19 March 2019

News Flash

सारेच काचगृहवासी..

सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या की आपण अशी प्रार्थना करतो.

 

राजकारण आणि धर्मकारण यात अद्वैत पाहू इच्छिणाऱ्यांची बहुसंख्या असलेल्या देशामध्ये, एका धार्मिक आखाडय़ाचा प्रमुख एका राज्याचा मुख्यमंत्री असणाऱ्या देशामध्ये, येथे आपल्याच धर्माचे राज्य स्थापन व्हावे यासाठी झटत असणाऱ्या संघटनांचा बोलबाला असणाऱ्या देशामध्ये एका ख्रिश्चन धर्मगुरूने निवडणुकीच्या संदर्भात लिहिलेल्या एका पत्राने खळबळ माजावी ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. दिल्लीचे आर्चबिशप अनिल कौटो यांनी आपल्या धर्मबांधवांना उद्देशून लिहिलेले हे पत्र. त्यात त्यांनी काय म्हटले आहे? सध्या आपण वादळी राजकीय वातावरणातून जात आहोत. आपल्या राज्यघटनेमधील लोकशाही तत्त्वांना आणि आपल्या देशाच्या धर्मनिरपेक्षतेला त्याचा धोका आहे, असा त्या पत्राचा प्रारंभ. त्यानंतर ते लिहितात, की देशाचे नेते आणि देश यांसाठी सदोदित प्रार्थना करणे ही आपली नेहमीची रीत. त्यातही खासकरून सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या की आपण अशी प्रार्थना करतो. २०१९च्या निवडणुका जवळ आल्या आहेत. तेव्हा आपण दर शुक्रवारी आपल्या प्रार्थनास्थळांमध्ये अशी प्रार्थना करू या. निवडणुकांत खऱ्या लोकशाहीची प्रवृत्ती दिसो, आपल्या राजकीय नेत्यांचे मन प्रामाणिक देशप्रेमाने उजळून निघो अशा आशयाची ती प्रार्थना. आर्चबिशप यांचे हे निवेदन प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ माजली. भाजपचे काही नेते त्यावरून फारच संतापले. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना तर न्यूटनचा नियमच आठवला. त्यांचे म्हणणे असे, की जर चर्चने मोदी सरकार निवडून येऊ नये म्हणून प्रार्थना करण्यास लोकांना सांगितले असेल, तर इतर सगळ्या धर्मातील लोकही कीर्तन-पूजा करू शकतील. यावर, आर्चबिशप यांनी आपण मोदीविरोधात नाही हे स्पष्ट केले. तो खुलासा मोदीसमर्थकांना मान्य होणार नाही हे दिसतेच आहे. या पत्रावरून आपले नेहमीचे धार्मिक राजकारण पेटवता येईल हे स्पष्ट दिसत असताना कोण गप्प बसेल? काळजीचे कारण आहे ते हेच. या देशात सातत्याने हा धर्म विरुद्ध तो धर्म अशी लढाई पेटती ठेवण्यातच अनेकांना रस आहे. आणि ही आग पेटवणारेच वर आपणास सांगत असतात, की आम्ही धर्माधर्मात, जातीजातींत तेढ निर्माण करीत नाही. वस्तुत: कोणतेही धार्मिक राजकारण हे अन्य धर्मीयांच्या द्वेषावरच उभे असते. आज देशात द्वेषाचा आगडोंब दिसतो त्याचे कारण हेच राजकारण आहे. हा आगडोंब शमवायचा असेल, तर त्यावर एकच उपाय आहे. राज्यघटनेतील सेक्युलॅरिझमचे तत्त्व. धर्म आणि राजकारण यांची फारकत. नेमके तेच कोणाला नको आहे; ना धार्मिक नेत्यांना, ना राजकीय पक्षांना. या राजकारणाच्या पद्धती भिन्न आहेत. येथील बहुसंख्य हिंदूंचा पक्ष असलेला काँग्रेस अन्य धर्मीयांचे लांगूलचालन करताना दिसतो, तर बहुसंख्य हिंदुत्ववाद्यांचा पक्ष असलेला भाजप हिंदूंचा अनुनय करताना दिसतो. यातून मग कधी काँग्रेससाठी एखादा मुस्लीम धर्मगुरू फतवा वा ख्रिस्ती धर्मगुरू निवेदन काढताना दिसतो, तर कधी भाजपसाठी एखादी साध्वी, एखादा योगगुरू सभा गाजवताना दिसतो. हे सगळे आपल्या डोळ्यांदेखत चाललेले असते आणि तरीही हे लोक आपल्याला सांगत असतात, की आम्ही धर्माधर्मात फूट पाडत नाही, आम्ही धर्माचे राजकारण करीत नाही. यातून आपण लक्षात घ्यावी अशी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे- हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. त्यात आजेदुजे करावे असे कोणीही नाही. यांना एवढेही कळत नाही, की ते सगळेच काचगृहात राहतात. अशा लोकांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करायची नसते..

First Published on May 24, 2018 2:02 am

Web Title: archbishop anil joseph thomas couto modi government 2