ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटीत भारतीय संघाने मिळवलेला विजय आणि त्याद्वारे मालिकेत मिळवलेले २-१ असे यश अकल्पित व म्हणूनच अभूतपूर्व होते. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळणे हेच मुळात आव्हान. ती जिंकणे हे त्याहूनही खडतर. परंतु तेथे खेळणे हे किती आव्हानात्मक वा खडतर आहे याचा विचार करायची सवडही भारतीय संघाला मिळत नव्हती. अ‍ॅडलेडमधील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ ३६ धावांमध्येच उखडला गेला त्यावेळी तो पूर्ण ताकदीनिशी खेळत होता, हे लक्षात घ्यावे लागेल. या क्रिकेट संघरूपी बुरुजाचे एकेक चिरे नंतर ढासळू लागले होते. सुरुवातीला कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला. मग एकामागोमाग एक गोलंदाज जायबंदी होऊ लागले. चौथ्या कसोटीचा पहिला दिवस उजाडला तोपर्यंत भारताकडे चार पहिल्या पसंतीचे तेज गोलंदाज, दोन प्रमुख फिरकी गोलंदाज जायबंदी झाले होते आणि म्हणून खेळू शकत नव्हते. रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा या प्रमुख फलंदाजांना म्हणावा तसा सूर गवसत नव्हता आणि प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेवर नेतृत्वाचा अतिरिक्त भार होता. अ‍ॅडलेडमधील नामुष्कीनंतर- भारत ही मालिका ०-४ अशी गमावणार, हे अघोषित प्राक्तन मानले गेले. पण तसे घडले नाही. मेलबर्नला दुसऱ्या कसोटीत अजिंक्य रहाणेने झुंजार शतक झळकावले आणि भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. मालिकेला कलाटणी मिळाली, ती त्या सामन्यातून. तो विजय जगभरातील क्रिकेट रसिकांसाठी, विश्लेषकांसाठी अनपेक्षित ठरला तरी अजिंक्य आणि त्याच्या सहकाऱ्यांनी निकाल काय लागेल, या फंदातच न पडता नैसर्गिक खेळ केला. ऑस्ट्रेलियाचे अनेक कच्चे दुवे हेरून त्यांचा त्यांनी फायदा उठवला. अजिंक्यच्या शांत, सरळमार्गी आणि आत्मविश्वासपूर्ण नेतृत्वाचा महिमा असा, की ज्यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये भावनावेग या घटकाला स्थान राहिले नाही. त्यामुळे मेलबर्नची कसोटी जिंकल्यानंतर बाकीच्या दोन गमावूनही काही बिघडणार नव्हतेच. पण तो विचारच सध्याच्या क्रिकेट संघाच्या समूहमानसाला शिवला नसावा. पराजयाचे शल्य नाही, विजयाचा दंभ नाही, पूर्ण प्रयत्नांनिशी खेळून क्रिकेटचा आनंद लुटणे यातच या संघाने समाधान मानले. त्यामुळे अक्षरश: दिवसागणिक एक-एक खेळाडू जायबंदी होत होता, प्रत्यक्ष सामन्यामध्येही कधी रविचंद्रन अश्विन, कधी चेतेश्वर पुजारा उसळत्या चेंडूंचा मारा सहन करत निश्चल उभे राहिले. कधी हनुमा विहारी, तर कधी शार्दूल ठाकूर वा वॉशिंग्टन सुंदर दडपण झुगारून खेळत राहिले. शुभमन गिल आणि ऋषभ पंत या युवा क्रिकेटपटूंनी तर अक्षरश: एकहाती सामने फिरवून दाखवले. कारण ‘अमुक एखाद्याला पर्यायच नाही’ असे म्हणत किंवा ऐकत हातावर हात ठेवून प्राक्तनचिंतन करणाऱ्यांतला हा संघच नाही. पर्याय आजूबाजूला नेहमीच उपलब्ध असतात, ते हुडकण्याची आणि पारखण्याची इच्छाशक्ती हवी, इतकेच! ऑस्ट्रेलियन संघाने संपूर्ण मालिकेत चारच गोलंदाज खेळवले. त्यांच्या संघातही एखाद् दोन अपवाद वगळता फारसे बदल झालेले दिसले नाहीत. या स्थितिवादी प्रवृत्तीला मालिकेच्या अखेरीस जबरी धक्का बसला. ब्रिस्बेन हा ऑस्ट्रेलियाचा अभेद्य गड मानला जायचा. कारण येथे १९८८पासून त्यांनी पराभव पाहिलेला नाही. परंतु भारताच्या दुय्यम किंवा कदाचित तिय्यम संघाने त्यांना धूळ चारली. कारण गृहितकांपेक्षा गृहपाठावर या संघाने भर दिला. एखाद् दुसरा वलयांकित क्रिकेटपटूच सामने जिंकून देऊ शकतो, या समजाला तर केराची टोपलीच दाखवली! अजिंक्य रहाणेच्या अजिंक्य संघाने दिलेला हा धडा क्रिकेटच्या परिघापलीकडेही अनेक बाबींना लागू होतो.