महाराष्ट्राच्या अध्यापक जगतात श्री. मा. भावे यांची ओळख लढवय्ये नेते अशीच आहे. परंतु आपली ही ओळख आपल्या अभ्यासाने, चिंतनाने आणि लेखनाने बदलण्याची हिंमत भावे यांनी बाळगली. पुणे विद्यापीठाच्या अध्यापक संघटनेचे नेते म्हणून त्यांनी अध्यापकांच्या विविध मागण्यांसाठी खूप लढे दिले. अतिशय मुद्देसूद मांडणी आणि पटवून देण्याची क्षमता यामुळे त्यांना व्यवस्थापनाच्या क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण करता आला. पुण्यातील वाडिया महाविद्यालयात गणित या विषयाचे विभागप्रमुख म्हणून ते कार्यरत होते. गणिताबरोबरच तत्त्वज्ञान या विषयातही भावे यांना विशेष रस होता. त्यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधाचा विषयही गणित आणि तत्त्वज्ञान असाच होता. या विषयावर त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये अनेक निबंधही लिहिले. श्री. मा. भावे यांनी इतिहासाच्या क्षेत्रातही वेगळ्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात केली. अशा तिपेडी विचारधारणेतून त्यांनी केलेले लेखन म्हणून वेगळ्या धाटणीचे आणि विचारप्रवर्तक ठरले. गणिताचा इतिहास हा त्यांचा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. त्यातून ते तर्कशास्त्राकडे वळले आणि तर्कशास्त्र व समाज यांच्या संबंधाचा अभ्यासही त्यांनी केला. ‘न्यायमंजिरी’ या ग्रंथातील ‘जाति’, ‘सामान्य’ आणि ‘व्याप्ति’ यांचे संदर्भ त्यांनी ‘अनुमान’ या त्या ग्रंथातील महत्त्वाच्या संकल्पनेआधारे उलगडून दाखवले होते. नेमस्त तरीही सुस्पष्ट विचारांमुळे त्यांचे लेखन महाराष्ट्रातील विचारवंतांमध्ये मान्यता पावले. भारत इतिहास संशोधक मंडळ आणि वाईची प्राज्ञपाठशाळा या दोन अतिशय दीर्घ परंपरा असलेल्या विचारसंपन्न संस्थांशी भावे यांचा संबंध होता. इतिहास संशोधक मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अतिशय कठीण परिस्थितीत त्यांच्यावर आली. परंतु श्री. मा. भावे यांनी अतिशय कष्टाने या संस्थेचे पुनरुज्जीवन केले आणि महाराष्ट्रातील इतिहास संशोधकांची पंढरी मानल्या गेलेल्या या संस्थेची फेरउभारणी केली. मंडळाचे कार्य जनतेसमोर आणून ती संस्था समाजाभिमुख करण्यासाठी विविध विचारप्रवाहांच्या संशोधकांची मोट बांधण्याचे काम त्यांनी केले. आर्थिक चणचण हे अशा मूलभूत स्वरूपाचे काम करणाऱ्या सगळ्याच संस्थांचे भागधेय असते. भावे यांनी हरप्रयत्नाने या संस्थांना काही प्रमाणात तरी आर्थिक सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कामाची दखल त्या क्षेत्रातील सगळ्यांनीच घेतली.  प्राज्ञपाठशाळेतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या ‘नवभारत’ या नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरीही महत्त्वाची होती. मूलभूत वैचारिक परंपरांचे व्यासपीठ म्हणून या नियतकालिकाने दिलेले योगदान मोलाचे आहे. विचारांचीच कास धरल्यामुळे मानमरातब आणि प्रसिद्धी यांबद्दल जराही हव्यास न बाळगणाऱ्या निवडक विचारवंतांमध्ये श्री. मा. भावे यांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. संस्थात्मक कार्य करणाऱ्यांना अनेकदा अभ्यास कार्यासाठी सवड मिळतेच असे नाही. भावे यांनी प्रयत्नपूर्वक आपला अभ्यास सुरू ठेवला. विविध विषयांवरील लेखनही सुरू ठेवले. त्यामुळे मराठीमध्ये अनेक नव्याच विषयांची ओळखही निर्माण झाली आणि नव्या विचारांच्या नव्या दिशेची सुरुवातही झाली. ‘नवभारत’मध्ये त्यांनी अशा अनवट विषयांवरील जुन्या (१८४० ते १९३० दरम्यानच्या) छापील पुस्तकांची सविस्तर ओळख करून दिली; त्या लेखांचे पुढे लोकवाङ्मय गृहातर्फे ‘जीर्णोद्धार’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. कार्यकर्ता आणि अभ्यासक अशी त्यांची महाराष्ट्राला असलेली ओळख अखेपर्यंत कायम राहिली. त्यांच्या निधनाने एका साक्षेपी तत्त्वज्ञाला महाराष्ट्र मुकला आहे.