24 October 2020

News Flash

ड्रॅगनचे पाकिस्तानी शेपूट

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ताणलेले संबंध सहज लक्षात येऊ शकतील.

पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाने अस्वस्थ असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या पाच वर्षांत अतिरेक्यांच्या कारवायांत ३५८ जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले, यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ताणलेले संबंध सहज लक्षात येऊ शकतील. आजवर हा प्रश्न केवळ या दोन देशांमधील होता. मात्र काश्मिरी अतिरेक्यांना थेट मदत करणाऱ्या मसूद अझहर या जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या म्होरक्यासही आपल्या पंखाखाली घेण्याच्या चीनच्या कृतीने आता भारत-पाक संबंधात चीनने हस्तक्षेप सुरू केल्याचे दिसते आहे. जम्मू-काश्मीरचे सार्वजनिक बांधकाममंत्री नईम अख्तर यांनी या संदर्भात व्यक्त केलेली काळजी भारतातील सरकारला विचार करायला लावणारी आहे. ज्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय अतिरेकी ठरवण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत सातत्याने आग्रह धरला, त्यास चीनने आपले अधिकार वापरून विरोध केला तेव्हाच खरे तर या गोष्टीची अंदाज यायला हवा होता. आंतरराष्ट्रीय दबावामुळे अतिरेक्यांचा सूत्रधार हाफीज सईदवर पाकिस्तान सरकारला कारवाई करणे भाग पडले, मात्र मसूद अझहरबाबत चीननेही आपली सारी ताकद पणाला लावली. अख्तर यांनी या घटनेचे महत्त्व विशद करताना भारताने चर्चेचा मार्ग सोडता कामा नये, असेही म्हटले आहे. पाकिस्तानला आजवर मिळणारी अमेरिकी मदत हा भारताच्या चिंतेचा विषय होता. गेल्या काही वर्षांत भारत-अमेरिका संबंधवृद्धी आणि ट्रम्प-नीती यांमुळे अमेरिकेनेही पाकिस्तानवर निर्बंध घालण्यास सुरुवात केली. त्याच वेळी चीनने पाकिस्तानचे पालकत्व घेणे आरंभले. पाकिस्तानमार्गे व्यापार वाढवण्यासाठी चीनने पाकव्याप्त काश्मीरमधून रस्ता तयार करण्यास सुरुवात केली, त्यास पाकिस्ताननेही पाठिंबा दिला. भारत व चीनमधील संबंध कायमच नाजूक राहिले आहेत. अमेरिका पाकिस्तानच्या मदतीला धावून जात होती, तोवर चीनने शांत राहणे पसंत केले. ही परिस्थिती बदलताच चीनने संपूर्ण आशियावरच आपले अधिक नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. मालदीवमधील राजकीय गोंधळात चीनने बजावलेली भूमिका म्हणूनच भारतासाठी उपद्रवमूलक ठरणारी आहे. पाकिस्तानकडून अतिरेक्यांना सातत्याने सर्व प्रकारची मदत केली जाते, हा भारताचा आरोप जगातील अनेक देशांनी मान्य केला असला, तरीही त्याकडे काणाडोळा करण्याची हिंमत करणे पाकिस्तानला शक्य होते, याचे कारण त्या देशास मिळालेला चीनसारखा नवा मित्र. पठाणकोटमधील हल्ला जैश-ए-मोहम्मद या संघटनेने घडवून आणल्यानंतर भारताने जागतिक व्यासपीठावर हा विषय नेला, मात्र त्या वेळी चीनने खोडा घातला. भारत-पाकिस्तान संबंधातील चीन हा तिसरा पक्ष भारताला काळजीत टाकणारा आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेले दगडफेकीचे प्रकार केवळ शस्त्रे हाती नाहीत म्हणून घडत आहेत. याच तरुणांहाती उद्या चिनी शस्त्रे आली, तर परिस्थिती आणखीच चिघळेल. ‘अशा वेळी चर्चेस नकार देणे ही राजकीय चूक ठरेल,’ असे अख्तर यांचे म्हणणे आहे. ‘पाकिस्तानला चीनची मदत मिळणे यात काही गैर नसले, तरीही चीनचे त्यामागील हेतू समजून न घेणे आत्मघातकीपणाचे ठरेल,’ असे मत पाकिस्तानातील शांततावादी विचारवंतही मांडू लागले आहेत. दुसरीकडे दगडाला गोळीने उत्तर ही भारतीय सेनादलाची भूमिका दूरदृष्टीची नाही, उलट त्याचे दूरगामी दुष्परिणाम होण्याचीच शक्यता अधिक, हे जम्मू-काश्मीरमधील पीडब्ल्यूपी पक्षाचे म्हणणे आहे. अशा वेळी भारताला चिनी ड्रॅगनच्या पाकिस्तानी शेपटाकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 2:38 am

Web Title: articles in marathi on china pakistan relations
Next Stories
1 साक्षीदारांना अभय हवे!
2 कावेरीच्या निकालाचा धडा
3 शिक्षण = राजकारण
Just Now!
X