आठवडाभरापूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले. तसेच दोन देशांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लागावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतीय हवाईदलाने बालाकोटवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर उभय राष्ट्रांच्या पंतप्रधानांमध्ये झालेला हा पहिलाच संपर्क. या दूरध्वनी संभाषणानंतर आठवडय़ाभरात पाकिस्तानने पुन्हा नियत दाखवलीच. भारतीय उच्चायुक्तालयाच्या वतीने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदा शनिवारी इफ्तार पार्टीच्या वेळी पाकिस्तानी सुरक्षारक्षकांनी निमंत्रितांना हिसका दाखविला. कराची, लाहोर आदी शहरांमधून राजकारणी, आजी-माजी राजनैतिक अधिकारी, निवृत्त लष्करी अधिकारी, पत्रकार, उद्योगपती आदींना निमंत्रित आले होते. मेजवानी जेथे होती, त्या पंचतारांकित हॉटेलला पाकिस्तानी सुरक्षादले व गुप्तचर अधिकाऱ्यांनी जणू वेढाच घातला होता. भारतीय निमंत्रणावरून आलेल्या पाहुण्यांना इफ्तार रद्द झाल्याचे सांगून पिटाळण्याचा प्रयत्न झाला. मुख्य प्रवेशद्वारापाशी आलेल्यांना अन्य बाजूने प्रवेश असल्याचे सांगण्यात आले. तेथे गेल्यावर पुन्हा मुख्य प्रवेशद्वाराचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला. पाहुण्यांची सुरू असलेली छळणूक बघून भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला असता, आयएसआय या गुप्तचर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना धमकावले तसेच मागे ढकलले. या साऱ्या प्रकाराचे छायाचित्रण करणाऱ्या भारतीय अधिकाऱ्यांचे कॅमेरे हिसकावून घेण्याचे प्रयत्न झाले. ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’च्या एका नेत्याने त्याला आलेला अनुभव ट्विटरवरून कथन केला. याउलट, चार दिवसांपूर्वी नवी दिल्लीत पाकिस्तानी उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीच्या वेळी भारतीय प्रशासनाकडून निमंत्रितांची छळणूक करण्यात आल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला होता. इस्लामाबादमधील प्रकारानंतर भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तान सरकारकडे तीव्र निषेध नोंदविला आहे. नवी दिल्लीतही असाच प्रकार झाल्याचा पाकिस्तानी दूतावासाचा आरोप असला तरी भारत सरकारकडे निषेध वा तक्रार नोंदविण्यात आलेली नाही. भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देणे हे नवीन नाही. भारतीय उच्चायुक्तांची गाडी अडविणे, त्यांना कोणाची भेट घेऊ न देणे, असे प्रकार घडले आहेत. बालाकोटावरील हवाई हल्ल्यानंतर भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या वाहनांचा पाठलागही झाला. पाकिस्तानवर निषेध- खलित्यांचा काहीही परिणाम होत नाही. पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी गेलेली त्यांची आई आणि पत्नी यांना तर पाकिस्तान सरकारने अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली होती. त्यांची थेट भेट होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली होती. तसेच जाधव यांनी मराठीतून बोलण्याचा प्रयत्न केला असता ध्वनिक्षेपक बंद केला गेला. एकमेव अपवाद म्हणजे, भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी हवाई दलाच्या एफ-१६ विमानाचा पाठलाग करताना पकडले गेलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची लगेच सुटका झाली. गेल्या वर्षी सत्तेवर आल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताबरोबरील संबंध सुधारण्यावर भर दिला. कर्तारपूर गुरुद्वाराला भारतीय शीख यात्रेकरूंना विनासायास जाता यावे, म्हणून त्या रस्त्यावर पायाभूत सुविधांची कामे सुरू केली. पण पाकिस्तानी राजकीय नेतृत्वावर नेहमीच तेथील लष्कराचा लगाम असतो. पुढील आठवडय़ात किरगिझस्तानात होणाऱ्या ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या शिखर बैठकीत इम्रान खान यांना मोदी यांच्याशी हस्तांदोलन अथवा अनौपचारिक चर्चा करण्याची कितीही इच्छा असली, तरी असल्या कुरापतींतून नियत दाखवून देणारे हे नेतृत्व भारतीय नेत्यांस कोणत्या तोंडाने भेटणार, हा प्रश्नच आहे.