भांडवली बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ गुरुवारी ५० हजाराला भोज्या करून आला. हा ‘सुवर्ण’ क्षण लवकरच अनुभवास येणार हे गेले काही महिने बाजाराला आलेले भरते सुचवीतच होते. अनेकांसाठी सेन्सेक्सचा हा टप्पा म्हणजे संक्रांत सरली तरी पतंग उडवण्याचा उत्सव साजरा करावा असा! सेन्सेक्सच्या आजवरच्या प्रवासात पहिला २५ हजारांचा टप्पा ओलांडायला ३५ वर्षे लागली, तर नंतरचे २५ हजार हे गेल्या सहा वर्षांत साजरे झाले; याचा आनंद काहींसाठी विशेषच असेल. केंद्रातील सहा वर्षांच्या झगमगाटी राजवटीला उजळवणारा हा आणखी एक प्रकाशदिवाच जणू! असो. मानवी आयुष्यातही पन्नाशीचे वळण हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. वयाच्या पन्नाशीचे भान शरीरातील सांधे हे दुखण्यासाठीच असतात याची जाणीव गृहस्थाश्रमींना करवून देते. ‘सेन्सेक्स’ या शब्दाची फोड ‘सेन्सेटिव्ह इंडेक्स’ अर्थात संवेदनशील निर्देशांक. ते जर शब्दश: समर्पक ठरायचे तर संवेदनशीलतेचे भान आता तरी निदान दिसावे, असे मुद्दामच म्हणावे लागेल. देशाची अर्थव्यवस्था तब्बल ४५ वर्षांनंतर पहिल्यांदाच वाढ दाखविण्याऐवजी आक्रसणार, तर त्याच काळात भांडवली बाजाराला तब्बल ८० टक्क्यांचे उधाण. हे चित्र विसंगत खरेच; पण सध्या ते तसे दिसते आहे. ते कसे? तर भांडवली बाजार हा वर्तमानापेक्षा भविष्याकडे डोळे लावून असतो आणि सेन्सेक्सची ५० हजारी मजल ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या उज्ज्वल भवितव्याचे द्योतक आहे, असे स्पष्टीकरण यावर दिले जाऊ शकते. भारतीय कंपन्यांच्या नफ्याच्या कामगिरीतील ताज्या सुधाराकडे त्यासाठी बोट दाखविले जाईल. ही कारणे विचारात घेऊनही बाजारातील भरधाव तेजी आणि तिने सध्या गाठलेल्या पातळीला न्याय्य ठरविता येणार नाही. किंबहुना त्यासंबंधाने सावधगिरीचा इशारा, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीच अलीकडे दोन प्रसंगी दिला आहे. दहा दिवसांपूर्वी रिझव्‍‌र्ह बँकेच्या वित्तीय स्थिरता अहवालाच्या प्रस्तावनेत दास यांनी, वास्तवविसंगत बाजाराचे ताणलेले मूल्यांकन हे देशाच्या आर्थिक स्थैर्यासही धोकादायक असल्याचे म्हटले आहे. मूल्यांकन ताणलेले असणे म्हणजे काय, तर सेन्सेक्स निर्धारित करणाऱ्या ३० कंपन्यांचे किंमत-उत्पन्न (पीई) गुणोत्तर हे सध्या ३५ पट अशा अभूतपूर्व स्तरावर आहे. याचा अर्थ सेन्सेक्समधील ३० कंपन्यांच्या मिळकतीत प्रत्येक एक रुपयाच्या वाढीसाठी ३५ रुपयांची किंमत मोजण्याची गुंतवणूकदारांची तयारी आहे. यापूर्वी बाजाराचे असे बेभान मूल्यांकन बहुधा १९९२ च्या हर्षद मेहताप्रणीत तेजीतच दिसले आहे. पण त्यानंतर काय घडले तो कटू इतिहास सर्वज्ञात आहे. सध्याचा भांडवली बाजाराचा स्तर हा फुगा की अद्याप तो बुडबुडा हा वाद व्यर्थ. ही वाढ अनैसर्गिक व अवाजवी आहे इतके मात्र नक्की. मुबलक रोकडसुलभता आणि अन्यत्र संधीच्या अभावी परदेशी गुंतवणुकीचा ओघ सतत सुरू आहे. मागील काही महिन्यांत त्यांच्याकडून आलेल्या विक्रमी ३२ अब्ज अमेरिकी डॉलरमुळे बाजारात खरेदीचा पूर आला हेही खरेच. एकीकडे हे मातबर, तर दुसऱ्या टोकाला आपल्याकडचे ‘रॉबिनहूड गुंतवणूकदार’ ज्यांची संख्या एक कोटीच्या घरात जाणारी आहे. अमेरिकेतील ‘रॉबिनहूड’ या नावाने कार्यरत दलाली पेढीने शून्य दलालीसह गुंतवणूक खुली करून जी उलथापालथ घडवून आणली त्यावरून गुंतवणूकदारांच्या या नववर्गाची संकल्पना पुढे आली. करोना टाळेबंदीच्या काळात जसे लोकांनी पाकक्रिया, गायन-वादनापर्यंतचे अनेक कलागुण शिकून घेतले, तसेच समभाग गुंतवणुकीशी पहिल्यांदाच नाते जुळविलेलेही दिसले. सेवानिवृत्त, गृहिणी, विद्यार्थी, छोटे-मोठे व्यावसायिक आणि करोनाचा कहर म्हणून नोकरी गमवावी लागणारेही यात असतील. आता त्यांच्या मनात काय चालले आहे, हा कळीचा प्रश्न. कल्पनाही करवणार नाही असा नफा त्यांना निश्चितच दिसला असेल, पण तो गाठीशी बांधून घेण्याची सुज्ञता त्यापैकी किती जणांनी दाखविली असेल? खरेदी करणारा विदेशी हात जोवर आहे, तोवर ५० हजारी फुग्यात हवा भरणे सुरूच राहील आणि तोच हात विक्री करू लागेल, तेव्हा हा फुगा फुटलेला दिसणे अपरिहार्य आहे. त्या समयी उरतील ते उद्ध्वस्त गुंतवणूकदार व बाजाराच्या विश्वासार्हतेला गेलेला घायाळ तडा. सोनेरी तेजी काळ्या दिवसात बदलण्याआधी गुंतवणूकदारांकडून सुज्ञ निर्णय दिसावा, इतकेच!