19 January 2021

News Flash

काँग्रेसमधील ‘चाणक्य’

सोनिया गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांचे राजकीय सचिव म्हणून पक्षाची सारी सूत्रे त्यांच्याच हाती होती.

(संग्रहित छायाचित्र)

काँग्रेस पक्ष सध्या अडचणीतून मार्गक्रमण करीत असतानाच अहमद पटेल यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले. काँग्रेसचा जनाधार कमी होऊन नेत्यांचे हेवेदावे वाढले असताना अहमदभाई (पक्षात त्यांचा उल्लेख या नावानेच होत असे) यांच्यासारख्या संकटमोचकाची पक्षाला खरी गरज होती. आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई आणि आता अहमद पटेल हे दोन ज्येष्ठ नेते करोनामुळे काँग्रेसने गमावले. पटेल हे गुजरातमधील भरुचचे. घोषित आणीबाणी मागे घेतल्यानंतरच्या (१९७७) निवडणुकीत देशभर काँग्रेसची धूळधाण उडाली असताना पटेल भरुच मतदारसंघातून विजयी ठरले होते. तीनदा लोकसभा तर पाच वेळा राज्यसभेचे ते सदस्य होते. गांधी घराण्याचे निष्ठावान असल्यानेच राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आणि ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. राजीव गांधी हे पंतप्रधान असताना पटेल हे त्यांचे संसदीय सचिव होते. सोनिया गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांचे राजकीय सचिव म्हणून पक्षाची सारी सूत्रे त्यांच्याच हाती होती. असे म्हणतात की, काँग्रेस पक्षाची केंद्रात व विविध राज्यांमध्ये सत्ता असताना अहमदभाईंचा दूरध्वनी आला वा भेटीसाठी निरोप आला तरी केंद्रीय मंत्री वा मुख्यमंत्र्यांना घाम फुटे. कारण मुख्यमंत्री बदलणे किंवा पक्षात फेरबदल करण्याचे सारे निर्णय पटेल यांच्या सल्ल्याने होत असत. सोनिया गांधी यांच्या कार्यकाळात तर पक्षातील निर्णयप्रक्रियेत पटेल यांचा शब्द प्रमाण मानला जायचा. २००४ ते २०१४ या काळात केंद्रात काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीची (यूपीए) सत्ता असताना सरकार आणि काँग्रेस पक्षात समन्वयाची जबाबदारी पटेल हे पार पाडत असत. अहमद पटेल यांचा दिल्लीतील दरबार रात्री दहानंतर सुरू होई आणि मध्यरात्रीपर्यंत तो चाले. तेव्हा देशातील मोठे उद्योगपती, नोकरशहा, कं त्राटदार या साऱ्यांचा राबता हा पटेल यांच्याकडे असायचा. प्रत्येक राजकीय पक्षाला धूर्त नेत्याची आवश्यकता असते. भारताच्या पक्षीय राजकारणात सोवळेपणाने यश मिळत नाही. यासाठी आर्थिक, राजकीय व्यवस्थापन आवश्यक असते. भाजपमध्ये प्रमोद महाजन किं वा समाजवादी पक्षातील अमरसिंग यांची उदाहरणे देता येतील. अहमद पटेल याच गटातील. अटलबिहारी वाजपेयी किं वा लालकृष्ण अडवाणी हे सत्तेत असताना त्यांच्यावर कोणतेही शिंतोडे उडले नाहीत याचे कारण तेव्हा प्रमोद महाजन हे सक्रिय होते, असे निरीक्षण तेव्हा एका राजकीय विश्लेषकाने नोंदविले होते. डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्याकडे सत्तेचा सुकाणू असताना पडद्यामागून सारी सूत्रे हलवणाऱ्या पटेल यांच्याबाबत हेच म्हणता येते. लोकसभा वा विधानसभा निवडणुकीच्या वर्ष-सहा महिने आधी त्या राज्यांतील राजकीय परिस्थिती, कोणत्या समाजाचे किती मतदार, पक्षातील प्रभावी नेते कोण याचा सारा तपशील पटेलांकडे तयार असे. सोनिया गांधी यांच्याप्रमाणे राहुल गांधी यांचे पटेल यांच्याशी तेवढे सख्य निर्माण झाले नाही. यामुळे मधल्या काळात पटेल हे काहीसे बाजूला पडले. परंतु पक्षाचे खजिनदारपद पुन्हा त्यांच्याकडे सोपविण्यात आले. राज्यात शिवसेनेसह सत्ता स्थापन करण्याकरिता पटेल यांनीच सोनियांना राजी केले होते. एरवी कधी दिल्लीच्या बाहेर न पडणारे पटेल हे तेव्हा आठवडाभर मुंबईत तळ ठोकून होते. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मोदी-शहा जोडीला टक्कर देणाऱ्या पटेल यांच्यासारख्या ‘चाणक्या’ची काँग्रेसला आता उणीव भासेलच, पण काँग्रेसमध्ये नव्या नेत्यांना संधी द्यावी लागण्याचा दबावही वाढणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2020 12:07 am

Web Title: article on ahmed patel a senior congress leader died of coronation early wednesday morning abn 97
Next Stories
1 शांतताप्रिय ‘आसामी’
2 अभिव्यक्तीपुढचे धोके
3 भानावर आणणारे अंजन..
Just Now!
X