पक्षाचा घसरता आलेख कसा रोखता येईल यावर विचार करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसांचे विचारमंथन रायगड जिल्ह्य़ातील कर्जत मुक्कामी पार पडले. राष्ट्रवादीसाठी सध्याचा तसा कठीण काळ. पक्षस्थापनेनंतर अवघ्या चार महिन्यांमध्ये सत्तेत आलेल्या राष्ट्रवादीने १५ वर्षे सत्ता भोगली. पण सत्ता गमाविल्यापासून राष्ट्रवादीला उतरती कळा लागली.  दिल्ली, मुंबई वा सध्या केरळ राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे कोणत्या ना कोणत्या भानगडींमध्ये नाव आले वा येत आहे. पक्षाचे स्थानिक पातळीवरील अनेक नेते वा कार्यकर्ते अन्य पक्षांमध्ये गेले. पश्चिम महाराष्ट्र या बलस्थानात भाजपने मुसंडी मारली. सहकार चळवळीतील राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडीत काढण्याकरिता भाजपने कुऱ्हाड चालविली. कधी भाजप तर कधी काँग्रेस, अशा तळ्यात-मळ्यातील भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या तीन वर्षांत विविध निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची पीछेहाटच झालेली बघायला मिळाली. राज्यातील चार मुख्य पक्षांमध्ये राष्ट्रवादी आजच्या घडीला चौथ्या क्रमाकांवर गेला आहे. अशा परिस्थितीत दीड वर्षांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकांमध्ये पक्षाला पुन्हा उभारी देण्याचे मोठे आव्हान पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर आहे. पक्षाबद्दल विश्वासाची भावना जनमानसात निर्माण करण्याची आधी आवश्यकता आहे. पण ते सोडून शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाच्या मुद्दय़ाला राष्ट्रवादीने पुन्हा स्पर्श केला. २००९ च्या निवडणुकांपूर्वी दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी नाशिकच्या अधिवेशनात पवारांच्या पंतप्रधानपदाचा मुद्दा उपस्थित केला होता. यंदा कर्जतच्या शिबिरात प्रफुल्ल पटेल यांनी २०१९ हे वर्ष शरद पवारांचे आहे व पक्षाची इच्छा पूर्ण होईल, असे सांगत पुन्हा एकदा पवारांचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणले. पवारांनी नेहमीप्रमाणे अशी चर्चा करणाऱ्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या. देशाचे नेतृत्व करण्याची पवारांकडे पूर्ण क्षमता आहे व हे साऱ्या पक्षांतील नेते मान्य करतात. पण त्याकरिता संख्याबळ आवश्यक लागते. २००९च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला वातावरण पोषक असताना खासदारांचा दुहेरी आकडा गाठता आला नव्हता. आता तर पक्षापुढे अस्तित्वाचा प्रश्न आहे. एकूणच सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादीसाठी पवारांचे पंतप्रधानपद हे दिवास्वप्न मानावे लागेल. याच शिबिराच्या दरम्यान पवारांनी आणखी एक राजकीय पुडी सोडून दिली. उद्धव ठाकरे आपल्याला भेटले आणि ते सत्तेत समाधानी नाहीत, असे पवारांनी जाहीर केले. तसेच शिवसेनेने पाठिंबा काढला तरी भाजप वा शिवसेना कोणालाही पाठिंबा देणार नाही, असेही सांगून टाकले. २०१४च्या विधानसभेचा संपूर्ण निकाल जाहीर होण्यापूर्वीच याच राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. शिवसेनेची नाराजी ही जगजाहीर आहे. पण हे शरद पवारांनी सांगण्यामागचे नियोजन काय, याचा राजकीय वर्तुळातील धुरिणांना नक्कीच प्रश्न पडला असावा. स्वत:च्या घराचा पाया कमकुवत असताना दुसऱ्याचे घर असुरक्षित आहे हे सांगण्याचा प्रकार झाला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या जवळिकीबद्दल नेहमीच चर्चा होते. पवारांपासून सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील आदी नेत्यांच्या सत्कार समारंभांना मुख्यमंत्र्यांपासून भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांना पाचारण केले जाते. त्यातून जनमानसात वेगळा संदेश जातो. राष्ट्रवादीबद्दल निर्माण झालेली नकारात्मक भावना बदलली गेली तरच पक्षाला बरे दिवस येऊ शकतील. कर्जतच्या शिबिरात महत्त्वाच्या विषयांवर विचारमंथन करण्यात आले; पण सामान्य नागरिकांचा विश्वास संपादन कसा करणार, हा खरा प्रश्न आहे. त्यावरच पक्षाचे यश अवलंबून राहील.