लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या प्रचंड स्फोटाच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसृत होऊ लागल्या, त्या वेळी सुरुवातीला त्या खोटय़ा असल्याचेच भासून गेले. एखाद्या अणुस्फोटामध्ये उठतो तसा पांढरा ढग याही स्फोटातून उमटला. अणुस्फोटाइतका नाही पण तरीही अत्यंत शक्तिशाली हा स्फोट बैरुत बंदरात साठवून ठेवलेल्या अमोनियम नायट्रेटच्या गोदामाला आग लागल्यामुळे झाला. स्फोटाची तीव्रता भयानक होती आणि गुरुवापर्यंत जवळपास दीडशे बळी, ५ हजार जखमी आणि कोटय़वधींचे नुकसान अशी तिची व्याप्ती होती. जवळपास पाच लाख रहिवासी तेथे सध्या बेघर झाले आहेत. कारण घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अमोनियम नायट्रेट मुळात अत्यंत स्फोटक. बैरुतच्या त्या गोदामात तर २७५० टन इतक्या प्रचंड प्रमाणात ते साठवले गेले होते. इमारतीत कुठल्याशा कारणामुळे आग लागली आणि ती या स्फोटकांपर्यंत पोहोचली. त्यातून झालेल्या स्फोटातून उद्भवलेल्या धक्कालहरींचे दणके पार भूमध्य समुद्र ओलांडून सायप्रसपर्यंत पोहोचले. स्फोटस्थळापासून किमान २२० कि.मी.वर असलेल्या जॉर्डनमध्ये या स्फोटाने ३.३ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाइतक्या धक्क्याची नोंद झाली. खाणकाम आणि खतांसाठी लागणारे हे संयुग. ते व्यावसायिक वापरासाठीच लागते आणि स्फोटक असल्यामुळे अत्यंत जपून व सुरक्षित ठिकाणी बंदोबस्तात ठेवावे लागते. ही प्राथमिक खबरदारीही लेबनीज सरकार वा प्रशासनाने बैरुतमध्ये बाळगलेली दिसत नाही. २०१३मध्ये लेबनॉनच्या अधिकाऱ्यांनी जॉर्जियाहून मोझांबिकला अमोनियम नायट्रेट घेऊन जाणारे एक जहाज बैरुत बंदराजवळ अडवले आणि त्यातील माल जप्त केला. तेव्हापासून बंदरातील एका गोदामात अमोनियम नायट्रेटचा हा प्रचंड साठा साठवून ठेवण्यात आला आहे. बैरुतमधील बंदरे आणि सीमा शुल्क विभागाने हा साठा इतरत्र हलवण्याविषयी स्थानिक प्रशासन आणि न्याय विभागाला वारंवार लिहूनही काही झाले नाही. ही अनास्था आणि निष्काळजीपणा लेबनॉनच्या सध्याच्या राजकीय आणि आर्थिक अनागोंदीशी अनुसरून आहे. आता या स्फोटानंतर सर्वप्रथम बैरुत बंदराशी संबंधित अधिकाऱ्यांनाच स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे. खरे तर यापेक्षा कितीतरी वरिष्ठ व्यक्तींना एव्हाना जबाबदार ठरवले जाऊन त्यांच्यावर कारवाईदेखील व्हायला हवी होती. लेबनॉनमध्ये सध्या हे अशक्य आहे. आखातातील अनेक बडय़ा अरब देशांच्या वळचणीला वसलेला हा एक छोटा अरब देश. तेलसंपन्न नसूनही भूमध्य समुद्रातील मोक्याचे स्थान आणि ख्रिस्ती व इस्लाम धर्मीयांच्या समसमान लोकसंख्या प्रमाणामुळे रुजलेला (काही प्रमाणात तडजोडीचा) उदारमतवाद यांमुळे बैरुत हे कित्येक वर्षे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आणि सर्वसमावेशक, प्रागतिक शहर म्हणून ओळखले जायचे. पण एकीकडे सीरियाचा वर्चस्ववाद आणि दुसरीकडे इस्रायलचा संशयमिश्रित आडमुठेपणा यांच्या कचाटय़ात सापडल्याने निश्चित धोरण आणि स्वायत्तता हरवून बसलेला हा देश. १९७५ ते १९९०मध्ये जवळपास निर्नायकी अनागोंदीनंतर तो पुन्हा सावरू लागला होता. अरब देशांच्या सान्निध्यात असूनही प्रचंड प्रमाणात इंधन तुटवडा, आवाक्याबाहेर गेलेला चलनफुगवटा, विजेचा तुटवडा, बेरोजगारी या समस्या गेल्या काही वर्षांतील मंदीमुळे वाढू लागल्याच होत्या. जागतिक व्यापारातील मंदीचा थेट फटका लेबनॉनच्या अर्थव्यवस्थेला बसला. त्यातून सावरण्यासाठी आवश्यक भक्कम राजसत्ता आणि प्रशासन तेथे नाही. त्यामुळे हा देश सध्या एखाद्या यादवीजर्जर आफ्रिकी देशापेक्षा फार वेगळा ठरत नाही. तशातच कोविडने इतर देशांप्रमाणेच या देशालाही ग्रासले. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तेथे झालेला ताजा महास्फोट लेबनॉनला अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलणारा ठरला. त्यातून बाहेर येण्याची या देशाची क्षमता नाहीच, पण त्याला मदत करण्याची इतर राष्ट्रसंघटना किंवा देशांचीही कुवत आणि नियत उरलेली नाही.