जगात बहुतेक सर्व देशांमध्ये- आणि विशेषत: प्रगत देशांमध्ये कोविड-१९ महासाथीची दुसरी आणि तिसरी लाट आलेली दिसून आली. दिवाळीनंतर भारतातही तसे काहीसे घडू शकेल असा अंदाज साथरोगतज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, विश्लेषकांनी व्यक्त केला होता. त्यामुळे सरकारी यंत्रणा सावध होत्या. परंतु कोविडबाधित आणि कोविडबळींचा आलेख सातत्याने घसरतोच आहे. दरम्यानच्या काळात लसीकरणालाही सुरुवात झाल्यामुळे या दोन्ही घडामोडी सकारात्मक आणि विश्वास वाढवणाऱ्या आहेत, हे कबूल करावेच लागेल. साथीविषयी आणि त्यातही कोविड-१९सारख्या महासाथीविषयी, ती पुन्हा उलटणारच नाही असे खात्रीलायक कोणीही सांगू शकत नाही. कोविडच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरलेला ‘सार्स करोनाव्हायरस-२’ हा विषाणू तर अत्यंत फसवा ठरलेला आहे. त्याच्या गुणधर्माविषयी आजही संशोधन सुरू आहे. त्याच्या निराकरणासाठी लस विकसित होते न होते, तोवर ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील या देशांमध्ये त्याच्या अधिक घातक आवृत्त्याही बनू लागल्या. मूळ करोनाविरोधी म्हणून विकसित झालेल्या चार ते पाच ज्ञात लशी करोनाच्या नवीन आवृत्त्यांवर कितपत परिणामकारक ठरतील यावर नव्याने संशोधन सुरू करावे लागले. भारतात ब्रिटनमधील नवकरोना आढळून आला असला, तरी त्याचे आणखी दोन अवतार येथे अद्याप आढळून आलेले नाहीत हे दिलासादायक म्हणावे लागेल. आणखी काही आकडेवारी हुरूप वाढवणारी ठरते. उदाहरणार्थ, गेले अनेक दिवस प्रतिदिन बाधितांची संख्या १३ हजारांच्या खाली आलेली आहे. कोविडमुळे देशभर होणाऱ्या मृत्यूंची संख्या- प्रत्येक मृत्यू ही अत्यंत क्लेशकारक घटना असते हे मान्य करूनही- बुधवारी सलग पाचव्या दिवशी १००च्या आत नोंदवली गेली. १० फेब्रुवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांमध्ये देशातील १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकही मृत्यूची नोंद झाली नाही. तर सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेले सलग तीन आठवडे बळींची नोंद झालेली नाही. हे एकीकडे घडत असताना, बुधवापर्यंत राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत ६६ लाखांहून अधिक आरोग्यसेवक आणि अत्यावश्यक सेवकांचे लसीकरण झाले होते. हे प्रमाण नजीकच्या काळात आणखी वाढेल. मार्चपासून लसीकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे आहे. त्यामुळे लशींचा लाभ आणखी मोठय़ा लोकसंख्येला होऊ शकेल. तो होणे आर्थिक गाडा रुळांवर येण्यासाठी अत्यावश्यक आहे. कारण कोविडविरोधी लढय़ाची नेमकी दिशा आणि रूपरेषा आता बरीचशी समजलेली आहे. पण ‘आर्थिक लसीकरण’ मात्र देशाच्या आर्थिक आरोग्यासाठी सातत्याने प्रदीर्घ काळ करावे लागणार. त्यामुळेच उरलीसुरली बंधने शिथिल करण्याकडे लक्ष केंद्रित करणे अत्यावश्यक आहे. भारतात स्वच्छतेविषयी अनास्थेतून विकसित झालेली अंगभूत रोगप्रतिकारशक्ती, अधिक सरासरी तापमान, क्षयरोगविरोधी ‘बीसीजी’ लसीकरणामुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती, तरुण लोकसंख्येचे लक्षणीय प्रमाण अशी अनेक कारणे कोविडचा आलेख घसरण्यामागे दिली जात आहेत. काही शहरांमध्ये झालेल्या सेरो-सर्वेक्षणांमध्ये मोठय़ा प्रमाणात लोकसंख्येला करोनाची बाधा होऊन प्रतिपिंडेही निर्माण झाल्याचे आढळून आले आहे. लसीकरणपूर्व सामूहिक प्रतिकारशक्तीचे आडाखे यातून मांडले जात आहेत. अर्थात अजूनही मोठी मजल मारायची आहे. करोनाचे निराकरण वगैरे मृगजळाच्या मागे न जाता, लसीकरण आणि सार्वजनिक, वैयक्तिक स्वच्छता यांचे अवलंबन करण्यात ढिलाई होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. मागे या स्तंभात म्हटल्याप्रमाणे, करोनाविरोधी लढाई ही एखादी शर्यत नव्हे. यात उपान्त्य, अंतिम फेरी असे काही असत नाही. त्यामुळे सातत्याने उपाय योजणे यावरच लक्ष केंद्रित करावे लागेल.