किमान कायदे तयार करणाऱ्यांचे वर्तन तरी कायद्याला धरून असावे असे लोकशाहीत अपेक्षित असते. त्याला सुरुंग लावण्याचे काम अचलपूरचे आमदार बच्चू कडू सातत्याने करीत आले आहेत. त्यांना बुधवारी न्यायालयाने सुनावलेली कैद हा अपेक्षाभंगाचा सज्जड पुरावाच आहे. उत्तरेकडील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील राजकारण सभ्य व सुसंस्कृत असल्याच्या समजाला छेद देण्याचे काम या शिक्षेने केले आहे. याआधी उमरेडचे आमदार सुधीर पारवे यांना, एका शिक्षकाला मारहाण केल्याबद्दल दोन वर्षांची शिक्षा झाली होती. ते प्रकरण वरच्या न्यायालयात तडजोडीने मिटले, पण लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर लागलेला कलंक मात्र कायम राहिला. विधिमंडळात लोकशाहीचे गोडवे गायचे आणि बाहेर मात्र तिला पायदळी तुडवायचे. असले प्रकार बच्चू कडू सातत्याने करीत आले आहेत. मंत्रालयापासून ते जिल्हा व तालुका स्तरावरील कार्यालयापर्यंत त्यांनी अनेकदा हात उगारला आहे. ‘असे केल्याशिवाय लोकांची कामेच होत नाहीत’, असा मुलामा ते असल्या बेकायदा कृत्यांना देत असतात व यातून लोकप्रियता मिळते असा त्यांचा भाबडा(?) समज आहे. ते पराभूत होईपर्यंत तरी हा समज कायम राहील असे सध्याचे चित्र असले तरी निकोप लोकशाहीसाठी हा प्रकार घातक आहे. वाढत्या अपघातांमुळे संतप्त होऊन पोलीस शिपायाला मारहाण करणाऱ्या बच्चू कडूंना या घटनेनंतर अपघाताचे प्रमाण घटले का, असा प्रश्न कुणीच विचारला नाही. त्यामुळेच ते सतत हिंसेचे समर्थन करणारी प्रमेये मांडत असतात व शिक्षा झाल्यावरसुद्धा लोकांच्या हितासाठी असा प्रहारी लढा सुरूच राहील, असेही म्हणत असतात. आजकाल कुणाही राजकारण्याला शिक्षा झाली की, मग गरिबांवरील अन्याय आठवतो. बच्चू कडूसुद्धा आता याच पंक्तीत जाऊन बसले आहेत. सामान्य जनतेचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी तसेच प्रशासनातील दिरंगाई, भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी व्यवस्थेने अनेक कायदेशीर मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. आमदार असलेल्या बच्चू कडूंजवळ तर या मार्गासोबतच विशेषाधिकाराचे कवचसुद्धा आहे. तसे करण्याऐवजी थेट कायदा हातात घेणे यालाच ते प्रमुख आयुध समजत असतील तर ते चूकच. बच्चू कडूंना मतदारसंघात लोकप्रिय असल्याचा मोठा अभिमान आहे. मात्र, कायद्याच्या कोंदणात न बसणारी अशी लोकप्रियता बरेचदा तकलादू असते याचे भान अजून त्यांना आलेले नाही. लोकप्रतिनिधींनी लोकांची कामे करण्यासोबतच समाजापुढे आदर्श निर्माण होईल अशी कृती करणेसुद्धा अपेक्षित असते; परंतु हिंसक कार्यपद्धतीतून कडू नेमका कोणता आदर्श निर्माण करत आहेत, असा प्रश्न या शिक्षेच्या निमित्ताने पुन्हा उपस्थित झाला आहे. संतापाच्या भरात घडलेली कृती एखादवेळी माफ करता येईल, पण कडूंकडून सातत्याने होत असलेले हिंसेचे तोंडी समर्थन काही निराळेच सांगते. अन्यायाविरुद्ध प्रहार करण्यासाठी प्रहार नावाची संघटना चालविणारे कडू हे प्रहार म्हणजे जणू प्रत्यक्ष ठोसाच आहे, असे वागत असल्याचे या निकालानंतर म्हणता येते. लोकप्रियता मिळवण्यासाठी हाच एकमेव व सोपा मार्ग आहे असा समज या आमदाराने करून घेतला असेल तर ते अजूनही मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत असे खेदाने नमूद करावे लागते. अभ्यासू, प्रामाणिक, कायद्याचा आदर करणारे व चर्चेतून प्रश्न सोडवण्यावर गाढा विश्वास असलेले असंख्य लोकप्रतिनिधी या राज्याने बघितले आहेत. त्याऐवजी बालिश प्रहारी मार्ग वापरणारे आमदार असतील, तर न्यायालयाची त्यांना वेसण हवीच.