लोंढय़ात आपले सनिक वाहून गेले आणि ऐन मुंबईत, महानगरपालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर भुयारी गटारांतील दूषित वायूंमुळे दोन कर्मचारी हकनाक मेले. या तीनही मृत्यूंमागे आहे सुरक्षा उपायांची हेळसांड. लष्करी सेवा तर आपण किती सजग आहोत हे दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत. तरीही हे असे प्राण जातात. मग ती कोसळत राहणारी विमाने असोत वा पाणबुडी. या तीन मृत्यूंतील तिसरा- म्हणजे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा- घटक हा जणू अस्तित्वातच नाही, अशा मिजाशीत समाजातील अन्य घटक वावरतात. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या मरणवृत्तावर हळहळदेखील व्यक्त होत नाही. याच महाराष्ट्रात कथित लैंगिक व्यभिचारासाठी तरुणीला भर गावात सर्वाच्या देखत चाबकाच्या फटक्यांची शिक्षा दिली जाते आणि कोणी हूं की चू करीत नाही. दलित तरुण कथित उच्चवर्णीय तरुणीच्या प्रेमात पडला म्हणून त्याच्या देहाची खांडोळी करण्यासही आजच्या पुरोगामी महाराष्ट्रातील एक वर्ग मागेपुढे पाहत नाही आणि राज्याच्या सर्वात धनिक प्रदेशातील स्त्री-भ्रूणहत्या काही कमी होत नाहीत.

हे सर्व बदलावयाचे असेल तर ते केवळ हे असे दिवस साजरे करण्याने बदलणारे नाही. त्यासाठी विचारांतच योग्य ते बदल करावे लागतील. तसे करताना आपण महिलांना काही तरी देत आहोत, या पुरुषी मानसिकतेलाच मूठमाती द्यावी लागेल. नपेक्षा ८ मार्च हा महिला दिन नवयुगाचे हळदीकुंकू तेवढे ठरेल.