अर्धसत्य सांगणे ही राजकीय कला मानली तर त्याचे ताजे उदाहरण म्हणून काँग्रेसचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे यांचे विधान सांगता येईल. गेल्या सत्तर वर्षांत या देशात काँग्रेसने लोकशाही टिकवली आणि त्यामुळेच एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकला, असे ते परवा मुंबईत अभिमानाने म्हणाले. यातील एक भाग अत्यंत खरा की, या देशात अजून संसदीय लोकशाही टिकून आहे. म्हणजे येथे सरकार निवडले जाते, त्यासाठी निवडणुका होतात. देशात निदान मताधिकाराच्या बाबतीत तरी सारे समान आहेत. लोकांना अद्याप आपल्या सरकारविरोधात बोलण्याचा अधिकार आहे. त्याच्या मर्यादा कमी कमी होत चालल्या असल्या, तरी लोक अजून तरी बोलू शकतात. त्यांना घटनेने स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. घटनेच्या बळावर लोक सत्ता उलथवूही शकतात. तेव्हा भारतात लोकशाही आहे, हे खरेच आहे. भारताबरोबरच स्वातंत्र्य मिळालेल्या अन्य राष्ट्रांच्या तुलनेत येथील लोकशाही सशक्तही आहे. परंतु हे कर्तृत्व कोणाचे? त्याचे श्रेय जाते इंग्रजीत ज्यांना ‘फाऊंडिंग फादर्स’ म्हणतात, त्या राज्यघटना-धुरिणांकडे. या देशाच्या अंतरंगात वाहात असणारा विविधतेतील एकात्मतेचा धागा बळकट करीत त्यांनी सामान्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या. लोकांना अधिकार देणे आणि त्याहून अधिक म्हणजे स्वातंत्र्य देणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नव्हे. स्वातंत्र्याचे भय असते लोकांच्या मनात. कारण स्वातंत्र्यात स्व-अर्थ असतो. त्यात स्वत:चे निर्णय घेण्याची, निवड करण्याची जबाबदारी अंगावर येत असते. ती स्वीकारण्यासाठी मने तयार करावी लागतात. पण लांबलचक प्रक्रिया असते ती. त्याबाबत सत्तर वर्षांत काय झाले, हा खरा प्रश्न आहे. खरगे लोकशाहीबाबत बोलतात, तेव्हा त्यांना आणीबाणीचा विसर पडला की काय अशी टीका होऊ शकते. पण त्याहून अधिक टीकास्पद बाब ही आहे, की लोकशाहीबाबत बोलताना त्यांना याचा विसर पडला आहे, की या सत्तर वर्षांत राष्ट्रनिर्मात्यांनी लावलेली लोकशाही मूल्यांची रोपे करपली आहेत. लोकशाहीचा नारळ वरून ठणठणीत दिसत असला, तरी तो आतून सडत चालला आहे. लोकांची मने गुलामच राहिली आणि येथे सरंजामी सामंतशाही निर्माण झाली. हे सामंत निवडून येतात. स्वत:स लोकसेवक म्हणतात. परंतु ते मालकच. मुखात राम आणि बगलेत सुरी हे त्यांचे राजकीय वर्तन. आणीबाणी हा त्याच वर्तनाचा एक आविष्कार. आता आपल्याला असे वाटते, की लोकांनी आणीबाणी आणणारांना धूळ चारली, तेव्हा लोकांच्या हातातच खरी सत्ता आहे. हा भ्रम कायम ठेवणे येथील सामंतशाहीच्या फायद्याचेच असते. शेवटी काहीही झाले, झेंडा कोणताही असला, तरी येथे सत्ताधारी असतो तो सामंतांचा वर्गच. काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षांत हा वर्गविग्रह संपविण्यासाठी काहीही न करता उलट तो वाढवीतच नेला. त्यात नुकसान झाले ते लोकशाही संस्थांचे आणि व्यवस्थेचे. ही राष्ट्रनिर्मात्यांशी, घटनेशी त्यांनी केलेली प्रतारणा आहे. या देशातील सर्वाधिक काळ सत्तेवर असलेला सर्वव्यापी पक्ष म्हणून हे पाप काँग्रेसचेच. ते नाकारून केवळ एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो ते या लोकशाहीमुळेच असे म्हणणे ही पुन्हा फसवणूकच. कारण चहावाला पंतप्रधान होण्यामागेही सामंतशाहीच – मग ती कॉर्पोरेट असो की राजकीय – असते. एरवी येथे ‘चहावाला’ साधी पक्षांतर्गत निवडणूकही जिंकू शकत नाही. हे आजच्या लोकशाहीचे वास्तव आहे. खरगे यांच्यासारखी मंडळी ते सांगणार नाहीत. ते आपले आपणच समजून घ्यायला हवे.. खऱ्या लोकशाहीसाठी ते गरजेचे आहे.